श्रीकांत विनायक कुलकर्णी
भारताविषयीची प्रचलित मतं अन वस्तुस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न म्हणजे हा लेख. सुरवातीस काही मतं पाहू. ‘जग जर एक घर मानलं तर भारत त्यातील देव्हाराच जणू’ असं म्हटलं गेल्याचं अलीकडेच वाचनात आलं. ‘अध्यात्माची भूमी म्हणजे भारत’ असं म्हटलं जातं, तरीही जगातील भ्रष्टाचाराचं नंदनवन गणलं जाण्यात आमचा क्रमांक अव्वल देशांमध्ये असतो. सभोवताली शिक्षण सम्राट वा शिक्षण महर्षी अशी बिरुदं मिरवणाऱ्या मंडळींकडनं उभारलेल्या अवाढव्य शिक्षण संस्था पाहायला मिळतात तरी खऱ्या उच्च शिक्षणाकरता भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशीच असल्याचं आढळतं. समाजजीवनातलं प्रत्येक क्षेत्र हे आज निव्वळ व्यापाराचं साधन म्हणूनच वापरलं जाताना आढळतं. शिक्षणापासून ते पार वैद्यकीपर्यंत, अगदी राजकारणसुद्धा हे धंदा म्हणूनच पाहिलं अन केलं जातंय. ज्यांच्या नावाखाली वा ज्यांच्याकरता हे करत असल्याचं म्हटलं जातं तो समाज, ते लोक म्हणजेच अर्थात तुम्हीआम्ही नागरिक केवळ असहाय्य, हतबल असे व्यवस्थेचे बळी ठरतोय. का होत गेलं असावं हे असं? केवळ आधीच्या किंवा आत्ताच्या राज्यकर्त्यांना याकरता जबाबदार धरून चालेल, की समाज म्हणून आम्हीच सारे याला जबाबदार आहोत? अशा प्रश्नांचा धांडोळा घ्यायच्या प्रयत्नात खालील मुद्दे समर्पक अन दखलपात्र वाटतात.
समाजजीवन हा मानवी उत्क्रांतीतला सर्वात अलीकडचा टप्पा गणता येइल. तर या उत्क्रांतीक्रमात धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या संकल्पना काय क्रमानं अस्तित्वात येत गेल्या असाव्यात? तसं पाहता मानवसमूहातील जवळजवळ साराच वर्ग कुठल्या ना कुठल्या स्वरूपात धर्माशी जोडलेला आढळतो, त्यामानानं विज्ञानाशी फार कमी अन तत्त्वज्ञानाशी तर अत्यल्प वा नगण्य. इथे जोडलेला असण्याचा अर्थ म्हणजे एकतर ‘त्याचं’ ज्ञान असलेला वा कळत नकळत ‘त्याच्या’ प्रभावाखाली असलेला वा आपण जगतोय ते ‘त्यास’ धरून अशी कल्पना असलेला असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. यातील ज्ञान असलेला वर्ग तसा संख्येनं कायम अल्पच असतो, परंतु आपणास हे ज्ञान आहे असं मानणारा अन अशा कल्पनेत जगणारा वर्ग फार मोठा असतो.
हेही वाचा >>>दहा मुद्दे : जरांगेंच्या आंदोलनातून ‘जातिअंताच्या लढाई’चे भले होणार का?
हा ऊहापोह करण्याचं कारण की या तिन्हींचाही आम्हा सर्वांच्या जगण्यावर खोल परिणाम होत असतो. आपलं विद्यमान समाजजीवन हे ह्या तिन्हींच्या संमिश्र प्रभावातूनच आकाराला आलंय. या साऱ्यात एक विरोधाभास असा पाहायला मिळतो की मुळातनं ज्याचा प्रभाव सर्वव्यापी, त्याचं ज्ञान तितकंच कमी असलेलं आढळतं. उदाहरणार्थ, वस्तू वरून खालीच येणार ह्या तत्त्वावर विसंबत दैनंदिन आयुष्यातल्या असंख्य गोष्टी आपण बेतत असतो, करत असतो पण यामागील गुरुत्वाकर्षण ह्या तत्त्वाचं वैज्ञानिक ज्ञान आम्हा सर्वांना असेलच असं नाही. किंवा, आम्ही सारे कायम काही ना काही निर्णय घेत असतो अन त्यानुसार कृतीही करत असतो, पण या साऱ्यामागे आपण नकळत तर्कशास्त्र वापरतो हे ज्ञान आम्हा सर्वांना असतंच असं नाही.
तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचं ज्ञान. यातील ‘तत्’ म्हणजे ‘ते’ आणि ‘असणं’ म्हणजे ‘त्व’- या दोन्हीचं मिळून ‘तत्त्व’- या तत्त्वाचं ज्ञान ते तत्त्वज्ञान. कुठल्याही गोष्टीचं, वस्तूचं, पदार्थाचं, संकल्पनेचं, वस्तुस्थितीचं यथार्थ आकलन, ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. या ज्ञानाची सुसूत्रित, सिद्ध स्वरूपातील, वस्तुनिष्ठ अन पुराव्यांनिशी केलेली मांडणी म्हणजे विज्ञान. म्हणजे, तत्त्वज्ञान अन विज्ञान या दोन्ही संकल्पना पूर्णतः वास्तवाधारित आहेत, मानवाच्या वास्तवातील जगण्यातनं उमटलेल्या आहेत, अभ्यास अन चिंतनातून खोलवर जाता येण्यासारख्या आहेत. याउलट धर्म ही संकल्पना पूर्णतः काल्पनिक आहे, उत्क्रांतशील मानवी मनाची भावोत्कट निर्मिती आहे. ती मानवी मनाची निर्मिती असल्यानं मानवागणिक बदलू शकणारी आहे. म्हणून ‘मानवता’ नामक एक धर्म सोडला तर सारे धर्म वेगवेगळे असलेले आढळतात. (इथे धर्म, रिलीजन, जीवनशैली यांच्या व्याख्या आणि त्यांतील भेद जाणून घेणं उचित ठरेल, पण या लेखाचा तो विषय नसल्यानं ती मांडणी येथे करणं टाळलंय.)
इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी वेगळा, एका ठराविक अर्थी श्रेष्ठतम ठरण्याचं कारण म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि अत्यंत व्यापक अशी स्मृती. स्मृतीतून भूत अन कल्पनेतून भविष्य या संकल्पना केवळ मनुष्यप्राणीच धारण करू शकला. या क्षमतेतनंच पुढे जाणिवा निर्माण झाल्या. यातूनच निर्माण झाली ती धर्म ही संकल्पना. ज्या प्रकारे अन ज्या कारणांसाठी धर्म ही संकल्पना निर्माण झाली त्यास मानवी बुद्धीच्या प्रगल्भतेचा अन प्रतिभेचा उच्चतम असा अविष्कार, असं मानावं लागेल. विविध कालखंडांत, विविध भागांत तात्कालीन भूसामाजिक भवताल अन मानसिकतांनुसार विविध धर्म उदयास आले. उदयापासून चालत आलेला धर्म या संकल्पनेचा प्रवास आजतागायत चालूच आहे.
हेही वाचा >>>ग्राहक संरक्षणाचा खेळखंडोबा किती दिवस चालणार?
धर्म ही संकल्पना जरी मूलत: प्रवाही असली तरी स्वरूप मात्र थिजत जात बंदिस्त होत गेलं. ज्या तरल अन प्रगल्भ चिंतनातून ही संकल्पना उदयास आली ते चिंतनच लोप पावू लागलं अन त्याजागी केवळ कर्मकांड, रूढी अन परंपरा राहिल्या. धर्मादी संकल्पनांचं काळानुरूप बदलत अधिक प्रगल्भ होत जाणं हेच त्यांच्या कालसुसंगत असण्याचं लक्षण असतं अन हेच अभिप्रेत असतं. ते नसता, संस्कृती अन सभ्यतांची डबकी होऊ लागतात की ज्याचे परिणाम मूळ उद्दिष्टांविपरीत अन अनिष्टसे होतात. कुठलीही अनिष्ट गोष्ट जेव्हा संस्थात्मक रूपात समाजात मान्यता पावते तेव्हा त्याचे परिणाम घातक होतात.
धर्माच्या बाबतीत घडत गेलेली सर्वात हानीकारक गोष्ट म्हणजे शंका घेण्यावर, प्रश्न करण्यावर आलेली, पर्यायाने बौद्धिक अभिसरणावर घातली गेलेली अलिखित बंदी. परिणामतः धर्माची विज्ञान अन तत्त्वज्ञानाशी फारकत झाली. यातील विज्ञानसुद्धा तेच खरं की जे कायम अंतिम सत्याची कास धरतं, जे आजपर्यंत कळलंय तेच पूर्ण सत्य असं मानत नाही.
समाजजीवन हे धर्म- विज्ञान- तत्त्वज्ञान या तिन्हींच्या संमिश्र प्रभावातूनच आकाराला येतं. यातल्या विज्ञान अन तत्त्वज्ञान यांच्या मानानं ज्याचा पगडा सर्वाधिक तो धर्मच अशा कुंठितावस्थेत असल्याने समाजावर अनिष्ट परिणाम होत जाणं क्रमप्राप्तच असतं. त्यात आणखी भर म्हणजे आपण अंगिकारलेली लोकशाही सत्ताव्यवस्था ही मुळात आमच्या परंपरांचा भाग कधी नव्हतीच. राजा हा विष्णूचं रूप मानून चालत आलेली राज्यव्यवस्था आणि वर्णजातीलिंग आदी भेदांवर आधारलेला समाज हा आमच्या अगदी अलीकडेपर्यंतच्या सत्ताव्यवस्थेचा पाया होता. या पायावर अचानक आम्हास अज्ञात असलेल्या पाश्चात्य तत्त्वज्ञानातून साकारत गेलेली लोकशाही स्थापली गेली. त्यामुळे आमची राज्यघटना पाळण्याची आस केवळ शब्दांपुरती मर्यादित राहात असल्याचं आढळतं. त्यात अभिप्रेत असलेला न्यायपूरक सर्वहितकारी समताधिष्ठित भाव मात्र दिसून येत नाही, किंवा लोकशाहीला अपेक्षित असलेलं समाजभान निर्माण होताना दिसून येत नाही.
हेही वाचा >>>यहाँ सब ग्यानी है..! सौरभ शुक्ला
हे सारं एकदा लक्षात घेतलं की आमचे लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते आदींच्या वर्तनाचा प्रसंगी खेद जरी वाटला तरी नवल वाटेनासं होईल. यांच्याकडनं काय अपेक्षा कराव्या याच्या मर्यादाही दिसू लागतील.
खरंतर यावरही मात करता येऊ शकते, किंबहुना असं होणं अत्यावश्यक आहे. परंतु हे तेव्हाच साध्य होऊ शकतं जेव्हा आपला जनमानस आम्ही अंगिकारलेल्या लोकशाहीची अंगभूत मूल्यं अन न्याय समतादी तत्त्वंही खऱ्या अर्थी अंगिकारू लागेल, त्यांचा यथार्थ असा मेळ आमच्या चालत आलेल्या परंपरांशी घालू शकेल.
हे करणं म्हणजे खोलवर रुजलेल्या वर्णजातीलिंगभेद भिनलेल्या मानसिकतेला तिलांजली देणं. आणि मुळात जर ‘आम्ही हे असे भेद मानतो, भेद करतो’ हेच आम्हाला मान्य नसेल तर भेद नष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पर्यायानं जे चालत आलं आहे त्यातही काही बदल होण्याची शक्यता राहात नाही. आपण सर्वांनी यावर विचार करणं आवश्यक आहे.
sk3shrikant@gmail.com