राहुल ससाणे
मुळात मराठी चित्रपटांत दलित नायकांचे योग्य चित्रण अपवादानेच होते. अशा स्थितीत कोणी या वर्गाचे जगणे पडद्यावर मांडू पाहत असेल, तर त्यात अडथळे आणले जातात. नामदेव ढसाळ कोण, हा सेन्सॉर बोर्डाचा प्रश्न त्याचेच उदाहरण. ढसाळ प्रस्थापितांना तेव्हाही पचनी पडले नाहीत आणि आजही पडत नाहीत, हेच खरे!
‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने केल्याची घटना नुकतीच घडली. शाहीर संभाजी भगत यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमात एक पोस्ट केली होती, ‘चल हल्ला बोल’ या सिनेमात नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा संदर्भ आहे. आणि या अनुषंगाने सेन्सॉर बोर्डाच्या काही सदस्यांनी विचारले, कोण नामदेव ढसाळ?’ काही विशिष्ट लोकांनी ढसाळ यांचे अस्तित्व नाकारले म्हणून ते लहान होत नाहीत. परंतु दलित, बहुजन, आदिवासी साहित्यिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र पूर्वीपासून सुरू आहे. या व अशा अनेक षड्यंत्रांच्या बेड्या तोडून नामदेव ढसाळ हे नाव वैश्विक पातळीवर गेले.
सेन्सॉर बोर्डाच्या वरील प्रश्नावरून एक गोष्ट लक्षात येते की, साहित्य क्षेत्रात आजही जातीयवाद कायम आहे. याच प्रस्थापित व्यवस्थेला विरोध म्हणून दलित साहित्यिकांनी अनियतकालिकाची चळवळ चालवली व आपली एक स्वतंत्र वाट निर्माण केली. आपल्या लोकांना, भाषेला, अभिव्यक्तीला या दुसऱ्या दुनियेत कुठेही स्थान नाही, याची जाणीव ढसाळ यांना झाली. आपले दु:ख आपणच, आपल्याच लोकांच्या भाषेत मांडावे, या विचारातूनच जन्म झाला त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचा- ‘गोलपिठा’चा. कवितेला ते ‘वर्गीय हत्यार’ मानत. या हत्याराचा वापर त्यांनी आयुष्यभर केला. खेड्यापाड्यांतील दारिद्र्याचा, अज्ञानाचा, दु:खाचा वेध त्यांची कविता घेते. ‘कविता लिहिणे ही राजकीय कृतीच आहे,’ अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यांनी कविता आणि चळवळ यांची सांगड घालून व्यवस्थेला प्रश्न विचारले. म्हणूनच आजची प्रस्थापित व्यवस्था त्यांचे अस्तित्व नाकारू पाहत आहे का?
दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ढसाळ यांनी ‘दलित पँथर’ संघटनेची स्थापना केली. ही चळवळ दोन-तीन वर्षेच टिकली आणि नंतर संघटनेत फूट पडली, मात्र या संघटनेकडून प्रेरणा घेऊन अनेक संघटना जन्माला आल्या आणि त्या आजदेखील कार्यरत आहेत. देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी संघटनांमध्ये दलित पँथर चळवळीची प्रेरणा जिवंत आहे.
ढसाळांची कविता
माणूस हा ढसाळांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. दलित, आदिवासी, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा ते आपल्या कवितेत आदरपूर्वक उल्लेख करत. ढसाळांच्या एकूण जीवनावर व साहित्य निर्मितीवर त्यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ या कवितेत ते म्हणतात,
बाबासाहेब मी साक्षात नतमस्तक तुमच्यापुढे
जी शिक्षा द्याल तुम्ही, ती जन्मभर भोगीन मी
आर्षकाव्यात शीळेचा उद्धार करणारे
अनेक पाहिले बाबासाहेब
तुम्ही दिलेली शिक्षा भोगून
माझा जन्म पवित्र होईल बाबासाहेब
ढसाळ येथे पुराणातील शिळेच्या कथेचा संदर्भ देऊन आजच्या नायकाचे मोठेपण सांगतात. त्यांच्या या संग्रहात या नायकाच्या जन्मापूर्वीची अवस्था व त्यानंतरची परिवर्तनाची अवस्था यातील तफावत अधोरेखित केली आहे. त्यासाठी अनेक जुने संदर्भ, कथा, प्रतिमा यांचा वापर ते करतात. त्यांचीशैली एका वेगळ्या अनुभवविश्वात घेऊन जाते. गावात बोलली जाणारी भाषा, मुंबईत वेगवेगळ्या विभागांत बोलली जाणारी, शालेय शिक्षणाची, पुस्तकांची भाषा, जगभरातील लेखक, कलावंत अभ्यासक, राजकारणी यांच्या भाषेचा प्रभाव नामदेव ढसाळ यांच्या भाषेवर दिसतो. या सर्व व्यमिश्रातून त्यांची भाषा आकाराला येते. ती काहींना शिवराळ वगैरे वाटते. किंवा त्यातील काही शब्द, प्रतिमा लवकर लक्षात येत नाहीत. पण ते जी भाषा वापरतात, ती भाषा बोलणारे लोक आहेत. त्यांना ती गैर वाटत नाही. एखाद्या विशिष्ट समूहाला ती भाषा समजत नसेल, तर त्यामुळे ती कमी दर्जाची कशी? उलट अशा विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारी भाषा ही साहित्याला समृद्ध करते. उदा- चंद्रबिंदी, जेवळी, सादळलेली झाडे, रांडकी पुनव, खैरबांडे, पांजरपोळ, डग्गा, धेड घायपोटलो, पाणचर गवशी, छप्पन्न टिकली, बहुचकपणा, मगरमच, बिंदाचिंदा, नेपाळी पोरी डावे-उजवे करतात इ. शब्द त्यांच्या साहित्यात आहेत. त्यांचा अर्थ लवकर लागत नाही. याचा अर्थ हे शब्द साहित्यात पूर्वी कोणीच वापरलेले नाहीत. ढसाळ ते सर्रास वापरतात. त्यांनी मराठी साहित्याच्या शब्दभांडारात भरच घातली आहे. उपलब्ध शब्दकोशांत या शब्दांचे अर्थ नाहीत. त्यांची उकल होण्यासाठी नव्या शब्दकोशाची गरज जाणवते. एखाद्या कवीच्या कवितेतील शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी नव्या शब्दकोशाची गरज भासणे निश्चितच त्या भाषेच्या विकासाचे लक्षण आहे. साहित्य क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्माश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ढसाळ यांचे साहित्य ‘समग्र नामदेव ढसाळ’ भाग- १ व २ प्रसिद्ध केले.
ढसाळ यांच्या कवितेची जगभरातील वाचक, समीक्षकांनी दखल घेतली आहे. कित्येक पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरणा देईल, असे त्यांचे कार्य आहे. असे असताना सेन्सॉर बोर्ड विचारते, कोण नामदेव ढसाळ? हा ढसाळांचा आणि स्वातंत्र्योत्तर दलित चळवळीचा अपमान आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात आता कुठे दलित, बहुजन नायक, लेखक, कवी व विचारवंत थोड्याफार प्रमाणात, प्रतिमा-प्रतीकांच्या माध्यमातून दाखविण्यास सुरुवात होत आहे. याआधी प्रस्थापित व्यवस्थेने बहुजन नायकांना कधीही योग्य प्रकारे दाखवले नाही. जे कलाकार व दिग्दर्शक हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करण्याचे काम ही प्रस्थापित व्यवस्था करत आहे. याउलट दक्षिण भारतीय चित्रपटांत दलित, बहुजन नायकांचा व त्यांच्या कथांचा, मिथकांचा व वास्तविक जीवनाचा प्रभावीपणे वापर केलेला दिसतो. अशाच स्वरूपाच्या निर्मितीला आपल्याकडे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे.
एकूणच नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी एका वाक्यात उत्तर द्यायचे म्हटले तर, इथल्या समग्र व्यवस्थेची, जातीपातींची, धर्मांची तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा करणारा व माणसावर, माणसाच्या जगण्यावर, त्याच्या माणूसपणावर अतोनात प्रेम करणारा आणि विश्वाला समानतेचा संदेश देणारा कवी म्हणजे नामदेव ढसाळ.
आभाळाला आजोबा अन् जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीतच
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माणसावरच सुक्त रचावे
माणसाचे गाणे गावे, माणसाने!
संशोधक विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
rbsasane8 @gmail.com