विजय मेश्राम-सैजल

कालच्या दलित समाजाने आरक्षणाचा फायदा घेतला आणि आजचा आधुनिक आंबेडकरी समाज स्वाभिमानाने जगत आहे. पण या शिक्षितांनी समाजासाठी काय केले? त्यांनी डॉ. आंबेडकरांनी दाखविलेल्या वाटेवर मार्गक्रमण केले का?

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

समाजातील शिक्षितांच्या प्रमाणावरूनच त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते, मात्र प्रत्येकच शिक्षित व्यक्ती समाजाच्या प्रगतीला हातभार लावते का? सामाजिक बांधिलकी जोपासते का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीवर नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाचा, येथील जाती-परंपरांचा, श्रद्धा-उपासनांचा सर्वथैव विचार केलाच, मात्र दलित, शोषित, पीडित समाजाचा विचार त्यांना प्राधान्याने करावा लागला, कारण त्यांनी ते दु:ख स्वत: भोगले होते. जातीयतेचे, अस्पृश्यतेचे चटके सहन केले होते.

येथील शूद्रातिशूद्र वर्गाची अवस्था जनावरांपेक्षाही भयंकर होती. येथील वर्णवादी समाजव्यवस्थेने त्यांना शिक्षणाचे अधिकार, लढाईचे- व्यापाराचे अधिकार, अगदी जगण्याचेही अधिकार नाकारले होते. अडीच हजार वर्षांपासून हे शोषण सुरू होते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात १६ (४) व्या अनुच्छेदानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास समाजाला नोकऱ्यांत आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण दिले. आज या आरक्षणाचा फायदा कालच्या दलित समाजाने घेतला आहे आणि आजचा आधुनिक आंबेडकरी समाज स्वाभिमानाने जगत आहे.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : थांगा डारलाँग

पण आरक्षणाचा लाभ घेणारे प्रत्येकच आरक्षणवादी आहेत का? प्रत्येकच आरक्षणभोगी हा आरक्षणवादी आहे का? ज्या समाजाने, समूहाने, व्यक्तीने बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारले, अनुसरले, त्या व्यक्तीची, समूहाची, त्या समाजाची नेत्रदीपक प्रगती झालेली आहे. पण प्रतिगामी विचारधारेच्या लोकांनी बाबासाहेबांना केवळ आरक्षणापुरतेच मर्यादित ठेवले. त्यांना बाबासाहेब हे केवळ एक व्यक्ती नसून ते एक परिवर्तनाचा, संपूर्ण क्रांतीचा विचार आहेत हे अद्याप कळलेले नाही! त्यांतील बरीच मंडळी आपल्याच तालात जगताना दिसतात. साडी, गाडी आणि माडी यापासून ते मुक्त दिसत नाहीत. बुद्धजयंती असो व बाबासाहेबांची जयंती असो, नागपूर येथील दीक्षाभूमी असो वा दादर मुंबई येथील चैत्यभूमी असो, गर्दी होतेच. मात्र ज्या वस्तीत राहतो तेथे ओळख लपविली जाते. याचे कारण एकच, स्वत:च्या समाजाविषयी आत्मीयता नाही. समाजाप्रति आपले काही दायित्व आहे, असे त्याला वाटत नाही! आणि म्हणूनच शिक्षित बांधवांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर, समाजाच्या प्रगतीला गती येणार नाही. समाजाचे नुकसानच होईल, हे आपण समजून घेतले पाहिजे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, ‘‘आजपर्यंत चळवळ झाली नाही याचे कारण तुमच्यात कोणी शिकलेले लोकच नव्हते. शिक्षणामुळे माणसाला व समाजाला डोळसपणा प्राप्त झाला.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांमुळे दलित, उपेक्षित समाजात मोठी क्रांती झाली. मोक्याच्या जागा मिळाल्या. तथापि हा शिक्षित वर्ग, ज्याने संविधानातील आरक्षणाच्या तरतुदींचा भरपूर फायदा घेतला, स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाचे आयुष्य सावरले तो समाजातील गोरगरीब समाजापासून फार दूर गेलेला दिसतो. खेडे सुटले, शहरात गेले, तेथे त्यांनी बस्तान मांडले, पण खेडय़ातील आपल्या कुटुंबातील मंडळींकडे, गरीब भावंडांकडे त्यांनी पाठ फिरविली. ज्याला आपल्या समाजाविषयी कळकळ नाही, तो आपल्या पदाचा उपयोग केवळ आपल्याच स्वार्थासाठी करतो. असा अधिकारी, पदाधिकारी काय कामाचा? बांधिलकी अंगीकारली आहे, असा साधारण कारकूनसुद्धा आमच्या मते त्या अधिकाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे भाषण झाले होते. हे ऐतिहासिक भाषण कामगार चळवळीचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, बहुजनांनी महत्त्वाच्या जागा काबीज केल्या पाहिजेत तसेच सुशिक्षितांनी आपल्या बांधवांची सेवा केली पाहिजे. आज महत्त्वाच्या जागा मिळविण्यात बहुजन समाजाने काही अंशी मजल मारलेली दिसते. हे चित्र तेवढे समाधानकारक नसले तरी निराशाजनक मात्र अजिबात नाही. तथापि आरक्षणभोगी सुशिक्षित बांधवांनी आपल्या अज्ञानी बांधवांकडे विशेष असे लक्ष दिलेले नाही. हा सुशिक्षित समाज केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करणारा आत्मकेंद्रित झालेला दिसतो.

आपला मुलगा आपल्याला हिऱ्यासारखा वाटतो. तो आपला प्राण वाटतो. हा निसर्गाचा नियमच आहे! पण समाजातील गोरगरीब, गुणवंत मुलांबद्दल आपल्याला असे का वाटत नाही? आपणही डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, आयएएस व्हावे असे त्यांनाही वाटते, पण पुरेशा पैशांअभावी, मार्गदर्शनाअभावी ते स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत! म्हणूनच आपण आपल्या मुलाएवढेच समाजातील गरीब, गुणवंत मुलांच्याही शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. तरच बहुजन समाजाची प्रगती अधिक वेगाने होईल.

कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व या तिन्ही गुणांनी मिळून आपले व्यक्तिमत्त्व सजते. नेतृत्व ही कला आहे. पण जी कला समाजावरील संकट दूर करू शकत नाही, अशी कला काय कामाची? मग ती मनोरंजनापुरतीच मर्यादित राहते. वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी. दातृत्व ही मनाची सर्वोच्च आदर्श भावना आहे आणि तोच आपल्या कर्तृत्वाचाच भाग आहे. आपल्याकडे गडगंज संपत्ती असावी, अशी बहुतेकांची इच्छा असते. त्यामुळे शक्य त्या मार्गाने संपत्तीचा संग्रह करायचा आणि आपले विलासी जीवन जगायचे अशी साधारण भावना असते.

पण संपत्ती संग्रहाकडे अपरिग्रहाच्या नजरेतून पाहायला हवे. नीतीच्या मार्गाने संपत्तीचा संग्रह करायचा तरीही त्याला काही मर्यादा आहेत. संपत्ती संग्रहासोबतच आपण सामाजिक दायित्वाचे भान ठेवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार आपल्या मिळकतीचा विसावा भाग समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी उपयोगात आणला पाहिजे, पण आज असे घडणे अतिशय दुर्मीळ झाले आहे.

आपल्या मुलाची क्षमता वा इच्छा, असो वा नसो लाखो रुपये खर्च करायचे केवळ समाजात मान मिळविण्यासाठी! असा उपद्वय़ाप समाजात चिरंजीव होत चालला आहे. समाजाच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी, आपल्या देशाला आई मानणाऱ्या भावनेच्या विकासासाठी, भातृभावाच्या कल्पनेच्या विकासासाठी, एवढेच नव्हे तर ‘वसुधैव कुटुंबकम’ या बुद्धवचनानुसारसुद्धा अशी भावना ही आपपरत्वाची भावना वाटते, जी माणुसकीला शोभणारी नाही. आमचे असे म्हणणे नाही की, आपण आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ समाजाचाच विचार करावा त्यासाठी घर उधळून मांडव टाकावेत, पण स्वत:च्या प्रगतीसोबत समाजाची प्रगती साधता आली पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार आम्ही अंगीकारला पाहिजे.

ते कुठे गेले? ते काय करत आहेत?

९ ऑक्टोबर १९३९ रोजी इंग्रज सरकारचे व्हाइसराय लॉर्ड लीनलिथगो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. याच काळात बाबासाहेबांच्या शिफारशीवरून अस्पृश्य वर्गातील १५-१६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचा खर्च तत्कालीन सरकारने केला होता. १६ वे विद्यार्थी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे स्वत:च्या खर्चाने परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी व मानसपुत्र होते. चंद्रपूर येथे बॅ. खोब्रागडे यांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्यांनी त्या ठिकाणी हजारो लोकांना दीक्षा देऊन २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर, ६ डिसेंबर १९५६ नंतर बाबासाहेबांच्या समाजाच्या रथाला बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांनी गती दिली. त्यांची चळवळ अखेपर्यंत अविरत सुरू ठेवली. बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांनी दिलेल्या धम्माला पुढे नेण्याचे काम बॅ. खोब्रागडे यांनी केले. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये काढली आणि या समाजाला शिक्षणाची दारे उघडी करून दिली. तथापि ज्या १५ विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले होते त्यापैकी कोणी समाजासाठी काय केले? त्यांचे समाजासाठीचे- आपल्या दलित, शोषित बांधवांच्या उत्थानासाठी काय योगदान आहे, हाही एक चिंतनाचा भाग आहे!

अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आग्रा येथे १८ मार्च १९५६ रोजी केलेल्या भाषणाचे स्मरण होते- ‘मला माझ्या शिकल्यासवरल्या लोकांनी धोका दिला आहे!’

लेखक महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Story img Loader