अजिंक्य विश्वास

सुहास शिरवळकर यांच्या अमृत जयंतीचे हे वर्ष- वाचकांचे लाडके कादंबरीकार ठरलेले शिरवळकर आज हयात असते, तर १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असती… पण शिरवळकर आपल्यात नसल्याला देखील यंदा २० वर्षे झाली आहेत. शिरवळकर यांच्या लेखनाच्या सुरुवातीला २०२३ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या साहित्यिकाची आठवण, त्याचे साहित्य आजही नवीन पिढीच्या वाचनात राहून सतत जिवंत राहाते, हे आजच्या ‘इन्स्टंट’ युगाच्या बाबतीत तसे आक्रीत वाटेल.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?

एखादा साहित्यिक आपल्या साहित्याच्या दर्जामुळे वाचकांच्या मनात घर करतो हे ग्राह्य धरल्यास, ‘सु.शि.’ (हे त्यांच्या वाचकांनीच त्यांना प्रदान केलेले संक्षिप्त उपनाम) आजच्या काळातही तिलकेच ‘रिलेव्हन्ट’ आहेत जितके ते १९७३ मध्ये होते, आणि वाचकांची त्यांच्या साहित्याबद्दलची ओढ पाहता ते येत्या काळातही तितकेच ‘रिलेव्हन्ट’ राहतील, यात शंका नाही. त्यांचे साहित्य वाचकांच्या कमीत कमी तीन पिढ्यांमध्ये वाचले गेले आहे आणि आजही तितकेच ताजेतवाने आणि वाचनीय आहे, हे सिद्धहस्त साहित्यिक असण्याची पावती आहे.

शिरवळकरांच्या साहित्य यादीच्या आकडेवारीने त्यांची साहित्यिक उंची कमी किंवा जास्त होत नाही, पण उदाहरणच द्यायचे झाले तर, त्यांच्या १७५ रहस्यकथा आणि ७१ कादंबऱ्या या सर्वांची किमान द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली आहे. सोबतच यातले जवळपास सर्व साहित्य शिरवळकर गेल्यानंतरही २० वर्षांनी पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहे. साहित्य क्षेत्रात याला मागणी असल्याने त्यांची जवळपास सर्व सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत; याची नोंद घेणे आवश्यक ठरते.

शिरवळकरांच्या लिखाणाचे तीन टप्पे प्रामुख्याने महत्त्वाचे ठरतात. १९७३ ते १९७९ हा पहिला, १९८० ते १९८९ दुसरा आणि १९९० ते १९९८ तिसरा टप्पा. १९७३ ते ७९ हा काळ त्यांच्या रहस्यकथा लिखाणाचा आहे. हाच कालखंड रहस्यकथेचा सुवर्णकाळ मानला जातो. रहस्यकथेच्या क्षेत्रात आपला दबदबा राखून अनेक लोकांच्या मनात राज्य करणारे बाबूराव अर्नाळकर यांच्या लेखणीचा प्रभाव या काळात उतरणीला लागला होता. याच वेळी नव्या दमाच्या गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे, एस्. एम्. काशीकर, सुभाष शहा यांनी अर्नाळकरांची जागा घेतली होती. यांच्या रहस्यकथा वेगळ्या बाजाच्या असल्याने त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या होत्या.

पटवर्धन, दारा बुलंद, अमर विश्वास, फिरोज इराणी…

एका प्रसिद्ध रहस्यकथाकाराने शिरवळकरांना ‘चॅलेंज’ दिल्यामुळे त्यांनी पहिली रहस्यकथा लिहिली, ‘गोल्ड हेवनचे गूढ’! नायक होता मंदार पटवर्धन. ही रहस्यकथा लोकांना आवडली आणि मग त्यांनी रहस्यकथा लिहिणे सुरू ठेवले. त्यांचे मंदार पटवर्धन, दारा बुलंद, अमर विश्वास, फिरोज इराणी हे वेगळ्या पठडीतील नायक अल्पावधीतच लोकप्रिय झाले आणि प्रकाशकांकडून शिरवळकरांच्या कथांना मागणी वाढली.

इतर रहस्यकथाकार महिन्याला सात-आठ, कधी कधी तर १२ रहस्यकथा लिहित असताना देखील सु.शिं.च्या १९७३ ते १९७९ या सहा वर्षांच्या कालावधीत सरासरी ३० रहस्यकथा प्रति वर्ष अशा प्रसिद्ध झाल्या. त्यातही त्यांनी विविधता देण्याचा प्रयत्न केला. इतर ‘बुरखाधारी’, ‘व्हिजिलन्ट’ नायकांची चलती असताना, स्वत:च्या बुद्धिमत्तेवर व पराक्रमावर भरवसा ठेवणारे, सामान्यांना जवळचे वाटणारे असे त्यांचे नायक मिष्कील वृत्ती घेऊन आले. केवळ कथानकावर आणि वैचित्र्यावर भर न देता भावनांना आणि मानवी सहज प्रवृत्तींना टिपणारे शिरवळकर, त्यामुळ त्यांचे नायकही अधिक मानवी होते. म्हणूनच त्यांच्या रहस्यकथा आज २०२३ सालीही कालबाह्य न होता, नवीन पिढीला देखील आपल्याशा वाटतात, हे त्यांच्या रहस्यकथांचे वैशिष्ट्य. त्यातच त्यांनी भय/ विस्मय/ मुक्त रहस्यकथा लिहिल्या ज्या नायकप्रधान नसूनदेखील तितक्याच आकर्षक होत्या.

शिरवळकरांचा मुख्य पिंड जात्याच कादंबरीकाराचा होता. त्यामुळे दर रहस्यकथेचे ७०-८० पानांत कथानक संपवावे लागणे, त्यासाठी प्रकाशकांनी आग्रह केल्यामुळे रहस्यकथेच्या घटनांमध्ये तडजोड करणे, याचा कंटाळा येऊन शिरवळकरांनी १९७९ नंतर सामाजिक कादंबरी लिहायचा इरादा केला.

हा त्यांच्या लिखाणातील दुसरा टप्पा

‘कोवळीक’ ते ‘दुनियादारी’…

कथेची मांडणी, त्यातील आशय आणि घटनाप्रधान कथानक यांवर शिरवळकरांचा हात बसला होता. त्यातच नायकांच्या मालिकेचे आणि पानांचे बंधन सुटल्यामुळे हव्या त्या पद्धतीने कथानक हाताळून त्याला योग्य न्याय देणे हे त्यांना सहज जाऊ लागले. त्यांच्या मुक्ती, कोवळीक, जाई, तलाश, दुनियादारी, सालम, तलखी, सॉरी सर या कादंबऱ्यांनी त्यांना हां हां म्हणता वाचकप्रिय केले.

मुळातच वाचनीयता, रंजकता शिरवळकरांच्या लिखाणात होती, मात्र त्यांनी कादंबरी हे माध्यम केवळ रंजनाकरता न वापरता, काही नवीन विचार, काही नवीन दृष्टी समाजाच्या नकळत समाजाच्या मनात पोहोचवायचे काम केले. त्यांच्या कादंबऱ्या वाचून केवळ रंजन न होता, काही काळ समाज अंतर्मुख होतो, हे त्यांच्या लेखणीचे यशच आहे. त्यात सॉरी सर, तलखी, कोवळीक, प्रतिकार (या कादंबरीबद्दल ते बोलताना नेहमीच ही ‘बलात्कारा’वर कादंबरी नसून त्याच्या ‘प्रतिकारा’वर कादंबरी आहे, असे ठामपणे म्हणायचे.), दुनियादारी, बंदिस्त, तलाश असे विविध विषयांवर लिखाण त्यांनी केले.

या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘जमीन- आसमान’ आणि ‘रूपमती’ अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील कादंबऱ्याही लिहिण्याचे धाडस केले. ‘जमीन- आसमान’ची उर्दूमिश्रित मराठीची शैली असो वा मध्यप्रदेशातील भाषेचा लहेजा मिरवणारी ‘रुपमती’ असो, त्यांच्या कादंबऱ्यांची आशयपूर्ण मांडणी वाचकांना भावली होती.

साहित्यविश्वाच्या कोतेपणाचे ‘रहस्य’!

या काळातच शिरवळकरांना साहित्य-विश्वाचा एक वेगळा अनुभव आला. त्यांची रहस्यकथा-लेखक म्हणून झालेली सुरुवात त्यांना सामाजिक कादंबऱ्यांचे लेखक म्हणून मान्यता देण्यात कमी पडत होती. अर्थातच हा साहित्यविश्वाचा कोतेपणा म्हणला पाहिजे. एखाद्याने रंजक लिखाण केले म्हणून त्यांना वाचकप्रिय म्हणून मूळ प्रवाहातून वगळणे हे मराठी साहित्यविश्वात सर्रास घडत होते, आणि असतेही. वाचकप्रिय, लोकप्रिय, अभिजात, समीक्षकांचे लाडके असेही लेखनात प्रकार असतात, आणि त्यांचा परिणाम एखाद्या लेखकाच्या अवघ्या कारकीर्दीला ‘शाप’ म्हणून ग्रासू शकतो, हे त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते.

शिरवळकरांच्याच शब्दात सांगायचे झाले तर- ‘साहित्यिक आणि त्यांचं साहित्य यांचा समाज-मानसावर परिणाम होत असतो. यातून सामाजिक विचारधारा घडत वा बिघडत असते. या कारणामुळं आपण सहजपणे साहित्यिक व समाज… कलावंत व समाज… अशी विभागणी करीत असतो. या विभागणीमध्ये श्रेष्ठत्व कायम कलाकार व साहित्यिकांकडे जातं आणि समाजाकडे नेहमी गौणत्व येतं. परंतु, समाजशास्त्रीयदृष्ट्या विचार केल्यास, कोणीही कलाकार वा साहित्यिक हा आकाशातून पडलेला नसतो. तो स्वयंभू नसतो. फार तर असं म्हणता येईल, की ही माणसं इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक प्रगल्भ जाण… दूरदर्शित्व… मनकवडेपण… विवेक व विचारशक्ती… असे काही वेगळे- दुर्लभ गुण घेऊन जन्माला आलेली असतात. याचा दैवदत्त फायदा म्हणून, ती सामाजिक प्रश्नांकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. आपले दृष्टिकोन मांडून, समाजाचे दिशा-दर्शक होतात. असं असलं तरी, आपण हे विसरून चालणार नाही, की ज्या कौटुंबिक वातावरणात ही माणसं लहानाची मोठी होतात- ज्या समाजात ती वावरतात, ज्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे अनुभव त्यांच्या पदरी पडतात, त्या साऱ्याचाच त्यांच्या जडण-घडणीत सिंहाचा वाटा असतो!

म्हणजेच, हे असं होईल, की तत्कालीन सामाजिक परिस्थिती साहित्यिक वा कलाकार घडवत असते. त्यांच्या मनावर या परिस्थितीचे जे परिणाम होतात, त्यांचेच पडसाद- त्यांचीच प्रतिबिंबं या कलाकार, साहित्यिकांच्या कला व साहित्यकृतीत निरनिराळ्या पद्धतींनी अभिव्यक्त होतात. ‘शब्द’ या माध्यमाशी थेट संबंध येत असल्याने साहित्यिक आणि वाङ्मयाबाबत तर हे सत्य त्रिकालाबाधितच आहे! याचाच अर्थ असा होतो, की समाजातलंच भलं – बुरं घेऊन, साहित्यिक आपल्या विचारशक्तीने, त्यांचं पृथःकरण करून ‘आहे’ ते, ‘नाही’ ते, ‘असावं’ ते, आणि ‘नसावं’ ते – असं समाजासमोर मांडत असतो. या लेखनाचा पुन्हा समाजाच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. या चक्रातूनच समाज बदलतो; समाज बदलला, की साहित्यप्रवाह बदलतात!’

हे चक्र दुर्दैवाने आपल्या मराठी साहित्य-विश्वात मानले जात नाही. केवळ रंजक म्हणून ते ‘अभिजात’ नाही असे समजणारे आणि केवळ सुरुवातीला रहस्यकथा लिहिली म्हणून म्हणून शिरवळकर हे केवळ क्षणभंगुर रंजनाचा आधार घेऊन सवंग लिखाण करणारे असे दूषण त्यांच्यावर लादले गेले. अर्थातच हे शिक्के काही साहित्यिक प्रवृत्तींपुरते मर्यादित होते. लोकांना या गोष्टीचा कधीही दुजाभाव न वाटता त्यांनी नेहमीच आपल्या पिढीचा एक जागता दुवा म्हणून शिरवळकरांना आपले मानले.

रंजनाच्या पलीकडे न जाता केवळ शैली आणि वाचकांच्या घाऊक आवडीनिवडीवर आपले साहित्य बेतणारे काही काळ लोकप्रिय राहू शकतात. पण कालबाह्य झालेले दूर सारून, नव्या विचारांचे, आशयाचे आणि कुठल्याही वैचारिक अभिनिवेशाला शरण न जाता केलेले लिखाण ‘रंजक’ असले तरी कालजयी ठरतेच, हे अशा काही साहित्यिक-समीक्षक वर्तुळाला समजणे अवघड असते, एवढेच त्यातून निष्पन्न झाले.

यामुळेच शिरवळकांच्या लिखाणाच्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी अधिकच प्रगल्भ लिखाण केलेले आपल्याला दिसते. १९९० ते १९९८ या काळात त्यांच्या कल्पान्त, हिन्दोस्ता हमारा, झूम, मधुचंद्र, हृदयस्पर्श, चूक-भूल…देणे: घेणे, हमखास, निमित्तमात्र यांसारख्या कादंबऱ्याच विशेष लक्षवेधी ठरतात. यातील विचारांची मांडणी, आशयाची खोली आणि विचारमंथन हे घटनाप्रधान न राहता वैचारिक आंदोलनात सामावलेले दिसते. त्यामुळे कथानकाची मांडणी ही वाचकांना अधिकच अंतर्मुख करून काही काळ नि:शब्द करणारी ठरते.

कथा आणि कविता

त्यांच्या या लिखाणाच्या टप्प्यांपलीकडेही त्यांच्या कथा आणि कविता हा त्यांच्या साहित्याचा अविभाज्य घटक आहे. त्याला वेगळे करून शिरवळकरांने साहित्य तोलणे अशक्य आहे. मुळातच कवी प्रवृत्तीचे शिरवळकर हे आपल्या कथांमधून आणि कवितेमधून एक वेगळा आलेख मांडत आले आहेत. त्यांची ‘गुलबकावली आणि नागमणी’ ही एक उत्कृष्ट कथांमध्ये सहज सामावली जाऊ शकते. सर्पयोग, अखेरच्या क्षणी, शृंगार-क्षण, अंधारभूल, देवाघरची फुलं, जस्ट हॅपनिंग, ते घर!, शमन, निरर्थ, देवकी, यंत्र, अर्घ्य, चाफा, या कथा कधीही त्यांना एक उत्तम कथालेखकाचा दर्जा देतात. कादंबरीकार असणे हे त्यांच्या कादंबऱ्यांच्या बाबतीत नशीब ठरले, तेच त्यांच्या कथांच्या बाबतीत मारक ठरले.

कादंबरीकार म्हणून वाचकांना अधिक प्रिय, अधिक परिचित असल्याचा तोटा त्यांना कथालेखक म्हणून झाला. केवळ त्या लवकर संपतात, एवढ्याच कारणाने त्यांच्या लिखाणाच्या चाहत्यांनी त्यांच्या कथांकडे दुर्लक्ष केले. अर्थातच हा मानवी स्वभाव असल्याने त्याचा फारसा फरक शिरवळकरांना पडला नाही. कदाचित ते स्वत: कादंबरीकार म्हणूनच स्वत:ला पाहात असल्यानेही वाचकांना त्यांच्या कथांचा आस्वाद दीर्घकाळ मिळाला नाही.

समीक्षेबद्दल शिरवळकर…

या सोबतच त्यांच्या प्रस्तावना आणि सदर लेखन या दोन लेखनप्रकारामुळे एका लेखकाची जडण-घडण, त्यांच्या कादंबऱ्यांच्या जन्मकथा आणि त्यांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रे त्यांच्या वेगळ्या पैलूचे दर्शन घडवतात.

एखाद्या ‘लोकप्रिय’ साहित्यिकाने आपल्या लेखन-प्रवासाचा लेखाजोखा मांडणे ही मराठी साहित्यात दुर्मिळ अशी घटना. केवळ या कारणामुळेही शिरवळकरांचे साहित्यातील स्थान निश्चित करता येते. साहित्यक्षेत्रातील घडामोडींचा साक्षात एक इतिहास त्यांच्या या लेखनाने मांडला गेला आहे, ज्यात रहस्यकथांपासून लोकप्रिय साहित्याची आणि अभिजात साहित्याची माहिती सहज वाचकांना होऊ शकते.

या मंथनात शिरवळकरांनी समकालीन समीक्षेबद्दल आपले जे मत मांडले आहे, ते काही अपवाद वगळता आजच्या काळातही तितकेच स्पष्ट आणि मार्मिक आहे हे सहज कळते. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर-

‘‘लोकप्रिय’ वाङ्मयाला चांगलं म्हणणारी समीक्षा श्रेष्ठ – असा माझा आग्रह असेल, तर तो तद्दन स्वार्थी; तसंच, ‘लोकप्रिय’ लेखन म्हणजे ‘झोडण्याची संधी’ – असं कोणाला वाटत असेल, तर तेही कृत्रिम – धंदेवाईक – पूर्वग्रहदूषित, म्हणून हिणकस होय! समीक्षेचा एकांगी वापर आणि विचार न करता, ‘त्या’ विवक्षित कलाकृतीचा पूर्वग्रहविरहित असा, संतुलित परामर्श घेणारी, ती खरी आदर्श समीक्षा! आज या समीक्षेची खरी गरज आहे, असं मला वाटतं. –

आणि, हेही तितकंच स्पष्ट आहे की, ‘समकालीन समीक्षा’ या आदर्श समीक्षेच्या कसोटीला कधीच उतरू शकणार नाही! कारण, लेखकाशी असलेले मैत्रीचे वा शत्रुत्वाचे संबंध… लेखक आपल्या ‘कळपात’ला आहे, का दुसऱ्या कळपातला… लेखकाची व्यक्तिगत वर्तणूक चांगली/वाईट असणं… तो नीती- अनीतिमान असणं… या, नि अशा सर्वच घटनांचा समीक्षेवर बरा-वाईट परिणाम होत राहणार! मला तर वाटतं, ‘समकालीन समीक्षा’ ही या परिणामांमुळे कायम फसवी राहणार. कोणत्याही साहित्यकृतीची व्यक्ति–मत–निरपेक्ष अशी समीक्षा, साहित्यिकाच्या मृत्यूनंतर, पन्नास वर्षांनीच होणं शक्य आहे! कारण, त्या वेळी सदर साहित्यिकाचे गुणावगुण – त्याचे कळप… इ. गोष्टींचा तत्कालीन समीक्षकांवर काहीही परिणाम असण्याचं कारण नाही! ती पूर्णतः व्यक्तिनिरपेक्ष व साहित्यसापेक्ष असू शकेल!’’

१९७३ ते १९९८ या २५ वर्षांच्या लेखनप्रवासात शिरवळकारांनी अनेक भले-बुरे अनुभव घेतले असतील; पण वाचकांची साथ त्यांना आजही तितकीत उत्कट प्रेमाची आणि मोलाची ठरली आहे. त्यांची पुस्तके आजही वाचकांमध्ये आहेतच, पण सोबतच सिनेमा, वेब सिरीज, ऑडिओ बुक या विविध माध्यमांतूनही अजूनही वाचक, प्रेक्षक आणि रसिक त्यांच्या लेखणीच्या प्रेमात आकंठ डुंबत राहून त्याचा आस्वाद घेत आहेत.

त्यांनी म्हणाल्याप्रमाणे ‘५० वर्षांच्या कालावधी’तला २५ वर्षांचा प्रवास त्यांनी सहज पार केला आहे. अजून पुढील २५ वर्षांच्या प्रवासात त्यांचे वाचक आणि इतरही नवीन पिढीचे साक्षीदार सोबत असतील यात मला तीळमात्रही शंका नाही.

लेखक फेसबुकवरील ‘सुहास शिरवळकर फॅन पेज’ (sushi.fanpage) चे संस्थापक आहेत.

amarvishwas13@gmail.com