मधुरा गोविंद
प्राथमिक शिक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा विषय एक पालक म्हणून मांडू इच्छिते. गेले दोन महिने ट्विटर, फेसबुक, ईमेल अशा माध्यमातून राज्य तसेच केंद्र सरकारमधील प्राथमिक शिक्षणासंदर्भातील अधिकारी तसेच मंत्री महोदयांपर्यंत हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या व्यासपीठावरून तो मांडण्यासाठी हा प्रयत्न.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पहिली प्रवेशावेळी विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण हवे असे गेले दोन वर्ष सांगितले जात असूनही महाराष्ट्रात वेगळे निकष लावण्यात आले. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत जन्मलेल्या बालकांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. फेब्रुवारी २०१४ मधील या संदर्भातील आदेशामध्ये या निर्णयाचा उल्लेख झालेला असून जवळजवळ २०२१ सालापासून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे केंद्र शासनाने सांगितले असल्याचे दिसून येते. पण २०१९ आधी सहा वर्ष पूर्ण असतानाच पहिलीत प्रवेश देण्याचा नियम असताना २०१९ नंतर मात्र महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या तथाकथित हितासाठी म्हणून पाचहून अधिक वय असतानाच जूनमध्ये पहिलीत प्रवेश मिळू शकतो असा बदल केला.
हेही वाचा >>>लोकांना मोफत धान्य देऊ नका, ते कमावण्याचे कौशल्य द्या…
आता पुढच्या वर्षीपासून नवे शिक्षण धोरण राबवले जाईल आणि पुन्हा एकदा सहाहून अधिक वय असतानाच पहिलीत प्रवेश दिला जाईल हा नियम लागू होईल. म्हणजे गेल्या दोन वर्षात किंवा एक वर्षात ज्यांना पाचहून अधिक वय असतानाच पहिलीत प्रवेश मिळाला ते विद्यार्थी, लवकर प्रवेश मिळाला म्हणून काही पालकांच्या दृष्टीने म्हटले तर कदाचित नशीबवान ठरले. पण काही पालकांसाठी मात्र या वेगळ्या नियमाचे बळी ठरतील. गतवर्षी, काही शाळांनी सहाहून अधिक वर्षे पूर्ण हे पहिलीसाठी आदर्श वय असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा मोठ्या गटात ठेवण्याचा सल्ला पालकांना दिला. देशभरात बहुतांश ठिकाणी सहाहून अधिक वय हा निकष राबविण्यात आला. महाराष्ट्रात मात्र ज्या शाळांनी पाचहून अधिक वय हा निकष ठेवून गतवर्षी आणि त्या आधीच्या वर्षी विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला, त्यांनी पालकांना आपल्या पाल्याला पुन्हा मोठ्या गटात ठेवण्याचा पर्याय विचारणे गरजेचे होते.
प्रवेशावेळी सहाहून अधिक वय होण्याआधीच पहिलीत प्रवेश दिलेल्या काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुढे दुसरी तिसरीत त्यांना अभ्यास काहीसा जास्त आणि जड जात असल्याचे आढळून येते. काही विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता कमी पडते असेही आढळते. वर्गात बाकीची मुले एक- एक वर्षाने मोठी असतात आणि ती स्वाभाविकपणे विविध स्पर्धा, शारीरिक शिक्षण कायर्कल्प यामध्ये पुढे राहतात. वयाने कमी असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवणे, तितक्याच जोमाने उपक्रमात सहभागी होणे शक्य होत नाही आणि हे त्यांच्यासाठी उमेद खचवणारे ठरते.
अशा विद्यार्थांच्या पालकांनी सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्या पाल्याला सहाहून अधिक वय या निकषानुसार पुन्हा पहिलीत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तर व्यवस्थेमध्ये आता पुन्हा मागे येणे शक्यच नाही असे उत्तर मिळते. RTE चे नियम, SARAL किंवा Udise हे ऑनलाईन पोर्टल या नुसार विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवणे शक्यच नाही असे सांगितले जाते. तुम्हाला परत त्याच वर्गात ठेवायचे असेल तर पाचवीमध्ये गेल्यावर तुम्ही ते करू शकता अशी माहिती मिळते. पण पाचवीमध्ये विद्यार्थ्याला परत बसवण्याची गरज कदाचित लागणारही नाही कारण पाचवीपर्यंत तो विद्यार्थी तसाच ढकलत ढकलत पुढे जाईल. पाचवी पासही होईल. पुन्हा पाचवीत ठेवायचे म्हटल्यास मोठे झालेले मूल मानसिक दृष्ट्या त्यासाठी तयार होणार नाही आणि ते त्याच्यासाठी ते योग्य ठरणार नाही.
हेही वाचा >>>लोकांना मोफत धान्य देऊ नका, ते कमावण्याचे कौशल्य द्या…
लवकर प्रवेश दिला गेल्यामुळे, सरते पहिली इयत्तेचे वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी पाच ते सहा तास शाळेत कसेबसे घालवले, ताण घेऊन रडत रडत शाळेमध्ये जे मूल जात होते, ज्याला चांगले गुण मिळत होते, परंतु जे काहीसे दबावाखाली शिकत होते, शिक्षकांशी संवाद साधणे, बाकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, सर्वांमध्ये मिसळणे ज्याला जड जात होते, किंवा कदाचित उगाच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातले म्हणून ज्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालूया आणि नव्याने सुरुवात करूया असे ज्या पालकांना वाटले, अशा त्या सहा वर्षाच्या लहान मुलांना नव्याने सुरुवात करण्याचा पर्याय व्यवस्थेमध्ये नाही.
खरेतर एखाद्या वर्गात पुन्हा बसणे हे मानसिक दृष्ट्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुलाला तितकेसे जड जाणार नाही. पण आपल्याकडे हा पर्यायच नाही. शासनाने आणि शाळा प्रशासनाने सहाहून अधिक वय हा निकष न पाळल्याने, राज्याने आपला वेगळाच निकष लावल्याने, पालक देशभरातील सहाहून अधिक वय या निकषाबाबत अनभिज्ञ राहिल्याने हा विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, येऊ घातलेल्या नवे शिक्षण धोरण लक्षात घेऊन, पालकांची इच्छा असल्यास, गेल्या वर्षी प्रवेशावेळी सहा वर्षे पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिलीत प्रवेश देण्याची मुभा देण्यात यावी. या दृष्टीने आपोआपच वर ढकलले जाण्याऐवजी पालकांच्या संमतीने पुन्हा त्याच वर्गात बसवणे असा पर्याय ऑनलाइन पोर्टलमध्ये असावा आणि याबाबतचा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच घेण्यात यावा अशी काही पालकांची भूमिका आहे. स्पर्धेमध्ये आपले मूल भरडले जाऊ नये, त्याच्या गतीनुसार त्याला शिकता यावे यासाठी अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, इयत्ता पहिलीत पुन्हा बसण्याची संधी या लहान जीवांना प्राप्त करून द्यावी असे वाटते.
madhuragovind24@gmail.com