दिलीप काळे

वाद्यसंगीताच्या सुवर्णकाळात कुणी एक वादक, काश्मीरच्या लोकसंगीतातलं अपरिचित वाद्य घेऊन शास्त्रीय संगीताच्या रंगमंचावर प्रवेश करतात आणि या वाद्याला अवघ्या सात दशकांत प्रतिष्ठा मिळवून देतात. १० मे ही पंडित शिवकुमार शर्मा यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त शंभर तारांच्या सोबतीने केलेल्या अखंड साधनेचं स्मरण..

article about contribution of pune in the field of sports
क्रीडासंस्कृती रुजली, पण…
article about transparent provisions to prevent misuse of evms
ईव्हीएम तर असणारच…!
article about supreme court s verdict on sub classification of scs and sts
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की मत? अनुसूचित जाती व जमातींचे उपवर्गीकरण
ngo umed education charitable trust
सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
ganeshotsav beginning of political career marathi news
गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातच मिळते राजकारणाचे बाळकडू…
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
problem of koyta attacks and traffic congestion on the roads in Pune is serious
पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?
Capital Market Investment Share market GDP Economy
लेख: आर्थिक आकांक्षांसाठीच तर नियमन हवे!

प्रचलित वाद्यांमुळे कलाकारांना प्रतिष्ठा मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत. परंतु एखाद्या कलाकारामुळे वाद्याला मिळालेली प्रतिष्ठा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे गुरुजी पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा! कंठ आणि वाद्यसंगीताच्या सुवर्णकाळात कुणी एक शिवकुमार शर्मा, आपले गुरू आणि वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून – काश्मीरच्या लोकसंगीतात वाजणारं, एक अपरिचित वाद्य घेऊन भारतीय शास्त्रीय संगीताच्या रंगमंचावर प्रवेश करतात आणि या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देतात तीही अवघ्या सात दशकांत! शंभर तारांच्या सोबतीने केलेली ही अखंड साधना आहे. संगीत क्षेत्रात केलेल्या अगणित प्रयोगांचा श्रीगणेशा तर आहेच, पण त्या प्रयोगांच्या पूर्ततेची इतिकर्तव्यताही आहे. एकाच आयुष्यात, एकहाती, एखाद्या वाद्याला हा दर्जा आणि उदंड लोकप्रियता मिळवून देण्याचं हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे आणि म्हणूनच संतूर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या मंचावरचं सर्वात तरुण वाद्य आहे.

तबला वादनाची रीतसर तालीम घेतलेल्या आणि दिग्गज कलाकारांना साथ करणाऱ्या युवा शिवजींनी काश्मीरच्या खोऱ्यातील लोकसंगीतामध्ये वाजणारं संतूरही ऐकलं होतं. पण त्या वेळी त्यांना ते तितकंसं भावलं नव्हतं. वयाच्या चौदाव्या वर्षी संतूर त्यांच्या हाती आलं आणि त्यांचं आयुष्यच संतूरमय झालं. त्या सुरेल इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. हिंदूस्तानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासात संतूर हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या वादन परंपरेत कुणीच वाजवलं नव्हतं. त्यामुळे वाद्य लावण्याची पद्धत, किती, कोणत्या आणि काय प्रकारच्या तारा वापरायच्या, घोडींची (ब्रीज) संख्या किती असावी, घोडींची रचना काय असावी याबाबत शिवजींसमोर मोठं आव्हान होतं. त्यांनी यावर प्रयोग करण्यास सुरुवात करून वाद्याला तिन्ही सप्तकांत वाजवण्यायोग्य केलं. तसंच सप्तकातील सर्व १२ सुरांचा समावेश होईल अशी क्रोमॅटिक टय़ुिनगची पद्धत विकसित केली. वाद्याच्या स्वर-नाद गुणवत्तेवर विशेष विचार करून वाद्य मांडीवर घेऊन वाजवायला सुरुवात केली.

पुढचं आव्हान होतं, त्या काळातील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीमध्ये संतूरचं सादरीकरण. सुरुवातीच्या काळात अनेक जाणकार मंडळी आणि कलाकारांनी त्यांच्यावर टीका करून संतूर अपूर्ण वाद्य आहे आणि त्याऐवजी त्यांनी सतार किंवा सरोदसारखी वाद्यं निवडावीत, असं सुचवलं. परंतु या टीकेमुळे न डगमगता शिवजी आपल्या ध्येयावर ठाम राहिले. पुढे कित्येक वर्षांनी त्याच जाणकारांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. संतूर वादनातील वैशिष्टय़ांमुळे भारतीय शास्त्रीय संगीताची एक नवी परिभाषा त्यांनी निर्माण केली.

स्वत: उत्कृष्ट तबला वादक असल्यामुळे त्यांच्या वादनात सूर आणि लय यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. वादनातील स्वरमाधुर्य आणि छंदांची उपज हे त्यांच्या वादनाचं प्रमुख वैशिष्टय़ होतं. या छंदामधील गणित, सुरांवर कधीच वरचढ होत नसे. केवळ चमत्कृतींनी श्रोत्यांना संमोहित करण्यापेक्षा रागाचे अंतरंग हळुवारपणे मांडण्यात त्यांना जास्त रस होता. संतूर वाद्यातील त्रुटींवर मात करतानाच वाद्याचा नवा बाज पेश केला. वादनशैलीद्वारे सुरावटींची सलगता (मिंड) वाजवण्याचे तंत्र विकसित करून श्रोत्यांबरोबरच जाणकारांनाही वाद्याच्या परिपूर्णतेचा आनंद दिला. गुरुजी उत्तर हिंदूस्थानी संगीतातल्या रागांबरोबरच कर्नाटक संगीतातील काही निवडक राग मैफलींमधे आवर्जून सादर करत.

संगीताची निर्मिती मनोरंजनाच्या पलीकडे असणाऱ्या परिमाणांसाठी व्हावी याविषयी ते आग्रही होते. राग संगीताबरोबर गुरुजींनी उपशास्त्रीय संगीताला एक वेगळं परिमाण दिलं. धून, ठुमरी इत्यादी प्रकारदेखील त्यांना मनापासून आवडत. प्रत्येक मैफलीत त्यांना धून वाजवण्याची फर्माईश होत असे आणि गुरुजीही श्रोत्यांना कधी नाराज करत नसत. ‘संतूर पहाडी धून’ हे एक लोकप्रिय समीकरण! ही धून नित्यनूतन असे. जणू काही काश्मीरच्या पर्वतराजीची क्षणोक्षणी बदलणारी रूपे! शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत यात फरक असला तरीही स्वरांच्या आविष्कारांचा परिणाम आणि आनंदाची अनुभूती समान असण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असे.

संगीताच्या सर्व प्रकारांबद्दल त्यांना आदर होता, त्यामुळेच त्यांनी चित्रपट संगीतासाठी अनेक संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर तीन दशकं काम केलं. तसंच पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर ‘शिव-हरी’ या नावानं निवडक चित्रपटांना संगीतही दिलं. रागसंगीत, तसंच विविधतेनं समृद्ध असलेल्या लोकसंगीतावर आधारित रचनांमुळे शिव-हरी यांनी दिलेलं चित्रपट संगीत वैशिष्टय़पूर्ण तर होतंच परंतु ते सर्वसामान्य लोकांनाही आपलं वाटलं. आज ३५ वर्षांनंतरही ते संगीत तेवढय़ाच आवडीने ऐकलं जातं. गुरुजींच्या चित्रपट संगीतातल्या योगदानावर आधारित एक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमासाठी संतूरचा प्रामुख्याने वापर झालेली गाणी निवडून ‘बियाँड हंड्रेड स्ट्रिंग्स’ ही संहिता तयार करण्यात आली. कार्यक्रमात विविध संगीतकार आणि ध्वनिमुद्रणाच्या आठवणी शिवजींनी स्वत: सांगाव्यात असं नियोजन होतं. या निमित्तानं गुरुजींच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचं संग्रहीकरण झालं. 

‘‘संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,’’ असं ते नेहमी सांगत. संगीत आणि अध्यात्माच्या एकरूपतेचा प्रत्यय शिवजींना आणि श्रोत्यांना अनेक वेळा आला आहे. 

शिवजी सौंदर्याचे पूजक होते. वादनातील सौंदर्यस्थळांचा विशेष विचार तर त्यांनी केलाच पण वैयक्तिक जीवनात आपण जे करू तेही उत्तमच असलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. ते सर्व कलाकारांच्या सन्मानाबाबत आग्रही होते. वेळप्रसंगी आयोजकांना त्यांच्या खुमासदार शैलीत काय करावे आणि काय करू नये याच्या सूचनादेखील देत असत.

शासकीय किंवा अन्य पुरस्कार देण्यामागची भूमिका आणि ते स्वीकारताना कलाकारांची भूमिका याबाबत त्यांची ठाम मतं होती. त्यात कलेची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाचा विचार होता. पद्म पुरस्कारांबरोबरच देश-विदेशांतून मिळालेले असंख्य पुरस्कार, सन्माननीय नागरिकत्व अशा ऐहिक मान्यतांच्या पलीकडे गुरुजी केव्हाच पोहोचले होते. सार्वजनिक जीवनात ते मितभाषी होते. पण त्यांना माणसांची पारख होती. ज्यांच्याशी मैत्रीच्या तारा जुळत त्यांच्यासोबत मात्र हास्यविनोद, चर्चा होत. गुरुजी कधी आठवणी आणि गोष्टी सांगत. त्यांचा स्वभाव शिस्तप्रिय आणि परिपूर्णतावादी होता. 

शिकवताना ते एक पंजाबी त्रिसूत्री ‘सिख्या – दिख्या – परख्या’चा उल्लेख करत. ‘सिख्या’ म्हणजे गुरूंकडून विद्या ग्रहण करणे. ‘दिख्या’ म्हणजे इतरांच्या संगीताचे डोळस अवलोकन आणि आकलन करणे. ‘परख्या’ म्हणजे स्वत:च्या कामगिरीचे परखड परीक्षण करून त्रुटी कशा कमी करता येतील याचा विचार करणे. ही त्रिसूत्री त्यांनी स्वत: आचरणात आणली आणि त्यामुळेच यशाच्या शिखरावर पोहोचूनदेखील गुरुजी आयुष्यभर विनम्र राहिले.

शिष्यांना हसत खेळत शिकवताना त्यांनी ‘काकुंभेदाचं’ महत्त्वदेखील मनावर बिंबवलं. ‘काकुंभेद’ म्हणजे एकच वाक्य प्रेमानं किंवा रागावून बोलता येतं आणि त्यानुसार त्याचा अर्थ आणि परिणाम बदलतो. हाच काकुंभेद संगीत सादरीकरणात कसा लागू होतो याचं प्रात्यक्षिक ते देत. ‘‘रागसंगीत म्हणजे रागावून वाजवलेलं संगीत नव्हे तर ते संगीताप्रतीच्या अनुरागातून उपजलेलं संगीत’’ अशी त्यांची धारणा होती. त्याहीपुढे जाऊन ते नेहमी म्हणत- ‘‘संगीत हे कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं!’’

गुरुजींसाठी दिलेला शब्द अंतिम होता आणि त्यांनी आयुष्यभर आपल्या कामाप्रती दाखवलेली निष्ठा अतुलनीय आहे. हीच मूल्यं त्यांनी सर्व शिष्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक शिष्याला ते त्याच्या पार्श्वभूमी आणि कुवतीनुसार शिकवत. ते नेहमी सांगत, ‘‘विद्या, शास्त्र, तंत्र आणि मांडणी मी शिकवू शकतो, परंतु सादरीकरणातला भाव मात्र उपजतच असावा लागतो. तो तुम्ही जन्माला येतानाचा ‘ओपिनग बॅलन्स’. तो शिकवता येऊ शकत नाही!’’

मी स्वत:ला भाग्यवान समजतो कारण मी शिवजींच्या काळात जन्माला आलो आणि त्यांच्याकडून मला संगीताची तालीम आणि संतूरची विरासत मिळाली. सहवादनाचा बहुमान मिळाला. त्यांच्याबरोबर खूप प्रवास करता आला. अखंड संवाद साधता आला. हा अनमोल अनुबंध माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. टाळेबंदीच्या काळातील गुरुपौर्णिमेला मी गुरुजींना सांगीतिक अभिवादन करण्यासाठी यमन रागावर आधारित एक रचना करून पाठवली. त्याचं नाव ‘आत्मन’. त्यात दोन गंधारांच्या वापराबद्दल त्यांनी केलेलं कौतुक स्मरणात राहील. अशा असंख्य आठवणींच्या मालिकाच आता गुरुजींच्या अस्तित्वाची अनुभूती देतात.

‘संतूर’म्हणजेच ‘शिव’आणि ‘शिव’ म्हणजेच ‘संतूर’! शिव-संतूर या अद्वैतास नमन करताना मनात कबीराचा दोहा येतो, ‘‘सब धरती कागज करू, लेखनी सब बनराय, सात समुंदर की मसि करु, गुरु गुण लिखा न जाय।’’

लेखक संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत.

dilipkale.santoor@gmail.com