‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय)च्या गैरवापराबद्दल डॉ. जेफ्री हिंटन यांचा इशारा जगासाठी महत्त्वाचा आहे..
डॉ. आनंद ज. कुलकर्णी
मानवी उद्यमशीलतेच्या प्रगतीचा आलेख साधारणपणे पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून उंचावू लागला. पहिल्या महायुद्धानंतर कमीत कमी वेळेत व संसाधनांत जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने ऑटोमेशनला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या संगणक क्रांतीनंतर मात्र गेल्या ३० ते ४० वर्षांत संरक्षण, उत्पादन, वाहतूक, संपर्क व दळणवळण, आरोग्य, खेळ, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांनी प्रचंड वेगाने प्रगती केलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर १९५० मध्ये इंग्लंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. अॅलन टुरिंग यांनी ‘थिंकिंग मशीन्स’ ही संकल्पना मांडली. पुढे १९५६ साली डॉ. जॉन मॅकार्थी यांनी अमेरिकेतील हॅनोव्हर येथील एका कार्यशाळेत ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) ही संकल्पना मांडली. संगणक क्रांतीनंतर ‘एआय’मुळे जवळपास प्रत्येक कामाच्या स्वरूपांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. ज्या कामांत एकसारखेपणा आहे, ती कामे आता इंटेलिजन्ट कॉम्प्युटर्स करत आहेत. याचे आपण साक्षीदार तसेच लाभार्थीदेखील आहोत.
जसे प्रगतीच्या प्रत्येक वळणावर व टप्प्यावर पुढील संभाव्य वाटचालीसंदर्भात, सर्वसाधारण बऱ्या-वाईट परिणामांबद्दल चर्वितचर्वण होत आले आहे, तसेच ‘एआय’च्या वापराबद्दलही होत आहे. परंतु ज्यांना ‘एआय’च्या वापराचे जनक मानले जाते असे गूगलचे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याच्या साधकबाधक वापराबद्दल भीती व्यक्त करीत नुकताच राजीनामा दिला आहे. डॉ. हिंटन यांनी १९८५ पासूनच मानवी मेंदूच्या शिकण्याच्या व आकलनाच्या पद्धतीवर आधारित ‘आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क्स’मध्ये केलेले मूलभूत संशोधन ‘नेचर’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. त्यावर पुढे वेगवेगळय़ा प्रकारे सुधारणा व बदल करून जगातील अनेक शास्त्रज्ञांनी, विद्यार्थानी तसेच कंपन्यांनी व सरकारांनी विविध क्षेत्रांत त्याचा यशस्वी वापर केलेला आहे. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. पुढे साधारणपणे २०१२ मध्ये डॉ. हिंटन यांनी डीप लर्निगचा पाया घातला. त्याबद्दल त्यांना ‘कॉम्प्युटिंगमधील नोबेल पुरस्कार’ मानला जाणारा टुरिंग पुरस्कार मिळाला. या डीप लर्निगमुळे एखादा फोटो, व्हिडीओमधील विविध व्यक्ती, प्राणी, वस्तू, आदी ओळखणे व वर्गीकरण करणे शक्य होत आहे. डॉ. हिंटन यांचे हे संशोधन जगभरातील शास्त्रज्ञांनी पुढे कित्येक क्षेत्रांत यशस्वीपणे वापरले आहे- यात वन्यजीवन संवर्धन, खेळ, उत्पादन क्षेत्र, कचरा व्यवस्थापन, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, अन्नसुरक्षा, शेती, आदी क्षेत्रांचा समावेश होतो. सध्या विशेष चर्चेत व वापरात असलेल्या जेनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, अर्थात ‘जीपीटी’सुद्धा डीप लर्निगवरच आधारित आहे. चॅट-जीपीटीनंतर आता जीपीटी-४ हे विशेष चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, चॅट-जीपीटी तंत्रज्ञान हे प्रश्न विचारल्यानंतरच उत्तर देऊ शकत होते. त्याची उत्तर देण्याची मर्यादादेखील ३,००० शब्दांची आहे. जीपीटी-४ची उत्तर देण्याची व क्षमता २५,००० शब्दांची आहे. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचे उत्तर ते अगदी संपूर्ण लेखाच्या किंवा अगदी संपूर्ण दस्तऐवजाच्या स्वरूपात देऊ शकते. चॅट-जीपीटी केवळ मजकूर स्वरूपाचे प्रश्नांचे आकलन करू शकते, तर जीपीटी-४ फोटो तसेच व्हिडीओंचेही आकलन व विश्लेषण करू शकते. जसे, एखाद्या चित्रात गॅसने भरलेले फुगे असतील, तर ते स्वत:च त्याचे विश्लेषण करून सांगू शकते की यांची दोरी तोडल्यास ते हवेत उडून जातील, कोणत्या दिशेला जातील, वगैरे. एखाद्या दिवसाचे आपले संपूर्ण वेळापत्रकसुद्धा काही क्षणांत बनवून देते, त्याचबरोबर त्यातील प्राधान्यक्रमदेखील सुचवते. जीपीटी-४ दिवसेंदिवस स्वत:ला अद्ययावत बनवत राहते. कोणत्याही विषयातील एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण विचारल्यास अगदी प्रायव्हेट टीचरप्रमाणे आपल्या आकलनाच्या स्तरानुसार अगदी बारीकसारीक गोष्टी तपशीलवार व न थकता सांगू शकते. जीपीटी-४ वैयक्तिक आरोग्यासाठीदेखील विविध उपाय सुचवत आहे. ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे!
त्याच्या क्षमतेविषयी बोलायचे झाले, तर आजच्या घडीला, विविध मानवी बौद्धिक क्षमता कसाला लावणाऱ्या जीआरई, लॉ अशा कित्येक परीक्षा जीपीटी-४ ने पहिल्याच प्रयत्नात लीलया पास केलेल्या आहेत. गुणवत्तेनुसार पहिल्या १० टक्क्यांत जीपीटी-४ चा क्रम लागतो आहे. मुख्य म्हणजे जीपीटी-४ ने अत्यंत कमी वेळेत आणि अगदी मूठभर प्रश्नांची तयारी करून या परीक्षा दिलेल्या आहेत. सध्या जीपीटी-४ इंग्रजी, इटालियन, जर्मन, स्पॅनिशबरोबरच ३०पेक्षा जास्त भाषांमध्ये शिकू शकते व काम करू शकते, ज्याची अचूकता ८० टक्क्यांहून अधिक आहे. मराठीत अचूकता ६५ टक्क्यांहून अधिक आहे. सध्याच्या जीपीटी तंत्रज्ञानाचा शिकण्याचा वेग प्रचंड आहे. ते मानवाच्या शिकण्याच्या पद्धती झपाटय़ाने आत्मसात करत आहे. अजूनही निर्णयक्षमता किंवा अचूकता मानवाच्या तुलनेत कमी असली तरी लवकरच त्या स्तरावर पोहोचणे शक्य होईल, असे एकूण चित्र आहे.
डॉ. हिंटन यांच्या मते ‘जीपीटी’सारखे तंत्रज्ञान चुकीच्या हातांत पडल्यास संपूर्ण मानवजातीला त्याचा धोका संभवतो. मानव एक जैविक संस्था आहे. त्याच्या शिकण्याच्या वेगाला, क्षमतेला मर्यादा आहेत, पण ‘एआय’ एका डिजिटल संस्थेचे प्रतिनिधित्व करते. एखादी डिजिटल प्रणाली जेव्हा काही नवीन शिकेल, तेव्हा ते लगेच इतर हजारो अशा प्रणालींशी शेअर करेल आणि त्या सर्व प्रणाली वेगाने शिकत जातील. त्यामुळे पुढे मानवाला ‘एआय’शी स्पर्धा करणे अशक्य होत जाईल. त्याचबरोबर, रशियन राष्ट्राध्यक्षांचे उदाहरण देऊन डॉ. हिंटन म्हणतात, की, एखाद्या वाईट हेतूने अशा डिजिटल प्रणालींना काही वाईट काम नेमून दिल्यास किंवा तशी स्वायत्तता दिल्यास, दुसऱ्या देशांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जीपीटी तंत्रज्ञानाची झपाटय़ाने होत असलेली प्रगती आणि त्याची वैश्विक स्तरावरील स्वीकृती व वापर पाहाता जगातील ‘एआय’शी संबंधित डझनभर शास्त्रज्ञांनी, ‘यावरील पुढील संशोधन त्वरित सहा महिन्यांसाठी थांबवावे’ अशी मागणी केली आहे. या सहा महिन्यांत जगातील देशांनी एकत्र येऊन त्याच्या नैतिक वापरासाठी कायदे व मार्गदर्शक तत्त्वे आखावीत, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु डॉ. हिंटन यांच्या मते, जरी एका देशाने त्याचे ‘एआय’वरील संशोधन काही महिन्यांसाठी थांबवले, तरी चीनसारखे देश बरेच पुढे निघून जातील. त्यामुळे त्यांच्या मते, शास्त्रज्ञ त्यांची कामे करत राहतील, प्रत्येक देशाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी ध्येय व धोरणे ठरवावीत; जेणेकरून शोधाची दिशा नैतिक तर असेलच, पण नागरिकांच्या सुरक्षेची काळजी व हमीदेखील घेतली जाईल. डॉ. हिंटन तसेच इतर अनेक शास्त्रज्ञांच्या मते इंटरनेटवर सर्वत्र ‘डीप लर्निग’मार्फत बनवलेले फसवे फोटो, व्हिडीओ (‘डीप फेक’) व लिखाण यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एखाद्या देशासंदर्भात खोटे फोटो, व्हिडीओ इ. पसरवले जाऊ शकतात. अगदी शहरातील एखाद्या रस्त्यावर काहीतरी अप्रिय घडल्याचे फोटो/ व्हिडीओ बनवून दिशाभूल करून वेगळाच कार्यभाग साधला जाऊ शकतो.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी नुकतीच गूगल, मायक्रोसॉफ्ट, जीपीटी तंत्रज्ञान बनवणारी ओपन-एआय, अशा अनेक कंपन्यांच्या सीईओंसह बैठक घेऊन १४ कोटी डॉलरच्या निधीची घोषणा केली आहे. त्याचा उपयोग शेती तसेच हवामानविषयक संशोधनासाठी नैतिक जबाबदारी पाळूनच केला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वासाठी एक नवीन पायंडा घालून दिला जाऊ शकतो. जगातील प्रत्येक तंत्रज्ञान तटस्थच असते. वापरकर्ता त्याची दिशा ठरवतो तसेच बरे-वाईट परिणामही ठरवतो. अणुतंत्रज्ञान वापरून घरांसाठी व उद्योगांना जगवण्यासाठी ऊर्जा बनवता येते, तसेच लाखो लोकांना एका सेकंदात मारण्यासाठीसुद्धा वापर करता येतो. अणुतंत्रज्ञानाच्या वापरासाठी जशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ती पाळणेदेखील बंधनकारक आहे, तशीच ‘एआय’च्या संशोधनासाठी व वापरासाठी लवकरात लवकर तयार केली पाहिजेत. त्याचबरोबर, या तंत्रज्ञानाबद्दल शाळांमध्ये, विविध सरकारी कार्यालयांत, तसेच कंपन्यांमध्ये वेळोवेळी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. ‘एआय’ला आपला सहकारी म्हणून घेतले तरच सर्व संसाधनांचा योग्य वापर होऊन आपले जीवनमान उंचावणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नैतिकतेचे धडे शाळेपासूनच गिरवले तर कोणत्याही तंत्रज्ञानाच्या गैरवापराची शक्यता उरणार नाही.