ज्ञानेश मोघे

गोव्याची कला अकादमी कालपर्यंत गोव्याचे वैभव होते. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील कलाकारांचे आकर्षण होते आणि जगभरातील स्थापत्यशास्त्रीय विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे हमखास ठिकाण होते. एकेकाळची तीच अभिमानास्पद वास्तू, तिच्या झालेल्या तथाकथित नूतनीकरणानंतर आज आपले वैभव गमावून केविलवाणी उभी आहे. या वास्तूत असलेल्या मास्टर दीनानाथ कला मंदिर या नाट्यगृहात आजही नाटक-संगीतादी कार्यक्रम होत असतात. पण त्या वास्तूंमध्ये कार्यक्रम सादर होताना ‘ध्वनी-प्रकाश’ या तांत्रिक घटकांची तरलता ज्याप्रकारे पूर्वी अनुभवाला यायची, ती तरलता नूतनीकरणानंतर त्या नाट्यगृहातून आता पूर्णत: हद्दपार झाली आहे. या नाट्यगृहाच्या एकोस्टिकचा (ध्वनिक व्यवस्था) दर्जा देशातील दिग्गज कलाकारांकडून नेहमीच वाखाणला जायचा. ध्वनिक्षेपकाचा वापर न करतासुद्धा इथे नाट्यप्रयोग यशस्वीपणे सादर झाले आहेत. मात्र आज कलाकारांनी आवाज वाढवूनसुद्धा खुर्च्यांच्या शेवटच्या काही रांगांवर बसलेल्यांना आवाज नीट ऐकू येणे दुरापास्त झाले आहे. अशाप्रकारे तिथल्या ध्वनी व्यवस्थेचे अक्षरश: तीन तेरा वाजवले गेले आहेत. ही झाली नाट्यगृहाच्या अंतर्गत व्यवस्थेची, चव्हाट्यावर आलेली नूतनीकरणानंतरची दुरवस्था; त्याशिवाय नूतनीकरणानंतर पहिल्या पावसाळ्यातच गळतीला लागलेल्या भिंती, वातानुकूल व्यवस्थेच्या नियोजनात झालेली हेळसांड आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे कामाची दर्जाहीनता आणि नियोजनशून्यतेमुळे नूतनीकरणाच्या दरम्यान पूर्णत: कोसळलेले खुले नाट्यगृह… नूतनीकरण नामक औषधाचे असे घोर अपाय सोसत चार्ल्स कोरिया या विख्यात वास्तुविशारदाने साकार केलेली ही देखणी वास्तू आज विव्हळत उभी आहे.

environmentally sustainable alternatives sustainable
पर्यावरणातील शाश्वत पर्याय खरोखरच शाश्वत आहेत का?
Women Founder of Religion Dominant Personality
स्त्रियांनी धर्म संस्थापक व्हावे…
dhangar reservation loksatta article
धनगर आरक्षणाच्या पल्याड…
Sri Lankan parliamentary election 2024
लेख : ‘एक असण्या’चा श्रीलंकेतला ‘अर्थ’
India relations with other countries considerations of national interest side effects
भारताचा शेजार-धर्म ‘खतरेमें’ असणे बरे नव्हे!
How to save society from perilous summation
घातक सुमारीकरणापासून समाजाला कसे वाचवायचे?
citizens now became beneficiaries loksatta article
नागरिकाचा लाभार्थी झाला, पण…
Maharashtra Legislative Assembly Election 2024 Campaign Election 2024
नेत्यांनी प्रचार रसातळाला नेला, आता आपण काय करणार?
Article to discuss how Dharavi can be redeveloped
धारावीचा पुनर्विकास हवाच, पण कसा?

अर्थातच कला अकादमीच्या या वास्तूला नूतनीकरणाची आवश्यकता होती. मात्र एखादा घाट घालावा अशाप्रकारे फार चतुरपणे कला अकादमीच्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सरकारने मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच घोषित केले. तातडी असूनदेखील ते काम घोळ घालत लांबवत ठेवले आणि शेवटच्या क्षणी, निविदा काढल्याशिवाय, अशा प्रकारच्या कामांचा फारसा अनुभव नसलेल्या एका आस्थापनेकडे सोईस्करपणे सोपवले गेले. निविदा काढल्याशिवाय होणारी कामे कुणाचा फायदा आणि कशाचे नुकसान करतात हे सर्वश्रुत आहेच. हे कामदेखील त्याला अपवाद नव्हते. या ‘आर्थिक’ खेळीमुळे कुणाचा फायदा झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र कला अकादमीचे नि:संशयपणे कायमचे नुकसान झाले.

हेही वाचा >>>राज्यातील हवामान कृती कक्ष क

सर्वात सुरुवातीला नाट्यगृहाच्या कलात्मक नूतनीकरणाचा कसलाही अनुभव नसलेल्या मुंबईतील एका बिल्डरला ३ मे २०२१ या दिवशी वर्कऑर्डर काढून ३९ कोटी ६३ लाख रुपयांचे काम सोपवले गेले. यात केवळ वास्तूची बांधकाम दुरुस्ती आणि नूतनीकरण यांचाच समावेश होता. हे काम एक वर्षाच्या आत पुरे करावे ही अटदेखील त्यात अंतर्भूत होती. (विशेष म्हणजे हे आस्थापन महाराष्ट्रातील एका दिग्गज राजकारण्याच्या पत्नीशी संबंधित आहे अशी बोलवाही त्यावेळी गोव्यात पसरली होती.) सुरुवातीच्या या वर्कऑर्डरनंतर या कंपनीला एकापाठोपाठ इतर साधनसुविधांचेही नूतनीकरण करण्याची कंत्राटेही देण्यात आली. त्यात नाट्यगृहाची ध्वनी व्यवस्था (४ कोटी ८६ लाख २१ हजार रुपये), निगराणी व्यवस्था (१ कोटी ७४ लाख ४२ हजार रुपये), आग प्रतिबंधक व्यवस्था (१ कोटी ६० लाख २१ हजार रुपये), रंगमंच प्रकाश योजना आणि स्टेजक्राफ्ट (२ कोटी ११ लाख ४९ हजार रुपये), स्वागतकक्ष क्षेत्र, भिंतीचे संरक्षण लेपन, बोरवेल इत्यादीविषयक ( १ कोटी ४४ लाख ७८ हजार रुपये) इत्यादी वर्कऑर्डर लागोपाठ मिळत गेल्या. ध्वनी व्यवस्था, रंगमंच प्रकाश योजना व स्टेजक्राफ्ट इत्यादी कामांचा तर या आस्थापनेला अजिबातच अनुभव नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार हे काम साहजिकच इतर संबंधित उप-कंत्राटदारांकडे सोपवून ते मोकळे झाले. नाट्यगृहाच्या या महत्त्वाच्या घटकांची आज जी दुरवस्था झाली आहे ती पाहता या कामाच्या बाबतीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायी नव्हता असेच म्हणावे लागेल.

मिळालेल्या वर्कऑर्डरनुसार ३६५ दिवसात पूर्ण व्हायला हवे असलेले काम साधारण तीन वर्षे लांबले. या तीन वर्षांत सुमारे ५० कोटी नऊ लाख २८ हजार रुपयांची कंत्राटे देऊन (इमारतीची दुरुस्ती, प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, आग संरक्षण प्रणाली, निगराणी व्यवस्था, भिंत संरक्षक लेपन इत्यादी) त्यातील ४५ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपये सदर विकासकाला अदाही केले गेले. या कामाच्या दर्जाबाबत मधल्या काळात चार्ल्स कोरिया फाऊंडेशनच्या वास्तुशिल्पकारांनी हरकत घेऊन आवाज उठवला, तर ‘‘कोण चार्ल्स कोरिया फाऊंडेशन? मी देखील इंजिनीयर आहे’’, अशी मग्रूर भाषा वापरून कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी वास्तुकलेतील तज्ज्ञांना उडवून लावले. एवढेच नव्हे तर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याशिवाय कंत्राट कसे काय दिले असा प्रश्न विरोधकांनी विधानसभा अधिवेशनात विचारता, ‘‘निविदा काढून बांधकाम व्हायचे असते तर ताजमहाल कधीच बांधला गेला नसता!’’ असे मासलेवाईक उत्तर देऊन ते मोकळे झाले. एक प्रकारे नियमावली आणि शिष्टाचारांविरुद्ध होत असलेल्या कामाची भलामण करणारे त्यांचे ते हास्यास्पद विधान आज लोकांच्या हेटाळणीचा विषय झालेले आहे व या ग्रहण लागलेल्या वास्तूला आता संपूर्ण गोवा ‘गावडेंचा ताजमहाल’ म्हणून उपरोधाने संबोधायला लागला आहे. त्यातून एका मात्र झाले- ताजमहालासारख्या वास्तूशी केलेल्या तुलनेतून कला अकादमीच्या नूतनीकरणासंबंधातला सरकारचा एकंदर ‘मोगलाई’ कारभार खऱ्या अर्थाने उघड्यावर आला.

हेही वाचा >>>भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

१० नोव्हेंबर २०१३ या दिवशी नूतनीकरण झालेल्या कला अकादमीच्या वास्तूचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाजत गाजत केले. मात्र या उद्घाटनाला एक दुर्दैवी किनारही लाभली होती- नूतनीकरण झालेल्या या इमारतीचा एक भाग, या वास्तूतील खुले नाट्यगृह, वास्तूच्या नूतनीकरणादरम्यान १८ जुलै २०१३ या दिवशी, म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी पूर्णपणे कोसळले होते. त्यावेळी या भागाचा नूतनीकरण योजनेशी कुठलाही संबंध नाही, असे सांगत माननीय मंत्री गोविंद गावडे यांनी आपली जबाबदारी लागलीच झटकून टाकली होती. नूतनीकरणासाठी संमत झालेल्या कोट्यवधी रकमेचा इमारतीच्या या भागाशी संबंध नव्हता ही नवीन माहिती पचवणे गोमंतकीयांना बरेच जड गेले होते. कला अकादमीच्या इमारतीचा हा भाग त्याच्या साऱ्या उद्ध्वस्त अवशेषांसकट तिथे पडून होता आणि तिच्या उरावर बसून सरकार अर्धवट नूतनीकरण झालेल्या आणि दयनीय अवस्थेतल्या कला अकादमीच्या वास्तूचे निर्लज्जपणे धूमधडाक्याने उद्घाटन करत होते.

मात्र त्यानंतर जेव्हा नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहात जेव्हा विविध संस्थांकडून कार्यक्रम सादर व्हायला सुरुवात झाली तेव्हा हळूहळू या नाट्यगृहातील त्रुटी लोकांच्या लक्षात येऊ लागल्या. सादरकर्त्या संस्थांनी ध्वनियंत्रणा भाड्याने आणणे हा एक अत्यावश्यक रिवाज बनला. एक उत्तम एकोस्टिक (ध्वनी व्यवस्था) असलेले नाट्यगृह लयाला गेले होते, तिथे असलेली प्रकाशयोजना व्यवस्थाही योग्य अशी नव्हती, प्रेक्षागृह व रंगमंच यांच्या माथ्यावरच वातानुकूलन व्यवस्थेचा जो भाग नव्याने बसवला गेला त्याचा आवाज रंगमंचावर व प्रेक्षागृहात घुमत होता. सुरुवातीच्या पावसात नाट्यगृहाच्या छपराला गळती लागून पावसाचे पाणीही प्रेक्षकांच्या डोक्यांवर बरसले होते. कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा या नाट्यगृहाची झालेली अशी हालत अनेकांच्या सहनशीलतेपलीकडची होती. कला अकादीची शान असलेले ब्लॅक बॉक्स २००४ या वर्षी इफ्फीच्या निमित्ताने बदलले गेले होते, नूतनीकरणावेळी ते परत उभारले खरे, परंतु तेथेही पावसाच्या पाण्याचे लोंढे आत शिरत होते. माननीय मंत्री महोदय मात्र सर्व काही ठीक आहे असाच आव आणून वावरत होते.

हळूहळू कलाकारांनी नूतनीकरणाच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि नाट्यगृहात असलेल्या त्रुटींविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. कलाकारांची आणि कला अकादमीबद्दल आत्मीय भावना असणाऱ्यांची विशेष बैठक होऊन, त्यातून कला अकादमीच्या बांधकामात झालेल्या घोळाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि त्यासंबंधी न्याय्य चौकशी व्हावी ही मागणी लावून धरण्यासाठी ‘कला राखण मांड’ संघाची स्थापना झाली. कला राखण मांडने वास्तूची दुर्दैवी गत विविध माध्यमांतून लोकांसमोर जोरकसपणे मांडायला सुरुवात केली. विरोधी पक्ष पुढारी युरी आलेमांव यांच्या पुढाकाराने कलाकारांनी संपूर्ण बांधकामाची तपासणी केली, तेव्हा त्यांच्याबरोबर ‘साऊंड मॅन ऑफ इंडिया’ म्हणून मान्यता पावलेले रॉजर ड्रेगो होते. ‘कला राखण मांड’ने त्यांना गोव्यात बोलावले होते. त्यांनी या तथाकथित नूतनीकरणाचे पितळ पूर्णतया उघडे पाडले. कलाकारांच्या या चळवळीचा परिणाम म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शेवटी कला अकादमीच्या नूतनीकरणात त्रुटी राहिल्या असल्याचे मान्य करावे लागले. हा एका परीने कलाकारांच्या एकजुटीचा विजय होता.

आंदोलनाची धग वाढत गेली तशी सरकारला नांगी टाकावी लागली. कला अकादमीच्या नूतनीकरणात राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास काही सरकारी समित्यांनी त्यापूर्वी केला होता, परंतु ती केवळ एक धूळफेक होती हेही एव्हाना सिद्ध झालेले होते. कलाकारांच्या दबावामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांना प्रसिद्ध रंगकर्मी विजय केंकरे यांच्या नेतृत्वाखाली कलाकार, तंत्रज्ञ आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करावी लागली. या समितीने कला अकादमीची पाहणी केली तेव्हा जे धक्कादायक वास्तव त्यांच्यासमोर आले त्यातून ‘परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतके गुणही मी या कामाला देऊ शकत नाही’, असे उद्गार समितीचे अध्यक्ष विजय केंकरे यांना त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत काढावे लागले. त्यांच्या या उद्गारावर राज्यभर प्रतिक्रिया उमटल्या. अर्थात, या समितीला अजून बरीच वाटचाल करायची आहे आणि तिच्यासमोर बरीच आव्हानेही आहेत. त्यातून मार्ग काढून कला अकादमीला ते पुनर्वैभव कसे मिळवून देतील याकडे आता साऱ्यांचेच लक्ष आहे.

या समितीने या नाट्यगृहात विविध कार्यक्रम आयोजित करून, तज्ज्ञांमार्फत नाट्यगृहातील साधन सुविधा आणि तिथल्या इतर दर्जात्मक गुणवत्तेचा आढावा घेण्याची योजना आखली आहे. मात्र त्याच दरम्यान कला अकादमीच्या प्रतिष्ठेच्या नागरी राज्य नाट्य स्पर्धाही या अपूर्ण असलेल्या नाट्यगृहात घेण्याचा हटवादी निर्णय मंत्रिमहोदयांनी घेऊन या वास्तूच्या जखमेवरच मीठ चोळले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाट्यगृहाच्या व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी कलाकारांना दिले आहे. अशा स्थितीत समितीचे काम निर्वेधपणे चालू शकेल का, हा प्रश्नही उत्पन्न झाला आहे.

गोव्याची शान असलेली कला अकादमी अशाप्रकारे सद्या काळात विवंचनेच्या घेऱ्यात सापडली आहे. समुद्र आणि नदी यांच्या अगदी निकट असलेली ही इमारत हवामान बदल आणि पाण्याच्या उंचावत असलेल्या पातळीमुळेही अतिरिक्त धोक्यांचा सामना करत आहे. भ्रष्टाचार आणि हवामान यांचा आघात ‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर कुणाला सांगावे’ अशाप्रकारचा पूर्णत: नेस्तनाबूत करून टाकणारा असतो. बिचारी कला अकादमी! सांगून सांगून, सांगेल तरी कुणाला?

dnyanmog@gmail.com