अरुण शौरी यांनी सध्या हिंदुत्वापासून हिंदू धर्माला वाचवण्याची गरज असल्याची ललकारी देत ‘द न्यू आयकॉन : सावरकर अँड द फॅक्ट्स’ हे पुस्तक बाजारात आणले आहे. एकतर सावरकर हे नवीन आयकॉन कधी झाले? ते जुनेच आहेत. जेव्हा सध्या सत्तेवर असलेल्या राजकीय विचारधारेला कोणीही विचारत नव्हते तेव्हापासून त्यांनी ते धरून ठवले आहेत. शौरी यांना ही माहिती नसावी हे आश्चर्य आहे. कारण अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असताना सावरकरांच्या चित्राचे अनावरण संसदेत झाले होते. त्या समारंभाच्या वेळी चंद्रशेखर सोडून इतर सर्व विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. याबद्दल सारवासारव करताना शौरी लिहितात, ‘‘मी सरकारमध्ये सामील असल्याने त्यावेळी मी बहुधा उपस्थित असावा… मला नक्की आठवत नाही.’’ गेली दहा वर्षे ते मंत्रिमंडळात नाहीत. शेवटी बरीच वाट पाहून असा ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी काम केले असावे. १९९८ साली त्यांच्या ‘एमिनन्ट हिस्टॉरियन्स : देअर टेक्नॉलॉजी, देअर लाइन, देअर फ्रॉड’ या पुस्तकात त्यांनी डाव्या इतिहासकारांवर झोड उठवली होती ती थोडी तरी अभ्यासपूर्ण होती. त्या लिखाणाचे बक्षीस त्यांना नंतर मिळाले अशी त्यांची भावना खरी असू शकते.
या पुस्तकाचा मोठा भाग सावरकरांच्याच लिखाणातील स्वत:च्या प्रतिपादनाला सोयीस्कर अशा भागांची निवड हा असला तरी, त्यामुळे तो सावरकरांच्या चारित्र्याला जाणीवपूर्वक हानी पोहोचवणारा आणि काही वेळा अनावश्यक उताऱ्यांनी भरलेला आहे. ‘या पुस्तकाच्या लिखाणात आपण सावरकरांच्या लिखाणातून सावरकरांचा शोध घेतला आहे’ असे शौरी यांचे प्रतिपादन आहे. पण तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सावकरांच्या स्वप्नांना शेखचिल्लीची स्वप्ने असे चेष्टेच्या सुरात लिहिल्याचे वाचल्यावर या लिखाणामागील हेतू काय, असा प्रश्न पडतो.
पुस्तक कोणाच्या दिशेने जाणार याचा अंदाज पहिल्या काही पानांतच येतो. पुस्तकासाठी प्रथम जे आभारप्रदर्शन त्यांनी केले आहे त्यात म्हटले आहे की सार्वजनिक समारंभातून सावरकरांना मोठ्या रकमा मिळाल्या. ‘‘एका प्रशिक्षण वर्गात त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी १८,००० रुपयांची थैली अर्पण करण्यात आली, नंतर मुंबईत ६१००० रु. देण्यात आले… १९४३ साली ही फार मोठी रक्कम होती.’’ ही रक्कम हिंदुमहासभा या पक्षासाठी होती हे ते सांगत नाहीत. नंतर याची तुलना त्यांनी इतिहासकार गो. स. सरदेसाई यांचा जेव्हा सत्कार करायचा असे ठरले होते व त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला याच्याशी केली आहे. तुलना करायचीच होती तर त्या काळात इतर राजकीय नेत्यांना आणि पक्षांना कसे पैसे मिळत याच्याशी करायला हवी. घनश्यामदास बिर्ला, बजाज यांच्यासारख्या उद्याोगपतींकडून काँग्रेसला तर अनेक देणग्या मिळत. गांधीजींच्या आश्रमाचा खर्च त्यावर चाले. चिरोल खटल्याच्या निमित्ताने लोकमान्यांना जवळपास १,५०,००० रु. महाराष्ट्रातील जनतेने गोळा करून दिले. त्या समारंभाला खुद्द गांधीजी उपस्थित होते. अशा देणग्या हा जनतेचा त्या नेत्याला असलेला पाठिंबा म्हणून पाहायचे का नेत्याची पैशासाठी असलेली लालसा म्हणून पाहायचे?
अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील निबंधांमधील सावरकरांचे बरेच प्रक्षोभक उतारे लेखकाने दिले आहेत. ज्यात मनुस्मृतीमध्ये पशुपक्ष्यांचे मांस खाणे तसेच गोमांसाविषयी असलेल्या विस्तृत उल्लेखांचा निर्देश सावरकरांनी केलेला आहे. मराठी माणसांना हे उतारे नवीन नाहीत. पण नेमका याचा उल्लेख करत शौरी काय साधू पाहत आहेत? अमराठी वाचकांमध्ये सावरकर अप्रिय व्हावेत असा एकमेव हेतू त्यात असावा, हे या प्रश्नाचे अधिक संभाव्य उत्तर. सावरकरांच्याच, ‘मनुष्याचा देव व विश्वाचा देव’ यासारख्या निबंधाचा त्यात उल्लेख नाही. यापुढे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा भाग आपला आवडता असल्याचे त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
सावरकरांच्या राजकीय भाषणांचा व लिखाणाचा वेध घेताना शौरी यांनी मूळ कागदपत्रे न वापरता मार्झिया कासलोरी या इटालियन विदुषीच्या पुस्तकातील उतारे उद्धृत केले आहेत. युरोपात चाललेल्या घडामोडींचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार त्यावेळी सर्व राजकीय नेत्यांमध्ये चालू होता. जेव्हा हिटलरच्या फौजा युरोप पादाक्रांत करत होत्या त्यावेळी महात्माजींनादेखील दोलायमान अवस्थेत पाहून महादेवभाई देसाई अस्वस्थ झाल्याची नोंद आहे. अशा वेळेला सावरकर, मुंजे काय किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस काय, ही सारी सशस्त्र क्रांतीचे वेध लागलेली मंडळी त्या बाजूला वळली असली तर नवल नव्हते. पण जमिनीवरील परिस्थितीची जाण गांधींना जास्त चांगली होती. काही नेत्यांचा विचार अपयशी ठरला तर ते अपमानाला पात्र कसे होतात हे समजत नाही. Bose was made to wait for one year by Hitler and then he packed him in submarine and was sent to Japan असे शौरींनी मुलाखतीत म्हटले आहे. या विषयीचे व्हॉइसरॉय लिनलिथगो यांच्याशी झालेल्या सावरकरांच्या वाटाघाटींचे वृत्तांत सविस्तर येथे दिले आहेत. त्यात ब्रिटिश साम्राज्याला धोका जर्मनीपेक्षा जपानकडून असल्याचे सावरकरांनी म्हटल्याचे व्हॉइसरॉय महाशयांनी कळवले आहे. यानंतर दोन महिन्यांनी जपानने दुसऱ्या महायुद्धात उडी मारली आहे, ही जाण महत्त्वाची नाही का? ब्रिटिशांशी सहकार्य करण्याच्या सावरकरांच्या भूमिकेला तेव्हाच्या ब्रिटिश प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिला नाही, कारण हिंदूंचे नेतृत्व सावरकरांच्याकडे नसून काँग्रेसकडे आहे हे ब्रिटिशांना माहीत होते.
सावरकरांची सगळी माफीपत्रे या पुस्तकात छापली आहेत. त्या माफीपत्रांची शिवाजी महाराजांनी कैदेत असताना औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रांशी तुलना करण्याला लेखकाचा आक्षेप आहे. तोही मान्य करूया. पण शौरींचे त्यामागील तर्कशास्त्र अजब आहे. त्यांचे म्हणणे असे की, ‘औरंगजेबाला फसवून, दिल्लीहून निसटल्यावर शिवाजी महाराजांनी त्याच्या विरुद्ध आपल्या कारवाया परत सुरू केल्या (हे योग्यच आहे, असे शौरी यांना म्हणायचे आहे- इतपत ठीक); परंतु सावरकरांनी तसे न करता ब्रिटिश सत्तेशी हातमिळवणीच केली.’ पण इथे शौरी हे विसरतात की, महाराज महाराष्ट्रात आले तेव्हा ते मुघली सत्तेच्या सीमेबाहेर होते. ही सोय सावरकरांना नव्हती. मुक्त राहून काही करायचे असेल तर काही अटी मान्य करणे व त्या पाळणे आवश्यक होते.
सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’मधील बरेच उतारे लेखकाने दिले आहेत. त्या लिखाणातून सावरकर एक पॅन इंडियन हिंदू राजकीय जाणीव कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. सावरकरभक्त सोडले तर इतिहासकार म्हणून त्यांना कुणी गंभीरपणे घेत नाही. पण इथेही शौरींची टिप्पणी त्यांची मनोवृत्ती दर्शवते. सावरकरांनी एके ठिकाणी चंद्रगुप्त आणि चाणक्यापेक्षा मराठ्यांचे काम अवघड होते असे तर्कदृष्ट्या बरोबर मांडून दाखवले आहे. दिल्लीश्वरोवा जगदीश्वरो अशी भावना सर्व भारतात असताना मराठ्यांनी मुघल सत्तेला पराभूत केले. अशा तऱ्हेचे ते प्रतिपादन आहे. पण याबद्दल शौरी लिहितात, ‘‘मराठे स्वत:ला इतरांच्यापेक्षा उच्च समजत होते. अशा वेळेला इतरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा देण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे होते.’’ मराठ्यांना राजकीय जाणीव नव्हती हे सांगणे वेगळे आणि वरील टिप्पणी करणे वेगळे. या टिप्पणीला पंजाबी सुप्रीमसीचा वास आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रिमूर्तीपैकी राजगुरूला पंजाबात किती किंमत आहे, हे विचारण्याची वेळ आहे.
‘सावरकर अँड द फॅक्ट्स’ असे पुस्तकाच्या नावात म्हणायचे; पण केवळ लिखाणातील व भाषणातील उतारे देऊन आपण सत्य सांगत आहोत असा आवेश आणायचा, असा प्रकार शौरींनी केलेला आहे. या प्रकारे रामायण, महाभारतातल्याही निवडक गोष्टी सांगून त्याबद्दल घृणा उत्पन्न करणे सहज शक्य असते किंवा महात्मा गांधीजींच्या लिखाणातून व भाषणातून असे उतारे देऊन त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करणे सहज शक्य आहे. संदर्भाविना असे उतारे उद्धृत केल्यास द्वेष निर्माण होतोच… उदाहरणार्थ, ‘७ एप्रिल १९४७ रोजी प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले, ‘‘मुस्लिमांचा हिंदूंना संपवण्याचा विचार असला तरीही हिंदूंनी त्यांच्यावर रागावू नये… आपण सर्व धैर्याने मरून जाऊ व नवीन जगाचे रहिवासी होऊ.’’ हे उद्धृत करताना त्या वेळच्या पंजाब, सिंध आणि इतर मुस्लीमबहुल प्रांतातील हिंदूंना असलेल्या धोक्याचा विचार गांधीजी करत होते. आपण हिंसा थांबवावी आणि इतरांकडून तशी अपेक्षा करावी असे आवाहन करण्यापलीकडे गांधीजींच्या किंवा कुणाही नेत्याच्या हातात काही नव्हते, हे सांगायला हवे. अन्यथा त्यांच्या विरुद्ध द्वेष पेटवणे सहज शक्य आहे. सत्य सांगताना त्यावेळची इतर राजकीय व सामाजिक परिस्थिती याचा आढावा काही प्रमाणात तरी घेतला जावा. तेवढे करण्याइतपत आता लेखकाकडे ताकदही नाही आणि त्याहीपेक्षा ती वृत्ती नाही (मग वृत्ती काय आहे, हे १९९७ मध्ये शौरींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहिलेल्या ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड्स’ या पुस्तकातून उघड झालेले होते).
हिंदुत्वापासून हिंदू धर्माला वाचवण्याची गरज शौरी यांनी व्यक्त केली असली तरी ती वेळ त्यांच्यासारख्या पत्रकारांच्या हातून गेली आहे. सावरकरप्रेमी हे असले पुस्तक वाचण्याची शक्यता शून्य आहे. त्यांच्यासाठी सावरकर हा भावनेचा प्रश्न आहे. पण या लिखाणातून सावरकरद्वेषी गटाच्या हातालाही काही नवीन लागणे शक्य नाही.
पुस्तकालयांचेही पुरस्कार…
मोठ्या इमारती आणि मॉल वगैरेसारखी पुस्तक विक्री दालने असणाऱ्या ब्रिटनमध्ये एकूण ७२ इंडिपेण्डण्ट म्हणजे तुलनेने लहान ग्रंथदुकाने आहेत. त्यांच्यात दरवर्षी सर्वोत्कृष्ट सेवा अथवा योगदानासाठी एकाला पुरस्कार मिळतो. गेल्या वर्षी हा पुरस्कार भारतीय वंशाच्या संचिता बसू सरकार यांच्या दालनाला मिळाला होता. त्यानंतरची त्यांची मुलाखत येथे पाहता येईल. यंदादेखील हे पुस्तकालय नामांकनात आहे हे दाखवून देणारी बातमी दुसऱ्या लिंकवर वाचता येईल.
https:// tinyurl. com/ mpvabuua, https:// tinyurl. com/ yc65 yxy9
एक भूतकथा…
इमर्सन कॉलेजच्या ‘प्लाऊशेअर’ मासिकाच्या विद्यापीठाच्या डायजेस्ट आकाराच्या अंकाकडे जगभरातील कथाप्रेमींचे लक्ष असते. कारण एकही कथा ‘हलक्यात घेता न येण्या’च्या प्रकारातील. ताजा अंक आला की आठवड्याला एखादी कथा या मासिकाच्या संकेतस्थळावर मोफत वाचू देण्याचा शिरस्ता पाळला जातो. त्यानंतर कथेला लागलेले टाळे शक्यतो उघडले जात नाही. चार्ल्स बॅक्स्टर या ऐंशीच्या दशकापासून उत्तम कथा लिहिणाऱ्या दिग्गजाची या आठवड्यापुरती दिलेली संपूर्ण मोफत भूतकथा.
https:// tinyurl. com/ ykj69 s5 b
‘रेअर बुक स्पेशालिस्ट…’
रिबेका रोम्नी नावाची एक अमेरिकी पुस्तक संग्राहक स्वत:ला ‘रेअर बुक स्पेशालिस्ट’ म्हणवते. पुस्तक पारख असणाऱ्यांनाही ती तशीच माहिती. ती लिहिते. शतक-दोन शतकांपूर्वीची पुस्तके धुंडाळण्यासाठी जुन्या-नव्या बाजारांत भटकते आणि ग्रंथ खरेदीदारांना मार्गदर्शनही करते.
अप्राप्य वाटणाऱ्या गोष्टींची खरेदी-विक्री होत असल्याचे प्रेक्षकांना दाखवणाऱ्या ‘पॉन स्टार्स’ या अमेरिकी रिअॅलिटी शोमधल्या पुस्तकांवरच्या विभागात रिबेका रोम्नी दुकान मालक आणि पुस्तक विक्रेत्यांमधील दुवा म्हणून असलेली दिसते. तिच्या अगदीच ताज्या पुस्तकावर लवकरच ‘बुकमार्क’मध्ये तपशिलात. तूर्त हा भाग, त्यातील दुर्मीळ पुस्तकांच्या किमती येथे पाहता येतील.
https:// tinyurl. com/47 resw2 j
बुकबातमी
मुस्लीम महिलांच्या आवाजाला आंतरराष्ट्रीय ‘बुकर’ दीर्घयादीत स्थान
मी महिला आहे आणि मुस्लीम महिला आहे, ही जाणीव लेखन करताना नकळत सतत सोबत करते. मला समाजातील विषमतेसंदर्भात आणखी लेखन करावं लागेल. सर्व प्रकारच्या भेदभावांविरोधात लिहिणं हेच माझ्या लेखनाचं मूळ उद्दिष्ट आहे… आंतरराष्ट्रीय बुकरच्या दीर्घयादीत समावेश झालेल्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकाच्या लेखिका बानु मुश्ताक यांचे हे मनोगत. या मूळ कन्नड भाषेतील पुस्तकाचा दीपा भस्थी यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे. कन्नड भाषेतून अनुवादित पुस्तकाचा दीर्घयादीत समावेश होण्याची ही पहिलीच वेळ!
मूळच्या वकील असलेल्या बानु मुश्ताक यांचा जन्म कर्नाटकातील एका पुरोगामी विचारांच्या मुस्लीम कुटुंबात झाला. वडील आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत होते. घरात शिक्षणाविषयी अतिशय आग्रही वातावरण. बानु यांनी वकिली पेशा स्वीकारला. त्यांचा साहित्य क्षेत्रात प्रवेश झाला तो बंडाय साहित्य चळवळीतून. या विद्रोही विचारांच्या चळवळीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हिंदू लेखकांच्या साहित्यात चित्रित करण्यात आलेली मुस्लीम पात्रे ही एक तर अतिसज्जन असतात किंवा अतिदुर्जन. त्यामुळे मुस्लीमही माणसेच असतात, त्यांच्यात चांगले-वाईट गुण असतात, हे निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे, या विचारांतून त्या १९७० सालापासून लिहू लागल्या. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेविषयी लेखनास सुरुवात केली. समाजातील उपेक्षितांचा आवाज होणे हे त्यांच्या लेखनाचे मूळ उद्दिष्ट होते आणि आजही आहे.
हार्ट लॅम्प हा दक्षिण भारतातील मुस्लीम मुली आणि महिलांच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणारा कथासंग्रह आहे. यात त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक ताणतणावांचे चित्रण आहे. यापैकी एका कथेचा समावेश पॅरिस रिव्ह्यूमध्येही करण्यात आला आहे. सहा कथासंग्रह, एक कादंबरी, कविता, निबंध त्यांनी लिहिले असून त्यापैकी अनेकांचे भारतातील विविध भाषांत अनुवाद झाले आहेत. हार्ट लॅम्प हे त्यांचे इंग्रजीत भाषांतरित झालेले पहिलेच पुस्तक आहे. बानु मुश्ताक यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली यांचा २००४ साली प्रदर्शित झालेला हसीना हा चित्रपट बानु मुश्ताक यांच्याच करी नगारागलु या पुस्तकावर आधारित आहे.
त्यांचा लढा त्यांनी केवळ साहित्यापुरताच सीमित ठेवलेला नाही. त्यांनी तब्बल नऊ वर्षे पत्रकारिता केली असून हसन नगरपालिकेच्या सदस्यपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आपल्या लेखनामागची प्रेरणा भोवतालची विविध स्वभावप्रवृत्तींची माणसेच असल्याचे त्या सांगतात.
बानु मुश्ताक यांची मुलाखत https://tinyurl.com/bdz5e6sk
‘द न्यू आयकॉन : सावरकर अॅण्ड द फॅक्ट्स’
लेखक : अरुण शौरी
प्रकाशक : व्हायकिंग (पेंन्ग्विन) इंडिया
पृष्ठे : ५६०; किंमत : ९९९ रु.
kravindrar@gmail.com