सिद्धार्थ ताराबाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अस्पृश्यतेतून सोसलेल्या यातनांच्या हेलावून टाकणाऱ्या करुण कहाण्या आंबेडकरपश्चात दलित साहित्यातून प्रखरतेनं मांडल्या गेल्या. आत्मचरित्रांतून, कथा-कवितांतून, अनुभव कथनांतून. त्यांची मुख्य धारेतल्यांनी सुरुवातीला उपेक्षा केली किंवा त्यांना अनुल्लेखातून मारण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, जातीव्यवस्थेविरोधातल्या आक्रोशातून निर्माण झालेल्या त्या शब्दांमध्ये ज्वालामुखीसम जमीन भेदण्याची, दखलपात्र ठरण्याची स्वयंभू शक्ती होती. उपेक्षा, अवहेलना, अनुल्लेख, अपमान, अन्याय, शोषण यांतून उत्पन्न झालेली अदृश्य विश्वव्यापी वेदना हा त्या साहित्याचा गाभा होता. नंतर नंतर या साहित्याचा प्रवाह काहीसा क्षीण झाला, पण ते अधूनमधून अंकुरत राहिलं. हुंकारत राहिलं.. नवनव्या परिप्रेक्ष्यात, नवनव्या संदर्भासह. नवा अवकाश कवेत घेत. याच प्रवाहातली पुढची पिढी म्हणजे ‘वॉटर इन ए ब्रोकन पॉट’. योगेश मैत्रेय या दलित तरुणाची ही अविस्मरणचित्रे.. ‘फ्लॉवर्स ऑफ होप स्प्राउट फ्रॉम द सीड्स ऑफ ग्रीफ’ या योगेशच्याच म्हणण्याप्रमाणे सामाजिक तुटलेपण आणि एकाकीपणातून ती उमटली आहेत. तळाशी धुमसता ज्वालामुखी असलेला भावनिक कल्लोळांचा खोल डोह, असंही या पुस्तकाचं वर्णन करता येईल.

योगेश मुळात कवी. लेखक आहे. शिवाय प्रकाशकही. ‘पँथर्स पॉ पब्लिकेशन’ ही त्याची प्रकाशनसंस्था. प्रामुख्यानं दलित-बहुजनांचं, इंग्रजीतलं किंवा प्रादेशिक भाषांतील साहित्य अनुवादित करून तो प्रकाशित करतो. दलित पँथरचे सहसंस्थापक कवी-लेखक ज. वि. पवार यांच्या साहित्याचा अनुवाद करून त्यानं तो प्रकाशित केला आहे. शिवाय, त्याचा ‘फ्लॉवर्स ऑन द ग्रेव्ह ऑफ कास्ट’ हा लघुकथा संग्रह आणि ‘सिंगिंग/थिंकिंग अँटी कास्ट’ हा लघुनिबंध संग्रहही प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पुस्तकात त्याच्या आठवणींचा दस्तावेज आहे. न्यूनगंडातून बाहेर पडून स्वयंप्रकाशित होण्यापर्यंतचा हा रंजक तितकाच अंतर्मुख करणारा प्रवास आहे.

योगेशला त्याची ही कथा त्याच्या मातृभाषेतही कथन करता आली असती, पण इंग्रजीमध्ये लिहिण्याच्या आपल्या निर्णयाला तो ‘भारतातल्या ब्राह्मणी इंग्रजी लेखनाविरोधातले बंड’ मानतो. ‘हे इंग्रजी लेखन दलित-बहुजनांच्या ऐतिहासिक, बौद्धिक आणि भावनिक जगाचं अचूक चित्रण करण्यात अक्षम ठरले आहे,’ अशा रास्त निष्कर्षांप्रत तो पोहोचला आहे. ‘‘इंग्लिश भाषा आपल्याला (दलित-बहुजन) येते की नाही या प्रश्नापेक्षा ती भाषा आपल्याला समजून घेते की नाही, हा प्रश्न आहे.’’ हे जॉर्ज या त्याच्या मित्राचं म्हणणं त्याला पटलेलं असावं आणि म्हणूनच त्यानं इंग्रजी भाषेतलं साहित्य वाचणाऱ्या वर्गाला डोळय़ासमोर ठेवलं आहे. या उच्चभ्रू जगानं दलित-बहुजनांचं भावविश्व, त्यांची वेदना, त्यांच्या वेदनेची भाषा समजून घ्यावी, हाही त्याचा उद्देश आहे. ही भाषा त्यानं जिद्दीनं आत्मसात केली आहे. त्याच्या विचार करण्याची, व्यक्त होण्याची आता हीच प्रमुख भाषा झाली आहे. तो आपल्या कवितेत म्हणतो, ‘‘ इंग्लिश, आय अ‍ॅम द दलित पोएट- आय अ‍ॅम अ‍ॅन इन्फिल्ट्रेटर इन युअर हाउस’’  

यशोगाथा नव्हे मुक्तिकथा

नागपूर शहरातल्या दलित वस्तीत वाढलेला, न्यूनगंड असलेला, पराकोटीचा संकोची, आत्मविश्वास नसलेला, वस्तीबाहेरच्या जगात ‘परग्रहवासी’ ठरणारा एक मितभाषी मुलगा ते कवी, कथालेखक आणि प्रकाशक हा योगेशचा ‘लर्निग टू सी’पासून ‘लर्निग टू राइट’पर्यंत आणि पुन्हा ‘बिगिनिंग फ्रॉम द रूट्स’ असा प्रवास म्हणजे हे पुस्तक. एका धुमसत्या ज्वालामुखीची मुक्तिकथा!

या मुक्तिकथेचा नायक – योगेश त्याचे अनुभव मांडत असला तरी ही त्याची एकटय़ाची गोष्ट नाही, तर जातीव्यवस्थेत एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्या समस्त दलित समष्टीतल्या तरुणाईची ती आहे. तशीच ती ‘‘डोन्ट मॅरी ए दलित’’ हा आपल्या बापाचा सल्ला शिरसावंद्य मानणाऱ्या योगेशची मैत्रीण‘देविका’ची, पर्यायाने सवर्णानी वडिलोपार्जित जोपासलेल्या दलितद्वेषाची आणि क्रौर्याचीही आहे.. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी संदर्भाकित केलेल्या ‘सिक सोसायटी’चीही आहे. म्हणून योगेशच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या, पराकोटीची पझेसिव्ह असलेल्या देविकाने प्रेमसंबंध तोडल्यावर, ‘‘जर प्रेम जातीव्यवस्थेचं उच्चाटन करू शकत नसेल तर अन्य कशानेही ते शक्य नाही,’’ या निष्कर्षांपर्यंत योगेशला पोहोचावं लागतं.

‘एकाकी असताना एकटेपणाची जाणीव होत नाही, तर लोकांमध्ये असतानाच ते तुम्हाला जाणवतं’ किंवा ‘प्रबळ जातींच्या वर्चस्वाखाली असलेल्या ठिकाणी दलित व्यक्तीला एकटं वाटणं म्हणजे मृत्यूविरोधातील जगण्याचा संघर्ष आहे,’ इतक्या तीव्रतेनं सामाजिक एकाकीपणाची वेदना बाळगणाऱ्या या नायकाचा हा प्रवास जोसेफ कॅम्पबेल यांच्या ‘हिरो विथ ए थाऊजंड फेसेस’मधल्या पौराणिक नायकत्वाच्या सिद्धांताला छेद देतो. तो आपल्या सामान्य विश्वात अतिसामान्य आहे. त्याला कोणीही ‘हिरोगिरी’ करण्यासाठी हाक देत नाही.. जातव्यवस्था हा त्याचा बाह्य शत्रू. पण या शत्रूमुळे त्याच्या मनात निर्माण झालेली न्यूनगंडांची गुंतागुंत हा त्याचा अंतर्गत शत्रू. या दोन्ही शत्रूंशी त्याची लढाई भावनिक पातळीवरची आहे. ती लढताना एकटेपणाच्या जाणिवेतून घुसमटणं, गुदमरणं, कोसळणं, पुन्हा धडपडत उभं राहणं आणि स्वत्वाचा निरंतर शोध घेत राहणं यांचा प्रत्यय तो आपल्याला वारंवार देतो. नातेसंबंधांत, वैयक्तिक आयुष्यात नैराश्यं येत तेव्हा तो काही काळ हेलपटतो; पण पुन्हा पुस्तकांकडे वळतो. अधाशासारखं वाचतो. लिहितो. दलित व्यक्तीसाठी लिहिणं म्हणजे काय, हे स्पष्ट करताना तो म्हणतो, ‘‘लेखनक्रिया दलित व्यक्तीच्या जीवनात क्रांतीपेक्षा कमी महत्त्वाची नसते. आमच्यासाठी लेखन म्हणजे स्वत:विरोधातील, समाजाविरोधातील आणि आम्हाला गिळंकृत करायला बसलेल्या जातीय अंध:काराविरोधातील लढाईच. लिहिणं म्हणजे स्वयंदीप होणं.’’ किंवा ‘‘लेखन ही एक स्वयं-स्पष्टीकरणाची कृती आणि ब्राह्मणी साहित्य वाचून माझ्या मनात निर्माण झालेल्या साहित्यिक कल्पनांपासून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.’’

सर्वच क्षेत्रांत वर्चस्व असलेल्या ब्राह्मणी समाजव्यवस्था, व्यवस्थांचं ब्राह्मणीकरण, त्या व्यवस्थांमध्ये अन्यांवर होणारे सांस्कृतिक हल्ले यावरही योगेशनं टीका-टिप्पण्या, भाष्यं केली आहेत. उदा. जात या आजारपणातून भारतीयांमध्ये विविध प्रकारचे पॅरानोइया (संभ्रमविकृती) विकसित होतात आणि त्याचा परिणाम हिंसेत होतो. जात हा एक असा अदृश्य पडदा आहे जो दृष्टी अधू करतो आणि व्यक्तीचे खरे अस्तित्व नाकारतो. त्याच्या कवितेत तो म्हणतो त्याप्रमाणे, जात विद्युत प्रवाहासारखी आहे, वाहिन्या दृश्य, पण प्रवाह अदृश्य!

त्रलोक्य बौद्ध महासंघाच्या (टीबीएम) रिट्रीट सेंटरमध्ये योगेशने बराच काळ व्यतीत केला. तिथल्या आध्यात्मिक नशेत त्याचा कोंडमारा झाला. त्यामुळेच त्याची ‘‘आय अ‍ॅम नॉट युअर बुद्धिस्ट झ्र् द बुद्धिस्ट यू वॉन्ट टू मेक आऊट ऑफ मी’’ या निष्कर्षांला येण्यामागची निरीक्षणे आणि भाष्ये धाडसी आहेत. ‘टीबीएम’चे शिबीर आणि त्याची वस्ती यांची तुलना करताना तो म्हणतो, ‘‘माझ्या वस्तीत डॉ. आंबेडकरांचे सादरीकरण एक ऐतिहासिक व्यक्ती असं होत असे. तिथे तत्त्वज्ञान, विचार, किंवा दलितांच्या जगण्यामागील एक शक्ती म्हणून त्यांना अस्तित्व नव्हते..  ..येथे डॉ. आंबेडकरांची सरकारने प्रकाशित केलेली पुस्तके, छायाचित्रे होती, बौद्ध धर्माविषयीच्या त्यांच्या विचारांना थारा नव्हता. ’’     

डॉ. आंबेडकर आणि ‘सिक’ सोसायटी

योगेश आपल्या घरात डॉ. आंबेडकरांची प्रतिमा पाहात आला. त्या प्रतिमेपुढे त्याच्या आजीचं फुलं वाहणंही पाहात आला. पण आंबेडकर ही फुलं वाहण्याची गोष्ट नाही, तर मस्तिष्कात रुजवण्याचं आणि जातीव्यवस्थेविरोधात संघर्षांचं ते एक तत्त्वज्ञान किंवा शस्त्र आहे, हे त्याला यथावकाश कळलं. जातिअंताचा सिद्धांत असं ज्याचं वर्णन करता येईल ते ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ वाचल्यानंतर किंवा ज्या वैयक्तिक अनुभवांच्या पायावर पुढे बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची इमारत आणि चळवळ उभी राहिली ती ‘वेटिंग फॉर व्हिजा’ही त्यांची १६ पानी आत्मकथा वाचल्यानंतर योगेश अस्वस्थ झाला. तुम्ही डॉ. आंबेडकर वाचलेत आणि अस्वस्थ वाटलं नाही तर कदाचित तुम्ही ते वाचतच नसाल. कारण आंबेडकर वाचणं म्हणजे जातीसंस्थेचा इतिहास हा द्वेष आणि अन्यायाचा इतिहास आहे, अशा निष्कर्षांप्रत येणं, असं निरीक्षण योगेश नोंदवतो ते त्यातूनच.

आणखी एका तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली तो आहे: पेडॅगॉजी ऑफ ऑप्रेस्ड. गेल्या शतकात ब्राझीलमध्ये होऊन गेलेल्या पाउलो फ्रिएरे या तत्त्वज्ञाचं हे चिंतन. या ग्रंथानंही योगेशचं  विचारविश्व व्यापलं आहे. त्यातला एक उतारा उद्धृत करणं क्रमप्राप्त आहे. फ्रिएरे म्हणतो, ‘‘एक शौर्यक्रिया म्हणून प्रेम हळवे असू शकत नाही. स्वातंत्र्याची कृती म्हणून त्याने वापर करण्याची सबब बनू नये. त्याने स्वातंत्र्याशी संबंधित अन्य कृती निर्माण करणे आवश्यक आहे. तसे घडत नसेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही. केवळ दडपशाही व्यवस्था नष्ट करूनच त्या व्यवस्थेने निषिद्ध केलेल्या प्रेमाची पुनस्र्थापना करणे शक्य आहे. जर मी जीवनावर प्रेम करीत नसेन, लोकांवर प्रेम करीत नसेन तर मी संवाद साधू शकत नाही. तथापि, जग आणि लोकांबद्दल अगाध प्रेम नसेल तर संवादही अस्तित्वात नसतो.’’

कथनशैलीतील अनौपचारिकता, सहजता आणि बिनधास्तपणा हे योगेशच्या लेखनाचं वैशिष्टय़. गोष्टी घडल्या किंवा अनुभवल्या तशाच त्या सांगितल्या, हे तर त्यानं केलं आहेच, पण त्यावर आपलं भाष्य आणि निरीक्षणही नोंदवलं आहे. घडलेला प्रसंग त्याच्या परिप्रेक्ष्यासह उभा करण्याचा शब्दखेळ त्याला जमला आहे. शिवाय, सोयीचं सांगावं आणि गैरसोयीचं लपवावं, असं तो करत नाही.. मग त्याचं कौटुंबिक जबाबदारीपासून पळ काढणं असो, अतिमद्यसेवन असो की मैत्रिणींबरोबरचे नातेसंबंध/ लैंगिक संबंध असोत.. तो खोटय़ा नैतिकतेचा बुरखा पांघरत नाही किंवा पुरुषी अहंकाराच्या बढाया मारत नाही.     

महार-बद्धिस्ट, दलित या न्यूनगंडातून आलेल्या सामाजिक एकलेपणाच्या अनुभवांचं गाठोडं उघडताना, योगेश लाखमोलाचा प्रश्न उपस्थित करतो. ‘स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचं नाव?’ या नामदेव ढसाळांच्या प्रश्नाइतक्याच तीव्रतेचा धक्का देण्याची ताकद योगेशच्याही या गहन प्रश्नात आहे. ‘‘दलित व्यक्तीचं भावविश्व विशद करण्याची किंवा त्याच्या आकलनाची भाषा या देशाकडे आहे?’’ हाच प्रश्न संपूर्ण पुस्तकभर वाचकाला टोचत राहतो, पुस्तकाच्या शेवटापर्यंत खेचत नेतो आणि त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर निर्माण करतो. 

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autobiographies stories and poems experience water in a broken pot yogesh maitreya ysh