पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार, २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर अयोध्यानगरीत भाविकांचा ओघ वाढणार असल्याने या शहरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येतील राम पथ, जन्मभूमी पथ, भक्ती पथ आणि धर्म पथ या चारही रस्त्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. दर्शनी भागावर विद्युत रोषणाई, भित्तिचित्रे, आकर्षक सौर दिवे, धनुष्याकृती दिवे, योग्य फुटपाथ, भूमिगत गटारे. हिरवाईने नटलेले दुभाजक, सीसीटीव्ही, आधुनिक वाहतूक व्यवस्थापन आदी सुविधा या रस्त्यांवर देण्यात येणार आहेत.

विद्युत बसची सुविधा

* पर्यावरणस्नेही प्रवासासाठी अयोध्येमध्ये विद्युत बस धावणार आहेत.

* राम जन्मभूमी मंदिर आणि शहरातील इतर मंदिरांना भेट देण्यासाठी भाविकांना खास विद्युत बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

* विशेषत: राम पथ आणि धर्म पथ या मार्गावर विद्युत बस चालविण्यात येणार असून १५ जानेवारीपासून या रस्त्यांवर १०० विद्युत बस चालविण्यात येत आहेत.

* त्याशिवाय गोल्फ कोर्ट, ई-रिक्षा यांचीही सुविधा देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> हॉटेल आरक्षणासाठी भाविकांची धावपळ..

पार्किंगची व्यवस्था

* २२ जानेवारीनंतर भाविकांचा ओघ वाढणार असल्याने अयोध्येत काही ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

* साकेत पेट्रोल पंप ते लता मंगेशकर चौकापर्यंत असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

* १४ कोसी व पंचकोसी परिक्रमा मार्ग, उदया चौक या परिसरात पार्किंगसाठी नवी ठिकाणे विकसित करण्यात येत आहेत.

* या तीनही ठिकाणी अनुक्रमे १० एकर, ३५ एकर व २५ एकर अशा ७० एकर क्षेत्रात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

* महर्षि अरुंधती पार्किंग व व्यावसायिक संकुल, लक्ष्मण कुंज बहुमजली पार्किंग, अमानीगंज येथे पार्किंग व व्यावसायिक संकुल उभारण्यात आले आहे.

सुरक्षित प्रवासासाठी

* अयोध्या नगरीत भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि विनात्रास व्हावा यासाठी ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

* सध्या २० चौकांमध्ये ही यंत्रणा असून दोन ठिकाणी लवकरच सुरू करणार आहे.

* ४७.७४ कोटींचा हा प्रकल्प असून १७ जानेवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

* अयोध्येतील नवा बस थांबा आणि निर्माणाधीन विमानतळ मार्गावरही आयटीएमएस यंत्रणा सुरू करण्याची योजना आहे.

* रिकाबगंज, सिव्हिल लाइन, हनुमान गुंफा, श्रीराम रुग्णालय, नया घाट, साकेत पेट्रोल पंप, देवकाली बायपास, सुलतानपूर बायपास, रायबरेली बायपास, सहादतगंज बायपास, गुरू गोिवद सिंह चौक, पोलीस लाइन, टेढी बाजार, उद्या चौक, देवकाली तिराहा, गुदरी बाजार, पोस्ट ऑफिस चौक, नाका तिराहा, हनुमान गढी चौक, डीएम चौक या परिसरावर ‘आयटीएमएस’ची नजर असेल.

हेही वाचा >>> रेल्वेने अयोध्या गाठायची आहे? 

पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम

* अयोध्येत १४ विविध ठिकाणी ‘पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम’ यंत्रणा लावण्यात आली आहे.

* या यंत्रणेद्वारे वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांबाबत प्रवाशांना माहिती देण्यात येईल.

* वाहतूक सिग्नलचे उल्लंघन केल्यास ‘मॉनिटरिंग रूम’द्वारे इशारा देण्यात येणार आहे.

* २० ठिकाणी आपत्कालीन दूरध्वनी संच बसविण्यात आले आहेत. कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास याद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.

महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अयोध्येतील नव्या विमानतळाला रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मीकी यांचे नाव देण्यात आले आहे. १४५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले हे विमानतळ ६५०० चौरस मीटर परिसरात पसरले आहे. दररोज १० लाख प्रवाशांना सेवा देऊ शकेल इतकी क्षमता या विमानतळाची आहे. विमानतळाची इमारत राम मंदिराच्या आकारासारखी बांधण्यात आली आहे. विमानाच्या आत स्थानिक कलाकुसर करण्यात आली असून रामायणातील कक्षांची माहिती चित्ररूपात देण्यात आली आहे.

रेल्वे स्थानक नि सुविधा

* अयोध्या रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले आहे. ते तिमजली आहे.

* अत्याधुनिक सुविधा असलेल्या या स्थानकाची वास्तुकला रामजन्मभूमी मंदिरापासून प्रेरित आहे. त्याची बाहेरील बाजू श्रीराम मंदिरासारखी दिसते.

* रेल्वे स्थानकाच्या आतील भागांत स्थानिक कला, चित्रे आणि श्रीरामाचे जीवन दर्शविणारी विविध चित्रे सजवलेली आहेत.

* स्थानकात लहान मुलांसाठी देखभाल, ज्येष्ठ नागरिकांसाठी खोल्या, उपाहारगृहे यांच्या सुविधा आहेत. अतिथी सत्कार विश्रामगृह आहे.

* दोन अमृत भारत रेल्वेगाडय़ा आणि सहा वंदे भारत रेल्वेगाडया या स्थानकावरून धावतील.

सौर पथदिवे मार्गाच्या विश्वविक्रमाच्या दिशेने..

* योगी आदित्यनाथ सरकार अयोध्या शहरात सौरऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांची सर्वात लांब रांग बनविण्याचा प्रयत्न करत आहे. हा विश्वविक्रम सौदी अरेबियाच्या नावावर आहे. तिथे डिसेंबर २०२१ मध्ये ९.७ किलोमीटर मार्गावर ४६८ सौरदिवे बसविण्यात आले होते.

* अयोध्येमध्ये हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी गुप्तार घाट ते निर्माली कुंड यांना जोडणाऱ्या १०.२ किलोमीटर मार्गावर ४७० सौरदिवे बसविण्यात येणार आहेत.

* सध्या ४७० पैकी ३१० सौरदिवे बसविण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक दिवस आधी सर्व दिवे बसविण्यात येणार असून ‘गिनीज वल्र्ड रिकॉर्डस’ंशी संपर्क साधला जाणार आहे.

* ४.४ वॉट एलईडीवर आधारित सौरदिवे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

कोटयवधींचे प्रकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर रोजी अयोध्या धाम येथे १५,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या ११,१०० कोटींच्या खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील ४,६०० कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

राम पथ

सहादतगंज ते लता मंगेशकर चौक (नया चौक)

एकूण लांबी- १२.९४ किलोमीटर

खर्च- ८४५ कोटी रुपये

प्रकार- चौपदरी

नया चौकाचे नामांतर आणि सौंदर्यीकरण करून त्याला लता मंगेशकर चौक असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या मध्यभागी भव्य आकाराची वीणा ठेवण्यात आली आहे. ती कला तसेच आधुनिक अयोध्येच्या वैभवाचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जाईल. इथे सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे.

जन्मभूमी पथ

सुग्रीव किल्ला ते राम जन्मभूमी मंदिर

एकूण लांबी- ०.५८० किलोमीटर

खर्च- ४१.०२ कोटी

प्रकार- दुपदरी

पूर्वी एकपदरी असलेला हा रस्ता आता दुपदरी करण्यात आला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो रुंद करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ‘फाईव्ह जी’ वायफाय कनेक्टिविटी असलेला उच्च गतीचा इंटरनेट अ‍ॅक्सेस या क्षेत्राला देण्यात आला आहे.

भक्ती पथ

श्रीनगर हाट ते हनुमान गढी

एकूण लांबी- ०.७४२ किलोमीटर

मूल्य- ६८.०४ कोटी

प्रकार- चौपदरी

अतिक्रमणे हटवून हा रस्ता चौपदरी तयार करण्यात आला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी या रस्त्यावर मोठया प्रमाणात सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.

धर्म पथ

लता मंगेशकर चौक ते

लखनऊ-गोरखपूर महामार्ग

एकूण लांबी- २ किलोमीटर

खर्च- ६५.४० कोटी

प्रकार- चौपदरी

अयोध्येत प्रवेश करण्यासाठीचा हा मुख्य मार्ग असून त्याच्या सुरुवातीला आकर्षक प्रवेशद्वार बांधण्याचे काम सुरू आहे. अयोध्येतील हे चार मुख्य रस्ते चार वेद आणि चार युगे यांच्यापासून प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहेत. स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन धोरणांचा समावेश करून शहरातील गतिशीलता सुधारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya infrastructure development infrastructure development in ayodhya city due to ram mandir zws