मिलिंद मुरुगकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या पिढयांना वाल्मीकींच्या रामायणातील राम आठवतो. त्या पिढीतील कोणी रामजन्मभूमीत रामाचे मंदिर नाही, म्हणून अश्रू ढाळल्याचे स्मरत नाही. अश्रू प्रामाणिकच असतात, पण त्यामागची अन्यायग्रस्तता खरी आहे का, हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते..

रामलल्लांना चांगले घर मिळाल्याबद्दल एका पत्रकाराच्या दाटून आलेल्या अश्रूंची सध्या चर्चा आहे. या अश्रूंचा अन्यायग्रस्ततेशी संबंध आहे. मोठा अन्याय दूर झाला म्हणून वाटलेल्या उदात्त भावनेशी या अश्रूंचा संबंध आहे. अश्रू खरे होते याबद्दल शंका नाही. पण मुळात जो अन्याय होता असे वाटत आहे, तो अन्याय खरा होता की ही अन्यायग्रस्ततेची भावना कोणी तरी चलाखीने रुजवली होती?

मानवी मन खूप दुबळे असते. माणसाच्या मनात खोटी अन्यायग्रस्तता निर्माण करता येते. भूतकाळाबद्दलच्या आठवणींत न घडलेली घटनादेखील समाविष्ट करता येते. एलिझाबेथ लॉफ्टस या नामवंत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बाईंनी माणसाचे मन भूतकाळाच्या आठवणींबद्दल/ आकलनाबद्दल किती कमकुवत असते, हे दाखवणारे आणि मानसशास्त्रात भर घालणारे अनेक प्रयोग केले. त्यातील एका सर्वात प्रसिद्ध प्रयोगात सहभागी झालेल्यांना त्यांच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटनांबद्दल काही प्रश्न विचारले गेले. एकदा नाही तर अनेकदा. त्यात अधूनमधून काही सूचनाही दिल्या गेल्या. मग त्यापैकी अनेक व्यक्तींनी लिहिले की ते लहानपणी मॉलमध्ये हरवले होते आणि बालपणातील ही घटना त्यांच्यावर मानसिक आघात करणारी होती. प्रत्यक्षात असे काहीही घडले नव्हते. पण त्या सूचनांमुळे, प्रश्नांमुळे त्यांना खरोखर असे वाटू लागले होते. अनेकांनी तर त्या घटनेची अत्यंत हृदयद्रावक वर्णनेदेखील लिहिली आणि त्यातील कोणीही खोटे बोलत नव्हते. त्यांच्या डोळयांतील अश्रू खोटे नव्हते. पण ते जिचे वर्णन करत होते, ती घटना खरी नव्हती, प्रत्यक्षात कधीही घडलेली नव्हती. या प्रयोगातील काहींना त्यांना कोणीही जाणूनबुजून मॉलमध्ये असे एकाकी सोडले होते, असे वाटत नव्हते, मात्र आपण अतिशय दुर्दैवी होतो, असे मात्र त्यांना निश्चितच वाटत होते. नियतीने त्यांच्यावर लहानपणी न केलेल्या अन्यायाच्या खुणा ते आज वागवू लागले होते.

हेही वाचा >>> आपण सावित्रीबाईंचा वसा पुढे नेणार का?

अयोध्येत येत्या काही दिवसांत अनेकांच्या डोळयांत पाणी येणार आहे. अयोध्येत उपस्थित असलेल्यांच्या  आणि अयोध्येतील सोहळा टीव्हीवर पाहणाऱ्यांच्याही डोळयांत असे अश्रू तरळतील. यापैकी कोणाचेही अश्रू खोटे आहेत, असे मानण्याचे कारण नाही, पण आपल्या मनात खोटी अन्यायग्रस्तता निर्माण केल्यामुळे तर ते वाहत नाहीत ना, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. 

अन्यायग्रस्तता आणि जातीय अस्मिता यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. आणि आपल्या उपराष्ट्रपतींनादेखील अशा जातीय अस्मितेशी जोडलेल्या अन्यायग्रस्ततेचा चलाख वापर करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपली जात सांगण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे विधान केले होते की (त्यांच्या दृष्टीने) देशात फक्त चार जाती आहेत. तरुण, स्त्रिया, शेतकरी आणि गरीब. पण त्यांनी हे विधान करून काही दिवस होताच देशाच्या उपराष्ट्रपतींनी त्या चार जातींत आणखी एक जात जोडली, ती म्हणजे त्यांची स्वत:ची जात- जाट.

एका खासदाराने उपराष्ट्रपतींची नक्कल केली आणि त्यामुळे आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांच्या मते, त्यांची नक्कल करणे हा समस्त जाट जातीचा अपमान आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा, की ते जाट असल्यामुळेच त्यांची नक्कल केली गेली. हे एवढयावरच थांबले नाही. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्रपतींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. राष्ट्रपतींनीदेखील उपराष्ट्रपतींच्या या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा >>> धार्मिक उत्सव जरूर असावेत… पण त्यात सरकार कसे सहभागी होऊ शकते?

नक्कल करणे हा व्यक्तीचा तरी अपमान मानायचा का हाच मुळात प्रश्न आहे. इथे तर उपराष्ट्रपतींनी थेट जातीचीच ढाल समोर केली. भारताच्या इतिहासात उपराष्ट्रपतींनी जातीचा आधार घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. खरे तर जाट ही मोठया प्रमाणात जमिनी बाळगून असलेली जात. हरयाणात ४० टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या जातीकडे तेथील ९० टक्के जमीन आहे. या जातीला कधीही भेदभाव, अपमान वा अवहेलनेचा सामना करावा लागलेला नाही. तरीदेखील देशाच्या उपराष्ट्रपतींना जातीचा उल्लेख करावासा वाटला आणि यात भाजप आणि त्यांच्या देशभरातील समर्थकांना काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. ‘अन्यायग्रस्तता’ हे किती मोठे राजकीय हत्यार आहे, हेच यावरून स्पष्ट होते.

उपराष्ट्रपतींनी किंवा जाट जातीतील आणखी काही नेत्यांनी अशा भ्रामक अन्यायग्रस्ततेचा वारंवार आधार घेतला तर एक वेळ अशीदेखील येऊ शकेल की या राजकीयदृष्टया, सांपत्तिकदृष्टया उच्च स्थानी असलेल्या जाट जातीतील कोणाच्याही डोळयांत अशाच एखाद्या घटनेमुळे अश्रू येतील आणि त्या व्यक्तीसाठी त्या भावना प्रामाणिक असतील.

हिटलरने जर्मन लोकांच्या मनात अशीच अन्यायग्रस्तता रुजविली होती. पहिल्या महायुद्धाला जर्मनीला जबाबदार धरून १९१९ च्या वॉर्साच्या करारात जर्मनीवर लादलेल्या अटी आपल्या देशासाठी अत्यंत मानहानीकारक आहेत आणि जर्मनीविरुद्ध एक आंतरराष्ट्रीय कट शिजवला गेला आहे, असे त्याने जर्मन नागरिकांना वारंवार सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू जर्मन नागरिकांचादेखील त्यावर विश्वास बसू लागला. अशी खोल अन्यायग्रस्तता जर्मनांमध्ये रुजल्यावर शत्रू ठरवणे सोपे होते. हिटलरने आपल्याच देशवासीयांमधील काहींकडे, म्हणजे ज्यूंकडे आपला रोख वळवला.

आजच्या समाजमाध्यमांचा स्फोट झालेल्या काळात तर अशी अन्यायग्रस्तता रुजवणे अगदी सोपे झाले आहे. इतिहासाची मोडतोड करण्याची आणि नवा इतिहास मनावर बिंबविण्याची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. अन्यायग्रस्तता या एकमेव शिदोरीवर जर एखादी संघटना किंवा एखादा पक्ष बांधला गेला असेल तर तो या माध्यमक्रांतीचा प्रभावी वापर करू शकतो.

आज अशी परिस्थिती आहे की सव्वातीनशे वर्षांपूर्वीचा औरंगजेब जणू काही दशकांपूर्वी जिवंत होता असे वाटू लागले आहे. त्याने तेव्हा केलेल्या अन्यायांमुळे आजही लोकांना दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, असे चित्र निर्माण केले जाऊ लागले आहे. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितले होते की आपण २०० वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीत राहिलो आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी गुलामगिरीतून मुक्त झालो. आता आपल्याला सांगण्यात येत आहे, की आपण हजार वर्षे गुलामगिरीत होतो. अयोध्येतील त्या महिला पत्रकाराच्या अश्रूंचा संबंध या हजार वर्षांच्या अन्यायग्रस्ततेशी आहे.

भारतातील पिढयानपिढया रामायण आणि महाभारत ऐकत- वाचत मोठया झाल्या आहेत. रामायण महाभारताशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पनाही करता येणार नाही. आज पन्नाशीच्या वरील लोकांनी आठवून पाहावे की त्यांच्या लहानपणी राम नेमका कोठे जन्माला आला, असा प्रश्न त्यांच्या मनात आला होता का? आला असता, आणि त्यांनी तो आपल्या आई- वडिलांना किंवा आजी- आजोबांना विचारला असता, तर त्यांनी काय उत्तर दिले असते? त्यांनी आपल्या आजी- आजोबांना राम ज्या ठिकाणी जन्मला तिथे त्याचे मंदिर नाही म्हणून दु:खात असल्याचे पाहिले आहे का? रामाचा जन्म हा तेव्हा गैरलागू प्रश्न होता. त्या पिढीसाठी रामायण हे वाल्मीकींचे एक सुंदर महाकाव्य होते. राम आपल्या सर्वांच्या खूप जवळ होता. आस्तिकांच्या आणि नास्तिकांच्यादेखील. महात्मा गांधींना राम अतिशय प्रिय होता. ते  नेहमी रामराज्याची कल्पना मांडत. त्यांना एकदा विचारले गेले की सीतेला वनवासात पाठवणारा राम तुम्हाला आदर्श कसा काय वाटतो. गांधींनी उत्तर दिले की दशरथपुत्र राम नाही तर भारतीय संस्कृतीत जे जे आदर्श मानले गेले आहे, त्या सर्वांच्या समुच्चयासाठी राम हा शब्द वापरला जातो, तो राम मला प्रिय आहे. राम हा असा होता- अमूर्त आणि गोष्टींमधून भेटणारा..

यापुढील काळात राग, संताप आणि उदात्त वाटणारे अश्रू या सर्वांच्या फेऱ्यात आपल्याला अडकवले जाईल. आपले अश्रू प्रामाणिक असतील पण अन्यायग्रस्तता खरी आहे का याची तपासणी करूया. हे सांगणेही अरण्यरुदन ठरेल अशी आजची परिस्थिती आहे. पण बलाढय रावणापुढे कदाचित रामालादेखील क्षणभर का होईना, असेच निराश वाटले असेल.

लेखक सामाजिक व आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

milind.murugkar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram temple inauguration vice president insulte caste discrimination zws
Show comments