डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला दिले जावे, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीने तब्बल १६ वर्षे संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानानंतर अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’) करण्यात आला. या घटनेला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात नामांतराचा लढा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरलेला आहे. तो आंबेडकरी चळवळीसाठी केवळ चळवळीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा नाही, तर तो वैचारिक संघर्षाचा, जातीयवादी मानसिकतेविरुद्धचा लढा आहे. या लढ्याने महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय वातावरण बदलले. त्यातूनच चळवळीत नवनवीन नेतृत्व निर्माण होऊ लागले. परंतु सामाजिक परिवर्तनाच्या आणि समतेच्या चळवळीच्या दृष्टीने या लढ्यानंतर आंबेडकरी चळवळीने जी गती घ्यायला हवी होती, ती अद्यापही दिसून येत नाही. किंबहुना पुन्हा एकदा सामाजिक, धार्मिक, जातीय, सांस्कृतिक संघर्ष अटळ बनलेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक काळ निर्माण झालेला आहे. म्हणून सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. 

विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्यानंतर चळवळीने एक लढा जिंकला. परंतु त्या लढ्याचे सामाजिक, राजकीय पडसाद आणि परिणाम दीर्घकालीन राहिले. चळवळीतील पोचीराम कांबळे असेल, गौतम वाघमारे असतील किंवा इतर अनेक भीमसैनिक असतील, त्यांनी दिलेले बलिदान, अनेकांच्या घरांची झालेली राखरांगोळी ही कधीही विसरता येण्यासारखी नाही. मात्र नामांतरानंतर आंबेडकरी चळवळीने सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सुसंघटित होऊन अधिक ताकदीने विधायक प्रश्न हाती घेऊन काम करणे गरजेचे होते, ते फारसे घडताना दिसले नाही. चळवळीतील नेतृत्वाने प्रसंगानुरूप भावनिक प्रश्नांना हात घातला आणि दीर्घकालीन प्रश्न बाजूला पडले. त्यामुळे चळवळ सर्वार्थाने बळ धरू शकली नाही. पुढच्या काळात रिपब्लिकन नेत्यांच्या गटबाजीमुळे त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. आंबेडकरी चळवळीला, त्यामधील रिपब्लिकन पक्ष असो वा अन्य आंबेडकरी पक्ष संघटन असोत, त्यांना एकाकी पाडले गेले. तीन दशकांमध्ये आंबेडकरी चळवळीचा दबदबा कमी होत गेला आणि संसदीय राजकारणातून आंबेडकरी पक्षांचे अस्तित्त्व संपुष्टात आल्याचे दिसून आले. वैचारिक बांधिलकीही राहिली नाही. केवळ सत्तेसाठी कुठेही धावण्याची कसरत सुरू झाली. अन्याय अत्याचाराच्या घटना कमी झाल्या नाहीत. उलट त्यात वाढ होतानाच दिसून आली. समाजासमोरचे प्रश्न दिवसागणिक वाढत चालले आहेत. नोकरी, शिक्षण या क्षेत्रांत प्रश्न जटिल झाले आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असोत अथवा जनता यांच्यापुढे वर्तमानात निरनिराळी आव्हाने उभे ठाकलेली आहेत. 

Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
dr ambedkar visited rss shakha opposed to buddhist councils organised by sangh parivar
पहिली बाजू : डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

हेही वाचा – स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 

कवी सुरेश भट यांनी म्हटले आहे, राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची, लढाई संपली नाही यारो अजूनही नामांतराची! 

ते खरेच आहे. विद्यापीठाला नाव दिले गेले, मात्र ही लढाई अजूनही संपलेली नाही. या लढ्याची परिपूर्ती होण्यासाठी आंबेडकरी चळवळीने विविध प्रश्नांवर सुसंघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. वर्तमानात समाजातील धर्मांधता, जातीयता वाढत आहे. देशात आणि राज्यातही शोषित, वंचित, पीडित, दलित, आदिवासींवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्यातील बीड असो अथवा परभणी असो, या ठिकाणी घडलेल्या घटना फार वेदनादायी आहे. नामांतराच्या लढ्यातून आंबेडकरी चळवळीने कोणता बोध घेतला? 

या साऱ्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीने भावनिक प्रश्नांमध्ये गुंतून न पडता विधायक प्रश्न हाती घेणे, मूलभूत प्रश्नांवर लढे उभे करणे गरजेचे आहे. समाजात राजकारणासाठी अनेकजण मुद्दामहून काही भावनेशी निगडित अप्रिय घटना घडवतात आणि त्याला आंबेडकरी समुदायाकडून अपेक्षित प्रतिक्रिया येऊ लागतात. यातूनच मग क्रिया- प्रतिक्रियावादाचे राजकारण घडत राहते. किंबहुना अशा प्रकारे प्रतिक्रियावादात अडकवून ठेवले जाते. त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल मिळते. महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात आणि वेगळ्याच गोष्टींभोवती समाजकारण, राजकारण फिरत राहते. हे गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहे. त्यामुळे चळवळीतील सामान्य नागरिक असो अथवा कार्यकर्ता यांनी या गोष्टीचे भान बाळगले पाहिजे. त्यातून बोध घेतला पाहिजे. प्रतिक्रियावादातून आपण बाहेर पडले पाहिजे. 

चळवळीच्या भल्यासाठी चळवळीची जी विविध अंगे आहेत, त्यामध्ये सुसूत्रता आणण्यावर भर दिला पाहिजे. विशेषतः समाजकारणामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक संघटना काम करत असतात. त्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे काम केल्यास सामाजिक, धार्मिक विकासाला गती मिळू शकेल. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेची स्थापना करून एक आदर्श निर्माण करून दिला होता. तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजातील लोकांनी शिक्षणाचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची अत्यंत गरज होती. ठिकठिकाणी शिक्षण संस्था उभ्या करून शाळा कॉलेजेस निर्माण करणे आवश्यक होते. मात्र ते झालेले दिसत नाही. उलट बाबासाहेबांनी निर्माण केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था फुटीरतेच्या चक्रात अडकली. त्याचा परिणाम संस्थेच्या विकासावर होताना दिसतो. ज्या शैक्षणिक संस्थेला बाबासाहेबांचा वारसा लाभलेला आहे, ती संस्था निरनिराळ्या कारणांनी वादात सापडते यासारखे दुर्दैव कोणते? त्यामुळे या दुष्टचक्रातून बाहेर पडून पीपल्स एज्युकेशन सोसायटी सक्षमपणे उभी करण्यासाठी त्यातील गटबाजी संपवणे आवश्यक आहे. यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 

तीच तऱ्हा राजकीय क्षेत्राची आहे. बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची निर्मिती केली. भले हा पक्ष जरी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रत्यक्षात स्थापन केला गेला असला, तरी त्याची संकल्पना त्यांचीच होती. अशा रिपब्लिकन पक्षाची फुटीरतेमुळे झालेली वाताहात रोखण्याची आवश्यकता आहे. पक्षातील गटबाजीमुळे प्रचंड मोठे नुकसान आंबेडकरी समुदायाचे झालेले आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षांत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा तथा राज्यसभा या कायदेमंडळांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे सदस्य पोहोचू शकत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. राज्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने आंबेडकरी समुदाय मोठ्या संख्येने आहे. तरीही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कायदेमंडळात असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य आणि पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. परिणामी त्याचे गंभीर परिणामही होताना दिसून येत आहे. 

हेही वाचा – मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं

राजकीय फायद्यासाठी अथवा स्वार्थासाठी प्रत्येक नेता कशाचाही विचार न करता सत्ताधारी पक्षांकडे आकर्षित होताना दिसतो. रिपब्लिकन चळवळीतील आज प्रमुख नेते भाजपासोबत गेलेले आहे. सत्ताधारी पक्ष हिंदुत्ववादाचे राजकारण करीत आहेत. हिंदू राष्ट्र घडवण्याचा संकल्प करीत आहेत. अशा लोकांसोबत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख म्हणवले जाणारे नेते मांडीला मांडी लावून बसत आहेत. देशाच्या संसदेत संविधानाच्या शिल्पकारांचा अवमान सत्ताधारी पक्षाकडून होत आहे, तरीही त्यांच्यासोबत बसलेले रिपब्लिकन नेते त्याबद्दल काहीही बोलत नाही. हे कोणत्या प्रकारचे राजकारण म्हणावे लागेल? आंबेडकरी चळवळीमधून या सगळ्या प्रकाराबद्दल प्रचंड संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. चळवळीचे, रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी भानावर यावे आणि संघटित व्हावे. एकाच निळ्या झेंड्याखाली संघटित व्हावे अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते आणि आजही आहे . मात्र सत्तेची चटक लागलेल्या लोकांना सामान्य माणसाच्या मनातील भावना कशा बरे लक्षात येतील? विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. नोकरीमधील आरक्षणाचे प्रश्न, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र त्याबद्दल प्रस्थापित नेतृत्व ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही. या सगळ्याचा परिणाम चळवळीवर होत आहे. त्यामुळे नामांतराच्या लढ्याचा इतिहास अभिमानाने सांगणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील वर्तमान नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भानावर येण्याची आवश्यकता आहे. आणि चळवळीला सुसंघटित रूप देऊन विधायक कार्यक्रम हाती घेऊन पुढे जायला हवे, तरच सर्वार्थाने निभाव लागू शकेल! अन्यथा येणारा काळ कठीण आहे! नाहीतर नुसते वर्धापन दिन साजरे करून हाती काहीच लागणार नाही. 

sandeshkpawar1980@gmail.com

Story img Loader