– केशव वाघमारे

‘डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली होती,’ असा दावा हल्ली केला जात आहे. ९ जानेवारी १९४० रोजी ‘केसरी’ वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा संदर्भ यासाठी दिला जात आहे. त्याआधारे काही लोक दावा करत आहेत की संघ आणि आंबेडकर यांचे विचार समान आहेत. केसरीची ही बातमी आपण काही काळ बाजूला ठेवून चिकित्सकपणे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अर्धसत्याच्या आधारे कपोलकल्पित विचार कशाप्रकारे पसरवले जातात. मागचा-पुढचा संदर्भ तोडून एखाद्या घटनेचं राजकीयीकरण करण्याची संघाची ही पहिली वेळ नाही. याबाबत संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांचे उदाहरण देता येईल. ‘भारतीय विचार साधना, पुणे’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘आपले बाबासाहेब’ या पुस्तकात ठेंगडी यांनी असा दावा केला आहे की डॉ. आंबेडकर यांनी १९३५ साली संघ शिक्षावर्गाला पुणे येथे भेट दिली होती. त्यावेळी हेडगेवारांशी त्यांची भेट झाली. पुस्तकात ते दावा करतात, डॉ. आंबेडकरांनी त्या वर्गात प्रश्न विचारला की इथे कोण महार, मांग, चांभार असतील तर त्यांनी एक पाऊल पुढे यावे. त्यावेळी शंभरच्या वर लोक पुढे आले. याशिवाय त्यांनी असा दावा केला आहे की दापोली येथेही संघ शाखेला डॉ. आंबेडकरांनी भेट दिली होती. त्याशिवाय १९३७ साली कराडच्या शाखेला भेट दिली. ठेंगडी लिहितात की त्यांनी भंडारा पोटनिवडणुकीत आंबेडकर यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केले होते. त्याशिवाय धर्मांतरापूर्वी त्यांनी श्याम हॉटेलात आंबेडकरांची भेट घेऊन चर्चा केली. १९५३ साली जून महिन्यात मोरोपंत पिंगळे यांनी डॉ. आंबेडकर यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन संघाविषयी तपशीलवार माहिती दिली.

chhagan Bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
manik kokate chhagan bhujbal
भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Harbhajan Singh opinion on cricket team selection sports news
बड्यांना वेगळी वागणूक अयोग्य! कामगिरीच्या आधारेच संघनिवड गरजेची असल्याचे माजी खेळाडूंचे मत
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद

अशा अनेक निराधार व विपर्यस्त कहाण्या ठेंगडी यांनी पसरवल्या होत्या. अर्थात त्यामागे संघाचा हात होता हे उघड आहे. संघाच्या लोकांच्या या तथाकथित आंबेडकर भेटीला समकालीन आंबेडकर साहित्यात कुठलाच पुरावा मात्र सापडत नाही. संदर्भ असे दिले जातात की दापोलीच्या संघ शाखेत आंबेडकर आले हे भाऊराव दांडेकरांनी भिकू ईदाते यांना सांगितले. पुढे भिकू ईदाते यांनी ठेंगडींना सांगितले आणि ठेंगडी यांनी तुम्हा-आम्हाला सांगितले. याचा अर्थ यांच्या कानी पडेल ती आठवण आणि हे सांगतील तोच पुरावा मानायचा का? कोणतीही शहानिशा न करता, जर वारंवार या गोष्टी लोकांच्या कानावर पडत राहिल्या तर त्या खऱ्या वाटू लागतात. संघाची हीच नीती आहे. स्वतःच्या राजकारणाचा भाग म्हणून संघ हा ‘प्रोपगंडा’ सतत करत असतो.

हेही वाचा – चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?

डॉ. आंबेडकर यांच्या बाबतीत तत्कालीन वर्तमानपत्रांनी अनेकदा खोट्या बातम्या दिल्याचे आढळते. ‘कुलाबा समाचार’ या वर्तमनापत्राने महाड सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकरांची रायगडावर स्वारी, आंबेडकरांच्या रायगडावरील लीला’ असा मथळा केला होता. बातमीत असे मांडण्यात आले होते की आंबेडकर गडावर गेले असता ते शिवाजी महाराजांच्या गादीवर बसले. त्यांनी समाधीची विटंबना केली. ही पूर्णतः खोटी बातमी होती. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांसंदर्भात ‘केसरी’ वृत्तपत्र आणि त्यातील बातमीची उलटतपासणी करणे गरजेचे आहे.

डॉ. आंबेडकर रीतसर मोबदला द्यायला तयार असूनसुद्धा १९२० साली ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राची जाहिरात छापायला केसरी व्यवस्थापनाने नकार दिला होता. या उलट महाड सत्याग्रह आणि पर्वती सत्याग्रहबाबत विपर्यस्त बातम्या छापल्या होत्या. केसरीच्या या दुटप्पी व्यवहाराला उघडे पाडणाऱ्या बातम्या नंतर ‘बहिष्कृत भारत’ च्या अंकात छापून आल्या होत्या. त्यामुळे आज दावा केली जात असलेली ‘केसरी’मधील बातमी किती विश्वासार्ह आहे, हा प्रश्न आहे. आंबेडकरांच्या संदर्भात तत्कालीन बातम्या पुस्तकरूपात संग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात १९४० साली आंबेडकरांनी सातारा, सांगली, बेळगाव असा प्रवास केल्याची नोंद आढळते. परंतु कराडच्या संघ शाखेला भेट दिल्याची कुठेच नोंद नाही.

चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या डॉ. आंबेडकरांच्या चरित्रग्रंथाच्या आठव्या खंडात १९३८ ते १९४५ सालातील घडामोडींची सविस्तर नोंद आहे. यात पान क्रमांक २७ वर डॉ. आंबेडकर ३ जानेवारी १९४० रोजी कराडला जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांना कराड म्युनिसिपालिटीचे मानपत्र मिळणार असल्याचेही नमूद आहे. विशेष म्हणजे कराडला जाताना आंबेडकरांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला खूप इजा झाल्याचाही उल्लेख या चरित्रग्रंथात आहे. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याची किंवा भाषण करून संघाबद्दल आपलेपणा वाटत असल्याचे वक्तव्य केल्याची कोणतीही नोंद यात नाही.

१९२० ते १९४० च्या दरम्यान डॉ. आंबेडकर अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले. पण त्याची दाखल केसरीने कधीच घेतली नाही. त्या काळातील दलितांचे महत्त्वाचे नेते शिवराम जानबा कांबळे यांच्या मृत्यूची साधी एका ओळीची बातमी केसरीने छापली नाही. अशा परिस्थितीत कराडची बातमी शंकास्पद वाटते. ठेंगडी यांच्या दाव्यानुसार १९३५ साली संघशिक्षा वर्गात आंबेडकरांची हेडगेवारांशी भेट ही घटना पुण्यातील आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की केसरीचे मुख्य ऑफिस पुण्यात असून त्यांनी इतकी महत्वाची बातमी का छापली नाही? ठेंगडी यांनी एके ठिकाणी तर असाही दावा केला आहे की, आंबेडकरांनी जवळच्या सहकाऱ्यांच्या आक्षेपांना झुगारून त्यांना शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस नियुक्त केले होते. हे निखालस खोटे आहे. कारण शेड्युल कास्ट फेडरेशन फक्त अनुसूचित जातींमधील लोकांसाठी होते. या धादांत खोट्या दाव्यामुळे ठेंगडीचे सर्व दावे संशयास्पद ठरतात.

‘जनता’ मासिकाने आंबेडकरांच्या प्रत्येक बैठकीचे आणि सभेचे अत्यंत तपशीलवार दस्तावेजीकरण केलेले आहे. डॉ. आंबेडकर कोणाला भेटले? सर्वसाधारण कार्यकर्ते किंवा लोक त्यांच्या मीटिंगमध्ये काय बोलले याच्या तपशीलवार नोंदी आढळतात. पण आंबेडकरांनी संघशाखेला भेट दिल्याची कुठेच नोंद नाही. जर ठेंगडीचा दावा खरा असेल तर १९४० साली हेडगेवार यांचे निधन झाल्यावर डॉ. आंबेडकर आणि ‘जनता’ वर्तमानपत्राने याची साधी नोंदसुद्धा का घेतली नाही. डॉ. आंबेडकर यांचा तत्कालीन हिंदू महासभा आणि त्यांच्या नेत्यांसोबत संवाद होता. मुंजे, सावरकर आणि हिंदू महासभेचे पाचलेगावकर यांच्यासोबत संवाद झाल्याच्या नोंदी ‘जनता’मधे सापडतात.

डॉ. आंबेडकर यांच्या मते जात आणि अस्पृश्यतेचा प्रश्न हा हिंदू समाजाचा प्रश्न आहे आणि ज्यांचा हिंदू समुदायाशी संबंध आहे त्यांच्यासोबत संवांद केला पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी आर्यसमाज आणि हिंदू महासभे संवाद आणि वाद-विवाद केला आहे. सावरकर आणि हिंदू महासभा यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी जनता तसेच बहिष्कृत भारत या नियतकालिकामधून लिहिले आहे. हिंदू महासभा आणि आर्य समाज या दोन संघटना १९४० पर्यंत हिंदूंच्या राजकारणाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. या प्रक्रियेत संघ कुठेच दिसत नाही. तत्कालीन राजकारणात हस्तक्षेप करण्याइतकी राजकीय क्षमता संघात तेव्हा नव्हती. कदाचित त्याच कारणाने डॉ. आंबेडकरांनी संघाची कधीच दखल घेतलेली नाही.

हेही वाचा – अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?

‘केसरी’तील तथाकथित बातमीनुसार डॉ.आंबेडकर म्हणाले की काही मतभेद असले तरी संघाबद्दल मला आपुलकी आहे. वस्तुतः डॉ. आंबेडकरांना खरंच संघाविषयी आपुलकी होती का? किंवा संघाला तरी आंबेडकरांबद्दल आपुलकी होती का ? आंबेडकर आणि संघ यांच्यात सुसंवाद होता तर १९४० नंतर आंबेडकर आणि संघात कोणत्या प्रकारचे राजकीय संबंध विकसित झाले? हे आपुलकीचे नाते एकतर्फी होते की दोन्ही बाजूने होते? हे नाते किती काळपर्यंत टिकले? जर अशी आपुलकी होती तर संघाने आंबेडकरांचे पुतळे का जाळले? हिंदू कोडबिल व आरक्षणाला विरोध का केला? आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली त्या मनुस्मृतीचे गोडवे गोळवलकर आणि संघाने का गायले?

गांधी हत्येनंतर संघावर बंदी घातली गेली होती. ती बंदी उठवण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर १९४९ मधे गोळवलकर आंबेडकरांना दिल्लीमध्ये भेटले होते. तेव्हा आंबेडकरांनी त्यांना सुनावले की पटेल यांना देशाची परिस्थिती नीट माहीत आहे आणि ते योग्य निर्णय घेतील. संघ जर हिंदूना एकाच निशाणाखाली संघटित करण्याशी प्रामाणिक असेल तर त्यांनी जातिव्यवस्था नष्ट करायला हवी, असे आंबेडकर म्हणाले होते. आंबेडकरांनी हिंदू आणि हिंदुत्व विचाराबाबत नेहमीच सडेतोड भूमिका घेतली आहे. त्यांनी असा दावा केला होता की ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ धर्मांतर केल्यावर ते म्हणाले, ‘मी नरकातून सुटलो’ आपुलकीचे पालुपद आळवणाऱ्यांना आज यात कोणती आपुलकी दिसते? त्याशिवाय आंबेडकरांनीही ठामपणे मांडले आहे की ‘हिंदू राष्ट्र घडले तर ती देशावरची भयानक आपत्ती असेल. हिंदू काहीही म्हणोत ते समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याचे अंतक असेल. कोणतीही किंमत देऊन ते रोखले पाहिजे’. याचा अर्थ असा की डॉ. आंबेडकरांना संघप्रणीत हिंदुत्वाबद्दल कधीच आपलेपणा वाटलेला नाही.

keshavwaghmare14@gmail.com

Story img Loader