– अतुल सोमेश्वर कावळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिकडे वैद्यकीय क्षेत्रातील एक गोष्ट अनेकांच्या अनुभवास येत असेल. ती म्हणजे गर्भवती स्त्रीच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे आणि त्यामुळे त्या स्त्रीस गर्भपाताचा सल्ला देऊन गर्भपात घडवून आणणे. अनेकांना हा अनुभव आला असेल आणि कित्येक जणांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपात केले असतील. वैद्यकशास्त्रानुसार बाळाच्या हृदयाचे ठोके गर्भधारणेच्या १० व्या आठवड्यापासून तर २०-२२ व्या आठवड्यापर्यंत केव्हाही ऐकू येऊ शकतात. त्यासाठी आजकाल डॉक्टर सोनोग्राफी करायचा सल्ला देतात. अनेकदा बाळाच्या हृदयाचे ठोके येत नाही आहेत म्हणून गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो आणि केलाही जातो. ही सगळी तपासणी आजकालच्या आधुनिक यंत्रांनी केली जाते. ती तंतोतंत बरोबर येईलच याची खात्री देता येत नाही. कारण यंत्रात काही तांत्रिक बिघाड असेल, यंत्र जुने झाले असेल, यंत्र चालवणारा पुरेसा अनुभवी नसेल तर त्याचे निष्कर्ष बरोबर येतीलच याची खात्री देता येत नाही.

मग यंत्र बाळाच्या हृदयाचे ठोके दाखवत नाही या कारणासाठी गर्भपात करणे योग्य आहे काय? पूर्वी गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी करण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्याकाळी गर्भस्थ बाळाचे ठोके मोजण्याची काही आवश्यकता पडत नव्हती. गर्भवती स्त्रीला सतत पुष्कळ दिवसांपर्यंत गर्भात बाळाची काहीच हालचाल जाणवली नाही तरच सोनोग्राफी करून बाळाच्या नेमक्या स्थितीची तपासणी केली जायची. त्यामुळे हृदयाचे ठोके येत नाही आहेत एवढ्या कारणासाठी गर्भवतीचे गर्भपात होत नसत. पण अलिकडे गर्भ राहिल्यावर लगेच सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. अशा नऊ महिन्यांत साधारण तीन ते चार सोनोग्राफी केल्या जातात. कधी कधी त्यापेक्षा जास्तही.

हेही वाचा – तर मग जम्मू-काश्मीरमध्ये घ्या की निवडणूक आता…

मुळात निसर्गाने बाळ गर्भात आल्यावर त्याच्या पोषण आणि सुरक्षेची व्यवस्था स्त्रीच्या शरीरात करूनच ठेवलेली आहे. गर्भवती स्त्रीला फक्त आपल्या आहार विहार आणि मानसिक स्वास्थ्यावर लक्ष ठेवणे एवढेच करायचे असते. योग्यवेळी बाळाचे ठोके त्या गर्भवतीला स्वतःलाच जाणवू लागतात. पण अति उत्साहापायी आणि डॉक्टरांनी घाबरविल्यामुळे वारंवार सोनोग्राफी करण्याचा अट्टाहास आणि उपद्व्याप केला जातो. त्यामध्ये मग बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाही आहेत असे कधीतरी निदान येते आणि गर्भपात केला जातो.

माझ्या एका भावाच्या पत्नीच्या बाबतीत असाच प्रकार घडला. शहरातील नामांकित डॉक्टरकडे तिची नियमित तपासणी सुरू होती. १२ आठवड्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके नाहीत असे निदान झाले. त्या उभयतांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण लग्नानंतर सुमारे १० वर्षांनी त्यांना बाळ होणार होते आणि नेमके त्या आनंदावर विरजण घालणारे हे निदान आले. भाऊ प्रचंड मानसिक तणावाखाली आला आणि पत्नीला स्वतःची योग्य काळजी न घेतल्याबद्दल दूषणे देऊ लागला. अखेरीस मी आणि आमच्या एका आत्याने त्याला खूप समजावले आणि थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितले. डॉक्टरांनी त्याला तीन दिवसांचा वेळ दिला होता आणि तीन दिवसांत बाळाच्या हृदयाचे ठोके न आल्यास गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. पण आम्ही धीर दिल्यामुळे त्याने दहा दिवस वाट पाहिली आणि दहा दिवसांनी तो परत डॉक्टरांकडे तपासणीसाठी पत्नीला घेऊन गेला. आणि काय आश्चर्य ! बाळाचे ठोके पूर्ववत येऊ लागले होते. डॉक्टरांनी बाळाचे ठोके व्यवस्थित असल्याचे निदान केले. एका बाळाची गर्भातच हत्या होण्यापासून वाचली होती. खरेतर हा चमत्कार नव्हता. हा निसर्गापेक्षा आधुनिक यंत्रांवर प्रमाणाबाहेर दाखविलेला अतिविश्वास होता. अन्यथा गेलेले ठोके परत कसे आले ? की तोवर हृदयाचे ठोकेच यायचे होते ? याच वहिनीचा दुसऱ्या वेळेस गर्भात बाळाच्या हृदयाचे ठोके नाहीत या कारणासाठी गर्भपात करण्यात आला होता.

माझ्या पाहणीत अशी तीन चार प्रकरणे आहेत ज्यामध्ये गर्भवतीला बाळाच्या हृदयाचे ठोके चालू नाहीत असे सांगून गर्भपात करण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी केलेही. प्रत्येकाने आपापल्या पाहणीतील अशा स्त्रियांचा शोध घ्यावा. माझ्या लिखाणात तथ्य असल्याचे आढळून येईल. गूगलवर शोध घेतला असता विविध पोर्टलवर अशी माहिती मिळाली की बाळाच्या हृदयाचे ठोके १० व्या आठवड्यापासून २० व्या आठवड्यापर्यंत केव्हाही येऊ शकतात. हे सत्य असेल तर पहिल्याच चाचणीत ठोके ऐकायला येत नाहीत म्हणून गर्भपात करण्याचा सल्ला देणे कितपत उचित आहे ? उच्च तंत्रज्ञानाने हे ठोके ऐकले जाऊ शकतात. पण पुन्हा प्रश्न तोच उरतो की यंत्र नीट माहिती देईलच कशावरून? निसर्गाच्या किमयेपेक्षा यंत्र अधिक प्रबळ राहू शकत नाही.

वरील प्रकरणांमध्ये राहून राहून एक शंका येते की लिंगनिदान चाचणीवर कडक निर्बंध आल्यापासून आणि जनतेनेही मुलांमुलींतील भेद नाकारणे सुरू केल्यापासून गर्भपाताचे प्रमाण कमी झाले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या कमाईचा एक स्रोत बंद झाला आहे. बेकायदा गर्भपात करून कोणताही डॉक्टर तुरुंगाची हवा खाण्यास तयार होणार नाही. त्यामुळे गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके नाहीत असा कायदेशीर मार्ग काढून गर्भपात करण्यात येत तर नसावेत? आरोप गंभीर असला तरी चिंतनीय आहे. जाणकारांनी या विषयावर अधिक प्रकाश टाकावा अशी अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात सोनोग्राफी करण्याच्या अद्ययावत सुविधा आणि मोठमोठी हॉस्पिटल्स नाहीत. तिथे ही समस्या फारशी दिसून येत नाही. मुस्लीम स्त्रियांना ही समस्या येत नाही. गर्भवती मुस्लीम स्त्रिया फारच कमी वेळा सोनोग्राफी करताना किंवा नियमित तपासणी करताना दिसतील. तरीही त्यांच्या बाळाला कोणत्याच किंवा फारशा समस्या निर्माण होताना दिसत नाहीत. हिंदू आणि मुस्लीम स्त्रियांमध्ये होणाऱ्या गर्भपाताचे सरासरी प्रमाण या विषयावर एक संशोधन झालेच पाहिजे.

या विषयात हिंदू मुस्लीम करण्याचे कारण काय असा प्रश्न कुणी उपस्थित करतील. पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेतल्यास असे संशोधन करणे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल. मुस्लीम स्त्रियांमध्ये आरोग्यविषयक फारशी जागृती नाही. त्यांचे हिंदू स्त्रियांपेक्षा शिक्षणाचे प्रमाणही कमी. तरीही त्यांच्या गर्भावस्थेत त्यांना हिंदू स्त्रियांसारख्या समस्या येत नाहीत… त्यांच्या सर्वच बाळांचे ठोके कसे काय व्यवस्थित राहतात ? शिक्षित हिंदू ही आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असते. तरीही किंवा त्यामुळेच तिच्या गर्भस्थ बाळाचे ठोके ऐकू येत नाहीत असे असेल का ? की शिक्षित हिंदू स्त्रियांच्या अति काळजी करण्याच्या वृत्तीचा गैरफायदा घेतला जातो ? प्रश्न गहन आणि गंभीर आहे. हा मुद्दा हिंदू मुस्लीम भेदभावाचा नसून मुलं जन्माला घालताना हिंदू आणि मुस्लीम स्त्रीच्या मानसिकतेत काय फरक असतो हे दाखविण्यासाठी आहे. तीच गोष्ट ग्रामीण भागातील अशिक्षित आणि शहरी भागातील शिक्षित यांच्याबद्दलही सांगता येईल.

हेही वाचा – ‘पूतनामावशी’चे पसमांदा प्रेम?

ग्रामीण भागातील स्त्रीला बाळंतपणाची वेळ येईपर्यंत बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्याची किंवा ऐकण्याची गरजच पडत नाही. शहरी स्त्रिया मात्र गर्भ राहिल्यापासून वरचेवर सोनोग्राफी आणि इतर अनावश्यक तपासण्या करत असतात. अर्थात त्यात डॉक्टरांचा चांगला अर्थलाभ होत असतो. त्यामुळे डॉक्टर तसाच सल्ला देत असतात.

या निमित्ताने एक वैयक्तिक आठवण : माझ्या पत्नीला एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे पहिल्यांदा तपासणीसाठी घेऊन गेलो होतो. तिने माझी पत्नी गर्भवती असल्याची गोड बातमी दिलीच पण सोबत प्रचंड घाबरविलेसुद्धा. निदान झाल्याबरोबर त्या डॉक्टरने आम्हाला सोनोग्राफी करण्यासाठी पाठविले. आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी राजी नाही, हे लक्षात आल्यावर ‘वेडेवाकडे काही झाले तर आपली जबाबदारी नाही हां…’ अशी गर्भगळित करणारी छुपी धमकीच त्या डॉक्टरने आम्हाला दिली. शेवटी घाबरून आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. असेच प्रकार वरीलसारख्या प्रकरणात होत आहेत. स्त्रिया पूर्वीही गर्भवती राहत होत्या. पण त्यांना आजच्या एवढ्या यंत्रवैद्यकीय चाचण्या करण्याची गरज पडत नव्हती आणि बाळंतपणही विना सिझेरियन होत होते. मग आताच हे सगळे प्रकार का सुरू झालेत ? वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या विषयावर सखोल संशोधन करून या प्रकरणातील गूढ उकलून सत्य बाहेर आणावे यासाठी हा लेखप्रपंच.

(E-mail: atulskawale@yahoo.co.in)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby heartbeat in the womb the new business of abortion ssb
Show comments