पळण्याची परवानगी तर द्यायची, पण पायात दोरखंड बांधायचे, असा प्रकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवताना केंद्र सरकारने केला आहे. कांद्याच्या खुल्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी करून करून कांदा उत्पादक शेतकरी थकले; मात्र त्यांच्या या मागणीकडे सरकारने जराही लक्ष दिले नाही. ऐन निवडणुकीच्या काळात देशातील बाजारपेठेत कांदा उपलब्ध असायला हवा, यासाठी केंद्राचे हे दुर्लक्ष. ज्या काळात शेतकऱ्याच्या हाती चार पैसे मिळण्याची शक्यता असते, त्याच काळात त्याचे कान, नाक, डोळे बंद करून टाकण्याच्या या कारभाराने देशातील शेतकऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे. ती थांबवायची आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे, तर केवळ घोषणा करून भागणार नाही. त्यासाठी जागतिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून योग्या वेळी योग्य त्या शेतमालाच्या निर्यातीसाठी मदत करण्याची भूमिका आवश्यक असते. नेमका गोंधळ इथेच आहे. उन्हाळी कांदा निर्यातक्षम असतो, कारण तो टिकाऊ असतो. त्याला जागतिक बाजारपेठेत मागणीही असते. यंदा कांद्याचे अपेक्षेप्रमाणे उत्पादन झालेले असताना, तो निर्यात करून चार पैसे मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने सतत पाने पुसली. निर्यातबंदी हे आता केंद्र सरकारचे हुकमी शस्त्र बनले आहे. त्यामुळे साखर असो, की गहू- निर्यातीला परवानगी देण्याचा प्रश्न आला की सरकार मूग गिळून गप्प बसते. त्यामुळे जिवापाड मेहनत करून शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात सतत विफलतेचे दान पडते. गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मर्यादित प्रमाणात का होईना, केंद्राने परवानगी दिल्याने, अन्य राज्यातील लाल कांद्याच्या उत्पादकांमध्ये निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी केंद्राने सशर्त निर्यात करण्यास दिलेली ही परवानगी फारशी उपयोगी ठरण्याची शक्यता नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा