संजय डोळे
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कथित वादग्रस्त चित्रफीतींमुळे अडचणीत आले आहेत. आता त्याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सोमय्या यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चौफेर टीका सुरू केली आहे. साधनशुचितेच्या राजकारणाच्या गप्पा कशा मारता, असाच विरोधकांचा सवाल आहे. पण किरीट सोमय्या हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अशाच काही घटनांमुळे भाजप अडचणीत आला होता.
बंगारु लक्ष्मण यांना शिक्षा
भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण हे २००१ मध्ये एका स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेरापुढे पैसे घेताना उघड झाले होते. पुढे विशेष न्यायालयाने लक्ष्मण यांना शिक्षा सुनावली होती. एका वृत्तसंकेतस्थळाने याबाबत स्टिंग ऑपरेशनमध्ये लक्ष्मण यांना पैसे घेताना दाखवले होते. संबंध प्रतिनिधीने शस्रास्र व्यावसायिक असल्याचे भासवून लक्ष्मण यांना पैसे दिल्याचा आरोप होता. अशा आठ बैठका झाल्याचा आरोप होता. विशेष म्हणजे त्यावेळी लक्ष्मण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या घटनेनंतर भाजपला धक्का बसला होता. विरोधकांनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली होती. पुढे लक्ष्मण यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी विरोधकांच्या हातात हा भाजपच्या विरोधात मोठा मुद्दा मिळाला होता. प्रचारातही हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. तत्कालीन सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा भाजपला फटका बसल्याचे मानले गेले.
संजय जोशी यांच्याबाबत वाद
भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय सरचिटणीस संजय जोशी यांच्याबाबतची कथित आक्षेपार्ह चित्रफीत २००५ मध्ये प्रसारित झाली होती. विशेष म्हणजे त्याच काळात पक्षाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मुंबईत होते. त्या दरम्यानच ही कथित चित्रफीत आल्याने खळबळ माजली होती. पुढे संजय जोशी यांना पदावरून हटवण्यात आले. या चित्रफितीमागे भाजपच्याच काही नेत्यांचा हात असल्याचा आरोप जोशी यांच्या निकटवर्तीयांनी केला होता. त्यावेळी पक्षात आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. संजय जोशी हे उत्तम संघटन कौशल्यासाठी ओळखले जात होते. या प्रकरणावरून पक्षात बराच काळ यावरून वाद सुरू होता. त्यावेळी समाजमाध्यमे इतकी प्रभावी नव्हती. तरीही हे प्रकरण चांगलेच गाजले होते.
छत्तीसगढच्या तत्कालीन मंत्र्याबाबत वाद
छत्तीसगढचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री राजेश मुनत यांच्याबाबतही २०१७ मध्ये अशीच कथित आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर तेथील राजकारण ढवळून निघाले होते. तंत्रज्ञानाचा वापर करून ही बनावट चित्रफीत तयार केल्याचा आरोप मुनत यांनी केला होता. याप्रकरणी विनोद वर्मा या ज्येष्ठ पत्रकाराला अटक करण्यात आली होती. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोपही मुनत यांनी त्यावेळी केला होता. राज्यात तेव्हा भाजपची सत्ता होती. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपची कोंडी केली होती.
हार्दिक पटेल वादाच्या केंद्रस्थानी
गुजरातमध्ये २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीची चुरस होती. भाजपच्या सत्तेला काँग्रेसने आव्हान दिले होते. त्याच दरम्यान पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेल या युवकाने भाजपला आव्हान दिले होते. त्याच वेळी पटेल यांच्या कथित आक्षेपार्ह चित्रफीती प्रसारित झाल्या होत्या. हार्दिक यांनी त्यावरून भाजपवर टीका केली होती. हा आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला होता. आपण शेतकरी व युवकांचे आंदोलन करत असल्याने त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचा डाव आहे, अशी टीका पटेल यांनी केली होती. पाटीदार अनामत आंदोलन समितीचे हार्दिक हे सक्रीय सदस्य होते. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले. आता ते भाजपचे आमदार आहेत. अटीतटीची ही विधानसभा निवडणूक भाजपने जेमतेम जिंकली होती.
रमेश जारकीहोळी यांना एसआयटीकडून निर्दोषत्व
कर्नाटकमधील भाजपचे एक वजनदार नेते व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबतही अशाच कथित वादग्रस्त आक्षेपार्ह चित्रफीतीवरून वाद झाला होता. अखेर जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही घटना २०२१ मधील आहे. या प्रकरणी जारकीहोळी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये विशेष तपास पथकाने जारकीहोळी यांना निर्दोष ठरवले. याबाबत कोणताही पुरावा सादर करता आला नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. जारकीहोळी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्यात आधीच वितुष्ट होते. त्यात या घटनेने राजकीय वळण घेतले. जारकीकोळी सरकारमधील प्रमुख नेते होते. त्यामुळे हा वाद वाढत गेला होता.
पुत्तूरच्या माजी आमदाराला फटका
दक्षिण कन्नडा जिल्ह्यात संजीवा मतनद्दूर यांची एका महिलेबरोबर छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर आमदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ही छायाचित्रे बनावट आहेत, आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा कट आहे असा त्यांचा आरोप होता. मे महिन्यात कर्नाटक विधानसभेची निवडणूक होती. त्यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये हा प्रकार घडला. भाजपमधील काही व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा आरोप केला जात होता. त्यांना उमेदवारी नाकारली जावी, हा त्यामागचा उद्देश होता. पुढे बंगळुरु न्यायालयाने माध्यमांना त्यांची ही बनावट छायाचित्रे वापरण्यास मनाई केली होती. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पुत्तूर मतदारसंघात जवळपास २० हजारांच्या आसपास मतांनी त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. यावेळी म्हणजे २०२३ मध्ये त्यांना भाजपने उमेदवारीही नाकारली. तसेच हा मतदारसंघ काँग्रसने जिंकला.