नितीन पखाले

किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापराने चिंतेत असलेल्या पालक आणि एकूणच समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांसी गावाने ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करत नामी उपाय शोधून काढला आहे. बांसी हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे. गावात मुलं कुठे मैदानी खेळ खेळताना दिसत नव्हती की, कुठे चावडीवर त्यांच्या गप्पांचे फड रंगलेले आढळत नव्हते. आपले गाव, घर बालसुलभ उचापतींपासून दुरावत असल्याची सल या गावाचे सरपंच गजानन टाले यांच्यासह त्यांच्या अनेक समविचारी मित्रांनी सतत टोचत होती. माणसं माणसांपासून, घर मुलांच्या किलबिलाटापासून दूरावत असल्याचा हा प्रकार मोबाईलमुळेच घडत असण्यावर बहुतांश गावकऱ्यांचे एकमत झाले.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे

हल्ली अल्पवयीन मुले विविध समाज माध्यमांवरून एकमेकांच्या संपर्कात येतात आणि पुढे अनेक अप्रिय घटनांना त्या मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागते. अनेकदा आर्थिक किंवा अन्य फसवणुकीचा धोका असतो. हे सर्व टाळून किशोरवयीन मुलांवरील मोबाईलचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांसी ग्रामसभेने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याचीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील वडगाव या गावात सायंकाळी सात वाजता भोंगा वाजल्यानंतर प्रत्येक घरातील स्क्रीन बंद केला जातो. यात टीव्ही, संगणक आणि मोबाईलचा समावेश आहे. एक तास कोणीही स्क्रीन बघणार नाही, या नियमाचे सर्वजण पालन करतात. हा एक तास मुले घराबाहेर खेळतात, पुस्तक वाचन करतात, एकमेकांशी गप्पा करतात, आपले छंद जोपासण्याठी वेळ देतात. हा नियम करून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न थेट ग्रामसभेचे अधिकार वापरून बांसी ग्रांमपंचायतीने केला आहे. ग्रामसभेचा हा ठराव आगळावेगळा आणि हल्लीच्या काळात जरा आततायीपणाचा वाटत असला तरी, बांसी गावात मात्र या निर्णयाचे स्वागत होत आहे. आता या निर्णयाला गावातील किशोरवयीन मुलं किती प्रतिसाद देतात, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

मोबाईलच्या आहारी गेलेल्या किशोरावस्थेतील पिढीची परिस्थिती करोनानंतर अधिकच भयावह झाली आहे. त्यावर उपाय बांसी गावात ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत गावातील १८ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदीचा ठराव घेण्यात आला. मुलांना मोबाईलमुळे गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागल्याचे अनुभव ग्रामसभेत गावकऱ्यांनी मांडले. मुलं आई-वडिलांपासून, कुटुंबापासून दुरावत असल्याचेही अनुभव अनेक पालकांनी सांगितले. त्यामुळे बहुमताने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामसभेने समाजासमोर एक आदर्श पायंडा पाडल्याची चर्चा गावात आहे. माध्यमांनी या निर्णयाची दखल घेतली. या निर्णयामुळे बांसी गाव चर्चेत आले. सर्वत्र बातम्या आल्या, निर्णयाची सर्वत्र दखल घेतली गेली, त्यामुळे ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांची जबाबदारी अधिक वाढल्याची प्रतिक्रिया गावाचे सरपंच गजानन टाले यांनी दिली.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने सुरूवातही केली आहे. जे पालक या‍ निर्णयाला डावलून मुलांना मोबाईल देतील त्यांचा मोबाईल प्रसंगी जप्त करण्याचा इशाराही गावात देण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन मतप्रवाह असले तरी बहुसंख्य गावकऱ्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्‍त केले आहे. अशी सक्तीने बंदी घातल्यावर तरी मुलं मोबाईलपासून काही काळ दूर राहतील, ही पालकांच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट असल्याचे या गावात फेरफटका मारल्यानंतर जाणवले. नवीन पिढीला मोबाईलच्या अतिनादी लागण्यापासून सावरण्यासाठी या निर्णयाची मदत होईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र अल्पवयीन मुलांना एखादी गोष्टी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट करण्यासाठी ते अधिक उताविळ होतात, हा निसर्गनियम कसा टाळावा याबाबत मात्र कोणाकडे समाधानकारक उत्तर नाही. मुलांच्या हातून अचानक मोबाईल काढून घेण्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात, अशी भीती काही गावकरी व्यक्त करतात. त्यापेक्षा या वयातील मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम समजावून सांगून अभ्यास, करिअर, भवितव्य याचे महत्व पटवून देत त्यांना मोबाईल कमी प्रमाणात वापरण्याबाबत प्रवृत्त करून सकारात्मक उपापयोजना करायला हवी होती, असे काही पालकांचे म्हणणे आहे. तरीही ग्रामसभेने निर्णय घेतला तर प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, अशी बहुसंख्य ग्रामस्थांची मानसिकता झाली आहे. गावातील काही अल्पवयीन तरूणांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता आम्ही अभ्यास करू, मैदानी खेळ खेळू, अशी ग्वाही या अल्पवयीनांनी दिली आहे.

किशोरवयीन मुले, तरुण ‘मोबाईल अॅडिक्ट’ झाले आहेत. मोबाईल हातात असताना मुले आई-वडिलांचे काहीएक ऐकत नाही. ऑनलाइन शिक्षणापेक्षा हा मोबाईल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे. ते टाळण्यासाठी मोबाईलबंदीचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे. मात्र मुलांना समजावून सांगण्यासाठी समुपदेशकांचाही मदत घेतली जाणार आहे. गावातील उच्चशिक्षित तरूण, तरूणींचीही मदत अल्पवयीन मुलांना समजावून सांगण्यासाठी घेतली जाणार आहे. या निर्णयाला ग्रामस्थांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे बांसी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन टाले यांनी सांगितले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली गावानजीक बांसी हे गाव आहे. एकेकाळी गहुली हे आदर्श ग्राम होते. आता बांसी गावाने मोबाईल बंदीचा निर्णय घेऊन तरूणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे.

उस्मानाबादमधल्या उमरगा तालुक्यामधल्या जकेकूरवाडी या दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या गावानेही मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी रोज संध्याकाळी सहा ते आठ संपूर्ण गावात टीव्ही तसेच मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालायातून सहा वाजता आणि आठ वाजता भोंगा वाजवला जातो. हे उपक्रम किती यशस्वी होतात, याचे उत्तर येत्या काळात मिळेलच, परंतु अल्पवयीन मुलांना मोबाईलच्या जोखडातून सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे बांसी ग्रामसभा तसेच बाकीच्या गावांनी घेतलेल्या ठरावामुळे अधोरेखित झाले आहे.

कोविड महासाथीच्या आधीच्या काळात मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्या शिक्षक तसेच शाळांवर कोविड काळात मात्र ऑनलाईन वर्ग घेऊन मोबाईलवरून मुलांना शिक्षण देण्याची वेळ आली. या काळात अगदी अंगणवाडीतील मुलांपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला. करोना काळात मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण ही अपरिहार्यता झाली. मात्र आता पुन्हा ऑफलाईन वर्ग सुरू झाले तरी मुलांच्या हातातील मोबाईल मात्र निघाला नाही. त्यामुळे घराघरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक अनेक क्लृप्त्या योजतात, पण त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मोबाईल हा मुलांना पालकांपेक्षाही प्रिय असल्याचे चित्र घराघरांत बघायला मिळते.

मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेतला तर ती अस्वस्थ होतात. मोबाईलमुळे मुलांमधील संयम संपला आहे. मोबाईल हातात असला की, त्यांना जेवायचेही भान राहत नाही. अभ्यासाच्या नावाखाली मुलं सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात. सतत मोबाईल पाहण्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर, मनावर आणि मेंदूवर विपरित परिणाम होत आहेत. अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. वाचलेले लक्षात राहत नाही. शाळेत, क्लासमध्ये मोबाईल वापरता येत नसल्याने मुलांचे चित्त एकाग्र होण्याऐवजी विचलित होते. विविध गेम्स, अनेक साईटमुळे मुले नेमके कोणत्या वळणार जातील, या विचाराने पालक आणखीनच चिंतेत आहेत. तंत्रज्ञान हे उपयोगाचे असले तरी त्याचा अतिवापर हा घातक ठरू शकतो, या निष्कर्षावर आता अभ्यासकही आले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष मित्र असण्यापेक्षा आभासी मित्रांमध्ये मुलं अधिक रमत असल्याने मानवी संवदेनांपासून मुले दूर तर जाणार नाहीत ना, अशी अनामिक भीती आता समाजात व्यक्त होत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी व्यासपीठे किशोरवयीन आणि तरूण मुला, मुलींच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेक वैयक्तिक आणि खासगी गोष्टी या माध्यमांमधून चुकीच्या लोकांपर्यत जावून त्यातून या कोवळ्या वयातील मुलांवर नको ते संकट येण्याचीही भीती आहे. शिवाय यातून आर्थिक, प्रसंगी शारीरिक फसवणूक होण्याचाही धोका अधिक आहे.

या पार्श्वभूमीवर बांसी, जकेकूरवाडी या गावांमधील उपक्रम सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. ते परिणामकारक ठरतील का, त्यांचे आणखी काही वेगळे परिणाम होतील का हे काळानुरुप पुढे येईलच, पण सध्या तरी मुलांमधील मोबाइल आसक्तीवर उपाय नाहीच, असे मानत हतबल होणाऱ्या पालकांना या उदाहरणांमधून एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

archneet@gmail.com

Story img Loader