विजया जांगळे
साडेआठशे कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या चंद्रयान-२ मोहिमेला म्हणावं तसं यश मिळालं नसताना ६१५ कोटी रुपये खर्च चंद्रयान- ३ मोहीम राबवण्यात आली. ही मिजास नासासाठी ठीक आहे, भारतासारख्या तुलनेने गरीब देशाने कशाला करायची एवढी उधळपट्टी? चंद्रयान मोहीम फत्ते झाली तरीही आमच्या रोजच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का? सामान्य करदाता म्हणून मला या उधळपट्टीचा काय फायदा? असा उद्वेग येत असेल, तर अवकाश मोहिमांनी आपलं रोजचं आयुष्य किती सुकर केलं आहे, हे जाणून घ्यावं लागेल. लॅपटॉपपासून वायरलेस हेडफोनपर्यंत आणि बुटापासून, चष्म्यापर्यंत अनेक उत्पादनं माणसाच्या आयुष्यात अवकाश तंत्रज्ञानातूनच आली आहेत. मोबाइल फोनमध्ये दिवसाला १०० या सरासरीने खचाखच फोटो टिपण्याची क्षमता असो, पिण्यासाठी शुद्ध पाणी असो वा मऊ, आरामदायी गादी असो… अवकाश तंत्रज्ञानाने मानवी आयुष्य बरंच सोपं आणि समृद्ध केलं आहे. अवकाश तंत्रज्ञानातून येऊन मानवी जीवनात स्थिरावलेल्या या उत्पादनांविषयी आणि या तंत्राच्या हस्तांतर प्रक्रियेविषयी जाणून घेऊ या…
वॉटर फिल्टर
अवकाशात दीर्घकाळ राहण्याचा विचार जेव्हा मानव करू लागला, तेव्हा एक महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे तिथे पाणी मिळणं शक्य नव्हतं. पृथ्वीवरून नेलेल्या पाण्यातच भागवायचं तर वापरलेल्या प्रत्येक थेंबाचा- अश्रू, घाम अगदी मूत्राचाही पुनर्वापर करणं अपरिहार्य होतं. नासाने त्यासाठी उच्च दर्जाचे वॉटर फिल्टर विकसित केले. आज आपण घरोघरी जे फिल्टर्स वापरतो, ती या तंत्राचीच देणगी आहे.
पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनर
कोणत्याही ग्रहावरील धूळ आणि दगडांच्या अभ्यासातून तिथे उपलब्ध असलेल्या विविध घटकांची माहिती मिळते. चांद्रमोहिमेत ही दगड-माती खेचून आणू शकतील अशा पोर्टेबल उपकरणांची आवश्यकता होती. एका खासगी कंपनीकडून ती तयार करून घेण्यात आली होती. पुढे तेच तंत्र पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनरमध्ये वापरण्यात आलं.
हलका कृत्रिम पाय
इस्रोच्या रॉकेटमध्ये वापरण्यासाठी अतिशय हलकं, मजबूत, टिकाऊ आणि आतील उपकरणांना सुरक्षित ठेवू शकणारं पॉलियुरेथन तयार करण्यात आलं. कालांतराने त्याचा वापर कृत्रिम पायांच्या निर्मितीसाठी करण्यात आला. ‘जयपूर फूट’चा हा आधुनिक अवतार होता. पॉलियुरेथनमुळे अवघ्या ५०० ग्रॅम वजनाचा, नैसर्गिक पायाप्रमाणेच दिसणारा, आरामदायी आणि न घसरणारा पाय उपलब्ध झाला. थिरुवनंतपुरम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर जगभरातल्या २७ देशांत अपंगांना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याचं कार्य करणाऱ्या ‘भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती’ला २००२ मध्ये हे तंत्रज्ञान मोफत देण्यात आलं.
कृत्रिम दात
दंतचिकित्सेत पडलेल्या दाताची जागा भरून काढण्यासाठी पूर्वी सोनं किंव तत्सम मौल्यवान धातू वापरले जात. एकतर ते महाग होते आणि इतर दातांपेक्षा वेगळे दिसत. इस्रोच्या लाँच व्हेइकल्ससाठी विकसित करण्यात आलेला ॲक्रामिड हा घटक दंतचिकित्सेसाठी वरदान ठरला. हलका, दीर्घकाळ टिकणारा आणि दातांच्या रंगाशी साधर्म्य असलेला हा कृत्रिम दात अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाला.
हॉर्ट रेट मॉनिटर
अंतराळात मानवी हृदयावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास करण्यासाठी आणि अंतराळवीरांच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्र तयार करण्यात आलं होतं. सध्याचा हार्ट रेट मॉनिटर त्या यंत्रांतच काही बदल करून विकसित करण्यात आला आहे.
वायरलेस हेडफोन
नील आर्मस्ट्राँगचं ‘दॅट्स वन स्टेप ऑफ मॅन…’ हे वाक्य अजरामर झालं. हा संवाद साधण्यासाठी त्याने वायरलेस हेडफोनचा उपयोग केला होता. त्यातूनच पुढे तंत्रज्ञानाचा विकास होत जाऊन आपण वायरलेस हेडफोन आणि इतर वायरलेस उपकरणांपर्यंत पोहोचलो.
मोबइल फोनमधील कॅमेरा
कॅमेऱ्याचा वापर करून ग्रह-ताऱ्यांच्या प्रतिमा टिपण्यासाठी नासाने १९६० मध्ये डिजिटल छायाचित्रण तंत्र विकसित केलं. पुढे याच तंत्राच्या साहाय्याने अवकाश यानांत वापरण्याच्या दृष्टीने लहान आकाराच्या आणि कमी वजनाच्या कॅमेऱ्यांची निर्मिती करण्यात आली. नंतर हेच कॅमेरे मोबाइल फोनमध्ये उपलब्ध करून दिले गेले.
लॅपटॉप
लहान आकाराचा, कमी वजनाचा आणि कुठेही नेता येणारा संगणक सर्वप्रथम अंतराळातील प्रवासासाठी तयार करण्यात आला होता. आज आपण जो लॅपटॉप वापरतो तो या संशोधनातूनच पुढे आला.
वेलक्रो
लहान मुलांना बुटाची लेस बांधता येत नाही आणि बेल्ट किंवा बकलही लावता येत नाही. त्यांच्या बुटांना सहज उघड-बंद करता येईल, असं वेलक्रो लावलेलं असतं. रेनकोट, हातमोजे, बॅग अशा अनेक ठिकाणी वापरलं जाणारं आणि अगदी रोजच्या आयुष्यातली सामान्य वस्तू भासणारं वेलक्रो हे अंतराळ संशोधनाचंच योगदान आहे. अंतराळवीरांना विविध उपकरणं वापरावी लागतात. ती मोकळी राहिल्यास पोकळीत तरंगत राहून इजा होऊ शकते. ही उपकरणं पोषाखावरच चिकटवून ठेवणं गरजेचे होतं. टेपने चिकटवण्याचा पर्याय होता. मात्र त्यामुळे उपकरण चिकट होत असे. ही समस्या सोडवताना वेलक्रोचा शोध लागला.
चष्म्याच्या ओरखडेरोधक काचा
पूर्वी चष्म्याच्या काचांवर अल्पावधीत ओरखडे उठत. आधुनिक काचा मात्र दीर्घकाळ टिकतात. कारण त्याच्यावर एका विशिष्ट द्रव्याचा थर दिलेला असतो. काचांना ओरखड्यांपासून सुरक्षित ठेवणारा हा थर नासाने विकसित केला होता. अंतराळात विविध प्रकारचा कचरा तरंगत असतो. त्याचं संशोधन उपकरणांच्या काचांशी घर्षण होऊन ओरखडे उठू नयेत, म्हणून हा थर दिला जात असे. पुढे तोच घटक चष्म्याच्या काचांसाठी वापरला जाऊ लागला.
अग्निशमन
उपग्रहांचं प्रक्षेपण करताना आग लागल्यास तिची तीव्रता मोठी असते. ती विझवण्यासाठी इस्रोने अतिशय उत्तम दर्जाच्या दोन पावडर तयार केल्या होत्या. त्यातील एक पावडर ज्वलनशील द्रवामुळे किंवा वायूंमुळे लागलेली आग विझवण्यासाठी आणि दुसरी धातूंना लागलेली आग विझवण्यासाठी वापरली जात असे. या पावडर आता सरकारी अग्निशमन दलांत आणि औद्योगिक क्षेत्रांत वापरल्या जातात.
उष्णता रोधक कापड
लाँच व्हेइकलला उष्णतारोधक कापडाचं आवरण लावलं जातं. हे कापड १६५० अंश सेल्शियसपर्यंत उष्णता सहन करू शकतं. इस्रोसिल या नावाने ओळखलं जाणारं आणि आज विविध उद्योगांत उपकरणांचं आणि वाहिन्यांचं उष्णतेपासून रक्षण करणारं हे कापड इस्रोने १९८३ मध्ये विकसित केलं.
इन्फ्रारेड इयर थर्मोमीटर
दूरवरच्या ग्रह-ताऱ्यांचं तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड तंत्र वापरलं जात असे. पुढे याच तंत्राचा वापर करून इन्फ्रारेड इयर थर्मोमीटर तयार करण्यात आलं. या थर्मोमीटरच्या सहाय्याने ताप काही क्षणांत मोजता येतो. लहान मुलं फार काळ स्थिर बसत नाहीत, त्यामुळे त्यांचा ताप मोजण्यासाठी हे थर्मोमीटर सोयीचं ठरतं.
बालकांचं खाद्य
अंतराळवीरांसाठी पोषक पदार्थ विकसित करण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले होते. या प्रयोगांच्या आधारे पुढे बालकांसाठी खाद्य तयार केलं गेलं. आज बालकांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक पावडरी याच खाद्यातून विकसित झाल्या आहेत.
मेमरी फोम
अंतराळ प्रवासादरम्यान पायलट आणि अंतराळवीरांना हादरे बसू नयेत आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून त्यांच्या आसनांना कुशन लावणं आवश्यक होतं. त्यासाठी मेमरी फोम विकसित करण्यात आला. आता सोफा, बूट, गाद्या अशा अनेक ठिकाणी हा फोम वापरला जातो.
सौर ऊर्जा
जैविक इंधनं वजनाने जड असतात आणि काही काळाने संपतात. अवकाश मोहिमेत त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं शक्य नसतं. त्यामुळे अवकाशातच ऊर्जा निर्माण करू शकेल, असा पर्याय शोधणं अपरिहार्य होतं. त्याविषयीच्या संशोधनातूनच सौर पॅनल तयार करण्यात आली. आज पृथ्वीवरही स्वच्छ तसंच अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून या पर्यायाकडे पाहिलं जाऊ लागलं आहे.
भूकंपरोधक तंत्र
अनेक नाजूक उपकरणं अवकाशात सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी प्रक्षेपकांवर असते. मात्र प्रक्षेपक एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना आणि पृथ्वी ते अवकाशापर्यंतच्या प्रवासादरम्यान त्यांत मोठ्या प्रमाणात कंपनं निर्माण होतात. हादरे बसतात. या सर्व प्रक्रियेत आतील उपकरणं सुरक्षित ठेवण्यासाठी व्हायब्रेशन आयसोलेशन सिस्टिम हे तंत्र विकसित करण्यात आलं. तेच तंत्र आता भूकंपप्रवण क्षेत्रांत इमारती बांधण्यासाठी वापरलं जातं.
हवामानाच अंदाज वर्तवणारं रडार
इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या बळावर डॉप्लर वेदर रडार तयार करण्यात आलं आहे. हवामानाचा अचूक वेध घेणारं हे रडार नैसर्गिक आपत्तींचा इशारा वेळेआधीच देतं. त्यामुळे जीवितहानी रोखणं शक्य होतं.
जमिनीखालील पाण्याचा शोध
अंतराळात ग्रहाच्या गर्भात दडलेल्या विविध खनिजांचा शोध घेण्यासाठी जे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं होतं, ते आज भूगर्भातील पाण्याच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी वापरलं जातं.
तंत्रज्ञान हस्तांतराची प्रक्रिया
इस्रोने एखादं तंत्रज्ञान विकसित केलं, की ते औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिलं जातं. पूर्वी ही प्रक्रिया इस्रोला स्वतःलाच करावी लागत असे, मात्र मार्च २०१९ मध्ये तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेसाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. असं तंत्रज्ञान जेव्हा औद्योगिक क्षेत्रासाठी खुलं केलं जातं तेव्हा त्याद्वारे सुरुवातीच्या काळात निर्माण करण्यात आलेली उपकरणं इस्रो स्वतःच खरेदी करते (बाय बॅक), त्यामुळे कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याआधीच ग्राहक मिळालेला असतो. हे साहित्य शैक्षणिक उद्दीष्टांसाठी हाती घेतल्या जाणाऱ्या मोहिमा आणि खासगी अवकाश मोहिमांसाठी उपलब्ध करून दिलं जातं.
दरम्यानच्या काळात या तंत्रज्ञानाचा उपयोग अन्य कोणत्या ग्राहकांसाठी करता येईल, याचा अंदाजही उद्योगांना घेता येतो. अवकाशात पाठविलेलं उपकरण दुरुस्त करणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट असते. त्यासाठी प्रचंड खर्च होतो आणि एवढा खर्च व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यातून पुढे येणारी अन्य उत्पादनंही अतिशय दर्जेदार, अचूक आणि टिकाऊ असतात. आपल्या कामाचा सामान्यांना काय उपयोग होतो, याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था पुस्तकं प्रकशित करणं, यू ट्युब चॅनलद्वारे माहिती देणं, असे अनेक उपक्रम राबवितात.
अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा मानवी जीवनावर काही परिणाम होतो की नाही, याविषयी वाद असू शकतात, पण याच ग्रहांचा वेध घेता घेता अवकाश तंत्रज्ञान माणसाचं दैनंदिन जीवन निर्वेध करत, हे मात्र निश्चित!
vijaya.jangle@expressindia.com