डॉ. विकास इनामदार
‘सेमीकंडक्टर उत्पादन हे रॉकेट सायन्स नाही. ते रॉकेट सायन्सपेक्षा अवघड तंत्रज्ञान आहे’ असे इंटेल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष क्रेग बॅरेट यांनी म्हटले आहे आणि ते खरेच आहे. सेमीकंडक्टर अर्थात अर्धवाहक धातूंपासून मोबाइल ते संगणक यांसारख्या उत्पादनांसाठी बनवल्या जाणाऱ्या आणि अत्यावश्यक असलेल्या ‘चिप्स’ चा प्रचंड तुटवडा ही संपूर्ण जगासाठी आज मोठी डोकेदुखी ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साधारण कोविड साथकाळापासून सेमिकंडक्टरचा तुटवडा हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला होता. या तुटवड्याचा परिणाम संगणक, स्मार्टफोन, वाहने आणि अन्यही अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर झाला होता. सेमीकंडक्टर उद्योगात जगात आघाडीवर असलेला देश म्हणजे तैवान! परंतु हा लोकशाहीवादी देश कम्युनिस्ट चीनचाच अविभाज्य भाग असल्याची बतावणी करून, चीन त्यावर लष्करी कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अमेरिकेने तैवानला संरक्षण पुरविल्याने आणि चीन सध्या अंतर्गत प्रश्नांत गुंतला असल्याने तूर्तास तैवानवरील आक्रमण टळले आहे. या पार्श्वभूमीवर सेमीकंडक्टर उद्योगाची संपूर्ण व्यवस्था भारतात उभारण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न स्तुत्य ठरतात.

आणखी वाचा- सरळसेवा भरती तरी पारदर्शकपणे हवी आहे का?

अलीकडेच गुजरातमधील प्रस्तावित आणि बहुचर्चित वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प बारगळला याचे महत्वाचे कारण म्हणजे एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स या डच कंपनीने या प्रकल्पाला पेटंटवर आधारित सेमीकंडक्टर उत्पादनाचे मूलभूत तंत्रज्ञान आणि तांत्रिक सहकार्य देण्यास नकार दिला. जगात आजमितीला सेमीकंडक्टर चिप्स उत्पादनात टीएसएमसी (तैवान), सॅमसंग (दक्षिण कोरिया) आणि इंटेल कॉर्पोरेशन (अमेरिका) या सर्वांत मोठ्या आणि आघाडीच्या कंपन्या आहेत. या तीन कंपन्यांमध्ये कायम स्पर्धा सुरू असते. तसेच सेमीकंडक्टर चिप्स उत्पादनासाठी लागणाऱ्या अत्यंत आधुनिक आणि खर्चिक अशा लिथोग्राफी यंत्रांची निर्मिती करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे- एएसएमएल. ही नेदर्लंड्सची कंपनी आहे.

सेमीकंडक्टर चिप्स उद्योगाच्या व्यवस्थेचे पाच भाग आहेत-

(१) चिप-डिझाइन

या क्षेत्रात या उद्योगाच्या पुरवठा-साखळीचे १५-२० टक्के मूल्य सामावलेले आहे. अमेरिका यात आघाडीवर असून त्या मागोमाग जपान,चीन, इंग्लंड या देश देशांचा क्रमांक लागतो. भारत ‘चिप डिझाइन’ मधील आघाडीच्या कंपन्या मेंटॉर ग्राफिक्स, कंडेन्स डिझाइन यांच्याबरोबर करारमदार करून या क्षेत्रात उतरू शकतो.

(२) चिप-फॅब्रिकेशन

या उद्योगाच्या पुरवठा-साखळीचे ३५-४० टक्के मूल्य चिप फॅब्रिकेशनमध्ये समाविष्ट आहे. केवळ १० कंपन्या १० नॅनोमीटर पेक्षा लहान चिप्सची निर्मिती करतात आणि दोनच कंपन्या (टीएसएमसी आणि सॅमसंग) पाच नॅनोमीटरपेक्षा लहान आकाराच्या चिप्स तयार करतात. टीएसएमसी ही एकमेव कंपनी तीन नॅनोमीटर पेक्षा लहान आकाराच्या चिप्स बनवते ज्यात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे मात्र उत्पादनाची खात्री नाही. अमेरिकेने या क्षेत्रात ५० अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत. भारताने या क्षेत्रात जाऊ नये, मात्र १०० नॅनोमीटरहून मोठ्या चिप्सवर लक्ष केंद्रीत करणे लाभदायक ठरू शकते. १०० ते ५०० नॅनोमीटर आकाराच्या चिप्सचे उत्पादन करण्यासाठी सुमारे १०० ते ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते. १०० ते ३०० नॅनोमीटर आकाराच्या चिप्सच्या उत्पादनासाठी एक ते २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक ठरते. इंटेल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स यांच्याबरोबर करारमदार करून हे साध्य करणे शक्य आहे. चिप-डिझाईन आणि चिप फॅब्रिकेशन क्षेत्रांत कंपन्या उभारून चिप निर्मितीची व्यवस्था मजबूत करता येईल.

आणखी वाचा-अमृतकाळ या संस्थांसाठी ‘संजीवनी’ ठरेल?

(३) चिप असेम्ब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग

या क्षेत्रात मायक्रॉन टेक्नॉलॉजी बरोबर भागीदारी करणे फायदेशीर ठरू शकते. या क्षेत्रा पुरवठा साखळीचे १५ ते २० टक्के मूल्य समाविष्ट आहे. चीन, तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर हे या क्षेत्रातील स्पर्धक देश आहेत.

(४) चिप वितरण

या क्षेत्रात एकंदर पुरवठा साखळीपैकी ५ ते १० टक्के मूल्य सामावलेले आहे. अमेरिका, कॅनडा, चीन, तैवान हे स्पर्धक देश आहेत. मायक्रॉन बरोबर भागीदारी केलेली असल्यास भारताला या क्षेत्राचा एक छोटा हिस्सा मिळेल.

(५) चिप ‘एन्ड यूजर’

यात पुरवठा साखळीचे १५ ते २० टक्के मूल्य आहे. भारतात स्मार्टफोन्स, वाहने, घड्याळे, खेळणी, आरोग्यक्षेत्राशी संबंधित उपकरणे, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींसाठी या चिप्सना देशांतर्गत मोठी मागणी आहे.

आणखी वाचा-‘नकुशी’ कधी होणार ‘हवीशी’?

थोडक्यात, भारताने वरील पाच क्षेत्रांत आणि त्यांच्या पुरवठा साखळीत जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या आणि ज्या कंपन्यांकडे पेटंटवर आधारित सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आहे अशा नामांकित कंपन्यांशी किमान प्रत्येकी एक करारमदार करणे उपयुक्त ठरू शकते. चीन- अमेरिका तांत्रिक, व्यापारी, औद्योगिक, लष्करी संघर्ष भारताच्या पथ्यावर पडेल असे दिसते. मात्र सेमीकंडक्टर क्षेत्रात सध्या ‘टॅलेंट वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जगभरातील भारतीय तंत्रज्ञ भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती मोहिमेश जोडले जाण्यातच या योजनेचे यशापयश अवलंबून आहे.

भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर होणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. सध्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी हा उद्योग नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

लेखक उद्योग व तंत्रशिक्षण तसेच व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

vikas.h.inamdar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Become self sufficient in semiconductor production is necessary mrj