गोविंद डेगवेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इहलोकातलं, अर्थात याच जगातलं भौतिक उन्नयन घडून यायचं असेल तर धर्मसंशोधनाशिवाय- म्हणजे वैचारिक बदलाशिवाय- पर्याय नाही. अर्थात हे धर्मसंशोधन जीवनविषयक गंभीर जाणिवेच्या उजेडात झालं पाहिजे. ‘कोणाच्याही श्रद्धेवर आघात करण्याचा नास्तिकांचा प्रयत्न कधीच नव्हता आणि तो नसेल, अशी खूणगाठ बांधून आजवर नास्तिकांनी ‘मी’ पण राखून आस्तिकांचं ‘तू’पण सांभाळलं आहे. परंतु ‘धर्म’ ही बाब सत्ताधाऱ्यांच्या हातात जाणार असेल तर नास्तिकांमधील साैम्यशक्ती ही प्रत्येक धर्मांध सत्तेला प्रश्न करेल,’ हा यंदाच्या नास्तिक संमेलनातून प्रखरपणे मिळालेला संदेश विचारी चळवळींसाठी दिशादर्शक ठरावा.

हेही वाचा >>>नव्या वर्षात सरकारसुद्धा ‘तंदुरुस्ती’चा संकल्प करील?

विवेकाधारित समाजाची रचना हे झालं ध्येय. परंतु या ध्येयाकडे जाणारी वाटचाल करण्यासाठी निश्चित अशी दिशा असावी लागते. ही दिशा ठरवायची कशाच्या आधारावर, हा मोठा प्रश्न असतो. मोठा या अर्थानं की, ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात, तिथून अनेक वाटा फुटलेल्या असतात. अनेक विचारधारा एकमेकांत मिसळल्यासम तुमच्यासमोर येऊन उभ्या ठाकतात. आणि त्या एकमेकींपासून अलग करण्याचा प्रयत्न करताना त्यात द्वैत नजरेसमोर येतं. म्हणूनच परिवर्तनवाद्यांसमोरचं हे मोठं आव्हान आहे. हा दाब किती मोठा आहे, यावर चर्चा करणारं ‘राष्ट्रीय नास्तिक संमेलन’ गेल्या रविवारी- १८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात पार पडलं. पुण्यातील ‘ब्राइट सोसायटी’या संमेलनाची आयोजक होती. या संघटनेला अभिप्रेत असलेली ‘नास्तिकेय सौम्यशक्ती’ कुमार नागे यांनी बीजभाषणात विशद केली. समाजातील अभिजन वर्गात ही शक्ती सुप्तावस्थेत असते. म्हणून ‘ब्राइट सोसायटी’ या वर्गाला त्यासाठी आवाहन करते, असं ते म्हणाले.

‘परिवर्तनवाद’ म्हणजे भूतकाळास सातत्यानं बाजूला सारून आजची, किंबहुना आताची मांडणी करणें. कालचा संदर्भ आज कदाचित चालत नाही. काळ सतत बदलत आहे. त्याला सुसंगत जीवन विचार करणं आणि त्यानुसार आचार पाळणं. परंतु, हे करत असताना समाजमनात त्याची पेरणी योग्य पद्धतीने करणंही आवश्यक असतं, याची जाणीव करोना काळानंतर प्रत्यक्ष जमून होत असलेल्या अशा या पहिल्याच राष्ट्रीय नास्तिक संमेलनातल्या सर्वच वक्त्यांनी करून दिली. दोन सत्रांत झालेल्या या संमेलनात सर्वच वक्त्यांनी संघटनशक्ती वाढविण्याची गरज व्यक्त केली.
प्रत्येक संघटनेचा, तिच्या विचाराचा पोत वेगवेगळा असतो. आता संघटनशक्तीचं हे वस्त्र असं कसंही ठिगळं लावून एकत्र आणणंही बरं दिसणारं नाही. किंबहुना त्यातून वैचारिक साम्याचे धागे गुंतले जाणार नाहीत, अशी इशारेवजा सूचना या संमेलनाच्या पीठावर करण्यात आली, ती या दृष्टीनं महत्त्वाची आहे.

हेही वाचा >>>नव्या आणि जुन्या व्यंगचित्रकारांचा अनोखा सोहळा अनुभवायला तुम्हीपण येताय ना?

‘लोकशाही आणि विवेकाला धर्मांध संघटनांचा विरोध आहे आणि तो परतवावाच लागेल,’ असं ‘मधूरजग’ पुरस्कार विजेत्या पत्रकार अलका धुपकर यांनी त्यांच्या परखड मांडणीतून सांगितलं. प्रसन्न जोशी म्हणाले की, ‘नास्तिकांना कोणाशी लढायचं हा भाग जरी लक्षात घेतला तरी त्यांना इतर समाजघटकांशी संवाद वाढवावा लागेल’. पहिल्या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात काठमांडूहून आलेले ‘ह्यूमनिस्टस् इंटरनॅशनल’चे उत्तम निरौला यांनी विचारवंत आणि विवेकवादी लोकांना होणाऱ्या त्रासाविरोधात जागतिक पातळीवर आवाज उठविण्याचं आवाहन केलं. धर्म म्हणजे ‘देवाची भीती’… याशिवाय आज धर्माला दुसरा काही अर्थ उरलेला नाही, असं सांगतानाच, आंतरराष्ट्रीय पातळीवर धार्मिक-सामाजिक प्रश्नांना हात घालताना तेथील सांस्कृतिक प्रतिमांचा, संचिताचा विचार करावा लागत असल्याचंही निरौला म्हणाले. यावेळी नरेंद्र नाईक यांना ‘चार्वाक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी या नास्तिक संमेलनाच्या विषयपत्रिकेत महिला आणि सामाजिक बंधनांचा कुठे उल्लेख नसल्याची खंत व्यक्त केली. ‘जे काही लादलं जातं ते पहिल्यांदा महिलांवर. सामाजिक बंधनांच्या पहिल्या बेड्या तिला ठोकल्या जातात. आजची महिलांच्या या स्थितीचं वर्णन वाईट या शब्दानंच करावं लागेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे इयत्ता पहिलीचं शिक्षण आहे, असं समजा. तुम्हाला पुढे दहावीत जाऊन जे काही वैचारिक मांडायचं आहे, त्याची सुरुवात पहिलीपासून म्हणजे ‘अंनिस’पासून होते,’ असं त्या म्हणाल्या, त्यात तथ्यही आहेच.

देव मानण्या-नाकारण्याचं स्वातंत्र्य
मानवी जीवन कोण्या बाह्यशक्तीने चालत नाही. ‘ना कोणाच्या शरीरात या“बाहेरच्या’ शक्तींनी काही बदल घडतात, ना ते घडायचे थांबतात’ हे बुद्धीप्रामाण्यवादाचं सरळ साधं सूत्र. पण हे सूत्र ज्यांनी ज्यांनी समाजात जाऊन मांडलं त्यांना थांबवण्यात आलं, किंबहुना संपवण्यात आलं. ईश्वराचं अस्तित्व न मानणाऱ्यांना आदिम मृत्यूदंडाचीच शिक्षा बहाल केली होती. पुढे दंडसत्तेच्या जोरावर ही शिक्षा कायम ठेवण्यात आली, हे एकवेळ मान्य करता येईल. पण आजही तिला कायद्याचा आधार आहे. याच धर्तीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी ‘ईशनिंदा कायद्याची कालबाह्यता’ ठळकपणे मांडली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसंच संविधान यांच्यातील बंधुभाव विशद केला. ईशनिंदेविषयीची त्यांची मांडणी अशी होती की, देव ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. कुणी निसर्गाला देव मानत असेल, किंबहुना कुणी देव मानतच नसेल तर ते तसं मानू देण्याचं स्वातंत्र्य राज्यघटनेनं बहाल केलं आहे. यालाच दुसऱ्या शब्दांत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणता येईल. कुणी देव या संकल्पनेसह जगत असेल किंवा कुणी देव नाकारून जगायचं म्हणत असेल, तरीही तो व्यक्तिगत स्वातंत्र्यांचा व सद्विविवेकबुद्धी वापरण्याच्या मूलभूत हक्कांचा भाग आहे. पण कुणी केवळ देव मानत नसेल, देवाच्या अस्तित्वाबद्दल साशंक असेल किंवा अज्ञेयवादी असेल तर त्यांना ईश्वराची निंदा करतो अशा गुन्ह्याखाली गुन्हेगार ठरवणं हे चुकीचे आहे. देव वेगळा आणि माणुसकीपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक देव-गुण वेगळे असं वाटणाऱ्यांना निर्भयपणे जगता यावं, यासाठी नवा स्पष्ट कायदा असायला हवा.

हेही वाचा >>>मराठी समाजाला नाटकाचे वरदान – ज्येष्ठ अभिनेते परेश रावल

संतसाहित्याचा संवाद-सेतू!
समारोपाच्या भाषणात विश्वंभर चौधरी यांनी डाव्या चळवळींच्या विचारांची साकल्याने मांडणी केली. संतसाहित्याचा अभ्यास टाळून नास्तिकांना फार काही करता येणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला.

मज हृदयी सद्गुरु ।
जेणे तारिलों हा संसारपुरु ।
म्हणऊनि विशेषें अत्यादरु ।
विवेकावरी…

हे ज्ञानेश्वरीतील तत्त्व नास्तिक चळवळींनी स्वत:त बिंबवायला हवं. विवेक शिकवणारा गुरू असायलाच हवा. नाहीतर जगात तसे खूप गुरू आहेत. संतांची शिकवण हे धर्मसंशोधनच आहे. त्या मार्गावर राहून धर्मचिकित्सा करावी लागेल, असं सांगतानाच राज्यघटनेने बहाल केलेलं श्रद्धेचं स्वातंत्र्य आम्हाला अभिप्रेत आहे आणि हे स्वातंत्र्य ओळखण्यासाठी चांगला नागरिक घडावा लागतो. पण आपल्याकडे नागरिकत्वाची ओळख करून देणारं ‘नागरिकशास्त्र’ आहे केवळ २० मार्कांसाठी. ते भविष्यात १०० मार्कांसाठी असायला हवं. शिवाय राज्यघटनेवर ५० मार्कांसाठी प्रश्न असायला हवेत. त्यासाठी विचार करणाऱ्या लोकांनी सरकारच्या मागे लागायला हवं, हे या भाषणातलं आवाहन नास्तिकांच्या ‘सौम्यशक्ती’ला नवा कृतिकार्यक्रम देणारं ठरू शकेल!

govind.degvekar@expresindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beginning of dialogue of atheist soumya shakti sant dnyaneshwar mentioned in atheist soft power meet at pune amy