भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय
प्रशासकीय सेवेतही आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढला की मिळतो. माझ्या सहचारिणीलाही प्रवासाची आवड असल्यामुळे आम्ही अगदी अंटाक्र्टिका, आर्टिक्ट, सैबेरियाचे वाळवंट अशा ठिकाणीही जाऊन आलो. सैबेरियाच्या वाळवंटात मला सगळीकडे मिहद्रा कंपनीच्या गाडय़ा दिसल्या. मी लगेच त्याचे फोटो काढून आनंद मिहद्रा यांना पाठवले. सैबेरियात एका कॉफी शॉपमध्ये एक रशियन महिला कॉफी पीत बसली होती. तिच्या दंडावर गणपतीचा टॅटू होता. हा टॅटू एका भारतीय देवाचा एवढंच तिला माहीत होतं; पण भारत देश, आपली संस्कृती, महती इथवर पोहोचली हे पाहून मला खूप छान वाटलंच; पण हे सगळं मला बघायला मिळालं याचंही मला समाधान आहे.
अनेक देश फिरलो, पण कधी तिथे स्थायिक व्हावे, असा विचार मनात आला नाही. उलट तिथल्या चांगल्या गोष्टी बघून त्या तशा आपल्याकडे आणाव्यात, असा विचार मात्र मनात येतो. सुदैवाने मी ज्या सेवेत ज्या पदावर आहे त्याद्वारे मला या चांगल्या गोष्टी इथे आणण्याची संधीही मिळते.
मला बाइक चालवण्याचीही आवड आहे. माझ्या पत्नीचा विरोध पत्करून घेतलेला हा एकमेव निर्णय. बाइक चालवण्याची जशी आवड असते तशी अनेकांना सायकल चालवण्याची आवड असते. त्यामुळे अशा सायकल चालवणाऱ्यांसाठी शहरात सायकल ट्रॅक ही काळाची गरज आहे.वाहनचालकांनी विशेषत: चारचाकी वाहनचालकांनी सायकल ट्रॅकचा आदर ठेवला तर उलट अपघात होण्याचा धोका कमी होईल. सायकल ट्रॅकमध्ये घुसू नये, त्याच्यावरून चालू नये ही पथ्ये पाळण्याची सामाजिक जाणीव आणि शिस्त लोकांमध्ये आली तर हा उपक्रम यशस्वी होईल.
प्रशासकीय सेवेची परीक्षा मी ‘मराठी साहित्य’ या विषयातून दिली याचेही अनेकांना आजही अप्रूप वाटते. पण मराठी भाषेवर प्रेम होतं, प्रशासकीय स्पर्धा परीक्षा ‘मराठी साहित्य’ या विषयातून देऊ शकतो व यशस्वी होऊ शकतो हे कळलं, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाल्यानंतरही मी अनेक विषयांत पदव्या घेतल्या. या पदव्या घेतल्या नसत्या तर माझं काही अडलं नसतं; पण तरीही केवळ आवड म्हणून मी शिकत गेलो.
(शब्दांकन : इंद्रायणी नार्वेकर)