सुहास हिरेमठ

येत्या विजयादशमीला (२ ऑक्टोबर २०२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होतील. उपेक्षा, विरोध, अपप्रचार, अन्याय व अत्याचार सहन करून आज देशातील सर्व जिल्ह्यांत, ९० टक्के तालुक्यांत व एक लाखापेक्षा अधिक गावांत कार्यरूपाने पोहोचलेली आपल्या देशातील ही एकमेव संघटना असावी. हे ऐकल्यावर स्वाभाविकच प्रत्यक्ष संघ कार्यापासून दूर असणाऱ्या कोणत्याही सुशिक्षित माणसाला प्रश्न पडेल की हे कसे घडले? याला कारणीभूत कोण? तेव्हा सहजपणे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्याकडे बोट दाखवावे लागते.

संघटन जगप्रसिद्ध, संस्थापक अप्रसिद्ध

डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूला येत्या २१ जूनला ८५ वर्षे पूर्ण होतील. पण आश्चर्य म्हणजे संघाबाहेरील जी मंडळी संघाविषयी पुष्कळ चर्चा करतात त्यातील किती जणांना संघ संस्थापकांचे नाव माहिती असेल? आज विविध माध्यमातून संघाविषयी लिहिले-बोलले जाते, परंतु यापैकी किती जणांना संघाच्या संस्थापकांचे नाव व त्यांच्याविषयी किमान प्राथमिक माहिती असेल?

छत्रपती संभाजीनगर शहरात स्वयंसेवक डॉक्टरांनी चालू केलेल्या ‘डॉ. हेडगेवार रुग्णालया’च्या नव्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते सुप्रसिद्ध उद्याोगपती रतन टाटा. मुंबईहून त्यांच्या विमानातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमासाठी येत होते. रुग्णालयाची माहितीपत्रके, निमंत्रणपत्र, आमंत्रण पत्रिका रतन टाटा पाहात होते. त्यांनी गडकरी यांना विचारले की, ‘डॉक्टर हेडगेवार यांनी या रुग्णालयाला देणगी दिली आहे का?’ जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेच्या संस्थापकांचे नाव माहिती नसणे हे रतन टाटा यांचे अज्ञान नाही तर हे डॉक्टर हेडगेवार यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी स्वत:ला सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर ठेवले होते. आजही आपल्या देशात हजारो विद्वान तसेच सन्मानित मंडळी असतील, ज्यांना संघ संस्थापकांचे नाव माहिती नसेल.

प्रारंभीच्या काळात संघगीतातील

वृत्तपत्र में नाम छपेगा, पहनुंगा स्वागतसम हार,

छोड दो ये क्षुद्र भावना, हिंदुराष्ट्र के तारणहार।।

या दोन ओळीतील अर्थ जगलेल्यांपैकी एक म्हणजे डॉक्टर हेडगेवार होत. १९३६च्या मे महिन्यात नाशिकचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी स्वामी यांनी जगद्गुरू आद्या शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्ताने डॉ. हेडगेवार यांना ‘राष्ट्र सेनापती’ ही पदवी घोषित केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध होताच डॉक्टरांच्या काही मित्रांनी व अनुयायांनी अभिनंदन करणारी पत्रे त्यांना पाठवली. डॉक्टरांनी सर्व संबंधितांना पत्र पाठवून कळविले की, ‘या पदवीचा उपयोग कोणीही व केव्हाही करू नये.’ त्या काळातील महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संपादक गो. गो. अधिकारी व नागपूरचे दामोदर भट यांनी डॉक्टरांचे जीवन चरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु डॉक्टरांनी त्यांना अतिशय गोड शब्दांत पण स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळेच आज आश्चर्य वाटते की ‘संघटन जगप्रसिद्ध पण संस्थापक अप्रसिद्ध !’

डॉक्टर हेडगेवार जन्मजात देशभक्त होते. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांची देशभक्तीची भावना व पारतंत्र्याबद्दलची चीड विविध प्रसंगी प्रकट झाली आहे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वैद्याकीय शिक्षणासाठी त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, कारण क्रांतिकारकांचे ते एक प्रमुख केंद्र होते. तेथील ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेचे ते अंतरंग सदस्य झाले. वैद्याकीय शिक्षणाच्या शेवटच्या परीक्षेत ७०.०८ गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. १९१५ मध्ये ते नागपूरला परत आले तेव्हा तत्कालीन मध्य प्रांतात केवळ ७५ डॉक्टर होते. वैद्याकीय व्यवसाय करून ते लाखो रुपये कमावू शकले असते पण त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चालू असलेली आंदोलने, चळवळी यात ते सहभागी झाले. १९२१ च्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला. इंग्रजांनी केलेली भाषण बंदी मोडून इंग्रजी राजवटीविरुद्ध जहाल भाषणे केल्याबद्दल त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३० मध्ये गुजरातमध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या जंगल सत्याग्रहात डॉक्टर हेडगेवार यांनी एका तुकडीचे नेतृत्व केले. त्यात त्यांना नऊ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

डॉ. हेडगेवार यांचे चिंतन व निष्कर्ष

१९१४ ते १९२५ या १२ वर्षात केलेल्या सर्व प्रकारच्या चळवळी, आंदोलने व कार्यक्रम या सर्वांच्या अनुभवातून त्यांनी हा निष्कर्ष काढला की, सशस्त्र क्रांतीचा मार्ग सर्वसामान्य जनतेला भावणारा नाही. यापेक्षा लोकांमध्ये विशुद्ध देशभक्तीची भावना स्थायी स्वरूपात जागृत करणे, अनुशासन निर्माण करणे, स्वार्थत्यागाची भावना जागवणे, राष्ट्रासाठी क्षण-क्षण व कण-कण झिजण्याची भावना उत्पन्न करणे आवश्यक आहे. याच त्यांच्या चिंतनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला.

संघ शाखा व संघाची कार्यपद्धती ही डॉक्टरांच्या उच्च कोटीच्या अलौकिक प्रतिभेची देणगी आहे. वरकरणी सामान्य, परंतु परिणामाला असामान्य अशा शाखा तंत्रातून संपूर्ण देशभर गुणवान, कर्तृत्ववान, समर्पित व निरंतर सक्रिय असे स्वयंसेवक व कार्यकर्ते निर्माण झाले. त्यातूनच आज एक भव्य चित्र देशात उभे आहे. संघ शाखेच्या मुशीतून घडलेले नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे कर्तृत्व, दृष्टी, समर्पण, प्रशासकीय कौशल्य, विदेशामध्ये स्वत:विषयी व देशाविषयी त्यांनी निर्माण केलेली आदराची भावना इत्यादी पाहिल्यानंतर श्रेष्ठ उद्याोगपती रतन टाटा यांनी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांना विचारले की संघाची ही ‘माणसे घडवण्याची प्रक्रिया’ कशी आहे ते मला समजून घ्यायचे आहे.

डॉक्टरांचे वडील पौरोहित्य करत होते. या क्षेत्रात त्यांना खूप प्रतिष्ठा होती. दुर्दैवाने इ.सन १९०३ च्या फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी डॉक्टरांच्या वडिलांचे व आईचे प्लेगच्या रोगामुळे निधन झाले. त्यानंतर गरिबीत दिवस काढावे लागलेल्या डॉक्टर हेडगेवार यांनी आजन्म अविवाहित राहून आपले संपूर्ण जीवन मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांचा हा श्रेष्ठ त्याग, चारित्र्य, स्वीकारलेला श्रेष्ठ ध्येयवाद, त्यासाठी केलेले अपरिमित परिश्रम, विलक्षण संघटन कौशल्य याचे अनुकरण करणारी मंडळी प्रत्येक पिढीत निर्माण झाली. डॉक्टरांना प्रत्यक्ष पाहिलेले आज जवळजवळ कोणीही नाही. आजचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी ही संघातील पाचवी पिढी आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनातील तारुण्याचा काळ संघ कार्यासाठी समर्पित करणारे प्रचारक व गृहस्थी जीवनातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आपल्या जीवनात ‘राष्ट्र प्रथम’ हा संकल्प करून त्यानुसार जगणारी लाखोच्या संख्येतील ही मंडळी चार पिढ्यांमध्ये पाहायला मिळतात; पुढच्या पिढ्यांमध्येही होतील हा विश्वास आहे. भारताच्या इतिहासातील त्याग, पराक्रम व प्रचंड परिश्रम करणाऱ्या तेजस्वी उदाहरणांची पुनरावृत्ती करणारी ही उदाहरणे पाहिल्यानंतर कोणत्याही देशभक्त नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून येईल. डॉक्टर हेडगेवार यांच्या पुण्याईचे हे परिणाम आहेत.

अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

hiremathsuhas@gmail.com