मैफल अजून सुरू व्हायची आहे. स्वरमंचावर वाद्यो येऊन थांबली आहेत. हळूच वाद्यांवर हात फिरायला लागतो आणि गायक कलावंत येण्यापूर्वीच हलक्या टाळ्यांनी संगतकारांचं स्वागत होतं. तबला आणि हार्मोनिअम या दोन्ही वाद्यांवर साथसंगत करायला आलेल्या या दिग्गजांसाठीची ती स्वागताची पावती. गोविंदराव पटवर्धनांना आयुष्यभर अशा स्वागताने बहरून जाता आलं, कारण त्यांच्या बोटांमध्ये कमालीची जादू होती. ती समोर बसून संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाला जेवढी लक्षात येत असे, त्याहून कितीतरी पटीने गायक कलावंताच्या लक्षात येत असे. गोविंदरावांकडे नुसतं पाहिलं, तरी एक आश्वासक आनंद कलावंताच्या डोळ्यात लकाकत असे. याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं. ही साथ आणि संगत कलावंताच्या सर्जनासाठी ़फार महत्त्वाची. त्यामुळे असा भरवशाचा साथीदार मैफलीत बरोबर असणं म्हणजे निम्मी लढाई जिंकल्यासारखंच. गोविंदरावांचं मैफलीतील हे अस्तित्व असं कलावंताच्या नवसर्जनाला प्रोत्साहन देणारं असे. भारतातल्या बहुतेक सगळ्या शहरांमध्ये झालेल्या शेकडो मैफलींमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्या काळातील सगळ्या दिग्गज कलावंतांबरोबर हार्मोनिअमची संगत केलेल्या गोविंदराव पटवर्धनांची त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने होणारी आठवण म्हणूनच त्या सुंदर स्वरशिल्पांना पुन्हा जागं करणारी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील सगळे कंठसंगीत समूहातूनच पुढे आले. भारतीय अभिजात संगीताने एकल संगीताची वाट स्वीकारली असेल, कारण त्या समूहातील प्रतिभावानास स्वत: काही वेगळे सुचत होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नसेल. त्यामुळे समूहातून बाहेर पडून एकट्याने सर्जनाची आराधना करणारी एक परंपरा निर्माण झाली असावी. कोणतेही शास्त्रीय उपकरण वा प्रयोगशाळा उपलब्ध नसतानाही भारतीय उपखंडात षडज, रिषभ, गंधार, मध्यम, पंचम, धमार आणि निषाद या सात स्वरांची निश्चिती झाली. हे सात स्वर आणि त्या स्वरांच्या सांदीसापटीमध्ये असणारे उपस्वर, म्हणजे श्रुती यामध्ये आजवर बदल झालेला नाही. पदार्थविज्ञानातील नव्या उपकरणांच्या साहाय्याने या स्वरांचे स्थान शोधणे सोपे झाले आणि ज्यांनी हे स्वर शोधले, त्यांचे संगीतावरील ऋण लक्षात आले. या सात स्वरांच्या पसाऱ्यातून निर्माण होणारी कला अव्याहतपणे नव्या कल्पना व्यक्त करीत आहे. निर्मितीला खळ पडू नये, एवढी प्रतिभा माणसाने आत्मसात केली आणि संगीत हा त्याच्या अखंड आनंदाचा विषय झाला. कंठ संगीतात केवळ गळ्यातून बाहेर पडणाऱ्या संगीताला आधार स्वराची आवश्यकता असते. तो आधार स्वर त्या स्वरांच्या नभांगणात जाण्याचे प्रवेशद्वारच. गायक कलावंताला स्वरांना लयीच्या कोंदणात बसवण्यासाठी तबला आणि स्वरांना अर्थगर्भ करण्यासाठी सारंगी, ही वाद्यो पहिल्यापासूनच होती. आधार स्वरासाठी तंबोरा हे वाद्या. दोन तंबोऱ्यांमधून येणाऱ्या षडज-पंचमाच्या अवकाशात संगीताच्या ब्रह्मांडाला सामोरे जाताना, लय आणि स्वरांची संगत कलावंतासाठी अधिक उपयुक्त. सारंगी हे वाद्या गळ्यातून निघणाऱ्या स्वरांशी तादात्म्य पावणारं म्हणून मैफलीत आलं. पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हार्मोनिअम संगीत मैफलींच्या दरबारात रुजू झाले. सारंगी आणि हार्मोनिअम या दोन्ही वाद्यांच्या मूलभूत स्वभावातच फरक (एक तंतुवाद्या आणि दुसरे वायुवाद्या) असला तरीही स्वरांच्या साथीला हे वाद्या आले आणि त्याने कलावंतांची आणि रसिकांचीही मन:पूर्वक वाहवा मिळवली. ब्रिटिशांनी आणलेल्या ऑर्गन आणि हार्मोनिअम या वाद्यावर भारतीय कलावंतांनी इतकी भरभक्कम हुकूमत मिळवली, की ब्रिटिशांनाही आश्चर्याने थक्क होण्याशिवाय पर्याय उरला नाही. १८८० मध्ये संगीत नाटकाचा ज़माना सुरू झाला, तो शेवटपर्यंत ऑर्गन आणि हार्मोमिअम या वाद्यामेळाने रंगत गेला. अभिजात संगीताच्या मैफलीत सारंगीची जागा हार्मोनिअमने घेतली आणि मैफलीचा माहौलच बदलून गेला.

हेही वाचा >>>अमेरिकेला विषमतेचा इतिहास पुसण्याची संधी…

अतिशय शांत मुद्रेने कलावंताच्या नवसर्जनाकडे लक्ष देत, त्याच्या नवोन्मेषी प्रतिभेला साद घालत गोविंदराव जेव्हा संगत करत, तेव्हा अनेक वेळा कलावंतही हरखून जाई. आपल्या जादूई बोटांतून निर्माण होणाऱ्या संगीताने रसिकांना आणि गायकाला नामोहरम करून, त्याच्यावर कुरघोडी करून, आपली नाममुद्रा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न गोविंदरावांनी कधीच केला नाही. गायकाला दाद द्यायची, ती हार्मोनिअममधूनच. त्यासाठी हातवारे करून लक्ष वेधून घेण्याची गरज गोविंदरावांना कधी वाटली नाही. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुमार गंधर्व, राम मराठे, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या कलावंतांच्या मैफलीतील त्यांचं असणं, रसिकांनाही हवंहवंसं वाटत असे. मराठी संगीत नाटकाच्या जमान्यात त्यांनी केलेली साथसंगत तर अवर्णनीय अशी. ललितकलादर्श, मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांच्या संगीत नाटकांच्या हजारो प्रयोगांमध्ये गोविंदरावांनी रंग भरला. शब्द संगीताला साथ करताना त्यांचे हार्मोनिअम स्वरांबरोबरच शब्दही बोलत असे. शब्दांचे भाव स्वरांमध्ये जसेच्या तसे आणण्याचे त्यांचे कसब कमालीचे होते. त्यांना अनेक संगीत नाटके अक्षरश: मुखोद्गत होती. गंमत म्हणजे स्वरांशी जराही सख्य नसलेल्या पोलीस खात्यात तीन दशके नोकरी करत गोविंदरावांनी पोलिसी खाक्याच्या कचाट्यातून आपली कला सहीसलामत जपली आणि तिची मन:पूत साधना केली. मैफल असो की संगीत नाटक, गोविंदरावांना कलावंताचा अंदाज अतिशय बरोबर असे. गायक कोणत्या वाटावळणांनी पुढे जाईल, याचा अचूक वेध घेता येण्यासाठी वादकही आतून गवई असावा लागतो. गोविंदरावांनी भारतीय संगीतातील सगळ्या घराण्यांमधील सगळ्या दिग्गजांच्या प्रतिभेला साद घालता यावी, यासाठी त्यांच्या शैलीचा पुरेपूर अभ्यास केला. त्यामुळे साथसंगत करताना, त्यांचे साहचर्य अधिक आनंददायी होत असे. गवयाला समजून घेत, त्याला क्वचित प्रसंगी सहजपणे, कोणताही आविर्भाव न ठेवता काही सुचवून जाण्याची त्यांची लकब खास म्हणावी अशी. पु. ल. देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर, संगीतकार स्नेही आणि शुभचिंतक असावा लागतो. संगीताच्या कैवल्यात्मक आनंदाच्या खेळातील तो एक महत्त्वाचा साथीदार असतो. गोविंदरावांनी हे सारे समजून, उमजून आयुष्यभर संगत केली आणि भारतीय रसिकांना स्वरश्रीमंत करून टाकले.

हेही वाचा >>>बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…

गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या कलावंताने हार्मोनिअम या वाद्याचे सौंदर्य असे काही उलगडून दाखवले, की नंतरच्या पिढ्यांमधील कलावंतांनाही या वाद्याची भुरळ पडली. गोविंदराव पटवर्धनांना त्या गोविंदरावांनी दाखवलेली स्वरांची वाट आयुष्य सार्थकी लागण्यास पुरेशी ठरली. आपण संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक आहोत, याची जाणीव केवळ वादनातूनच करून देणाऱ्या या कलावंताच्या निधनामुळे मैफली गाजवत असलेल्या अनेक कलाकारांमध्ये हतबलतेची जाणीव निर्माण झाली, यावरून त्यांचे महत्त्व सहज कळून येईल. वसंतराव आचरेकर आणि गोविंदराव पटवर्धन यांची जोडी मैफलीतून अचानक निघून गेल्यानंतर कुमार गंधर्वांसारख्या सर्जनशील कलावंताची झालेली घालमेल त्यांच्या चाहत्यांनाही हळहळून जायला लावणारी होती. संगीत व्यापारात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गोविंदरावांच्या बोटांना स्वरांचा परीसस्पर्श झाला होता. तीच त्यांची आयुष्यभराची ओळख होती. तो त्यांचा विश्वास होता. गायक कलावंतालाही त्यांच्या असण्याचे आश्वासन किती मोलाचे वाटत असे, हे त्या कलावंतांच्या चेहऱ्यावरूनही लक्षात येत असे.

केवळ गायकाच्या गळ्यातील स्वरावली हुबेहूब वाजवणे, म्हणजे संगत नव्हे. त्या कलावंताच्या संगीताचे चालचलन लक्षात घेत, त्याला आपल्या वादनातून पुरेपूर विश्वास देण्याचे काम संगतकार करत असतो. गोविंदरावांची साथसंगत हा त्यासाठी एक वस्तुपाठच ठरला. मैफलीत रसिकांच्या बरोबरीने कलावंताकडूनही उत्स्फूर्त दाद मिळवणाऱ्या या कलावंताने एकेकाळी वळचणीला असलेल्या हार्मोनिअमला प्रतिष्ठा मिळवून दिली. या वाद्याचे भारतीयीकरण करत येथील परंपरागत संगीताच्या विकासात मोलाचे साह्य करत गोविंदराव पटवर्धनांनी संगीताची जी सेवा केली, ती केवळ अभिनंदनीय आणि कौतुकास्पद नाही, तर स्वरांचे ऋण व्यक्त करणारी होती. एकलव्य पद्धतीने स्वत:च वाद्याची ओळख करून घेत, त्याला आपलंसं करत, त्यावर स्वार होण्यासाठी त्यांनी घेतलेले अफाट कष्ट पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावेत. घरात संगीताचा वारसा असला, तरी तो जपताना, त्यात स्वप्रतिभेने भर घालता येण्याची समज त्यांच्यामध्ये होती, म्हणूनच संगतकार म्हणून ते प्रत्येक कलावंताला हवेसे वाटत. हार्मोनिअम या वाद्याचाच अलंकार झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची ही ओळखीची खूणगाठ जपून ठेवणं फारच आवश्यक.

mukundsangoram@gmail. com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth centenary of harmonium player govindrao patwardhan amy