अॅड. हर्षल प्रधान,प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपची आजची अवस्था वरिष्ठांकडील घरगड्यांच्या गर्दीत सामील होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या हरकाम्यांची फळी अशी झाली आहे. ज्या भाजपने महाराष्ट्रात प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे – नितीन गडकरी – प्रकाश जावडेकर यांच्यासारखे असंख्य कर्तृत्ववान कार्यकर्ते देशाला दिले त्या भाजपमध्ये आता फक्त मोदी- शहा यांच्या नजरेत उठून दिसण्यासाठी, त्यांनी सांगितलेली कामे घरगड्यांसारखी करण्यासाठी उतावीळ झालेले हुजरे दिसून येतात. म्हणूनच अक्राळविक्राळ बहुमत मिळवल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांना वाकुल्या दाखवण्यात मग्न आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की भाजपच्या सध्याच्या ‘आकां’ना खूश करण्याचा सोप्पा मार्गच जणू या गर्दीत सामील होणाऱ्या भाजपाईंनी शोधून काढला आहे. भाजपच्या चाणाक्षांनी त्यांच्या पक्षत होत असलेल्या या अध:पतनाकडे दुर्लक्ष केल्यास एखाददिवशी हे जहाज बुडणार एवढे निश्चित!

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी दुरावा का केला, त्यांनी भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत घरोबा कसा केला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रावर आलेल्या संकटांना ते कसे सामोरे गेले आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून कसे नावाजले गेले हा इतिहास सर्वश्रुत आहे. त्याची भाजपला इतकी पोटदुखी आहे की आज अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडून त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ईडी, सीबीआय आणि आयटीची धमकी देऊन कसे भाजपच्या गोटात किंवा महायुतीत सामील करून घेतले गेले हा इतिहासही बहुश्रुत असताना आणि त्या जोरावर सत्ता मिळत नाही हे आकलन झाल्यावर राज्याच्या तिजोरीची विल्हेवाट लावून जनतेला विशेषत: बहीण-भावांना खोट्या आमिषांत गुंगवून विधानसभा निवडणुकीत राक्षसी बहुमताने सत्ता काबीज केल्यानंतरही ते अद्याप उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता रोखू शकलेले नाहीत. त्यातूनच त्यांना विनाकारण बदनाम करण्याची गोबेल्स नीती फुटकळांकडून वदवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपला करावा लागतो हे त्यांच्या अधोगतीचे लक्षण आहे.

भाजपच्या दगाबाजीची लक्तरे

२३ जानेवारी २०२५ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील अंधेरी येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपने देशाच्या इतिहासात कशी कशी आणि कुठे कुठे दगाबाजी केली याचे दाखले दिले होते. थेट श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून ते अमित शहा यांच्यापर्यंत भाजपने केवळ सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच सहकाऱ्यांना कसे बाजूला सारले याचा आढावा त्यांनी घेतला होता. स्वातंत्र्यलढ्याशी काडीचा संबंध नसलेल्यांच्या हातात आपला स्वतंत्र देश गेला अशी बोचरी टीका त्यांनी केली. भाजपचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे कसे स्वातंत्र्याच्या विरोधात होते याचे दाखले त्यांनी दिले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे कसे अलिप्त होते आणि पाठोपाठ जयप्रकाश नारायण यांच्या सोबत गेलेला जनसंघ कसा त्यांच्यापासून स्वार्थासाठी विभक्त झाला याचाही पाढा त्यांनी वाचला. शरद पवार यांच्या पुलोदमध्ये हशू अडवाणी सामील झाले आणि देशाच्या राजकारणात भाजपने कसे ममता, समता, जयललिता, मायावती, मेहबूबा मुफ्ती अशा अनेक लाडक्या बहिणींना केवळ स्वत:च्या सत्तालोलुप स्वार्थासाठी सोबत घेतले आणि नंतर बाजूला सारले याची उदाहरणे दिली. भाजपच्या अमित शहा यांना त्यांनी अब्दालीची उपमा दिली आणि महाराष्ट्र या महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘‘मध्यंतरी इथे अब्दाली येऊन गेले आणि त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवेल. अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे तुम्हाला भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादाला लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवलं, तिथे अमित शहा किस झाड की पत्ती है?… अमित शहा तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही, शिवसेनाप्रमुखांनी दिलेले हे शिवसैनिक ही माझी खरी श्रीमंती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही, गद्दारांना गाडूनच उद्धव ठाकरे संपेल.’’ अशा शब्दांत त्यांनी अमित शहा यांचा समाचार घेतला. भाजपच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांची ही सत्य परिस्थितीचा आरसा दाखवणारी टीका झोंबणे साहजिकच होते. पण त्याबाबत इतिहासातले दाखले खोडून काढण्याचा प्रयत्न करणे तर दूरच भाजपाई ‘ध चा मा’ करून आपले हसू करून घेऊ लागल्याचे चित्र दिसले. म्हणून भाजपमध्ये आता निष्णात चाणाक्ष शिलकीत राहिले नसून घरगड्यांच्या- हरकाम्यांच्या गर्दीत सामील होण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे जाणवले.

उद्धव ठाकरे यांनी सांभाळले

उद्धव ठाकरे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवला. केवळ सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी बंड केले नव्हते तर राज्याचा आणि मराठी मातीचा, हिंदू अस्मितेचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली होती. त्या अडीच वर्षांच्या कालावधीत भाजपचे वरिष्ठ सत्तेशिवाय अगदी वेडेपिसे झाले होते. उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. आदित्य ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. करोनाच्या जागतिक संकटातही त्यांनी महाराष्ट्राला कोणतीही मदत केली नाही उलट अडथळे आणले, मात्र त्या अस्मानी आणि भाजपच्या सुलतानी संकटाशी उद्धव ठाकरे एकाकी लढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून कोविड उपाययोजनांचे २९ विविध मॉडेल्स तयार केले गेले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून जम्बो कोविड केंद्रांची उभारणी झाली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत मुंबई महानगरपालिका पोहोचली. रुग्णाला थेट कोविड अहवाल न देता प्रभाग कार्यालयामार्फत हा अहवाल देणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर म्हणून नावाजले गेले. सुमारे पावणेअकरा लाख कोविड अहवाल दिले. धारावी पॅटर्न, रुग्णवाहिका, १४४ खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या डॅशबोर्डवर आणणे, ऑक्सिजन सुविधा, लसीकरणावर भर आदी स्वरूपाची असंख्य कामे या काळात झाली, त्यासह मिशन झिरो, कोविड चाचण्या असे विविध मॉडेल्स तयार केले गेले. कोविड-१९ विषाणूच्या संसर्ग कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या. त्या उपाययोजना ‘मुंबई मॉडेल’च्या रूपाने देशातच नव्हे, तर जगभरात नावाजल्या गेल्या. उद्धव ठाकरेंच्या प्रशासकीय नेतृत्वामुळे, मुंबईसारख्या दाट घनता असलेल्या लोकसंख्येच्या महानगरात कोविड-१९ संसर्ग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले. याच काळात उत्तर प्रदेशात प्रेते गंगेत वाहून दिली जात असल्याची छायाचित्रे समोर आली होती. उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वोच्च असा उत्कृष्ट मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळवून दाखवला. महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली. याउलट आज केवळ सत्तेसाठी आम्ही आणि संघर्षासाठी तुम्ही अशीच भाजपची भूमिका राहिली आहे. त्यामुळे संघाच्या आणि एकेकाळच्या भाजपच्या ‘राष्ट्र प्रथम’ या विचारसरणीला मूठमाती देणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार गमावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या वारसदाराला भाजपच्या खोटे मुखवटे घालून वावरणाऱ्यांनी हिंदुत्व आणि सत्ताकारण शिकवण्याची आवश्यकता नाही. जनताजनार्दन भाजपची वाटचाल अनुभवते आहे. आधीच देशाची आणि राज्याची आर्थिक परिस्थिती भाजपने हलव्यासारखी केली आहे.

देश, राज्य आर्थिक संकटात

आज देशावरील आर्थिक बोजा असहनीय झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भारतावर बाह्य कर्ज ६४८.२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. सप्टेंबर २०२३ च्या तुलनेत हे कर्ज १०.९ अब्ज डॉलरने वाढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की, जर सरकारने कर्ज घेणे सुरू ठेवले तर देशावर ‘जीडीपी’च्या १०० टक्के कर्ज होऊ शकते. भारतावर असणाऱ्या कर्जात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये भारताची एकूण कर्जे २०३७.४१० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. याउलट २०१४ मध्ये केंद्र सरकारचे एकूण कर्ज ५५ लाख कोटी रुपये होते. त्यानुसार पाहिल्यास भारत सरकारचे कर्ज गेल्या नऊ वर्षांत १९२ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये देशी आणि विदेशी कर्जाचा समावेश आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीही नाजूकच आहे. ‘अर्थ’ही नाही आणि ‘संकल्प’ही असे चित्र आहे. राज्य सरकारने २०२३-२४ मध्ये अभूतपूर्व ८२०४३ कोटी रु.कर्ज घेतले आणि त्याचा कर्जाचा बोजा ७.११ लाख कोटी रु.वर नेला आहे.

अशा स्थितीत भाजपने आपल्या शिलेदारांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी सोडण्यापेक्षा राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन ती सुधारण्याच्या उपाययोजनांचा अभ्यास करावा. अन्यथा एक दिवस भविष्यात भाजपचे हे पोकळ हवेने फुगलेले जहाज बुडणार, एवढे निश्चित.