संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजकारणातील घराणेशाहीवर आपल्याकडे सातत्याने चर्चा होत असते. खरेतर घराणेशाही हे सरंजामशाहीचेच अपत्य. आपण स्वीकारलेली राज्यव्यवस्थेची चौकट आधुनिक असली, तरी तिचा आत्मा अजूनही सरंजामशाहीकडे झुकणारा आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षाच्या ‘लोकशाही’ चौकटीतदेखील नेत्याच्या मुला-नातवंडांनाच निवडणुकीची तिकिटे आणि अधिकाराच्या जागा मिळत जातात. इतर पक्षांमधील या घराणेशाहीवर टीका करत, आम्ही ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत असे सांगत २०१४ साली भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतरही भाजप नेते इतर पक्षांमधील घराणेशाहीवर टीका करत असले तरी प्रत्यक्ष भाजपमधील चित्रही यापेक्षा वेगळे नाही.

अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपमध्येही घराणेशाही दिसते. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातही घराणेशाहीची लव्हाळे वाचली आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांना घराणेशाहीचा नियम बहुधा लागू नसावा कारण त्यांचे पुत्रच आमदार आहेत. घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठविणारे पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांच्या सासूबाई जयश्री बॅनर्जी यांनी मध्य प्रदेशात भाजप सरकारमध्ये मंत्रीपद तसेच लोकसभेची खासदारकीही भूषविली होती.

घराणेशाहीवरून काँग्रेसला नेहमीच डिवचले जाते. शिवसेना, तेलुगू देशम, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आदी प्रादेशिक पक्ष हे घराणेशाहीसाठीच प्रसिद्ध आहेत. प्रादेशिक नेत्यांकडून मुलांनाच राजकीय वारस म्हणून पुढे आणले जाते. डाव्या पक्षाचाही अपवाद करता येणार नाही. कारण केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्या जावयाचा पहिल्यांदा विधानसभेवर निवडून येऊनही थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. भाजपमध्ये घराणेशाही नाही असा दावा मोदींपासून सारे नेते करतात. पण भाजपमध्येही नेतेमंडळींच्या दुसऱ्या पिढीला पुढे आणले जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षात निवडून येण्याची क्षमता या एका मुद्दय़ावर उमेदवारी देताना विचार होतो. हाच न्याय भाजपमध्ये लावला जात असावा. म्हणूनच पक्षनेतृत्वाने नाके मुरडली तरी ठिकठिकाणी नेतेमंडळींच्या मुलांचा खासदारकी व आमदारीसाठी विचार केला गेला असावा. अलीकडेच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाहीचा भरणा होता.

भाजपमधील घराणेशाहीची सुरुवात अगदी राजधानी दिल्लीपासूनच होते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पीयूष गोयल, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे आदी मंत्र्यांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे. भाजपचे माजी अध्यक्ष व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र उत्तर प्रदेशात आमदार आहेत. पक्षाच्या खासदारांच्या यादीवर नजर टाकल्यास घराणेशाहीचा अंदाज येतो.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांचे पुत्र, प्रमोद महाजन यांची कन्या, गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्या, ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे पुत्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे भाचे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे पुत्र, माजी केंद्रीय मंत्री सी. पी. ठाकूर यांचे पुत्र ही बोलकी उदाहरणे. या व अन्य नेत्यांच्या मुलांनी खासदारकी-आमदारकी भूषविली आहे. या नेतेमंडळींच्या दबावामुळेच मुलांना उमेदवारी मिळाली असणार हे निश्चितच. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे एक पुत्र खासदार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले दुसरे पुत्र आपल्या जागी विधानसभेची निवडणूक लढविणार हे येडियुरप्पा यांनी जाहीर केले. मोदी आणि नड्डा हे भाजपमध्ये घराणेशाहीला वाव नाही, असे जाहीरपणे सांगतात, पण त्याच वेळी येडियुरप्पा यांच्यासारखे नेते आपला मुलगा उमेदवार असेल, असे जाहीरपणे वक्तव्य करतात. भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेत ४००च्या आसपास खासदार आहेत. यापैकी ४५ खासदारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये घराणेशाहीने कळसच गाठला आहे. राज्यातील भाजपच्या २३ खासदारांपैकी आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे-पाटील, हिना गावित हे सारे घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत.

भाजपच्या १०६ आमदारांपैकी जवळपास २५ आमदारांची घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे पुत्र, माजी मंत्री दत्ता राणे यांचे पुत्र, दत्ता मेघे यांचे पुत्र यांचा समावेश आहे. राज्य भाजपमधील ट्रबल शूटर गिरीश महाजन यांची पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा होत्या. आमदारकी आणि नगराध्यक्षपद हे दोन्ही घरात राहील याची खबरदारी महाजन यांनी घेतली होती. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांचे सारे कुटुंबीय विविध पदांवर कार्यरत होते. खडसे पुत्राला आमदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. पत्नी दूध महासंघाच्या अध्यक्षा होत्या. खडसे यांचे सर्व चोचले भाजपने पूर्ण केले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार आहेत व त्यांना मंत्रिपद मिळावे, असा दानवे यांचा प्रयत्न आहे. पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची एक कन्या पंकजा या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी होत्या. दुसरी कन्या प्रीतम या बीडच्या खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही आपल्याला विधान परिषदेची आमदारकी मिळावी हा पंकजा यांचा आग्रह कायम असतो. प्रमोद महाजन यांची कन्या पूनम या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर व डॉ. दौलत आहेर यांची मुले आमदार आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी तर त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रनराजे भोसले यांना आमदारकी भाजपने दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासू आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. पण फडणवीस यांनाही घराणेशाहीची किनार आहे. वडील गंगाधरपंत फडणवीस हे आमदार होते तर काकी शोभाताई फडणवीस या मंत्री होत्या. वडिलांच्या पार्श्वभूमीमुळे फडणवीस यांना अत्यंत लहान वयात पक्षात महत्त्व मिळत गेले. अवघ्या तिशीत त्यांना नागपूरच्या महापौरपदावर संधी मिळाली. अनेक ज्येष्ठ सदस्य असताना फडणवीस यांना लहान वयात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली होती. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेसुद्धा घराणेशाहीतून पुढे आलेले नेते. त्यांचे वडील एस. आर. बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू यांचे वडीलही मुख्यमंत्री होते. म्हणजेच कर्नाटक व अरुणाचल प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री हे घराणेशाहीतूनच पुढे आलेले. केंद्रातील शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या वडिलांनी वाजपेयी सरकारमध्ये काम केले होते.

भाजपला घराणेशाहीचे वावडे असल्याचे सांगितले जात असले तरी लोकसभा, विधानसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत नेतेमंडळींची मुले, मुली, पत्नी, जावई, सुना यांचाच विचार केला जातो. काँग्रेसला घराणेशाहीवरून डिवचणाऱ्या भाजपलाही सत्तेसाठी संख्याबळ जमविण्याकरिता घराणेशाहीचाच आधार घ्यावा लागतो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेच चित्र आहे.

santosh.pradhan@expressindia.com