पंकजा गोपीनाथ मुंडे हे नाव राज्याच्या व विशेषत: भाजपच्या राजकारणात कायमच चर्चेत असते. त्यांच्या विधानांवरून नेहमी वाद होतात. पक्षात डावलले गेल्याची भावना त्यांच्या मनात असते. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या अशा मुद्द्यांवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी मुक्तपणे संवाद साधला. त्याचा सारांश : मी निर्भीड आहे, माझ्या हावभावांमुळे मी आक्रमक वाटते. त्यामुळे ‘अँग्री यंग वुमन’ अशी प्रसारमाध्यमांत माझी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. २००९ मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने माझा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला, तेव्हा माझ्या बाबांना फार आनंद झाला होता. ते माझ्या आईला म्हणाले होते ‘बघ आपली पंकजा मोदींची स्टार प्रचारक आहे’. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली आणि माझा मंत्रिमंडळात समावेश होऊन ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली. मी मुंबईत लहानाची मोठी झालेली असल्यामुळे या खात्याला मी कसा न्याय देऊ शकेन, असे मला वाटत होते. पण मी झोकून देऊन काम केले. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण खात्याचीही जबाबदारी माझ्याकडे दिली. त्याआधी मी एका स्वयंसेवी संस्थेमार्फत बीड परिसरात जलसंधारणाचे मोठे काम (वैद्यानाथ पॅटर्न) केले होते, त्याचीच परिणती पुढे जलयुक्त शिवार योजनेत झाली. यानंतर माझ्याबद्दल नाहक वाद निर्माण केले गेले. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे विधान मी कधीही केले नव्हते. मराठवाड्यातील एका कार्यक्रमात माझ्या अगोदर दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव बोलले, ‘तुमच्या रूपाने बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा. तुम्ही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहात, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’. हे त्यांचे विधान होते. पण ते जणू मीच बोलले आहे असे चित्र माध्यमांनी रंगविले. अगदी अलीकडे आणखी एका वाक्यावरून मला लक्ष्य केले गेले. ‘मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यातून एक पक्ष तयार झाला असता’, असे विधान बाबांच्या एका जुन्या सहकाऱ्याने केले होते. मी त्यावर म्हणाले, खरे आहे, एक पक्ष तयार झाला आहे आणि तो पक्ष भाजप आहे. या विधानाला उलट प्रसिद्धी देऊन मी वेगळा पक्ष काढणार वगैरे चर्चा माध्यमांमधूनच सुरू झाली. मी बंडखोर आहे, असे चित्र रंगवले गेले. या अनुभवांपासून धडा घेऊन मी आता खुलून, मोकळेपणाने बोलत नाही.

वारसा चालविण्याचे आव्हान

स्वत:ला सतत चर्चेत ठेवण्यासाठी मी वादग्रस्त विधाने केली, असे सांगितले जाते. पण, मला चर्चेत राहण्याची गरज काय? मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात मी वाढले आहे. त्यामुळे प्रसिद्धी माझ्यासाठी नवी नाही. मी असायला पाहिजे तितकी महत्त्वाकांक्षीही नाही, त्यामुळे अतिमहत्त्वाकांक्षी असण्याचाही प्रश्नच नाही. गोपीनाथ मुंडे यांचे काम प्रचंड आहे, तेवढेच काम उभे करणे हेच माझ्या समोरील आव्हान आहे. माझा स्वभाव शांत आहे, पण वडिलांचा पुढे नेण्यासाठी मी स्वत:ला बदलले आहे.

सत्तेचा वापर विचार रुजविण्यासाठी

राजकारण आपल्याभोवती फिरले पाहिजे, असे संस्कार आमच्यावर कधीच झाले नाहीत. भाजप परिवारातील शिस्त आम्हाला लहानपणापासून माहीत आहे आणि आम्ही ती शिस्त पाळतो. शेठजी-भटजींचा पक्ष, अशी ओळख असलेल्या पक्षाला बहुजन चेहरा देण्यासाठी मुंडेंनी काम केले. नेता महत्त्वाकांक्षी असलाच पाहिजे. पण माझी महत्त्वाकांक्षा खुर्चीसाठी नव्हती. सत्तेसाठी काहीही, असे व्हायला नको. सत्ता आली तरच आपल्या विचाराने कारभार करता येतो. मी लहान असताना पहिल्यांदा पक्ष वाढविणे हे ध्येय होते. त्यानंतर सत्ता मिळविणे हे ध्येय होते. आता सत्ता हे आमचे विचार रुजविण्यासाठी किंवा त्यानुरूप विकास करण्याचे माध्यम आहे.

पक्षासाठी फायद्याचेच

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. पण मी खचले नाही. काम करीत राहिले. तरीही मी संपले, मला पक्षात कोणी विचारत नाही, अशी चर्चा सुरू झाली. पण मला लोकांचे प्रेम पूर्वीसारखेच मिळत होते. मी पक्षात सक्रिय होते. मी राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत काम करण्याची इच्छा पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केली. माझी विनंती पक्षाने लगेचच मान्य झाली. पक्षात मला कोणी विचारत नसते तर तसे झाले असते का? मध्य प्रदेशची संघटनात्मक जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. दिल्लीत काम करायला आवडेल की मुंबईत असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. मला मुंबईत काम करायला आवडते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले होते. विशेषत: मराठवाड्यात ते जाणवत होते. या पार्श्वभूमीवर बीडमधून मी लोकसभा लढवावी, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. वास्तविक माझी बहीण प्रीतम ही तेव्हा खासदार होती. पण पक्षाच्या आदेशानुसार मी तयारी केली. बीडमध्ये गावागावांमध्ये जातीय विभागणी झाली होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मला फटका बसला. माझा निसटता पराभव झाला. पण माझ्या उमेदवारीचा भाजपला राज्यात सर्वत्र फायदा झाला. भाजपच्या उमेदवारांना माझ्यामुळे सर्व ठिकाणी ५ ते १० हजार मते अधिक मिळाली.

खाते लहान, पण… अवमूल्यन नाही

लोकसभेतील पराभवानंतर पक्षाने मला विधान परिषदेवर संधी दिली. महायुती सरकारमध्ये माझा समावेश करण्यात आला. पर्यावरण आणि हवामान बदल विभाग हे माझे अवमूल्यन असे म्हटले गेले. पण मला तसे वाटत नाही. इथे काम करायला वाव आहे. लहान विभाग मिळाला म्हणून नेता संपला असे नसते. मी आमदार नव्हते, मंत्री नव्हते तरी मी संपले नाही. मग आता कशी काय संपेन ? मंत्री होईपर्यंत मंत्रालयात न जाण्याचा माझा पण होता. तो मी पाळला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मी भेटल्याच्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. पण मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही.

नदीची मालकी ठरवावी

मुंबईइतके प्रदूषित दुसरे शहर नाही. किनारी रस्त्याचे काम चालू असल्याने मध्यंतरी मुंबईची हवा बिघडली होती. हवा प्रदूषित होऊ नये म्हणून उद्याोगांवर कठोर कारवाई करता येत नाही. शेवटी रोजगारही महत्त्वाचा असतो. पर्यावरण संरक्षणासाठी नवे कायदे आणले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी मात करता येईल. पर्यावरणाचे नियम काटेकोर पाळणाऱ्या उद्याोगांना परतावा दिला पाहिजे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला मी पत्र लिहिणार आहे. नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्यात अडचण अशी की, नदीची मालकी केंद्राची की राज्याची असे ठरवता येत नाही. यासंदर्भात जबाबदारी निश्चित केली तर नदी प्रदूषणासंदर्भात प्रगती होईल. नदीजोड प्रकल्प राज्यासाठी लाभाचा असला तरी पर्यावरणासाठी हानीकारक आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यासंदर्भातली कल्पना मांडून कितीतरी वर्षे लोटली, पण तो साकार झाला नाही. नदीजोड प्रकल्पासाठी महाराष्ट्राची भौगोलिक रचना पूरक नाही. नदीसुधार प्रकल्प करताना नदीच्या परिसंस्थेला धक्का पोचता कामा नये. मी विज्ञानाची विद्यार्थी आहे. प्रकल्पांकडे वैज्ञानिकदृष्ट्या बघायची मला सवय आहे. ग्रामविकास विभागाचे काम करताना मी बऱ्याच नव्या गोष्टी केल्या.

पीओपी मूर्तींवर बंदीच

गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोलचा भरमसाट वापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने ‘पीओपी’ मूर्तीवर बंदी घातली आहे. ‘पीओपी’ ही माती आहे या मूर्तिकारांच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही. खरे तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम सर्वत्र राबवायला हवी. पण, आपल्याकडे कशाचेही राजकारण होते. गणेशोत्सव आनंददायी आहे, पण तो जबाबदारीने साजरा करायला हवा.

शरद पवारांना विरोध नाही

भाजपचा शरद पवारांना कधीही विरोध नव्हता, मात्र त्यांच्या विचारांना किंवा ते ज्या पक्षात होते, त्या पक्षाच्या विचारांना विरोध होता आणि आहे. आता अजित पवार आमच्या महाविकास आघाडीत आले आहेत. शिंदे, पवार सोबत आल्यामुळे एक चांगली रेसिपी तयार झाली आहे. त्यानंतर विधानसभेला चांगला निकाल लागला. सत्ता आल्यानंतर आम्हाला आमच्या विचाराने राज्य कारभार करता येईल. भाजपमध्ये सध्या येत असलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांबाबत आत्ताच बोलणे चुकीचे ठरेल. कारण अन्य राजकीय पक्षांतील नेत्यांच्या समावेशामुळे भाजप मजबूत झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात राजकीय नेत्यांमध्ये मतभेद होते, पण शत्रुत्व नव्हते. वैयक्तिक मैत्री होती. विलासराव देशमुख- गोपीनाथ मुंडे यांची मैत्री होती. पण, ती वैयक्तिक होती. ती पक्षहिताच्या आड आली नाही. दोघेही आपआपल्या पक्षाशी प्रामाणिक होते. शरद पवार – गोपीनाथ मुंडे याचा संघर्ष राज्याने पाहिला. पण सूडभावनेने राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. मुंडे बहुजन समाजाचे नेते होते. ओबीसी समाजाचे नेतृत्व असा माझा उल्लेख केला जातो. मला ओबीसी नेतृत्वाच्या पुढे जाऊन सर्व समाजाचे नेतृत्व करायचे आहे. वंजारी – मराठा किंवा ओबीसी – मराठा, हा वाद मिटविण्यासाठी किंवा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. फक्त आमचे हे प्रयत्न कुणी हाणून पाडू नयेत, इतकीच अपेक्षा आहे.

तरुणांना कुणाचा धाक राहिला नाही

आजच्या तरुणांना कुणाचा धाक राहिला नाही. त्यांना वडीलधाऱ्यांचा धाक असला पाहिजे. तरुणांवर सरकारचा धाक पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जे झाले ते योग्य नाही. असा प्रकार कुणाच्याच मुलीबाबत होता कामा नये.

सत्ता कार्यकर्त्यांना माजवते

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोण – कोण आरोपी आहेत, हे न्यायालयातील सुनावणीतून समोर येईल. ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या आहे. एका माणसाचा जीव जातो, त्याबाबत वातावरण निर्मिती करण्यात येते. एका समाजाला, जातीला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. यामुळे सगळा समाज सुन्न झाला आहे. हे बीडमध्येच होते, असे नाही, सर्व राज्यांत हा प्रकार सुरू आहे. संतोष देशमुख माझा बुथ प्रमुख होता, कार्यकर्ता होता, त्यामुळे मलाही दुख वाटतं. सत्तेमुळे अहंकार निर्माण होतो. सत्ता असताना कार्यकर्त्यांना सांभाळणे अवघड असते. मी सत्तेवर आहे, जे करायचे ते करा, असे राजकीय नेत्यांकडून सांगितले जाते. हे चुकीचे आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे दोन समाजांत, जातींमध्ये, गावागावांत तेढ निर्माण झाली आहे. बीडचे नाव गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले होते, आता बीडचे नाव वाईट अर्थाने घेतले जात आहे. वंजारी समाजाच्या मुलांना वसतिगृहे, शाळांमध्ये वाईट वागणूक दिली जात आहे. बीडमध्ये सामाजिक ऐक्याला तडा गेला आहे. लोकांच्या आक्रमक भाषणांमुळे समाजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. वंजारी समाजाला लक्ष्य केले जात आहे, हे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये माझा सहा हजार मतांनी पराभव झाला. मी निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हते. मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष तीव्र झाला असतानाच्या अत्यंत अडचणीच्या काळात मी लोकसभा लढविली, त्याचा फटका मला बसला. परिस्थिती माझ्या विरोधात होती, त्यामुळे पराभव मी स्वीकारला. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली आहे.

(संकलन : दत्ता जाधव, अशोक अडसूळ)

Story img Loader