रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा हिंदुराष्ट्राची पायाभरणी करणारी ठरेल, असे ज्यांना वाटत होते, त्यांचे स्वप्न या लोकसभा निवडणुकीत फोल ठरले. देशातील कोट्यवधी सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून कृतक गोष्टींना प्रश्न म्हणून पेश करण्याचे राजकारण या निवडणुकीने धुळीला मिळवले. आता त्याची परिणती ‘हिंदूच हिंदूचे खरे शत्रू’ अशी होत असल्यामुळे गाफील राहून चालणार नाही…

नुकत्याच झालेल्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘चारसौ पार’चा पार निकाल लागला. उत्तर प्रदेशात, विशेषत: अयोध्येत भाजपचा झालेला पराभव मोदी समर्थकांच्या पार जिव्हारी लागला आहे, ह्यात आश्चर्य नाही. अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा ही हिंदुराष्ट्रनिर्मितीची आधारशिला बनेल अशी अपेक्षा करणाऱ्यांना आपले हाताशी आलेले स्वप्न उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटल्यास आश्चर्य ते काय? त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांपैकी एक मला प्रातिनिधिक वाटते. अनेक हिंदुत्वप्रेमी म्हणाले, ‘हिंदूंचे खरे शत्रू हिंदूच!’

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हे उद्गार ऐकल्यावर मला सर्वप्रथम आठवले राम मनोहर लोहिया. देशात काँग्रेसविरोधाचा पाया रचणारा हा राजकारणी संघ-भाजपला प्रिय वाटतो, यात शंका नाही. आजही भाजपचे समर्थन करण्यासाठी नितीशकुमारसारख्यांना लोहियांचा दाखला द्यावा लागतो, यातच सारे आले. याच लोहियांचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे, ‘हिंदू विरुद्ध हिंदू’. लोहिया १९५० मध्ये म्हणाले होते की भारताच्या इतिहासातील सर्वात प्राचीन व अद्याप अनिर्णित राहिलेली लढाई ही (उदारमतवादी) हिंदू विरुद्ध (पुराणपंथी) हिंदू ही आहे.

हेही वाचा >>> मराठी लघुपटांच्या वाढत्या दर्जाला राज्य शासनाचीही दाद हवी!

यासंदर्भात त्यांनी मांडलेली तीन निरीक्षणे खूप मोलाची आहेत. एक, जेव्हा या लढ्यात उदारमतवादी हिंदूंचा विजय होतो, तेव्हा समाजाची एकता दृढ होते, आणि समाजाची सर्वांगीण प्रगती होते. याउलट कट्टरपंथीय हिंदू समाजावर वर्चस्व गाजवतात, तेव्हा नव्या विचारांचा गर्भपात करण्यात येतो, समाजांतर्गत भेद रुंदावतात, आणि समाजाची पीछेहाट होते. जातिव्यवस्था, स्त्री-पुरुषसंबंध, वर्गसंबंध व परधर्मसहिष्णुता या चार मूलभूत निकषांवर हे बदल तपासून पाहता येतात, कारण त्यांबद्दलचे उदारमतवादी व कट्टर हिंदू यांचे दृष्टिकोन परस्परविरोधी आहेत. दोन, जेव्हा उदारमतवाद वरचढ ठरतो, तेव्हा संधी असूनही तो जीर्ण विचारांचा निर्णायक पाडाव करत नाही. कारण इतिहासाच्या त्या पर्वात कट्टरपंथी हिंदू स्वत: उदारमतवादी असल्याचे भासवतात. योग्य वेळ आल्यावर ते सर्व प्रकारची साधने वापरून सत्तेवर येताच खुल्या विचारांची पूर्ण मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतात. पण मुळात मोकळ्याढाकळ्या हिंदू धर्माला बंदिस्तपणा सोसत नाही आणि समाजाची त्यामुळे परागती होऊ लागल्यावर प्रागतिक विचार पुन्हा वर उसळतो. मात्र जुनाट विचारांचा पूर्ण पाडाव न केल्यामुळे समाजाला वारंवार या चक्रातून जावे लागते. तीन, हिंदू विरुद्ध मुसलमान हा भारतातील मूलभूत संघर्ष कधीच नव्हता. हिंदूंमधील दबलेले समाजगट उचल खाण्याचा धोका समोर दिसू लागला, की त्याचे बुजगावणे उभे केले जाते.

हेही वाचा >>> शेतकरी हितात मोदींचे आणि देशाचे हित

वरकरणी असे दिसते की हिंदुत्वाचे मुख्य शत्रू मुसलमान, कम्युनिस्ट, धर्मनिरपेक्ष, नास्तिक हे आहेत. पण हे चित्र अतिशय फसवे आहे. उद्या सारे मुसलमान पाकिस्तानात गेले (त्यांना तिथे जाण्याचे/धाडण्याचे अजिबात कारण नाही) तर त्यांच्या शत्रुलक्ष्यी राजकारणाचा आधारच संपून जाईल व ते त्यांना अजिबात परवडणार नाही. तसेही भारतातील ओवैसींसारखे त्यांचे वैचारिक सहोदर, पाकिस्तानातील राज्यकर्ता वर्ग आणि पेट्रोडॉलर्सने संपन्न अरब देश यांच्याशी त्यांचे अजिबात वाकडे नाही. भारतातील समाजवादी-कम्युनिस्ट-नास्तिक हे संख्येने अल्प असल्यामुळे हिंदुत्वाच्या रणगाड्याला त्यांची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. येथील हिंदू हजारो वर्षांच्या निद्रेनंतर आता जागा झाला असेल, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष व सर्वात मोठी अ-राजकीय (?) संघटना त्याच्या दिमतीला असेल, तर हिंदुत्ववादी सातत्याने चिंताक्रांत का असतात?

अस्वस्थतेमागील मर्म

अवघड प्रश्न विचारणारा एखादा पत्रकार, त्यांनी ‘पप्पू’ ठरवलेला राजकीय नेता, इतकेच काय एखादा स्टँडअप कॉमेडियन, व्यंगचित्रकार यांची त्यांना भीती का वाटते? कारण त्यांना खरी भीती आहे ती येथील हिंदूंमध्ये दडलेल्या आणि वेळोवेळी उचल खाणाऱ्या उदारमतवादी डीएनएची. यांच्यापैकी कोणाच्याही कृतीने हिंदूंमधील ते जीन्स सक्रिय झाले तर आपला निभाव लागणार नाही, याची त्यांना खात्री आहे. म्हणून वरकरणी काहीही म्हटले तरी त्यांच्या दृष्टीने निर्णायक राजकीय लढाई त्यांचे ‘हिंदुत्व’ विरुद्ध ‘फुरोगामी/लिब्रांडूं’चा ‘पुचाट’ हिंदुधर्म, अशीच असणार आहे, हे त्यांनी मनोमन स्वीकारले आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत अंबानी-अडाणी यांची संपत्ती, शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेली मोदींची प्रतिमा आणि आणि विनाप्रतिकार कोसळलेले भारतीय लोकशाहीचे चारही स्तंभ यांच्या जोरावर हिंदुत्वाचा बुलडोझर जुने सर्व काही उद्ध्वस्त करत गेला. त्यामुळे सर्वसामान्य हिंदूंमधील खुलेपणा, सहिष्णुता यांसारख्या ‘सद्गुुणविकृती’ (हिंदुत्ववाद्यांचा शब्द) नष्ट झाल्या असतील अशी त्यांना आशा होती. मात्र ती फोल ठरल्याचे जाणवल्यामुळे ते आता कमालीचे अस्वस्थ झाले आहेत, ‘अयोध्येला जाऊ नका, गेला तरी तिथे एक पैसाही खर्च करू नका, मरू द्या गद्दारांना उपासमारीने’ अशी आवाहने केली जात आहेत, त्यामागील मर्म हे आहे.

धर्म-संस्कृती व पुरोगाम्यांचे अज्ञान

गंमत म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधकांना हे अद्याप कळलेले नाही. मुळात कोणताही राजकीय लढा हा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक लढा असतो ही हिंदुत्ववाद्यांची मांडणीच त्यांना कळली नाही. म्हणून गेली ९९ वर्षे शालेय शिक्षणापासून वारकरी पंथापर्यंत हिंदुत्वविचाराने केलेली घुसखोरी त्यांच्या ध्यानात आली नाही. महात्मा गांधींच्या हत्येनंतर काय करावे याचा विचार करण्यासाठी गांधींना मानणाऱ्या सर्वांची १२ फेब्रुवारी १९४८ रोजी वर्ध्यात एक बैठक झाली होती. त्यात खुद्द विनोबांनी रा. स्व. संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे आणि तिच्या कृत्यांच्या झळा पवनार आश्रमापर्यंत पोहोचल्या आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी लोहियांनी यापुढील महत्त्वाची लढाई ही हिंदुत्व/कृतक हिंदुधर्म विरुद्ध उदारमतवादी हिंदुधर्म अशी असेल असे सांगितले. ती जिंकण्यासाठी आपण उदारमतवादी हिंदू धर्माला मजबूत केले पाहिजे अशीही भूमिका त्यांनी घेतली. त्यासाठी देशभरात रामायण मेळे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. या मेळ्यांतून हिंदुधर्माची बहुविधता प्रकट व्हावी, त्यात सादर होणाऱ्या रामचरितमानसातून शंबूकहत्या व सीतात्याग वगळावा असेही त्यांनी सांगितले. पण धर्म व संस्कृतीच्या सामाजिक-राजकीय सामर्थ्याची जाणीव नसणाऱ्या पुरोगाम्यांना त्याचा अन्वयार्थ उलगडला नाही. धर्मातील कालबाह्य रूढी-आचार-अंधश्रद्धांऐवजी त्यांनी सरसकट धर्माला विरोध केला आणि सारा सांस्कृतिक पैस हिंदुत्ववाद्यांना बहाल केला.

मूलतत्त्ववादी मुसलमान हे हिंदुत्ववाद्यांचे आदर्श आहेत. या दोघांनाही धर्माच्या गाभ्याशी, त्यात गृहीत असणाऱ्या जीवनमूल्यांशी काही देणेघेणे नाही. त्यांना लोकांना बाह्य आचारात, कर्मकांडात अडकवायचे आहे, परधर्मद्वेषाची आग भडकवत ठेवायची आहे. पाकिस्तानात कट्टरपंथी मुसलमानांनी धर्मशुद्धीच्या नावाखाली हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असणाऱ्या सुफी संतांची स्थाने आधी उद्ध्वस्त केली. भारतात हिंदुत्ववादीही साईबाबा ते शेख चिश्ती या ‘सलोख्याच्या प्रदेशां’वर निशाणा साधत आहेत. ते कधीही कबीर, तुकाराम, नानक, ऐक्य व समतेचा संदेश देणारी समस्त भक्ती परंपरा यांच्याशी नाते सांगत नाहीत. वेद-उपनिषदांसोबत कुराण व बायबलचीही मीमांसा करणाऱ्या विनोबांचे ते नावही घेत नाहीत. अद्वैताचा आत्मा आणि इस्लामचा देह यात भारताची तसबीर पाहणाऱ्या विवेकानंदांनाही ते सोयीपुरते वापरतात. त्यांच्या दृष्टीने नामदेव-ज्ञानदेव-तुकाराम ते थेट गाडगेबाबा-तुकडोजी या संतपरंपरेपेक्षा बागेश्वर धाम सरकार व आसाराम बापू हे ‘आधुनिक संत’ अधिक महत्त्वाचे आहेत.

लोहियांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू विरुद्ध हिंदू हा केवळ धार्मिक संकल्पनांचा लढा नाही. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष भेद ही त्याची दृश्य रूपे आहेत. त्याकडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून हिंदू-मुसलमान हे खोटे द्वंद्व समोर आणण्यात येते. शेतकरी-कष्टकरी यांचे लढे दडपून टाकण्यासाठी, कोट्यवधी बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी, स्त्रिया-दलित-आदिवासी यांना सामाजिक समता नाकारण्यासाठी मंदिर-मशीद, गोमांस, लव्ह जिहाद या कृतक प्रश्नांना केंद्रस्थानी आणणे ही हिंदुत्वाची अपरिहार्यता आहे. निम्म्या भारतातील ‘खऱ्या अर्थाने’ जाग्या झालेल्या हिंदूंनी हे ओळखले आहे. आता लोहियांनी दिलेला इशारा ध्यानी घेऊन खरा हिंदू धर्म वाचवण्यासाठी (उदारमतवादी) हिंदू विरुद्ध (कट्टरपंथी) हिंदू हा लढा पूर्णत्वाला नेणे ही आता त्यांची जबाबदारी आहे.

ravindrarp@gmail.com