– नंदन नांगरे

‘मोदी की सौगात’ या शासकीय कार्यक्रमावर उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. पराकोटीच्या मुस्लीम द्वेषावर आपले राजकारण करणाऱ्या भाजप तसेच संघाच्या तात्विक भूमिकेत बदल होत आहे असे काही स्वप्नात बडबडत आहेत. काहीजण भाजपचे हिंदुत्व मवाळ होत असून भाजपने सर्वधर्मसमभाव व सामाजिक समरसतेची गुढी उभारली आहे आणि हिंदू – मुस्लिम आपसांत मिठाई वाटत वाटत गळाभेट घेत आहेत असे मुंगेरीलाल टाइपचे स्वप्न पाहत आहे. काही राजकीय पक्ष भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे असे तोंडसुख घेत आहेत. काहींना बिहार व उत्तर प्रदेशातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका विचारात घेऊन वक्फ बोर्ड ॲक्ट, हज यात्रा अनुदान बंदी, औरंगजेब कबर इत्यादी अनेक प्रकरणामुळे नाराज झालेल्या मुस्लिमांची काही प्रमाणात सहानुभूती मिळवण्याचा कावा यात दिसत आहे. कमी जास्त प्रमाणात वरील मतमतांतरे बरोबर असतीलही, परंतु वाट्टेल त्या करामती करून असंवेदनशील व असंवैधानिक मार्गाने एकपक्षीय सत्तेची – हुकूमशाहीला शोभणारी- लालसा कायम जिवंत ठेवणे हे भाजप तसेच संघ परिवाराचे प्रमुख उद्दिष्ट आहे हे विसरून चालणार नाही.

धर्मनिरपेक्ष विरोधी पक्ष, अल्पसंख्यांक समाज, आदिवासी आणि आंबेडकरी समाज हे ‘शत प्रतिशत भाजप’ या मार्गातील खरे अडथळे आहेत याची जाणीव मोदी तसेच त्यांच्या समर्थकांना जाणीव आहे. या विरोधी लोकांना गलितगात्र केल्याशिवाय लोकशाहीच्या नावाखाली आपल्या विचाराची एकपक्षीय सत्ता ते आणू शकत नाहीत. या हिंदुत्वाची झूल पांघरलेल्या भाजप व संघीय हिंदू राष्ट्रवादाच्या मर्यादा आहेत. लोकशाही व्यवस्थेतील यंत्रणेचा असंवैधानिक, गैरवापर करून सत्ताधारी राहणे ही भाजपची अगतिकता आहे.

याकरिता भूक, भय, भ्रम आणि भ्रष्टाचार तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था अशा अनेक यंत्रणांचा उपयोग करून विरोधकांना जेरीस आणले जात आहे. भाजपला शरण जाणार नाहीत त्यांना खोटे पुरावे तयार करून किंवा पुराव्याशिवाय तुरुंगात खितपत ठेवले जात आहे. राजकीय पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेऊन पवित्र केले जात आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी केले जात आहेत. प्रशासनातील ढिली नैतिकता आणि संशयास्पद चारित्र्य असलेल्या अधिकारी लोकांना शोधून वेठबिगारासारखा त्यांचा वापर केला जात आहे.

हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हा भ्रम सर्वसामान्यांच्या मनात पक्का केला जात आहे. हिंदुत्वाचा ठेका तर भाजपने घेतला आहे. भाजपला विरोध म्हणजे हिंदुत्वाला विरोध आणि हिंदुत्वाला विरोध म्हणजे राष्ट्रवादाला विरोध. म्हणून जे भाजपला, भाजपच्या धार्मिक हिंदू राष्ट्रवादाला विरोध करतात, त्यांना राष्ट्रद्रोही समजले जाते. त्यांनी पाकिस्तानला जावे असा सल्ला नव्हे आग्रह केला जातो. बुलडोझर चालवून, मॅाब लिंचिंग करून दहशत निर्माण केली जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार नाकारला जातो. विरोधी विचारांना, चुकीच्या सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी म्हटले जाते.

एका बाजूला देशातील ८० टक्के लोक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सरकारच्या दयेवर अवलंबून आहेत आणि दुसरीकडे एक टक्का लोकांकडे देशाची ४० टक्के संपत्ती आहे. ‘हम दो हमारे दो’ करिता आणि मूठभर उद्योगपती व्यापारी, कर्मचारी यांचे करिता आर्थिक धोरणे राबवली जातात, हे उघडे गुपित आहे. गरिबांना आम्ही तुमची भूक भागवतो तुम्ही आम्हाला मतदान करा. आमचे आश्रित व्हा. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोग्य, शिक्षण, बलात्कार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले फालतू प्रश्न विचारू नका आणि विचाराल तर बेदखल तुरुंगात जाल असे देशात सामाजिक राजकीय वातावरण तयार केले जात आहे.

हे भयाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी सत्ता पाहिजे आणि ती लोकांच्या मतांमधून मिळणार आहे. अनुसूचित जाती जमाती आरक्षणाचे वर्गीकरण, घटना बदलाची मानसिकता, आंबेडकरी विचारांची अवहेलना, आदिवासी समाजाचे जल जंगल आणि जमिनीवरून बळजबरी विस्थापन, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, जुनी पेंशन योजना, मागासांसाठी शिष्यवृत्ती इत्यादी अनेक कारणांमुळे नाराज झालेले समाजघटक भाजपपासून दूर जाताना दिसत आहेत. या लोकांचे कमी होणारे मतदान भरून काढण्यासाठी हा नेहमीचा जुमला आहे.

भारतीय माणूस स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपल्या जातीय जाणिवा घेऊनच जातो, जगतो आणि मरतो. धर्मांतरित मुसललमानही त्याला अपवाद नाहीत. मुसलमानामध्ये अश्रफ, अजलाफ आणि मजलूम असे सामाजिक दर्जाचे विभाजन आहे. भारतीय परिस्थितीत अश्रफ म्हणजे उच्चवर्णीय धर्मांतरित हिंदू मुसलमान, अजलाफ हे ओबीसी धर्मांतरित हिंदू मुसलमान. मजलूम हे अस्पृश्य धर्मांतरित हिंदू मुसलमान. उच्चवर्णीय धर्मांतरित हिंदू मुसलमान उच्चवर्णीय हिंदूंशी रोटी बेटी व्यवहार करतात. अडचण आहे ती अजलाफ आणि मजलूम मुसलमानांची. हिंदू जगातील सर्व मुस्लिमांचा द्वेष करीत नाहीत. भारतातील हिंदूही सर्व मुसलमानांचा द्वेष करीत नाहीत. भारतीय हिंदू माणूस पूर्वाश्रमीच्या शूद्र आणि अतिशूद्र हिंदु मुसलमानांचा द्वेष करतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय हिंदू लोक मुसलमानांचा द्वेष ते मुस्लिम आहेत म्हणून करीत नाहीत तर ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आहेत म्हणून करतात हे वास्तव मागास मुस्लिम समाजाने स्वीकारले पाहिजे. हीच अवस्था शीख, बौद्ध, ख्रिश्चन धर्मांतरित अस्पृश्य लोकांची आहे.

आपल्या देशात एखाद्या माणसाने धर्म बदलला म्हणून त्याचा सामाजिक दर्जा बदलत नाही. व्यक्तीचा सामाजिक दर्जा धर्म नाही, तर जात ठरवते. घटनेतील आरक्षणाचा आधार धर्म नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आहे. धर्म कोणताही असो जे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहेत ते आरक्षणास घटनात्मक दृष्ट्या पात्र आहेत. भाजप व संघ परिवाराला मुस्लिमांना सौगात द्यायची असेल तर एकदाच पोट भरेल अशी भिकेच्या स्वरूपातील सौगात न देता पूर्वाश्रमीच्या मागास आणि अस्पृश्य हिंदू परंतु आता मुस्लिमासह इतर धर्मातील लोकांना घटनेने दिलेल्या आरक्षणाची सौगात द्यावी. यातच ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ आहे. यामुळे कदाचित आज धर्माच्या नावाने एकजूट असलेला समाज सवलतीच्या नावाखाली विस्कळीत केल्याचे राजकीय फायदे भाजपला मिळू शकतील. नाही तर, भाजपला सत्ता मिळवून देणारी आणि एकदा सत्ता मिळाली की नव्या जोमाने मुस्लिम द्वेष पसरण्यास मदत करणारी ‘मोदी सौगात’ स्वीकारायची का नाही याचा निर्णय घेण्याइतपत मुस्लिम समाज सुज्ञ आहे.

nandan1020@gmail.com