कॅनडातील ‘गिलर’ पारितोषिक आपल्याकडच्या साहित्य अकादमीच्या समकक्ष! फक्त इंग्रजीमुळे त्याच्या दीर्घ आणि लघुयादीतील पुस्तके जगभरात वाचली जातात. ब्रिटनच्या बुकर पारितोषिकासाठी दरवर्षी त्यांतील एखादे पुस्तक तरी असतेच. गतवर्षी ‘स्टडी फॉर ओबीडियन्स’ ही सेरा बर्नस्टाईन यांची कादंबरी बुकरच्या लघुयादीत होती. तिला तो पुरस्कार मिळाला नसला, तरी कॅनडातील ‘गिलर’ पारितोषिक मात्र मिळाले. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पुरस्काराची टोरण्टोमध्ये घोषणा झाली, तीच प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर. त्याचे पडसाद अगदी काल-परवापर्यंत लेखक-वाचकांच्या नव्या आंदोलनासाठी इंधनपूरक ठरले. बरे हा वाद त्यांच्या देशातील कुठल्याही प्रश्नांवर नाही. तर इस्रायल-हमास युद्धाची त्याला पार्श्वभूमी आहे. स्कॉशिया बँक ही गिलर पुरस्काराला आर्थिक पाठबळ देणारी यंत्रणा इस्रायलच्या युद्धसामग्री बनविणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करीत असल्याचे उघड झाल्यानंतर गेल्या वर्षी या पुरस्कार कार्यक्रमावर कॅनडातील सजग वाचकांचा मोर्चाच निघाला. काही निदर्शकांनी विजेत्यांचे नाव घोषित होण्याआधी थेट व्यासपीठावर आणि काहींनी प्रेक्षकांत भाषणे देण्यास सुरुवात केली आणि पोलिसांनी त्यांची धरपकड केली.
कॅनडातला लेखक-वाचक साक्षेपी विचार करणारा आणि थेट कृतिप्रवण होणारा आहे. साप्ताहिक-मासिकांतील लेख- कथा- वैचारिक समीक्षा यांचे लिखाणच नाही तर त्यांचे संपादन- पानांवरील मांडणी यांच्यासाठीही राष्ट्रीय पातळीवर मानांकने देणारे कॅनडा हे बहुतेक एकमेव वाचनप्रेमी राष्ट्र असावे. तर गिलर पारितोषिकासाठी स्कॉशिया बँकेचे आर्थिक पाठबळ यंदाही कायम ठेवणार असल्याचे गुरुवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत वर्षभरात कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या २० लेखकांनी ‘आमच्या पुस्तकांचा विचार यंदाच्या पुरस्कारासाठी केला जाऊ नये,’ ही भूमिका घेत पुरस्काराआधीच पुस्तकवापसीचा निर्णय घेतला.
‘एलबिट सिस्टम्स’ ही इस्रायलची युद्धसामग्री बनविणारी कंपनी. या कंपनीत गुंतवणूक करून ‘स्कॉशिया बँक’ पॅलेस्टाइनमधील माणसे मारण्यात सहभागी होत असल्याचे कॅनडातील युद्धविरोधी निदर्शकांचे म्हणणे याच वर्षी मे महिन्यात भरलेल्या ‘टोरंटो फोटोग्राफी’ महोत्सवातही गांभीर्याने घेण्यात आले. या महोत्सवाचे प्रायोजकत्वही ‘स्कॉशिया बँक’कडे असते. यंदा या महोत्सवावर कलाकारांनीच बहिष्कार टाकला. कारण तेच. त्यामुळे ‘स्कॉशिया बँके’ने आपण ‘एलबिट सिस्टम्स’मधील गुंतवणूक निम्म्यावर आणत असल्याचे जाहीर केले. पण तरीही नागरिकांचा राग कमी झाला नाही. निदर्शनांचे लोण पसरतच राहिले.
आता आमच्या कादंबऱ्या यंदा गिलर पुरस्कारासाठी ग्राह्यच धरू नका, ही भूमिका घेत गुरुवारी डेव्हिड बर्गन, नुर नागा, एमी वॉल, कॅथरिन हर्नांडेझ, कॉलीन बॅरेट, फ्रँकी बर्नेट, कझीम अली, लिली वॅँग या कथात्म साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखकांनी पुस्तकवापसी केल्यानंतर त्यात फक्त कॅनडापुरती ओळख असणाऱ्या, काही पहिल्यावहिल्या कादंबऱ्या लिहिणाऱ्यांनीही सहभाग घेतला. आता ही शृंखला वाढू शकते.
सगळेच लेखक बाहेर पडले, तर पुरस्कारासाठी लघुयादी तयार करणेही अवघड ठरू शकते. एक लाख डॉलरच्या पुरस्कारावर पाणी सोडण्यास तयार असलेल्या तेथील लेखकांमधील जाज्वल्य मानवतावाद कौतुकास्पद म्हणावा लागेल. आणि ‘लेखकांची भूमिका’ आदी संकल्पना मासिका-दिवाळी अंकांच्या फक्त परिसंवादासाठी वापरणाऱ्या आपल्या साहित्य जगतासाठी बऱ्याच प्रकारचा जाणीवधडा देणाराही…