डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगभरातल्या पुरोगामी चळवळीसाठी प्रेरणा आणि अभ्यासाचा विषय आहेत. आंबेडकर यांची १९४०च्या दशकापासून अनेक चरित्रं लिहिली गेली आणि त्यांत यू. एम. सोलंकी लिखित गुजराती चरित्र (१९४०), तानाजी खरावतेकर लिखित मराठी चरित्र (१९४६), रामचंद्र बनौधा लिखित हिंदी चरित्र (१९४७) यांचा समावेश आहे. १९५० नंतर चांगदेव खैरमोडे लिखित चरित्र प्रकाशित झाल्यावर पुढे डॉ. आंबेडकर हयात असतानाच धनंजय कीर लिखित चरित्र प्रकाशित झालं होतं. प्रा. वसंत मून, प्रा. नलिनी पंडित, भालचंद्र फडके, बी.सी.कांबळे, द. ना. गोखले यांनी आणि मधू लिमये, डॉ. डी. आर. जाटव, एल. आर. बाली (हिंदी) यांनी आंबेडकरांबाबत पुस्तकं लिहिलेली आहेत. सन २००० नंतर आंबेडकर यांच्यावर इंग्रजीतही अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली गेली; यात प्रामुख्याने एलिनॉर झेलियट, गेल ऑमवेट, अशोक गोपाल ते क्रिस्टॉफो जेफरलो आणि शशी थरूर यांचा समावेश होतो. स्वाभाविकच या इंग्रजी पुस्तकांनी आंबेडकर यांचे विचार जागतिक पातळीवर नेण्याचं कार्य केलं. परंतु, या बहुतांश चरित्रांतील माहितीचा प्राथमिक स्राोत प्रामुख्यानं चांगदेव खैरमोडे लिखित चरित्राचे दोन खंड हेच राहिले असं म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
खैरमोडे हे स्वत: काही काळ आंबेडकर यांच्या सहवासात होते आणि आंबेडकर हयात असतानाच त्यांच्या चरित्राचे दोन खंड प्रकाशित झाले होते, हे इथे महत्त्वाचं. परंतु, ते चरित्र माहितीपूर्ण असलं, तरी आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय अवकाशाचं त्यात कोणतेच विश्लेषण आढळत नाही. अग्रगण्य चरित्रकार धनंजय कीर याचं चरित्र महत्त्वाचं मानलं जात असलं, तरी विषादाने नमूद करावंसं वाटतं की, त्यावर हिंदुत्वनिष्ठ सावरकरवादी दृष्टिकोनाचं सावट दिसून येतं. इंग्रजी चरित्रांपैकी, शशी थरूर यांनी लिहिलेल्या आंबेडकर चरित्रात सध्याच्या राजकीय घडामोडी/आंबेडकरांचा अपहार करण्याचे हिंदुत्ववाद्यांचे प्रयत्न, या पार्श्वभूमीवर सजगपणे मूल्यमापन केलेलं आहे. दुसरं अशोक गोपाळांचं ‘द पार्ट अपार्ट’. हे चरित्र बरीच नवीन माहिती देणारं आहे. उपलब्ध मराठीत साहित्यातले जे अनेक संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत, ते मराठी लेखकांनीही यापूर्वी अनेकांनी वापरले नसावेत!
तेलतुंबडे-लिखित चरित्राचं वेगळेपण
प्रश्न असा पडतो की, आंबेडकरांवर इतकं लिखाण झालेलं असताना, आनंद तेलतुंबडे यांना आता त्यांच्याबद्दल पुस्तक लिहावंसं का वाटलं असावं? प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, ‘मुक्तिदायी आशय वगळून त्यांची जीवनकथा भक्तिरसाने शब्दबंबाळपणे मांडण्यात मला अजिबात रस नव्हता.’ ते म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी केवळ एक व्यक्ती नाहीत, तर कोट्यवधी लोकांच्या जीवनाला आकार देणाऱ्या चळवळीचे व्यक्तिमत्त्वही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ‘डॉ. आंबेडकर केवळ गतकाळाचा भाग नसून, वर्तमानाची एक सजीव शक्ती बनले आहेत. कदाचित त्यांच्या जीवनकाळापेक्षा आज ते अधिक शक्तिशाली आहेत. ते लाखो लोकांच्या भविष्यावर प्रभाव टाकत आहेत. आज आंबेडकर-भक्तीच्या नावाखाली त्यांचे अनुयायी म्हणवणारे वर्तमानाकडे दुर्लक्ष करून भूतकाळाचा अभिमान बाळगत भविष्याविषयी बेफिकीर बनले आहेत. अशा वेळी त्यांनी डॉ.आंबेडकरांचा जीवनसंघर्ष चिकित्सकपणे समजून घेत भूतकाळाचं विच्छेदन, वर्तमानाचं विश्लेषण आणि भविष्याची रचना करण्यास सक्षम बनावं, ही माझी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा आहे.’ थोडक्यात, आंबेडकर-भक्तीपेक्षा त्यांना शक्ती म्हणून समजून घेणं, या हेतूनंच ‘अ लीजन्ड इज बॉर्न: फ्रॉम भिवा तो भीमा’ ते ‘दि लीजन्ड लिव्ह्ज ऑन: आयकॉनायझेशन ऑफ दि आयकोनोक्लास्ट’ अशी कालानुक्रमे लिहिलेली आठ प्रकरणं या पुस्तकात आहेत.
आंबेडकर यांचा जीवन काळ, व्यक्तिमत्त्वाचा विकास, त्यावर प्रभाव पाडणारे अर्थ राजकीय सामाजिक घटक आणि त्यामधून घडत जाणारे आंबेडकर या पुस्तकात दिसतात. हे व्यक्तिमत्त्व घडण्यात आणि घडवण्यात आंबेडकर कुटुंबाची सैनिकी पार्श्वभूमी, वडील रामजी यांचा धर्मावरला विश्वास, आंबेडकरांनी ज्ञानासाठी केलेली अपार धडपड; अमेरिकेत गेल्यानंतर झालेली नव्या जगाची ओळख, कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील काळ, आंबेडकर त्या विचारप्रक्रियेतून कसे घडत गेले, याची चर्चा केली आहे. एरवी आंबेडकर यांचा जो इतिहास म्हणून दर्शवला जातो, तो बहुतांशी तथ्यांवर कमी आणि कवी, गायक, चरित्रकार आणि शासकवर्गानं रंगवलेल्या व्यक्तिगत प्रतिमेवर अधिक आधारित असल्याचं दिसून येतं. तेलतुंबडे यांनी मात्र आंबेडकर यांच्याबाबतच्या व्यक्तिगत नोंदी कमीत कमी नोंदवून आंबेडकर यांच्या संकल्पनात्मक, सामाजिक, राजकीय जीवनालाच अधिक महत्त्व दिलं आहे; मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे. पूर्वीच्या चरित्रकारांनी सांगितलेली माहिती तेलतुंबडे यांनी नव्या पुराव्यांच्या प्रकाशात तपासून घेऊन, जुन्या माहितीवरही नवा प्रकाशझोत टाकला आहे. केळुसर गुरुजींची प्रथम भेट, त्यांचे शिक्षक जॉन ड्युई, एडविन सेलिमग्न, जेम्स रॉबिन्सन आणि जेम्स शॉटवेल यांचा प्रभाव, पारशी मित्र नवल भथेना यांची सततची मदत, ‘मूकनायक’ ते ‘प्रबुद्ध भारत’ या वर्तमानपत्रांचा प्रवास यातून वेगळी अंतर्दृष्टी लाभते.
दलितांच्या प्रश्नावर काम करणारे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी दलितांच्या प्रश्नाचं नेतृत्व कोणी करावं, यावरून झालेला संघर्ष, गांधी-आंबेडकर संघर्ष, मुंजे-आंबेडकर करार, हिंदू महासभेची दलितांबद्दलची भूमिका, धर्मांतराचा प्रवास, वसाहतवादी राजकारण, त्यात घडत- बिघडत गेलेली आंबेडकरी चळवळ, दलितांचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात घेऊन जाण्याचा प्रयत्न, संविधान सभेत प्रवेश करू न देण्यासाठी काँग्रेसी राजकारणाने बंद केलेली दारे, आंबेडकरांचा संविधानसभेत प्रवेश आणि त्यानंतर झालेलं राजकारण, त्याबाबतची आंबेडकरांची भूमिका, शेवटच्या दिवसातील भ्रमनिरास, आरक्षण धोरणाची उपलब्धी आणि परिणाम, अशा अनेक गोष्टीवर या पुस्तकात नवा प्रकाश टाकलेला आहे.
चरित्र नायकाला कसं पाहावं?
डॉ. आंबेडकर इतिहासाला त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू देणार नाहीत, असं गांधी म्हणाले होते. काही काळ इतिहासानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु १९६०च्या दशकानंतर निवडणुकांमधील मतांचं राजकारण जसं स्पर्धात्मक बनत गेलं, तसे आंबेडकर पुन्हा केंद्रस्थानी आले. तेलतुंबडे यांच्या मते आंबेडकर यांच्या अनेक परस्परविरोधी प्रतिमा आहेत, आणि त्या प्रतिमांयोगे आंबेडकर यांचा मोठ्या प्रमाणात शोषक वर्गाकडूनच अपहार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जात आहे. धर्म, जात, वर्ग, लोकशाही, समाजवाद, कम्युनिस्ट, महिला, आदिवासी, गांधी, राज्यघटना यांबाबत त्यांची अनेक परस्पर विसंगत विधानं आहेत झ्र ही परस्परविरोधी विधानं कशी समजून घ्यायची? ‘सातत्य हा गाढवाचा गुण असतो,’ असं म्हणत त्यांनी त्याला निकालात काढलं आहे. आंबेडकर सर्वकाळ शिकत होते आणि स्वत:ची भूमिका बदलवत होते, म्हणून त्यांच्या कोणत्याही सुट्या विधानाचं पारंपरिक दृष्टिकोनांतून केलेलं आकलन कसं दोषास्पद आहे, हे तेलतुंबडे दर्शवून देतात. जातीअंत, समाजवाद, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यांवर आधारित शोषणमुक्त समाज हे त्यांचं ‘व्हिजन’ होतं, आणि त्याच प्रासंगिकतेतून आंबेडकर यांना समजून घ्यायला हवं, हे सूत्र ते या पुस्तकातून समजावण्याचा प्रयत्न करतात.
‘‘महान माणूस हा नेहमीच सत्तेचं ‘उत्पादन’ असतो’’ हे तत्त्वज्ञ कार्ल काउत्स्की यांचं विधान उद्धृत करून तेलतुंबडे म्हणतात की, डॉ. आंबेडकर यांनीच ‘रानडे, गांधी आणि जिना’ या भाषणात ‘महान माणूस म्हणजे काय? महान माणसाला कसं समजून घ्यावं?’ याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. हाच मार्ग तेलतुंबडे डॉ. आंबेडकरांबाबत स्वीकारतात. आंबेडकरांच्या लिखाणाचे संदर्भ, त्यांचा विचारप्रवाह, त्यांचं जीवन-तत्त्वज्ञान आणि त्यांचा आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर राजकारणावर झालेला परिणाम हे ते आजच्या काळाला लागू करून बघतात. त्यांची भक्कम पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ तपासणी करतात आणि हे करताना ते स्वत:मधला विचारवंत कुठेही भावनिक, पक्षपाती अथवा पूर्वग्रहित होऊ नये, याची काळजी घेताना दिसतात. इथं, तेलतुंबडे आंबेडकर आणि त्यांच्या जीवन-व्यवहाराकडे अत्यंत कठोर पद्धतीने बघतात असा त्यांच्यावर आरोप केला जाऊ शकतो. परंतु, ‘शास्त्राच्या कक्षेत भावनेला हद्दपार केलं पाहिजे व वस्तुनिष्ठ भूमिकेतून गोष्टींचा निवाडा केला पाहिजे.’ या डॉ.आंबेडकर यांच्या विधानाला प्रमाण मानून ते आंबेडकर यांच्या बौद्धिक, राजकीय जीवनाला वस्तुनिष्ठ पद्धतीने बघतात.
व्यक्तिपूजेपेक्षा शोषण-मुक्तीचा विचार!
तेलतुंबडे यांचं म्हणणं आहे की, आंबेडकरांनी मानवाच्या शोषणमुक्तीची चळवळ उभी केली. त्यांच्या व्यक्तिपूजेपेक्षा त्यांचा विचार आज कसा उपयोगी ठरू शकतो, तो कुठे विकृत केला जात आहे आणि त्यांच्या नावाने त्यांच्या अनुयायांकडून आणि विरोधकांकडून नेमकं काय राजकारण खेळलं जातं आहे, हे सर्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. आंबेडकर यांना व्यक्ती म्हणून कसं बघावं, यापेक्षा त्यांच्या मुक्तिदायी चळवळीकडे कसं पहावं हा मुद्दा तेलतुंबडे कायम अधोरेखित करत आले आहेत.
आंबेडकर यांनी मांडलेल्या काही सामाजिक संकल्पना आणि राजकीय प्रतिमा यांची पुनर्तपासणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकातही आहे. लोकशाही आणि जातिव्यवस्था या एकत्र राहू शकत नाहीत. लोकशाहीचं प्रत्यक्षात येऊ शकेल असं दर्शन उभं करायचं असेल, तर त्यात जातीअंताची खात्री असावी लागेल, असं आंबेडकरांना तीव्रतेनं वाटत होतं. ते जातीला हिंदू धर्मग्रंथाची निर्मिती समजत होते आणि जाती-अंत करायचा असेल, तर हिंदू धर्मग्रंथांना ‘डायनामाइट लावण्याची’ गरज त्यांना वाटत होती. तेलतुंबडे या त्यांच्या मताशी असहमती दाखवताना म्हणतात की, हिंदू धर्मग्रंथ, चालीरीती आणि विधींच्या विपुलतेनं जातिव्यवस्थेला बळकटी दिली आहे हे स्वीकारायला हवं. परंतु हिंदू धर्माचा असा कोणताही ग्रंथ नाही जो पूर्वी अस्तित्वात असलेल्या जातिव्यवस्थेशी पूर्णपणे जुळतो. मनुस्मृती देखील नाही, जी जातिव्यवस्थेचं सर्वात वाईट प्रतिनिधित्व म्हणून मानली जाते. हिंदू धर्मग्रंथ सांगतात म्हणून लोक जाती पाळतात का? किंवा ते प्रथा आणि परंपरेच्या जडत्वाने करतात का? हे आणि असे अनेक प्रश्न आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या मांडणीतून निर्माण होऊ शकतात. त्यांच्या नावावर असलेलं संविधान जसं त्यांना हवा असलेला आदर्श समाज निर्माण करू शकलं नाही, अगदी तसंच कोणताही मजकूर, संहिता किंवा धर्मग्रंथ सामाजिक व्यवस्था निर्माण करू शकत नाही.
कोणत्याही परिस्थितीत, सामाजिक बदल कधीही कोणीतरी संहिता लिहिण्याद्वारे घडवून आणला गेला नाही. जरी तो त्याच्या वर्चस्ववादी स्थितीत असा प्रभाव निर्माण करू शकत असला तरी त्याचं मूळ नेहमीच भौतिकवादात असतं. जाती हिंदू धर्मशास्त्रांमध्ये रुजलेल्या असतील आणि त्या शास्त्रांचा नाश करूनच त्या नष्ट होणार असतील तर आज भारतातल्या इतर धार्मिक समुदायांमध्ये असलेल्या जातींबाबत स्पष्टीकरण कसं करायचं – त्यांचे धर्मग्रंथ तर जातिव्यवस्थेला पाठिंबा देत नाहीत तेलतुंबडे यांनी आंबेडकरांच्या जातीय मांडणी संदर्भात मतभेद नोंदवले असले, तरी ‘डॉ. आंबेडकर हे जातीच्या प्रश्नाला प्रश्नांकित करणारे पहिले विचारवंत होते,’ हे ते नमूद करतात.
आंबेडकरांच्या धर्म संकल्पनेला समजून घेताना ते म्हणतात, ‘आंबेडकरांच्या मते व्यक्तीचा आध्यात्मिक विकास हे धर्माचे खरं उद्दिष्ट असायला हवं. व्यक्तिश: आंबेडकरांना धर्माच्या अस्तित्ववादी पैलूपेक्षा आध्यात्मिक बाजू जास्त महत्त्वाची वाटत होती आणि मानवी जीवनाचं नियमन करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांना राज्य आणि धर्म हे महत्त्वाचे वाटत होते’. परंतु, धर्म आणि राज्य अस्तित्वात नव्हते तेव्हा मानवी जीवनाचं नियमन होत नव्हतं का – असा तात्त्विक प्रश्न तेलतुंबडे उभा करतात. धर्म आणि राज्य मानवी नियमन करण्याऐवजी मानवाला नियंत्रित करून मानवी स्वातंत्र्याचाच संकोच करू लागले असताना, तेलतुंबडे यांचा तात्त्विक प्रश्न अधिक ठळक होत आहे. परंतु, अशा तात्त्विक विधानाचं रोजच्या प्रत्यक्ष जगण्यात काय करायचं, याचं उत्तर या पुस्तकात नाही.
सत्ताधारी वर्गानं संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा मोठ्या चतुरपणे निर्माण केली, असं तेलतुंबडे सूचित करतात. यासाठी ते संविधानसभेत झालेल्या चर्चांआधारेच तिथं नक्की काय घडलं, त्यात आंबेडकर यांची काय भूमिका होती यावर वस्तुनिष्ठपणे प्रकाश टाकतात. संविधान सभेत अनुसूचित जातीचे ३२ सदस्य असले तरी संविधान तयार करणाऱ्या २१ सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये आंबेडकर वगळता एकही सदस्य दलित नव्हता. या सवर्ण प्रभावाचा परिणाम असा की, आंबेडकर यांनी ‘स्टेट अँड मायनॉरिटीज’मध्ये केलेल्या कोणत्याही मागणीला संविधान सभेत स्थान मिळालं नाही. किंवा संविधान सभेत जेव्हा अस्पृश्यता निर्मूलनाचा विषय आला आणि प्रथमरंजन ठाकूर यांनी ‘जातिव्यवस्था कायम ठेवून अस्पृश्यता संपवता येणार नाही. जातव्यवस्था संपवली पाहिजे’ अशी भूमिका घेतली; तेव्हा या ठरावाला के. एम. मुन्शी यांनी विरोध केला. तर एस. सी. बॅनर्जी आणि धीरेंद्रनाथ दत्त हे प्रथमरंजन ठाकूर यांच्या ठरावाच्या बाजूने उभे राहिले. मात्र या सर्व प्रकरणात आंबेडकर यांनी मौन पाळणं पसंत केलं. काँग्रेस पक्षाचं संविधान सभेवर पूर्ण नियंत्रण होतं आणि ते स्वत:ला हवं तेच करून घेत होते. आंबेडकर हतबल होते, हे ठसवणारी अन्य उदाहरणंही आहेत.
‘डावेपणा’चा प्रश्न
समारोपाच्या प्रकरणात आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर चळवळीची ७५ वर्षाची उपलब्धी समजून घेण्यासाठी तेलतुंबडे यांनी वैयक्तिक सक्षमीकरण, सामूहिक सक्षमीकरण, सक्षम करणारे घटक, विकासात्मक संधी आणि अनुकूल सांस्कृतिक वातावरण या पाच घटकांच्या आधारे संज्ञात्मक चौकट दिली आहे. ही चौकट भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण डेटा आणि अंतर्दृष्टी उपलब्ध करून देते.
ते आंबेडकरांच्या सगळ्या संकल्पना, संघर्ष आणि त्यांचा मुक्ती प्रकल्प भौतिक परिस्थितीशी जोडून आणि ताडून बघतात. बहुतांशी आंबेडकरोत्तर आंबेडकरी-चळवळ अस्तित्वशील भौतिक प्रश्नांना ‘डावं तत्त्वज्ञान’म्हणून निकालात काढत आली आहे. जमीन सत्याग्रहाच्या प्रश्नावरून बी. सी. कांबळे यांनी ‘सत्याग्रहा’ला अराजकाचं व्याकरण ठरवून ‘घटनावाद हाच आंबेडकरवाद’ असा दृष्टिकोन स्वीकारला, तर ‘दलितपँथर’च्या फुटीच्या वेळी ‘बौद्धवाद हाच आंबेडकरवाद’ असं म्हणत राजा ढाले यांनी शोषितांच्या भौतिक प्रश्नांना अग्रक्रम देणारा ‘पॅन्थरचा जाहीरनामा’ निकालात काढला. आज विविध गटांना अस्मितावादी राजकारणानं इतकं आंधळं बनवलं आहे की, जगण्या-मरण्याच्या भौतिक प्रश्नांची मांडणीसुद्धा त्यांना ‘डावी’ वाटू लागते. अशा वेळी तेलतुंबडे म्हणतात, ‘आंबेडकर चळवळ ही मूलत: डावीच चळवळ आहे, कारण तळागळातील लोकांची चळवळ उजवी कशी असू शकते?’ ते म्हणतात, पुस्तकात जे प्रश्न उभे केले आहेत ते लोकांनी विचार करावा यासाठी आहेत.
हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तर आंबेडकर चळवळीची आताची रणनीती काय असावी आणि त्यासाठी आंबेडकर काय अंतर्दृष्टी देतात याचा तो चर्चाग्रंथ आहे. लोकांनी महान व्यक्तींकडे कसं पाहावं याचं ‘पद्धतीशास्त्र’ हे पुस्तक वाचकांपर्यंत नेतं. बदलणाऱ्या जगात कोणत्याही गोष्टीला कायमस्वरूपी ‘दीपस्तंभ’ म्हणून बंदिस्त करणं हे चळवळीच्या पुढच्या वाटा रोखून धरणारं आहे. लेखकानं म्हटल्याप्रमाणे, दलितांना आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांच्या इतिहासातून शिकण्यासाठी, भविष्याची रणनीती आखण्यासाठी मदत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत जे केलं आणि त्यांना जे करायचं होतं याचा आज मेळ बसतो आहे का? – असा प्रश्न उभा करून ‘आंबेडकर यांनी काय केलं, यापेक्षा ते काय करू इच्छित होते आणि काय करू शकले नाहीत यामध्ये आंबेडकरांची प्रासंगिकता आज अधिक आहे’ असं लेखक सुचवतात.
आयकॉनोक्लास्ट : अ रिफ्लेक्टिव्ह बायोग्राफी ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आनंद तेलतुंबडे
पेंग्विन प्रकाशन
किंमत – १४९९ रुपये, पृष्ठे – ७००
keshavwaghmare14@gmail.com