अरुंधती देवस्थळे
‘देशहितासाठी’ हा एक शब्द सुरुवातीला जोडला की कोणत्याही बेकायदा कृत्याला वैधता मिळवून देता येते. मग विरोधकांना भलत्याच गुन्ह्यांत गुंतवून, देशद्रोही ठरवून, केलेला रक्तपातही देशभक्ती ठरतो… फिलिपिन्समधील रॉद्रीगो दुतेर्ते यांच्या जुलमी राजवटीचे वर्णन करणारे हे पुस्तक एकाधिकारशाहीकडे वाटचाल करणाऱ्या आणि त्यालाच प्रगती समजणाऱ्या देशांसाठी धोक्याची घंटा वाजविणारे आहे…
गेलं वर्षभर एक अस्वस्थपण सतत जाणवत होतं. देशातल्या जनमताचा किंवा अंतरराष्ट्रीय दडपणाचा मुलाहिजा न ठेवता देशोदेशी हुकूमशहा आरामात स्थिरावलेले दिसत आहेत. सत्तेच्या दुरुपयोगाचा आलेखही उंचावत चालला आहे. बेलारूस, रशिया, युक्रेन आणि इराणमध्ये असलेल्या सजग मित्रमैत्रिणींमुळे काही राजकीय दुर्घटनांना वैयक्तिक अनुभवांची किनार मिळाली. नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल मिळालं खरं, पण ते स्वीकारण्यापुरती सुटका तर सोडा, नव्याने आरोप ठेवून त्यांची शिक्षा वाढवण्यात आली आहे. हेच बेलारूसच्या आलेस ब्याल्यातस्की यांच्याही बाबतीत घडलं आहे. शस्त्रास्त्रमंडित हुकूमशहांच्या विरोधात उठणारे नि:शस्त्र आवाज आणि त्यांचा परिणाम यांचा वेध घेता घेता लक्षात आलं की प्रत्येक देशात जुलूमशाहीला विरोध करणारी माणसं आपापल्या तऱ्हेने लढ्यांत उतरली आहेत. यात ‘पुराव्याने सिद्ध करणाऱ्या’ धाडसी पत्रकारांची भूमिका तर वाखाणण्यासारखीच!
वर्षाअखेरीस अमेरिकी माध्यमांत जागोजागी दिलेल्या उल्लेखनीय पुस्तकांच्या यादीत ‘सम पीपल नीड टू डाय’ हे फिलिपिनो पत्रकार पॅट्रिशिया ईवांजेलिस्ताचं रॉद्रीगो दुतेर्ते यांच्या फिलिपिन्समधील दहशतवादी राजवटीवरलं अनुभवकथन दिसत राहिलं. २०१६ च्या निवडणुकांत ‘देशांतल्या ड्रग माफियाशी युद्ध पुकारून, सर्व लोकशाहीविरोधी गुन्हेगारांना संपवेन’ अशी घोषणा करणारे, आधी अनेक वर्षं दावोचे उपमहापौर, नंतर महापौर व अखेरीस राष्ट्राध्यक्ष झालेले दुतेर्ते सर्वोच्च पदासाठी बहुमताने निवडून आले यात काही आश्चर्यकारक नव्हतंच. पण देशभक्तीची सतत ग्वाही देत, दोषींच्या रक्ताचे पाट रस्त्यावर वाहवीन असं म्हणणाऱ्या दुतेर्तेंनी, मादक पदार्थांच्या माफियाशी बादरायणसंबंध जोडून कित्येक विरोधकांना अक्षरश: संपवलं. अनेक घरांतून उचलले गेले आणि नंतर त्यांचं काय झालं हे कुटुंबाला कळलंच नाही. “तुमची मुलं जर मादक पदार्थांचं सेवन करत असतील, बापांनीच त्यांना ताबडतोब संपवून टाकून आमच्या मोहिमेला सहकार्य द्यावं. तशीही ती आमच्या पंजातून सुटणं कठीणच आहेत” अशी तोफ त्यांनी निवडून येताच सार्वजनिक व्यासपीठावरून डागली होती. सापडलेल्या प्रत्येकाला, आपण अमली वस्तूंशी कुठलाही संबंध ठेवणार नाही अशी शपथ देऊनही ते मारलेच गेले. देशद्रोहाच्या हास्यास्पद आरोपाखाली एक आकडी वयाची चिमुरडी पोरंही चिरडून टाकली गेली, हे एक भयाण सत्य.
हेही वाचा >>> संविधानभान : संविधान सभेचे सर्वसमावेशक नेतृत्व
“काही माणसं मरायलाच हवी. त्यांना संपवणारा मी तसा वाईट माणूस नाहीये, खरंच नाहीये, पण देश नासवणाऱ्या गुन्हेगारांना माझ्यालेखी क्षमा नाही!” हे दुतेर्ते यांच्या निकटतम सहकाऱ्याचंं गाजलेलं विधान. सरकारी अधिकाऱ्यांशी, पत्रकारांशी बोलताना, अगदी कोऱ्या चेहऱ्याने केलेलं! पॅट्रिशियाने हे पुस्तक एकाधिकारशाहीने घडवून आलेल्या संहारातून वाचलेल्या आणि आपल्यावर झालेल्या अन्यायांचं वास्तव जगासमोर मांडण्याचं धैर्य दाखविणाऱ्या स्त्री-पुरुषांना समर्पित केलं आहे. ज्यांच्या विरोधात लिहिलं त्यांचीच मुलं सत्तेत आल्याने, राजधानी मनिलात राहून हे पुस्तक लिहिणं म्हणजे पाण्यात राहून शार्क माशांशी वैर करण्यासारखंच होतं. पुस्तकभर नोबेल विजेत्या स्वेतलाना अलेक्सिविने ‘चेर्नोबिल’साठी वापरलेल्या पॉलीफोनिक निवेदनशैलीची आठवण येते. कोर्टात दिलेल्या तारीखवार साक्षी आणि सांगितलेल्या कहाण्यांतून हे आत्मकथन उलगडत जातं. मेमरी (शब्दांकित केलेली पार्श्वभूमी), कार्नेज (वीस हजारांवर संख्या गेलेलं हत्याकांड) आणि रेक्विएम (मृतांसाठी केलेली प्रार्थना) अशी तीन भागांत केलेली मांडणी, वाचकांना पूर्ण चित्र दाखवणारी आहे. हत्याकांडाच्या भागांत वेगवेगळ्या पत्रकारांनी आपापले अनुभव सांगितले आहेत. वाट्याला आलेला पहिला खटला किंवा विसर न पडू देणारे अमानुष अनुभव. एक वाक्य टंकलिखित करण्यासाठी जितका वेळ लागत असेल, त्यापेक्षा कमीच वेळ एका माणसाला संपविण्यासाठी लागतो, हे आम्ही अनुभवत होतो, असं त्यात म्हटलं आहे.
फिलिपिन्स सात हजार ६४१ बेटांचा सुंदर देश आहे. लुझान, विसायास आणि मिंदनाव या तीन द्वीपसमूहांत विभागलेला आहे. अलीकडच्या इतिहासात, अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या या देशाला १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर एका नव्या राष्ट्रवादाची सुरुवात झाली आणि हा नवा राष्ट्रवाद अल्पकाळात संपलाही. मग सुरू झालं भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारी आणि बेकायदा कामांच्या शिरजोरीचं देशव्यापी साम्राज्य! पॅट्रिशिया सुरुवातीलाच लिहिते, ‘माय जॉब ईज टू गो टू प्लेसेस व्हेअर पीपल डाय. आय पॅक माय बॅग्ज, टॉक टू द सर्व्हायव्हर्स, राइट माय स्टोरीज अँड देन गो होम टू वेट फॉर द नेक्स्ट कॅटास्ट्रोफी. आय डोन्ट वेट व्हेरी लाँग’. डगमगत्या लोकशाहीचे दाखले देणाऱ्या फिलिपिन्सला गेलं अर्धशतक सामाजिक- राजकीय स्थैर्य लाभलेलंच नाही, सामान्य नागरिक शांतीप्रेमी असूनही. गुन्हेगारी, गरिबी आणि हिंसक भ्रष्टाचाराने केलेले सत्तापालट आणि मादक पदार्थांच्या चोरीमारीने प्रस्थापित झालेली बजबजपुरी अशी स्थिती आहे. दुतेर्ते यांचा कालखंड (२०१६-२०२२) हा त्यातला दहशत आणि आंधळ्या हिंसाचाराचा म्हणून कुप्रसिद्ध. १९८५ मध्ये कॉरी अक्विनोंच्या ‘पीपल्स पॉवर रेव्होल्यूशन’ने मार्कोस यांची भ्रष्ट हुकूमशाही संपवून आणलेली लोकशाही अल्पजीवी ठरली आणि दुतेर्ते यांच्या सत्ताकाळात एका भयावह वळणावर संपली. सत्तेवर येताच सरकारी यंत्रणेने आरोपी ठरवलेल्यांना, कुठल्याही कायदेशीर बचावाची संधी न देता गोळ्या घालण्याचा सपाटा लावण्यात आला. इतका की देशात ‘इजेके’ (एक्स्ट्राज्युडिशियल किलिंग्ज) हा एक चलनी शब्द ठरला. सरकारच्या पाठबळाने देशात हिंसेचं वादळ पसरलं आणि दहशतही. जनता दोन सरळ हिश्श्यांत विभागली गेली: दुतेर्ते आणि अदुतेर्ते. अदुतेर्ते म्हणजे राष्ट्रद्रोही, हे समीकरण आलंच. जनसामान्यांची सहानुभूती आणि विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाची श्रीमंती लपवली आणि आपण गरिबीतून वर आलो आहोत अशी प्रतिमा निर्माण केली. सर्वोच्च पद मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी, खऱ्या- खोट्याची भेसळ पुढे राजनीतीचा भागच बनली. दुतेर्तेंच्या वाक्चातुर्याबद्दल ती लिहिते की, त्यांची भाषा उद्दामपणाची वाटली तरी कधी कायद्याच्या कचाट्यात सापडेल अशी नसायची. उदा. आम्ही अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांना संपवू (‘खून करू’ नाही.). वृत्तपत्रांना जुलूमकर्ते घाबरण्याऐवजी, वृत्तपत्रेच त्यांना घाबरू लागली आणि खिळखिळ्या लोकशाहीची उरलीसुरली वाट लागली. हे सगळं होत असूनही बहुसंख्यांचा त्यांच्यावरला विश्वास ढळला नव्हता. मार्ग चुकत असेल कदाचित, पण ते हे सगळं देशासाठीच करताहेत असा भ्रम जनतेच्या मनात रुजलेला होता. कायदा झुगारून हजारोंच्या संख्येने मारले जाणारे नागरिक पाहून २०१८ मध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने चौकशी सुरू केली. १८ हजारांच्या आसपास बेकायदा हत्या खरोखरच घडल्याचं जाहीर होताच दुतेर्तेंनी फिलिपिन्सचं या न्याययंत्रणेचं सदस्यत्व बंद करून टाकलं. ‘गुन्हेगारां’च्या हत्यांत खंड पडू दिला नाही. ‘देशहितासाठी’ आवश्यक हत्या थांबवण्यासाठी मानवाधिकारवादी, पत्रकार, वकील कोणीही विरोधात उभे झाल्यास त्यांनाही संपवून टाका अशा पोलिसांना आज्ञा दिल्या. गुन्हेगारांचा नि:पात करण्याचं स्वातंत्र्य दिल्याने पोलीस यंत्रणा मात्र खूश होती. देशातील गुन्हेगारीला या अतिरेकामुळे आळा बसला हे खरं, पण आरोपाचा बडगा दाखवून निरपराध्यांकडून विशेषतः शहरातल्या झोपडपट्ट्यांतील रहिवाशांकडून त्यांना न झेपणारे पैसे उकळले गेले हेही खरंच. यंत्रणेनेही अधिकाराच्या उन्मादात वैयक्तिक वैरी उडवून टाकले. काही दिवस तर असे की ती काम करत असलेल्या रॅपलरच्या न्यूजरूममध्ये तासा-तासाला देशात वेगवेगळ्या ठिकाणी मृतांचा आकडा वाढताना दिसत असे.
“आम्ही हतबुद्ध होऊन एकमेकांची तोंडं पाहात राहायचो. शब्द गोठलेले, आपसांत संभाषण अशक्य झालेलं. तेच तेच शब्द, तीच तीच विशेषणं; बातम्या कसल्या लिहायच्या! पण नाही लिहिलं तर बातम्या दडपण्याच्या सरकारी धोरणाला पत्रकारांच्या सुन्न होण्याने हातभारच लागणार होता, ‘बुडालेली’, ‘आत्महत्या केलेली’, ‘अपघातात मृत्युमुखी पडलेली’, ‘गायब झालेली’, ‘भांडणात बळी गेलेली’ मृत व्यक्ती एका आकड्यात दफन होणार होती, हे जाणवलं की उसनं अवसान आणून कम्प्युटरशी झगडत बातम्या लिहीत होतो” असं ती म्हणते. लवकरच मृतांची छायाचित्रं छापण्यावर बंदी आली. अशा प्रेतांनी ‘मी ड्रग डीलर आहे’ किंवा ‘ड्रग्ज करणाऱ्यांनो, पुढला नंबर तुमचा आहे’ अशा चिठ्ठ्या लावलेल्या असत, भल्या मोठ्या अक्षरात! पॅट्रिशिया गुन्ह्याच्या स्थळी जायची तेव्हा आपलं जीपीएस ‘रॅपलर’च्या न्यूजरूमला जोडून जायची, तिला काही झाल्यास निदान सहकाऱ्यांना कळेल तरी की ती आहे कुठे! पुस्तकातल्या एक प्रकरणाचं शीर्षकच ‘हाऊ टू किल ॲन ॲडिक्ट’!
लोकांना पटतील अशा गोष्टी रचून सांगणे हा दुतेर्ते यांचा हातखंडा. म्हणून त्यांनी आरंभलेलं हत्यासत्र ही लोकांना बरीच वर्षं, देशासाठी पडणारी देशद्रोह्यांची आहूती वाटत राहिली. परस्परांवरचा विश्वास उडाला किंवा दहशतीमुळे तोंडं बंद ठेवणं श्रेयस्कर वाटलं म्हणा, विरोधात फारसं कोणी उभं राहिलंच नाही. पॅट्रिशिया काम करत असे त्या रॅपलरच्या संस्थापक, प्रमुख असलेल्या मारिया रेसांना त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढाईसाठी २०२१चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आणि फिलिपिन्समध्ये चाललेलं हत्याकांड जगासमोर आलं. भ्रष्टाचाराचं लाजिरवाणं उदाहरण ठरलेल्या आणि त्यापायी देशातून पळ काढावा लागलेल्या दिवंगत फर्डिनांड मार्कोसना २१ फैरींचा सॅल्यूट व राष्ट्रीय नेत्यांच्या कबरींच्या प्रांगणात चिरनिद्रा बहाल करणारे, शर्टाची बटणं सार्वजनीक कार्यक्रमांत उघडून बसणारे, सुंदर स्त्रिया आणि लैंगिक सुखाबद्दल व्यासपीठावरून कोणी न मागितलेली कबुली देणारे, दूतेर्ते! १९२२ मध्ये त्यांनी सत्तेचं सिंहासन सोडलं खरं. पण त्यांची मुलगी सारा उपराष्ट्रपती आणि मुलगा सेबॅस्टिअन दावोचा महापौर निवडून आले आहेत, ‘हा केवढा अद्भुत योगायोग’ असं त्यांनी शेवटच्या भाषणात म्हटलं आहे! जनमत नावाच्या रसायनाएवढं अतार्किक काही नसतं याचा पुन:प्रत्यय देणारं हे पुस्तक वाचनीय, मननीय आहे.
सम पीपल नीड किलिंग
लेखक – पॅट्रिशिया ईवांजेलिस्ताचं
प्रकाशक – रँडम हाऊस
पाने – ४४८ मूल्य – ३४१९ रुपये
arundhati.deosthale@gmail.com