शशिकांत सावंत

अँडी वॉरहॉलच्या चित्रकलेत वेगळं काहीच नव्हतं. ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच त्याने कॅनव्हासवर उमटवल्या, तरीही त्यांची किंमत फार होती. अनेक प्रस्थापितांनी त्याचं काम कधीही कलाकृती म्हणून स्वीकारलं नाही, मात्र तरीही तो कायम लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला….

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

एखाद्या चित्रकाराने एकहाती क्रांती घडवल्याचं चित्र १९व्या शतकात दिसणं सोपं होतं. सेझान, व्हॅनगॉग, पिकासो यांसारख्या चित्रकारांना ते साधलं, पण २०व्या शतकात बहुतेक पारंपरिक चित्रकला प्रकार शिळे झाले होते. तेव्हा असं शक्य होतं का? अँडी वॉरहॉलने त्याचं उत्तर ‘होय’ असं दिलं. १९२८ साली अँडी वॉरहॉल अमेरिकेत जन्मला, अमेरिकन संस्कारांत वाढला. सुरुवातीला त्याला पेंटर व्हायचं होतं पण त्याने कमर्शियल आर्टला ॲडमिशन घेतलं. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने चपला डिझाइन करायचं काम केलं. हे करताना त्याने कागदावर रंग तुटकपणे देण्याचं एक तंत्र शोधलं. ते रंग पसरताना साहजिकच स्क्रीन प्रिंटिंगप्रमाणे दिसतं. स्क्रीन प्रिंटिंग हा त्याच्या आयुष्याचा मोठा भाग झाला. तोपर्यंत चित्रकारांनी चित्र काढायचं आणि ते मूळ चित्र रसिकांनी विकत घ्यायचं किंवा त्याची शंभर-दीडशे निवडक प्रिंट विकत घ्यायची, ही परंपरा होती.

अँडी वॉरहॉलने ‘सेरीग्राफ’ म्हणजे स्क्रीन प्रिंटिंगच्या साहाय्याने हजारो प्रिंट्स काढली. ती काही वेळा खूप स्वस्त तर काही वेळा खूप महाग विकली गेली आणि या प्रकारे त्याने सर्वसामान्यांना कला उपलब्ध करून दिली. त्याला हॉलीवूडविषयी प्रेम होतं. कला म्हणजे चित्रकाराने रेखाटन करायचं, पेंटिंग करायचं याला फाटा देऊन त्याने सरळ-सरळ फोटो स्क्रीन प्रिंटिंगच्या द्वारे कागदावर आणले आणि त्यालाच स्वत:ची कलाकृती म्हटलं. इतकंच नव्हे तर स्वत:च्या स्टुडिओला त्याने चक्क ‘फॅक्टरी’ असं नाव दिलं. त्यामुळे तो बहुप्रसवा कलावंत ठरला. ‘वॉरहॉल.. अ लाइफ ॲज आर्ट’ हे ब्लेक गॉपनिक यांचं पुस्तक या अनेक प्रतिथयश चित्रकारांनी नाकारलेल्या तरीही प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रकाराचा प्रवास कथन करते.

हेही वाचा >>> संविधानभान : संविधान सभेचे सर्वसमावेशक नेतृत्व

६०च्या काळात अनेक एलपीज रेकॉर्ड्स निर्मितीचा धंदा उदयाला आला. तेव्हा त्याला त्यांची मुखपृष्ठ करण्याचं काम मिळालं. भोवतालच्या जगण्यातले साधे विषय त्याने चित्र म्हणून सेरीग्राफमध्ये उतरवले. उदाहरणार्थ कोका-कोला किंवा ब्रिलो बॉक्सची कॉपी ही खरंतर ग्राहकप्रिय उत्पादनं होती. ती सर्वांना उपलब्ध होती. त्याबद्दल अँडी वॉरहॉल म्हणतो की, ‘कोका-कोला एलिझाबेथ टेलरही पिते, राष्ट्राध्यक्षही पितो आणि सर्वसामान्य माणूसही आणि सर्वांना एक माहीत असतं की आपण कितीही पैसे मोजले तरी, यापेक्षा वेगळ्या प्रतीचा कोका-कोला आपल्याला मिळणार नाही.’ या ग्राहककेंद्री बाजाराने अँडी वॉरहॉलला मोहिनी घातली. चित्रकार पूर्वीही प्रिंट काढत होते पण त्यामागे एखादं ओरिजिनल चित्र असायचं. ‘प्रिंट हेच माझं चित्र’ असं म्हणणारा केवळ वॉरहॉलच होता.

समलिंगी संबंधांवर टीका होत असतानाच त्याने खुलेपणाने छायाचित्रकार असलेल्या एका पुरुषाशी आपले शारीरिक संबंध असल्याचे सांगितले. त्या फोटोग्राफरबरोबरच त्याने सेरीग्राफचं बरंचसं काम केलं. एका मासिकासाठी त्याने इंटीरियरची दोन चित्रं केली. ती त्याची छापून आलेली पहिली कलाकृती. नंतर अनेक कलादालनांत त्याने सेरिग्राफ मांडले. मर्लिन मन्रोची सात-आठ चित्रं त्याने वेगवेगळ्या रंगांत केली. गोल्डन मर्लिन, येलो मर्लिन, लेमन मर्लिन वगैरे. माओ झेडाँगचं चित्र त्याने १९७३ साली केलं. या प्रकारे अनेक चित्रं काही वेळा विषयाला धरून तर काही वेळा सोडून केली. ‘ज्युईश थिंकर’ नावाची मालिका केली. त्याच्यावर सिग्मंड फ्राइडपासून ते काफ्कापर्यंत अनेक जणांनी चित्रं केली. खरंतर त्याच्या चित्रकलेत वेगळं काहीच नव्हतं. ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच त्याने कॅनव्हासवर उमटवल्या तरीही त्यांची किंमत फार होती. लाखो डॉलर किमतीला त्याची चित्रं विकली जाऊ लागली. वर्तमानपत्रांत आलेलं गाड्यांच्या अपघाताचं चित्रदेखील त्याने सेरीग्राफच्या साहाय्याने उतरवलं. खुर्चीला शॉक देऊन ज्याला ठार मारण्यात आलं, अशा कैद्याचा फोटोदेखील चित्र म्हणून प्रसिद्ध केले.

६०च्या दशकातल्या हिप्पी चळवळीचा त्याला फायदा झाला. या काळात त्याने शेकडो ‘नॉन सेलिब्रेटीं’ची चित्रं केली. या सर्वांना तो पाच मिनिटं खुर्चीवर बसवून फोटो काढत असे. अशी शेकडो पोर्ट्रेट त्याने केली आहेत. थोडक्यात, त्याच्या कलेला थकणं किंवा शांत बसणं माहीत नव्हतं. तो आधाशाप्रमाणे काम करत असे. वयाच्या ५८व्या वर्षी त्याच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली. त्यातून तो पुन्हा बरा झालाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्या रुग्णालयावर खटला भरला. उपचारांत हलगर्जी केल्याचा आरोप केला, पण प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटविण्यात आलं. काही दिवसांत तो मरण पावला.

अवघ्या ५८-५९ वर्षांच्या कालावधीत त्याने एखाद्या झंझावाताप्रमाणे अमेरिकी चित्रकलाविश्व पालटून टाकलं. बस्कीयातसारख्या रस्त्यावर उभं राहून ग्राफिटी चित्रं काढणाऱ्या चित्रकाराला त्याने प्रतिष्ठा मिळवून दिली आणि त्याची ही चित्रं लाखो डॉलर्सना विकली जाऊ लागली. डेव्हिड साल, जास्पर जोन्स अशा कितीतरी नव्या प्रयोगशील चित्रकारांना त्याने स्टुडिओ आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. चित्रकरांनाही अँडी वॉरहॉलने सेलिब्रेटी बनवलं आणि तो स्वत:ही सेलिब्रेटी ठरला. जी माणसं कधीही कलादालनांत गेली नव्हती, ती वॉरहॉलमुळे जाऊ लागली.

लीन गोल्डस्मिथने त्याला जेव्हा ‘द प्रिन्स’ या चित्राचं काम करायला सांगितलं, तेव्हा त्याने त्याचं पोर्ट्रेट केलं. ‘वेल्वेट अन्डरग्राऊंड’ नावाचा ब्रँड त्याने काढला, जो त्याच्या इतकाच गाजला. मिडास राजाप्रमाणे त्याने ज्याला ज्याला स्पर्श केला ती गोष्ट बेस्टसेलर ठरली, क्रांतिकारी ठरली. त्याने कलेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि स्वत:ही लोकप्रिय झाला.

तो जिवंतपणीच दंतकथा झाला होता. १९२८ साली रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे वॉरहॉलचा जन्म झाल्यानंतर त्याचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. तो आणि त्याचा भाऊ दोघांनाही लहानपणापासूनच कलेतील विविध प्रयोगांची आवड होती. घरची परिस्थिती गरीब, वडील कामगार आणि आई घरकामगार. तेरा-चौदाव्या वर्षी वडील वारल्यामुळे दोन भावंडांना शाळेतून काढण्यात आले. पण घरकाम करून आईने अँडीचं शिक्षण सुरू ठेवलं, त्याला मागेल ते दिलं. अगदी कॅमेरासारखी महागडी गोष्टदेखील. अगदी लहान असताना तो सांगायचा की, मला फिल्ममेकर व्हायचं आहे. उत्तम कॉलेजमधून त्याचं कलाशिक्षण झालं. वयाच्या वीस-एकविसाव्या वर्षीच तो सरळ न्यू यॉर्कला आला. मित्रांच्या मित्रांची ओळख सांगत ते ज्या भाडेतत्त्वावरील घरात राहत होते, त्याच घरात राहत हळूहळू त्याने काम सुरू केले.

एका शूजच्या कंपनीसाठी चित्रं काढली. खिडक्यांमध्ये ज्या रचना मांडतात ते काम म्हणजेच ‘विंडो सेटिंग’ केलं. वर्तमानपत्रांत, मासिकांत रेखाटन करण्याची कामं मिळवली. काम मागण्यात कधीच त्याला संकोच वाटत नसे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असल्यामुळे एकच बेलबॉटम आणि जॅकेट घालत असे. एकदा तो एका आर्ट डायरेक्टरला पोर्टफोलिओ दाखवत होता तेव्हा त्यातून चक्क झुरळ निघालं. तिने दया येऊन त्याला काम दिलं. तो अनेकांची चित्र काढायचा. विशेषत: नग्न पुरुषांची किंवा मुलांची. अँडी जाईल तिथे लोकप्रिय होत असे. त्याची चित्रं खूप आखीव-रेखीव नव्हती पण त्याच्याबरोबर काम केलेले आर्ट डायरेक्टर सांगतात की, त्याच्या प्रत्येक कलाकृतीत त्याचं व्यक्तिमत्त्व डोकावत असे. अगदी चपला, बूट यांतही. अँडीची रेषा बारीक पेनने काढलेली आणि सुखद होती.

दर आठवड्याला आलेली पत्रं, जमवलेल्या वस्तू यांचा संग्रह तो एका बॉक्समध्ये करत असे आणि त्यावर आकडा टाकत असे. असे जवळपास सहाशे ते साडेसहाशे बॉक्स त्याने जमवले होते. त्याच्या मृत्यूनंतर पिटर्सबर्ग येथे त्याचं म्युझियम झालं. तिथे या गोष्टी ठेवल्या आहेत. सुरुवातीला भाड्याच्या खोलीत ते ठेवणे शक्य नव्हतं. पण हळूहळू त्याला चित्रांमधून पैसा मिळू लागला आणि त्याने मोठा स्टुडिओ घेतला. त्याला ‘फॅक्टरी’ असं नाव दिलं.

वॉरहॉल खरा लोकप्रिय झाला तो त्याच्या चित्रकलेच्या शोधातून. एका पार्टीत त्याने अनेकांना विचारलं की, अशी कोणती कला आहे की जी खूप लोकांपर्यंत पोहोचेल. एक बाई म्हणाली की, तू मला ५० डॉलर्स दिलेस तर मी सांगते. त्याने पन्नास डॉलर्स दिल्यावर ती म्हणाली की, ‘समथिंग लाइक ब्रिलो बॉक्स’. ती प्रत्येकाला आपलीशी वाटली पाहिजे. ब्रिलो बॉक्समध्ये तेव्हा साबणाच्या वड्या येत. तो बॉक्स घरोघरी असे. अँडी वॉरहॉलच्या डोक्यात कल्पना आली. ब्रिलो बॉक्सचंच चित्र काढलं तर… हा त्याच्यातला पहिला स्पार्क होता. ज्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. सुरुवातीला त्याने ब्रिलो बॉक्स तसंच कॅम्पबेल सूपचं वेष्टन यांची चित्र काढली. यात करण्यासारखं काहीच नव्हतं. जे आहे त्याचं छायाचित्र टिपायचं. झेरॉक्स काढल्यासारखं ते रंगवायचं बस्स. या प्रकारे त्याने ३२ कॅम्पबेल सूपचा संग्रह आणि कोकाकोलाच्या बाटल्यांचं चित्र काढलं. कॅम्पबेल सूपच्या ३२ झाकणांचं चित्र मोमा इथे लावलं आहे. तिथे लिहिलं आहे ‘पॉप आर्ट’. यात चित्रकला कुठे आहे, असं लोक विचारत होते. अँडी वॉरहॉलचं तेच म्हणणं होतं की, चित्रकलेला महत्त्व नाहीच, महत्त्व आहे ते तुम्ही काय पाहता याला आणि त्याच्या सादरीकरणाला.

त्याची सिनेमाची कल्पना पूर्ण वेगळी होती. त्याने न्यू एम्पायर इमारतीचं नऊ तास चित्रण केलं. त्याच्यावरचा प्रकाश परावर्तित होताना केवळ त्या इमारतीचे रंग थोडे बदलतात इतकंच. कुठलीही गोष्ट आपण नऊ तास पाहू शकत नाही. वाचणारे काही वेळा कादंबरी वाचतात. पण एखादा दीर्घ सिनेमाही दोन-तीन भागांत दाखवला जातो आणि कुठलाही सिनेमा हा नऊ तास लांबीचा नसतो. एक प्रकारे अँडी वॉरहॉलची जी काही कलाकृती होती, ती संकल्पनात्मक होती.

अमेरिकन चित्रकलेत त्याने इतकी क्रांती घडवली की, डी कुनिंगसारखा चित्रकार त्याला म्हणाला होता की, तू चित्रकला नष्ट करत आहेस. हे खरचं होतं. चित्रकलेची निरर्थकता अँडी वॉरहॉलने दाखवून दिली. त्याने चित्रकला नष्ट केली नाही पण चित्रकलेला नवा क्रांतिकारक आयाम दिला. अँडी वॉरहॉलने विपुल प्रमाणात डॉक्युमेंटेशन करून ठेवल्यामुळे पिटर्सबर्ग इथल्या त्याच्या संग्रहालयात लाखभर ‘ऑब्जेक्ट्स’ आहेत. गॉपनिकने चारित्रासाठी त्यांचा कसून अभ्यास केला. म्हणूनच पुस्तक तपशिलाने समृद्ध झाले आहे.

वॉरहॉल.. अ लाइफ ॲज आर्ट

लेखक:- ब्लेक गॉपनिक

पृष्ठसंख्या:-९७६ पाने

किंमत:- ८९७ रुपये

हेही वाचा

* सोफिया कपोला ही आपल्या वडिलांचा वारसा चालविणारी चित्रकर्ती. उच्चभ्रूंच्या जगण्यातील गुन्हेगारी आणि विविध विषयांवरील तिच्या चित्रपटांचा दर्शक जगभर आहे. न्यू यॉर्करच्या गेल्या आठवडयाच्या अंकातील हे ‘प्रोफाइल’. न्यू यॉर्करचे व्यक्तिशब्दचित्र एखाद्याविषयी किती सखोल माहिती देते, याचा अनुभव घेण्यासाठी.

https://shorturl.at/tvPX5

* मॅडलिन ग्रे नावाची ऑस्ट्रेलियातील लेखिका करोनापूर्व काळात ब्रिटनमध्ये पीएचडी करीत होती. टाळेबंदी लागल्यानंतरच्या शिक्षणाबाबतच्या आर्थिक अडचणीत तिने पुन्हा मायदेशाची वाट धरली. तिथे एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी धरली. या दोन वर्षांच्या पुस्तक दुकानातील नोकरीचा आणि त्यानिमित्ताने वेतनासाठी केलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा रंजक इतिहास या दुपानी लेखात सापडतो. या काळात ग्रे यांनी लिहिलेली कादंबरी ‘ग्रीन डॉट’ सध्या गाजत आहे.

https://shorturl.at/agBHI

* इलेक्ट्रिक लिटरेचर नावाच्या संकेतस्थळावर दर आठवडयाला एक ताजी कथा दिली जाते. नव्या आलेल्या पुस्तकातील किंवा नव्या गाजत्या लेखकाला प्रोत्साहन म्हणून. त्यातली ही ताजी कथा. या कथांचे अर्काइव्ह पाहिल्यास कित्येक आठवडे ते वाचायला अपुरे पडतील.

https://shorturl.at/iyzQY

Story img Loader