डॉ. रवींद्र उटगीकर, व्यवस्थापनतज्ज्ञ व उद्याोग क्षेत्रात तीन दशके कार्यरत
‘ओन्ली पर्सन यू आर डेस्टाइन्ड टू बिकम इज द पर्सन यू डिसाइड टू बी.’ अॅडम ग्रँट यांचं ‘हिडन पोटेन्शियल : द सायन्स ऑफ अचीव्हिंग ग्रेटर थिंग्ज’ हे पुस्तक वाचताना या वचनाची आठवण होते. स्वत:लाच मर्यादांचे बांध घालून घेण्याऐवजी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर एक पाऊल पुढे टाकण्याची क्षमता आपण प्रत्येक जण अंगी बाणवू शकतो, हा आत्मविश्वास हे पुस्तक देतं; नव्हे त्यासाठीचा मार्गही दाखवतं.
प्रेरणादायी विचार देणारी पुस्तकं, व्याख्यानं यांचा भडिमार होत असलेल्या जगामध्ये आपण सध्या राहतो. त्यामुळे ग्रँट यांनी त्यापेक्षा वेगळं काय सांगितलं असेल, असा प्रश्न आपल्याला पुढे जाण्याआधी पडू शकतो. परंतु पुस्तकाच्या नावातच दडलेल्या त्याच्या स्वरूपानुसार, हे पुस्तक तुम्हाला यशस्वी होण्याचा नव्हे, तर आपल्या क्षमतांचा पूर्णांशानं विकास करण्याचा मार्ग दाखवणारं आहे आणि त्याचेही तात्त्विक बैठक असणारे मंत्र नव्हेत, तर वैज्ञानिक पाया असणारं तंत्र लेखकानं सांगितलं आहे. अॅडम ग्रँट हे ख्यातकीर्त संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेतील व्हार्टन स्कूलमधील सर्वोत्तम प्राध्यापक म्हणून सलग सात वर्षं ते गौरवले गेले आहेत. लेखक आणि व्याख्याते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. ‘थिंक अगेन’ आणि ‘ओरिजिनल्स’ या त्यांच्या आधीच्या पुस्तकांची गणना जगभरातील सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीमध्ये केली जाते.
परंतु, या पुस्तकात त्यांनी मांडलेल्या विचारांना त्यांच्या पूर्वानुभवातून आलेली वेगळी धारही आहे. ग्रँट यांची स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नव्हती. शिक्षण घेताना एका पर्यटन कंपनीसाठी प्रचाराचं काम करताना त्यांना आठवडाभरात एकही नवा ग्राहक मिळवता आला नव्हता. परंतु संवादकौशल्यातल्या त्या मर्यादांवर मात करताना हेच ग्रँट आता टेडच्या (टेक्नॉलॉजी, एंटरटेन्मेंट, डिझाइन) मंचावरील प्रख्यात व्याख्याते झाले आहेत. सुरुवातीचं अपयश मनावर घेतलं असतं तर त्यांनी श्रोत्यांना सामोरं जाणं कदाचित फार पूर्वीच सोडलं असतं. त्यामुळे, तुम्ही किती उंचीचं शिखर गाठलं आहे, यापेक्षा त्या शिखरापर्यंत किती वाटचाल करू शकला आहात, हे महत्त्वाचं असल्याकडे ते लक्ष वेधतात. आकांक्षांना नवं अवकाश कसं द्यावं आणि अपेक्षापूर्ती कशी करावी, याची नवी चौकट ग्रँट यांनी ‘हिडन पोटेन्शियल’मध्ये मांडली आहे. विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंत, घरच्या मैदानापासून ऑलिम्पिकपर्यंत आणि पाताळापासून अंतराळापर्यंत प्रत्येक विषय हाताळताना केलेला मर्मभेद आणि त्याला दिलेली अचाट पुराव्यांची जोड यांची घट्ट वीण बांधण्यातून हे पुस्तक भलतेच प्रभावी होते.
आपण किती कष्टपूर्वक काम करतो, यापेक्षा किती उत्कटतेनं ज्ञानग्रहण करतो, यावर आपल्या प्रगतीचा पाया रचला जातो. आपली प्रतिभा नव्हे, तर चारित्र्य त्याचा मार्ग दाखवते, याची तर्कसिद्ध मांडणी ते करतात. त्याची पायाभरणी कशी करावी, त्यासाठीची कौशल्यं कशी विकसित करावीत आणि त्या दिशेने स्वत:ला उद्याुक्त कसं करावं, याच्या युक्त्या ते सांगतात. वलयांकित व्यक्तिमत्त्वांनी आयुष्यात असाध्य ते साध्य कसं करून दाखवलं, याच्या भाकडकथा सांगणारं हे पुस्तक नाही. परंतु आयुष्यात आपल्या परीने आवाक्याबाहेरची वाटणारी कामगिरी कशी करून दाखवता येऊ शकते, हे विचारबीज मात्र ते पेरतं. त्यासाठीचे व्यवहार्य आणि वैचारिक कसोट्यांवर पारखलेले मार्ग दाखवतं. आपल्या क्षमतांचा पूर्णांशानं विकास करण्यासाठीच्या तीन महत्त्वाच्या कसोट्यांची चर्चा ग्रँट यांनी पुस्तकामध्ये केली आहे. १. चारित्र्यबांधणी : तुमच्या सहजवृत्तींपेक्षा तुमच्या मूल्यांना प्राधान्य देण्याची क्षमता म्हणजे चारित्र्य, अशी व्याख्या लेखक करतात. जेव्हा कुणी आपली चालढकलू वृत्ती बाजूला ठेवून आपल्या माणसासाठी वेळ गाठण्याची धडपड करतो; एखादा लाजाळू आणि अंतर्मुख माणूसदेखील अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, तेव्हा त्याची चारित्र्यबांधणी झाली आहे, असं समजावं, असं लेखक म्हणतात. २. आधार : थकलेल्या, कंटाळलेल्या किंवा शंकेने घेरलेल्या क्षणी जेव्हा आपली पावलं थिजण्याची चिन्हं दिसू लागतात, तेव्हा कोणाच्या तरी आधाराची गरज निर्माण होते. परंतु इतरांसाठी आधार होणं हादेखील अशा स्थितीतला मार्ग असू शकतो, याकडे ग्रँट लक्ष वेधतात. ३. व्यवस्था : व्यवस्थात्मक रूपातले पूर्वग्रह हे दुर्लक्षित किंवा वंचित घटकांपुढे आणखी अडसर उभारणारे असतात. त्यासाठी तुम्ही परीक्षांमध्ये किती यश मिळवले आहे, याच्या जोडीला तुमच्या यशाचा आलेख कसा आहे, हा निकषही महत्त्वाचा ठरू शकतो, असं ग्रँट सांगतात.
या कसोट्यांना उतरण्याची तयारी कशी करावी, याचं मार्गदर्शनही पुस्तकात केलं आहे. स्वत:च्या मर्यादांवर मात करावी लागेल, अशा परिस्थितीत जाऊन पाहा. परिपूर्णतेच्या ध्यासाने कामाचा आवाका वाढत नसतो, त्यासाठी जोखीम पत्करण्याची, चुका करून शिकण्याची सवय विद्यार्थीदशेतच लागली पाहिजे, असं ते सुचवतात. कर्तव्यनिष्ठ वारस होण्यापेक्षा चांगले पूर्वज होण्याला महत्त्व द्या, असा ग्रँट यांचा सल्ला याअनुषंगाने लक्षणीयरीत्या महत्त्वाचा आहे. आपण आपल्या पालकांना अभिमानास्पद काम करण्यासाठी नेहमी धडपडतो. परंतु खरं तर आपल्या मुलांना अभिमान वाटावा, असं काहीतरी आपण करायला हवं. तीच प्रत्येक पिढीची जबाबदारी असावी, असा वेगळा दृष्टिकोन ते वाचकांपुढे ठेवतात. ‘हिडन पोटेन्शियल’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकामधल्या छुप्या क्षमतेला वाव कसा मिळू शकतो, याची गुरुकिल्ली आहे. कुठे स्वत:भोवती, तर कुठे इतरांभोवती विषय गुंफताना ग्रँट यांनी क्षमताविकास आणि यशाचा मार्ग अनुसरण्याचे तंत्र उलगडून आपल्यापुढे ठेवले आहे. त्यांची कथनशैली साधीसोपी आहे आणि वैयक्तिक अनुभवांची गुंफण प्रेरणादायी आहे. तेव्हा, स्वत:मध्ये लपलेल्या आपल्याच क्षमतेचे पूर्ण रूप पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायलाच हवं.
हेही वाचा...
‘बुकर’च्या लघुयादीतील पुस्तकांविषयी ‘बुकरायण’ हे नैमित्तिक सदर याच पानावर सुरू असताना हा ‘वाचनबोनस’. गार्डियनने गेल्या आठवड्यात उपलब्ध करून दिलेला. लघुयादीत झळकलेल्या सहा पुस्तकांच्या लेखकांनी आपली कादंबरी सुचण्यापासून लिहिण्यापर्यंतच्या प्रेरणांबाबत टिपणे दिली आहेत; जी इथे वाचता येतील :
https:// shorturl. at/ JSYuu
जॉन स्टाईनबेक हा ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीमुळे जगभर मान्यता पावला. ही कादंबरी कित्येक भाषांमध्ये आजही नव्याने अनुवादित होते आहे. पण ही विस्थापितांच्या जगण्याची कहाणी त्याने कुणा दुसऱ्याच होतकरू कादंबरीकाराच्या अभ्यासनोंदीतून उभारली असल्याचा शोध नुकताच एका ताज्या पुस्तकाने समोर आणला! गेल्या आठवड्यापासून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. या चर्चेचा एक मासला :
https:// shorturl. at/ iwq7 L
हारुकी मुराकामीच्या नव्या (इंग्रजीत अनुवादित) कादंबरीचे प्रकाशन ही पुढल्या महिन्यात साहित्यजगतातील मोठी घडामोड ठरणार आहे. त्याआधी त्याच्या कादंबऱ्या वाचकाला काय सांगू पाहतात, त्याविषयी मुराकामीच्याच मित्राने केलेली लघुचर्चा इथे वाचता येईल :
https:// shorturl. at/ W5 LCm
ravi.utgikar@gmail.com