रुपेश मडकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साथीच्या रोगांच्या इतिहासापासून, त्या स्मृतींपासून काय शिकणे गरजेचे होते याचा शोध घेणारम्य़ा पुस्तकाची ही ओळख..

आपल्याला प्लेग बऱ्यापैकी माहीत असतो परंतु मानमोडीची साथ भारतात, महाराष्ट्रात कधीतरी आली होती हे आपण कधीही ऐकले व वाचलेले नसते आणि म्हणूनच भारतासह जगास करोनाच्या साथीने बेसावध पकडले. ते कसे, हे समजून घेण्यासाठी ‘द एज ऑफ पँडेमिक्स १८१७-१९२० : हाऊ दे शेप्ड इंडिया अँड द वल्र्ड’  हे चिन्मय तुंबे लिखित पुस्तक ‘वाचलेच पाहिजे’ अशा पुस्तकांच्या यादीतील ठरते! एवढीच पार्श्वभूमी असती तर या पुस्तकाबद्दल लिहिण्याची मी तसदी घेतली नसती, परंतु मंकीपॉक्सचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळून येत आहेत. टोमॅटो फ्लूचे रुग्ण केरळमध्ये आढळून आले, आणि वेस्ट नाईल विषाणूची चर्चा केरळमध्ये सुरू आहे. तर ज्या करोनाचा अध्याय संपला असे समजून आत्ता कुठे आयुष्य पूर्वपदावर येत आहे त्याचवेळी करोनाच्या ‘बी४’ आणि ‘बी५’ या आवृत्त्या भारतात आढळत आहेत. एकविसाव्या शतकात आपण तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीवरच असताना या शतकातील तिसऱ्या रोगाच्या जागतिक महासाथीची (पँडेमिक) घोषणा करावी लागते की काय अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) असताना हे पुस्तक समजावून घेणे अतिशय महत्त्वाचे वाटते. या पुस्तकात चिन्मय तुंबे यांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जागतिक साथीचे जे रोग आले त्यांचा इतिहास रंजकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या महासाथींनी आजच्या जगाला, विशेषत: भारताला आकार देण्यात  महत्त्वाची भूमिका कशी पार पाडली यावरही प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातून विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच विविध रोगांच्या कारणांचा शोध घेत असताना वैद्यकीय विज्ञानाची व त्यातल्या शाखा-उपशाखांची प्रगती कशी झाली हे समजते. नुसता इतिहास सांगून हे पुस्तक थांबत नाही तर शासन-प्रशासन व समाज म्हणून, मागील महासाथींची सामूहिक स्मृती नष्ट झाल्यामुळे करोना साथीला सामोरे जाताना कशा अनेक चुका झाल्या, ज्या टाळता येण्याजोग्या होत्या याची सोदाहरण उजळणी लेखक करतो. बदलते हवामान, जागतिक तापमान वाढ व अन्य बाबींचा विचार करता करोना ही जागतिक साथ शेवटची नसेल हे स्पष्टच आहे. त्यामुळे या माहासाथींनी जी शिकवण आपल्याला दिली त्याची सामूहिक स्मृती जतन करणे हे येणाऱ्या महासाथींना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असल्याचे तुंबे दाखवून देतात. सन १८१७  ते १९२० हा सुमारे शंभर वर्षांचा कालखंड जागतिक महासाथींचा कालखंड होता. या काळात साथीच्या रोगांनी जगभरातील सात कोटी लोकांचा बळी घेतला. त्यामध्ये चार कोटी लोक एकटय़ा भारतातील होते! कॉलरा (पटकी), प्लेग व एन्फ्लूएंझा या महासाथींनी घेतलेल्या बळींची संख्या ही विसाव्या शतकातील दोन्ही महायुद्धांत गेलेल्या बळींच्या एकत्रित संख्येइतकी भरते. पण शालेय वा विद्यापीठीय स्तरावर या दोन्ही महायुद्धांचा अथवा अन्य युद्धांचा इतिहास, राजकीय इतिहास जसा शिकवला गेला तसा महासाथींचा इतिहास, त्यातून झालेली उलथापालथ, तत्कालीन समाज या साथींना कसा सामोरा गेला, प्रशासनाने या साथींना कसे हाताळले हे कोणत्याही स्तरावर सांगितले न गेल्यामुळे करोनाची साथ आली तेव्हा आपण याला नेमके कसे सामोरे जावे हे न कळून एक भांबावलेपण आपण अनुभवले, असे लेखक नमूद करतात. हे पुस्तक वाचत असताना करोनाकाळातील अनुभव व एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील कॉलरा (पटकी), प्लेग व एन्फ्लूएंझा काळातील समाजाचे अनुभव यामध्ये गुणात्मक फरक फार जाणवत नाही. हे अनुभव इतके एकसारखे आढळतात की, इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काय, ते लक्षात येते.

एकोणिसाव्या शतकाच्या आधीही सहाव्या व चौदाव्या शतकात महासाथ म्हणता येईल एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्लेगची साथ आली होती. त्या दोन्ही साथींत युरोपची मोठी हानी झाली. परंतु तिसऱ्या वेळी मात्र आशिया, त्यातही भारतीय उपखंड या साथीचे केंद्र राहिला. किंबहुना एकोणिसाव्या-विसाव्या शतकात ज्या महासाथी आल्या त्यात भारतीय उपखंडाची सर्वात जास्त हानी झाली. या कालखंडात भारत साम्राज्यवादी युरोपीय देशाच्या अधिपत्याखाली असल्याने, व यावेळी युरोपमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्यामुळे (तसेच इतिहासलेखनात पाश्चिमात्यांचा प्रभाव असल्यामुळे) या काळाचे इतिहासलेखन युरोपकेंद्री राहिले. त्यामुळे प्लेगच्या पहिल्या दोन साथींबद्दल मोठय़ा प्रमाणात लिहिले-बोलले गेले. या साथींची युरोपची सामूहिक स्मृती टिकून राहिली. भारतीय उपखंडातील साथींच्या रोगांचा इतिहास मात्र  दुर्लक्षिला गेला. पश्चिमेकडून हे होणे समजू शकते, परंतु आपल्या सामूहिक विसरभोळेपणाचे काय? हा महत्त्वाचा प्रश्न लेखक उपस्थित करतात. साम्राज्यवाद, वसाहतवाद त्यातून औद्योगिक क्रांती यामुळे संपर्क/प्रवास साधनात प्रगती झाल्यामुळे जगातील दळणवळण मोठय़ा प्रमाणात वाढले, परिणामी रोगांचा प्रसारही वाढला. अमेरिकेच्या प्रदेशातून सिफिलीस प्रथम युरोपमध्ये व नंतर आफ्रिका व आशियाकडे पसरला. तर युरोपकडून देवीच्या रोगाची (स्मॉलपॉक्स) संहारक भेट अमेरिकन आदिवासींना मिळाली.  कॉलरा (पटकी) हा सन १८१७ पूर्वी भारतीय उपखंडात स्थानिक (एन्डेमिक) रोग होता, त्यात उत्परिवर्तन होऊन तो अन्य देशात पसरला.

‘बहुत बडे डाक्टरमियाँ हैजा की सूरत देखते है तो उनकी रूह काप उठती है’- हकीम सय्यद आमलदार हुसेन यांचे हे १८८३ मधील कॉलरा (पटकी) बद्दलचे वाक्य तत्कालीन परिस्थिती कशी होती हे स्पष्ट करण्यास पुरेसे ठरावे! वैद्यकीय सुविधा फारशा नाहीत, हा आजार कशामुळे पसरतो याबद्दल फारसे ज्ञानही नाही, हीच स्थिती ब्रिटिश व भारतीय दोघांची होती. मात्र स्वच्छता व मोकळय़ा घरांच्या अभावी भारतीय जनता मोठय़ा प्रमाणात भरडली गेली. डेविड अर्नोल्ड यांच्या मते भारतीय उपखंडात या साथीने एक कोटी २० लाख दगावले. यावर प्रार्थना ( Prayers), रेचके  आणि अफू याचा उतारा म्हणून भारतात वापर करण्यात येत होता.

सन १८१७ नंतर जगात मोठी स्थित्यंतरे घडली फ्रान्स, ब्रिटन, रशिया आदी साम्राज्यवादी युरोपियन शक्तींना इटली व जर्मनी हे एकीकरणानंतर सामील झाल्याने साम्राज्यवादी शक्तींची वसाहतींसाठीची स्पर्धा आणखी वाढली. यात मेईजी क्रांतीनंतर जपानही सामील झाला. आफ्रिका आणि आशियामधील उरले-सुरले स्वतंत्र प्रदेश ताब्यात घेण्यात आले. सततची युद्धे, दुष्काळ यांमुळे चीन अशक्त झाले. ऑटोमन व पर्शियन साम्राज्ये लयास गेली. ब्रिटनने भारतावरील आपले नियंत्रण मजबूत केले. औद्योगिक क्रांतीची पहिली लाट वस्त्रोद्योगात आली, ती ब्रिटनमध्ये. दुसरी लाट रसायने, स्टील, पेट्रोलियम पदार्थ यांची, तिने शास्त्रीय ज्ञानात भर पाडली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी वस्तू आणि माणसांच्या गतीमुळे जागतिकीकरण सुरू झाले. अमेरिकेची लोकसंख्या या काळात दहापट वाढली. शहरे वाढली. दाटीवाटी व झोपडपट्टीही वाढली. भांडवल व राष्ट्रवादाचा प्रसार झाला. अर्थात पहिले महायुद्ध व रशियन राज्यक्रांतीने याला काहीशी खीळ घातली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉलरा जवळपास शतकभर घोंगावत होता. ठिकठिकाणी त्याचा उद्रेक होत होता. पातळ शौचास होणे या त्याच्या मुख्य लक्षणाने समाज हादरून गेला होता. कॉलरा हे मोठे रहस्य बनले होते. एन्फ्लूएंझा (म्हणजेच ‘मानमोडी’)  हा कॉलरापेक्षा जास्त घातक होता तरी, पटकीबद्दल सर्वात जास्त चर्चा झालेली दिसते. एकूण सहा वेळा पटकीची लाट आल्याचे नोंदवले आहे. या सर्व लाटांचे उगमस्थान भारत होते असे मानले गेले. भारतीयांप्रमाणे भारतातील ब्रिटिशांनासुद्धा याचा मोठा फटका बसला. सन १८५७ च्या  उठावावेळी सैन्याचा प्रमुख असणारा जनरल जँसन याचा मृत्यू, त्याचा उत्तराधिकारी जनरल बर्नाड,  थॉमस मनरो (मुंबई प्रांतात रायतवारी लागू होण्यामागे हा महत्त्वाचा), जॉर्ज वॉर्ड हे मद्रास प्रांताचे गव्हर्नर, ऑलिव्ह फर्गसन ही मुंबई प्रांताच्या गव्हर्नरची पत्नी.. हेही कॉलऱ्याचे बळी. सन १८१७ ते १८५७ या काळात नऊ हजार ब्रिटिश सैनिकांचा कॉलराबळी पडला. सन १८५७ चा उठावावेळचा कॉलरा उद्रेक त्याच्या राजकीय संबंधामुळे महत्त्वाचा, परंतु तितकाच दुर्लक्षित राहिलेला विषय! चपातीचे वितरण हे उठावाशी संबंधित नसून कॉलराच्या आगमनाची सूचना देण्यासाठी होते, तसेच ज्या भागात या चपात्या जात तेथे उठाव होत.  ‘ब्रिटिशांनी एतद्देशीय धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ केली, त्यामुळे या रोगाची लाट पसरली. याला जबाबदार इंग्रज म्हणून त्यांच्या विरुद्ध उठाव’ असा याचा इंग्रजांनी संबंध लावला. याच वेळी ब्रिटिशांनी मृत्यूची नोंद ठेवण्यासाठी उपाय केले. अर्थात, आधी सैन्यासाठी नंतर सर्वासाठी. यातून कळते ते तीन लाख मृत्यू दरवर्षी कॉलऱ्याने होत. सन १९१९ नंतर दुष्काळ कमी होत गेले तसे कॉलरा-मृत्यू घटत गेले. कॉलरा आणि अस्पृश्यतेची डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली आठवण या पुस्तकात लेखकाने दिली आहे, ती मुळातूनच वाचण्यासारखी. वाढत्या मृत्यूमुळे प्रार्थनांची तीव्रताही वाढली. त्यातून कॉलरा या रोगाशी संबंधित देवी-देवतांचा उगम झालेला दिसतो. ओलाबीबी बंगालमध्ये, शीतलादेवी पश्चिम भारतात, तर बुंदेलखंडमध्ये हर्दोललाला यांना प्रार्थना केल्या जाऊ लागल्या. कॉलरा साथीमुळे व्यापार, धार्मिक यात्रा, विलगीकरण पद्धती यामध्ये अनेक बदल झाले. आंतरराष्ट्रीय स्वच्छता-विषयक परिषदांचे (सॅनिटरी कॉन्फरन्सेस) यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातूनच पुढे जागतिक आरोग्य संघटना निर्माण झाली. अनेक भागांत दंगली झाल्या. उठाव झाले. वैद्यकीय वाद-विवाद, वैद्यकीय शोध असे अनेक बदल कॉलरामुळे घडून आले. कलकत्त्यात (तत्कालीन नाव) दाटीवाटीच्या वस्त्यांची रचना लक्षात घेऊन शहराची सुधारणा करण्याचे ठरले. त्यासाठी लॉटरी समिती निर्माण करण्यात आली. त्यातून पैसा उभा करण्यात आला. लंडनपासून प्रेरणा घेऊन हे कार्य करण्यात आले. तरी कॉलरा मात्र राहिला. पुढे नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यावर त्यात काही सुधारणा झाली.

प्लेगची साथ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी चीनमधून हाँगकाँग मार्गे मुंबई बंदरात दाखल झाली. प्लेगची गाठ, पाठोपाठ मृत्यू! तत्कालीन मुंबई व आसपासच्या परिसरात दहशत निर्माण झाली. लोकांनी मुंबईतून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, पण त्यातून ही साथ अन्य भागांत पसरली. चौदाव्या शतकातील प्लेगच्या ब्रिटिशांच्या स्मृती जागृत असल्यामुळे व हा आजार पुन्हा युरोपमध्ये पसरू नये म्हणून ब्रिटिशांनी कडक उपाययोजना अमलात आणण्यास सुरुवात केली. दुसरे कारण म्हणजे साथीच्या रोगांना समोर करून ब्रिटिशांवर टीका करण्याची संधी अन्य साम्राज्यवादी सत्तांना मिळत होती म्हणूनही ब्रिटिशांनी उपाययोजनांना प्राधान्य दिले. उंदीर व प्लेग यांचा संबंध तेव्हा पुरेसा स्पष्ट नसल्याने, विविध प्रकारचे समज-गैरसमज निर्माण होत होते व त्या प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात होत्या. यानंतर हाफकिन यांनी लस शोधली तरी ती टोचून घेण्यासाठी लोक तयार नव्हते. त्यामुळे प्लेगचा प्रसार होत राहिला. इंग्रजांच्या जाचक उपाययोजनांना विरोध केल्यामुळे, त्याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे टिळकांना खटल्यास सामोरे जावे लागले. या प्रसंगानंतर टिळक राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले; तर प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची शुश्रूषा करत असताना सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. मुंबई हे ब्रिटिशांचे महत्त्वाचे ठाणे असल्यामुळे ब्रिटिशांनी तत्कालीन मुंबईमधील सांडपाण्याची व्यवस्था नसलेली, दलदल असलेली भारतीयांची राहण्याची ठिकाणे सुधारण्यासाठी आराखडा बनवला (कारण येथून रोग ब्रिटिश वा युरोपियनांच्या वस्तीच्या भागात पसरू शकतात, किंबहुना असेच होते असा त्यांचा ठाम समज होता) त्यातून नव्या चाळी निर्माण करण्यात आल्या. पुढे डॉ. आंबेडकर यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या सुधारित वसाहतींचा लाभ झाला. मुंबईतून स्थलांतर व वाढत्या मृत्युदरामुळे कामगार मिळणे कठीण झाले. त्यातून कामगारांची सौदाक्षमता (मोबदलावाढ मागण्याची क्षमता) वाढली व भांडवलदारांना कामगारांचे ऐकावे लागले.

सन १९१८ ची एन्फ्लूएंझा साथ प्लेग व कॉलरापेक्षा घातक ठरली. अत्यंत कमी काळात या साथीने लोक दगावले. बॉम्बे फ्लू या नावानेही व पुढे स्पॅनिश फ्लू (अर्थात स्पेनचा याच्याशी संबंध नव्हता तरीही) ही साथ ओळखली गेली. या रोगाची लागण झाल्यास प्रचंड अशक्तपणा येत असे, माणूस झोपून राही व त्यातच त्याचा मृत्यू होत असे, म्हणून महाराष्ट्रातील तत्कालीन समाजात ‘मानमोडी’ हे नाव प्रचलित झाले. प्लेग व मानमोडी या दोन्हीच्या आठवणी लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रां’मध्ये आहेत. लक्ष्मीबाई टिळकांच्या मुलीला प्लेगची लागण झाली होती व त्या आपल्या मुलीसह विलगीकरणात राहिल्या होत्या. त्याच्या भयानक आठवणी मुळातूनच वाचाव्यात. मानमोडी आजारही त्यांनी जवळून पाहिला व तत्कालीन परिस्थितीचे वर्णन स्मृतीचित्रांमध्ये केले.

तुंबे यांनीही तत्कालीन परिस्थितीतील हतबलता या पुस्तकात अधोरेखित केली आहे. या साथीचा प्रसार भारताच्या पूर्व भागात तितकासा नव्हता. बळींची संख्या भारताच्या पश्चिम भागात जास्त राहिली. ते जगातील इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा जास्त होते. याचे कारण दुष्काळ व त्यामुळे झालेली अन्नधान्यांची भाववाढ हे होते असे लेखक सप्रमाण दाखवून देतात. ब्रिटिश वासाहतिक सत्ता पहिल्या महायुद्धात गुंतली होती व भारत ही वसाहत असल्यामुळे येथील सर्व यंत्रणा ब्रिटिशांनी युद्ध प्रयत्नात गुंतवली होती. रेल्वे सेवा त्यातच गुंतवल्यामुळे अन्नधान्याची वाहतूक प्रभावित झाली. परिणामी भाववाढ होण्यास आणखी चालना मिळाली. युद्धामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले होतेच.त्यात दुष्काळाने भर घातली. या सर्वाचा एकत्रित परिपाक म्हणजे पहिल्या महायुद्धात चार वर्षांत जेवढे मृत्यू झाले त्यापेक्षा जास्त मृत्यू काही महिन्यात एन्फ्लूएंझामुळे झाले. मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या नष्ट झाली. याचे प्रमाण म्हणजे सन १९२१ ची जनगणना! लोकसंख्यावाढीचा उणे दर आत्तापर्यंत फक्त याच जनगणनेत नोंदवला गेला. पंजाब प्रांतातून महायुद्धात मोठय़ा प्रमाणात सैन्य भारती झाली होती. सैनिकांची प्राणहानीसुद्धा पंजाबातून जास्त होती. त्यात या साथीच्या रोगाची व दुष्काळाची भर पडली. पंजाबच्या लोकसंख्येचे वितरणच बदलून गेले. त्यातूनच व्यवस्थेविरुद्धचा विरोध मोठय़ा प्रमाणात उफाळून आलेला दिसतो. जेव्हा आपण रौलेट कायदा, जालियनवाला बाग व  पंजाबमधील तत्कालीन घडामोडी अभ्यासत असतो तेव्हा त्यामध्ये लोकांच्या मनावर आघात करणाऱ्या साथीच्या रोगांचा आपण विचारच केलेला नसतो, हे लेखकाचे मत लक्षात घेण्यासारखे आहे.

नंतरच्या काळात प्रसिद्धीस आलेले अनेक नेते आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात साथीच्या काळातील सामाजिक कार्यातून करताना दिसतात. टिळकांचा उल्लेख झालाच, सरदार वल्लभभाई पटेल यांनीही या काळात अहमदाबादच्या पालिकेद्वारे आपत्ती निवारणाच्या कार्यात झोकून दिले होते. गांधीजी स्वत: एन्फ्लूएंझाच्या काळात आजारीच होते. या साथीत त्यांच्या स्नुषेचा मृत्यू झाला. प्लेगच्या साथीवेळी त्यांनी आफ्रिकेतील भारतीय लोकांसाठी कार्य केले. गलिच्छतेशी या साथीचा संबंध जोडल्यामुळे गांधीजींनी ‘‘स्वच्छता हीच ईश्वर सेवा’’ ही घोषणा दिली (साथीच्या रोगांच्या शिकवणीचा चष्मा मात्र आपण हरवला!). तत्कालीन मुंबई प्रांतातील सहकार चळवळीचे मूळसुद्धा या परिस्थितीत असल्याचे लेखकाने आकडेवारीसह स्पष्ट केले आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाचा ‘साथीचे रोग’ हा महत्त्वाचा प्रभाव टाकणारा घटक म्हणून पाहिला पाहिजे, हे लेखकाचे प्रतिपादन आहे. भारतातील स्थलांतराचा तुंबे यांचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी, करोनाकाळातील स्थलांतरितांचा प्रश्न आधीच्या साथरोग काळातील स्थलांतराचा संदर्भ लक्षात न घेतल्यामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्लेगच्या काळातील मुंबईतील गिरणी कामगारांनी केलेले स्थलांतर व करोनाकाळात पुन्हा मुंबईतूनच असंघटित कामगारांनी केलेले स्थलांतर- जेव्हा मध्यमवर्गीय जनता महाभारताचे पुनप्र्रक्षेपण पाहात होती- अशी इतिहासाची पुनरावृत्ती कशामुळे झाली, यावर लेखकाचे उत्तर – आपण विसरलो की ‘ते’ (जिवाणू/विषाणू) पुन्हा येतात!

द एज ऑफ पँडेमिक्स १८१७१९२० हाऊ दे शेप्ड इंडिया अँड द वर्ल्ड

लेखक : चिन्मय तुंबे

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया

पृष्ठे : २७१; किंमत : ५९९ रु.

लेखक औरंगाबादच्या शासकीय महाविद्यलयात इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.     

rupeshmadkar02@gmail.com