जेरी पिंटो यांची ही नवी कादंबरी जितकी एका बुजऱ्या पण वयपरत्वे बंडखोर तरुणाच्या ‘प्रौढ होण्या’विषयी, तितकीच ती मुंबईबद्दल आणि १९८० च्या दशकातल्या मानवी ऊर्जेविषयीही भरपूर सांगत राहाते. पण तिच्यातले ‘संदेश’ आपापल्या पातळीवरून घेता येतात..
अभिजीत ताम्हणे
दर तीन-चार पानांमधून उलगडणारा एक प्रसंग, असं गृहीत धरलं तरी शंभरेक प्रसंग या कादंबरीत आहेत. ते सारे युरी या मुख्य पात्राच्या आयुष्यातल्या पाचच वर्षांत घडणारे. याचं युरी हे नाव ऐकून अनेकजण त्याला विचारतात, ‘युरी गागारिनसारखं?’- पण यातून, युरी गागारिन हा १९६१ सालात पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला मानव मुंबईकरांना ज्या काळात सहज आठवत होता, त्या काळातला या मुंबईकर युरीचा जन्म असल्याचंही लक्षात येतं. साधारण १९८१ च्या सुमारास हा मुंबईचा युरी एल्फिन्स्टन महाविद्यालयात, दहावीच्या बऱ्यापैकी गुणांनुसार विज्ञानशाखेत प्रवेश घेतो.. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून कादंबरी सुरू होते आणि नोकरीच्या संधीपाशी संपते! याच्या मधला भाग म्हणजे युरीचं एज्युकेशन. शिक्षण. ते काय असतं? युरी अभ्यासात चांगला आहे. हुशार म्हणावा असा. त्याला वाचनाची आवडही आहे. अवांतर वाचनातूनही त्याला अनेक तपशील आठवतात. म्हणजे यानं फार अभ्यास नाही केला तरी दरवर्षी तो पुढल्या वर्गात जाणारच, हे नक्की. पण शाळा महाविद्यालयातल्या औपचारिक शिक्षणाबाहेरचं जगण्याचं आणि स्वत:चं भान म्हणजे शिक्षण, हेच कादंबरीचं सूत्र असण्याची शक्यता वाचकांनी आधीच हेरलेली असणार, हेही नक्की.
युरी अगदी तान्हा असतानाच त्याचे आईवडील दोघेही मोटार अपघातात मरण पावल्यामुळे, त्याच्या एकुलत्या एका मामानं त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. हा मामा म्हणजे तिओ ज्युलिओ. त्याला ख्रिस्ती धर्मगुरू व्हायचं होतं पण युरीचा सांभाळ करायचा म्हणून ही इच्छेला स्वहस्ते तिलांजली देऊन (इथं ‘इच्छेला स्वहस्ते गाडून’ असंही म्हणता येईल), गोव्यातली उरलीसुरली जमीन चर्चला देऊन ज्युलिओनं त्या बदल्यात माहीमच्या चर्चनजीक एक फ्लॅट स्वत:च्या नावे करून घेतलाय, युरीची शाळा याच चर्चच्या आवारात होती आणि ज्युलिओ समाजकार्य करतो, ज्युलिओमुळे युरीवर चांगले संस्कार झालेत, युरीला अगदी बॉक्सिंगसुद्धा त्याच्या तिओनं (तिओ म्हणजे मामा) शिकवलंय एवढंच वाचकाला पहिल्या काही प्रकरणांतून कळतं.. ज्युलिओबद्दल. पण ते कळेस्तोवर युरीला वाचक ओळखू लागलेला असतो. युरी काहीसा बुजरा होता शाळेत तरी, पण हे बुजरेपण फेकून देण्याची- होय, ‘बंडखोरी’ची- आंतरिक इच्छाही युरीमध्ये आहे. ही अशीच्या अशीच स्थिती १९८०च्या दशकात वयात येणाऱ्या अनेक मुलग्यांची होती, हेही आज पंचेचाळिशीपार असलेल्या वाचकांना माहीत असतं. तिओ ज्युलिओमुळे युरीला शाळेतली पोरं ‘पाद्री का बच्चा’ असं चिडवत असतात, त्यामुळे एकलकोंडा झालेल्या युरीला पहिला मित्र कॉलेजातच भेटतो, हा प्रसंग वाचेस्तोवर मात्र युरी अगदीच चारचौघांसारखा नाही, याचीही खूणगाठ बांधली गेलेली असते.
मग युरी ‘नायक’ आहे का? ही गोष्ट युरीच्या त्या पाच वर्षांत घडणाऱ्या प्रसंगांची युरीच्याच जाणिवांशी सांगड घालत उलगडत असल्यामुळे कादंबरी अस्तित्ववादी ठरते का आणि म्हणून युरीसुद्धा ‘न- नायक’ ठरतो का? – युरी आणि लेखक जेरी पिंटो हेसुद्धा तरुण असताना ज्या अस्तित्ववादी कादंबऱ्या आल्या होत्या, तो साचा या कादंबरीनं काहीसा मोडला आहे. म्हटलं तर हा युरीचा आत्मशोध आहे, म्हटलं सहानुभूती या मानुषी अनुभवासोबत काहीएक जबाबदारीही असते अशासारखे अनेक ‘संदेश’ वाचकांना मिळवू देणारं हे लिखाण आहे, हे संदेश नाहीच कळले आणि युरीचा आत्मशोधही नाहीच लक्षात आला तरीही मुंबईतल्या ‘त्या वेळच्या’ एका संवेदनशील तरुणाच्या जगण्याचं हे स्मरणरंजन मुंबईला जणू जिवंतबिवंत करणारं आहे. अगदी तेही नाही तर मग ‘श्यामची आई’च्या धर्तीवरली ‘युरीचे मामा’ अशी ही गोष्ट आहे! याचा अर्थ असा की, फडफडीत अस्तित्ववादी कादंबरी वाचकापुढं ‘पेश’ वगैरे करण्याच्या फंदात न पडता जेरी पिंटो यांनी या कादंबरीला बोधनेच्या भरपूर पातळय़ांची अस्तरं लावली आहेत.. किंवा ती त्यांच्याकडून चुकून लागली आहेत. या सर्व पातळय़ांवर वाचकानंही वावरावं, अशी जेरी पिंटो यांचीच इच्छा दिसते. त्यामुळे मग हा युरी ज्युनिअर कॉलेजात असतानाच कॉलेजला कुठल्याशा ‘उत्स्फूर्त वक्तृत्वस्पर्धे’ची ढाल मिळवून देतो आणि सीनिअर कॉलेजात असताना एका वर्गमैत्रिणीशी ‘अखेपर्यंतचा’ शरीरसंग करतो.. हे प्रसंग यशवादी किंवा पुरुषी वास न येता जेरी पिंटो यांनी मांडले आहेत. रंगवले नाहीत. मांडलेच आहेत. शरीरसंगाचे निव्वळ उल्लेख येतात, तपशील नाही. पण युरीनं काही मिनिटांत तयार केलेल्या त्या उत्स्फूर्त भाषणाचा मात्र अख्खाच्या अख्खा मजकूर लेखकानं वाचकांना वाचायला लावला आहे. इथं युरीनं, दिलेल्या सगळय़ा विषयांची भेळ केलीय. या स्पर्धेबद्दल, असल्या स्पर्धा गांभीर्यानं घेण्याबद्दल, परीक्षकांच्या निवडीबद्दल जो नि:संगपणा युरीच्या ठायी आहे, तो तसाच्या तसाच वाचकाच्या ठायी उत्पन्न व्हावा या तगमगीतून जेरी पिंटो अख्खं भाषण लिहितात. बरं त्याआधी, कॉलेजमधल्या वक्तृत्वमंडळाचा ज्युनिअर सेक्रेटरी म्हणून युरीची ‘निवड’ कशी होते याचाही प्रसंग आहे आणि त्यातून कॉलेजांमधला अध्यापकवर्ग आपापलं काम कसं करत असतो आणि त्यातून पोरांना संधीबिंधी कशी मिळत असते हेही कळतं, पण युरीला ही संधी हवीच होती असं नाही. मग युरीला या वक्तृत्वमंडळाच्या ‘पडेल त्या कामा’तून हवंय काय? काहीच नाही. ज्ञानाचा आव आणू नये, असं मात्र त्याला अगदी मनोमन वाटतं आहे.. हे सीनिअर सेक्रेटरी या नात्यानं याच स्पर्धेत त्यानं पुढं कधीतरी केलेल्या भाषणाच्या ओझरत्या उल्लेखामुळे कळतं.
कॉलेज म्हटलं की ‘कॉलेज लाइफ’ आलं, मित्रमैत्रिणी, नवथर भावना, हे सारंच आलं. ते इथं आहेच. पण युरी हा ‘फक्त इंग्रजीतच विचार करू / बोलू शकणारा’ असल्यानं अगदी पहिल्या काही दिवसांमध्येच त्याचा वावर एल्फिन्स्टन कॉलेजातल्या समभाषकांमध्ये (‘इंग्लिश क्राउड’मध्ये) होऊ लागतो. कॉलेजात एकंदर सर्वाकडे नवी वस्तू किंवा नवा प्राणी म्हणूनच पाहण्याच्या त्या पहिल्या महिन्याभराच्या काळातच युरी ठरवतो की, विज्ञानशाखा सोडून कलाशाखेत प्रवेश घ्यायचा. हा असाच निर्णय ज्या अनेकांनी आपापल्या कॉलेजजीवनात घेतलेला असेल, त्या प्रत्येकाला ‘साइड बदलणं’ हा आत्मशोधाचा क्षण होता असंच आज वाटत असेल. पण युरीच्या बाबतीत तो कदाचित न्यूनगंडाचा, कदाचित माघारीचाही क्षण होता का? नव्यानंच आपला वाटू लागलेल्या मुझम्मिल या मित्राला युरी म्हणतो- ‘आपण साइड बदलू या’ मुझम्मिलच्या नकारानंतरही युरी स्वत:चा निर्णय तडीस नेतोच, मग मुझम्मिलही त्याच्यापाठोपाठ कलाशाखेत येतो. इथपासून ही गोष्ट युरीची होते.
लेखकाचं वेगळेपण..
पण मुझम्मिल- जो या कादंबरीच्या मध्यावर फारतर अधूनमधून दिसतो- तो अखेरच्या दोन प्रकरणांत महत्त्वाची भूमिका बजावतो. मुझम्मिल हा पेडर रोडला राहणारा. पण बसनं ये-जा करणार! किती नंबरची बस? शहाऐंशी! इतके तपशील आपल्याला जेरी पिंटो पुरवतात, कारण मुंबई हेही या कादंबरीतलं जणू एक पात्र आहे. मात्र पेडर रोडचा मुलगा कसा काय बसनं ये-जा करतो? तेही वडील नामांकित करसल्लागार वगैरे असताना? याचं उत्तर मात्र लेखक पिंटो यांनी वाचकांवरच सोपवलं आहे. कादंबरीचा काळ १९८० च्या दशकातला, म्हणजे ‘मारुती ८००’ आणि ‘प्रीमियर ११८ एनई’ यासारख्याच मोटारगाडय़ांपर्यंत आपली प्रगती झाली असतानाचा. एकंदर मोटारी कमी. साहजिकच तेव्हा पेडर रोडची मुलं बसला बिचकत नसत.. यातलं काहीच जेरी पिंटो सांगत नाहीत. आपले वाचक देशी आहेत, या मातीतलेच आहेत, असं जणू त्यांनी गृहीतच धरलंय. एकंदर ‘एक्स्पोर्ट क्वालिटी माल’ निर्माण करणाऱ्या कादंबरीकारांच्या गदारोळात जेरी वेगळे ठरतात.
यामागे काही कारणं आहेत. अर्थात जेरी पिंटो हे आपणा मराठी वाचकांना तर ‘मराठीतून इंग्रजी अनुवाद करणारे’ म्हणूनच अधिक माहीत आहेत (हेलनवरचं त्यांचं पुस्तक किंवा ‘मर्डर इन माहीम’ हे आपल्यापैकी कमी जणांनी वाचलेलं असतं, ‘एम अॅण्ड द बिग हूम’ हे जेरी पिंटोंचं मूळ इंग्रजी वाचण्याऐवजी शांता गोखले यांच्या ‘एम आणि हूमराव’ या अनुवादानं आपलं काम सोपं केलेलं असतं, ते असो).. पण सचिन कुंडलकरांच्या ‘कोबाल्ट ब्लू’ पासून दया पवारांचं बलुतं, मल्लिका अमरशेख यांचं ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ अशा महत्त्वाच्या पुस्तकांना जेरी पिंटो यांनी मराठीत आणलं, त्यामागे त्यांची साहित्यविषयक काहीएक भूमिका होती, हे ‘एज्युकेशन ऑफ युरी’मधून उमगतं. युरी हा पेडर रोडकडे, दक्षिण मुंबईकडे, नरिमन पॉइंटच्या (आता परळमध्ये गेलेल्या) ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीकडे किंवा जहांगीर आर्ट गॅलरीतल्या (आता बंद झालेल्या) ‘समोवार कॅफे’कडे डोळे वासून पाहणारा माहीमचा मुलगा आहे. त्याचे मामा समाजकार्यात असल्यामुळे तो भिवंडी दंगलीत विस्थापित झालेल्यांच्या छावणीत जाऊन तिथं पडेल ते – लिखापढीचं किंवा मानवी विष्ठेवर चुना टाकण्याचं – कामही करतो आहे. तिथंच भावना ही मैत्रीण भेटते. ही नावापुरतीच भावना. आयुष्याचा विचार स्वत:पुरता तरी नीटसपणे करणारी आणि त्यातून स्वत:वर मोजूनमापून प्रयोगही करणारी. कविताही लिहिते, पण दाद मिळेल अशाच प्रकारच्या शब्दांत तोलूनमापून.. पुढे अठराव्या वर्षांच्या टप्प्यात आलेले युरी आणि ती एकत्र येतात. तिचे आईवडील आणि नोकरचाकरांपैकी कोणी घरी नसताना, मंत्रालयानजीकच्या तिच्या फ्लॅटवर भेटू लागतात. हे नातं प्रेमाचं आहे की केवळ शारीरिक, असा प्रश्न युरीला पडत राहातो. एव्हाना कॉलेजमधले लोक आपलेसे झालेले आहेत. ते परके नाहीत. विज्ञानशाखेत असताना बेडूक सहजपणे कापणारी बिमली त्याला १९८२ पासूनच्या गिरणी संपातल्या कामगारांसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेसाठी बोलावते. हे काम उत्तम केल्यामुळे ‘ईसीडी’ नावाच्या एका खास डाव्यांच्या वाचनालयात युरीकडे अपेक्षेनं पाहिलं जाऊ लागतं! हे वाचनालय म्हणजे ‘सीईडी’, हे मुंबईकरांना माहीत असेलच, पण लेखक तसं म्हणत नाही.
याच वाचनालयातल्या एका बैठकीनंतर बिमली एकदा युरीला ‘उंच जागी’ नेते. ही बहुधा वादग्रस्त प्रतिभा इमारत. पाडकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या या त्या वेळच्या गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर बिमली आणि युरी. चुंबाचुंबी नाही.. अमली पदार्थ. त्या नशेत तिथंच रात्र काढून युरी माहीमला परततो, तेव्हा मामाला सगळं खरंखुरं सांगून टाकतो. मामाही क्षमाशीलपणे ऐकून घेतो. अशा प्रसंगांमुळे ही कादंबरी आजच्या पालकांनी आणि आजच्या नवतरुणांनीही वाचण्यासारखी ठरते. त्या बैठकांमुळे युरी नक्षलवादी कंपूच्या अगदी जवळ जातो. पण ‘चंद्रपूरला जा’ हा या बैठकीतला आदेश मात्र तो पाळू शकत नाही. बिमलीला सोबत म्हणून चंद्रपूपर्यंत जातो, पण तिथून परत येतो.. पुन्हा मामांपुढे कबुली. एकच कबुली त्यानं मामांकडे न देता भावनाकडे दिलेली असते.. ‘गीतू टॉकीज’मध्ये कुणा विचित्र कामसुख घेतल्याची. हे त्याच्याकडून ऐकल्यानंतर भावना त्याच्यापासून शरीरानं तुटते, पण मैत्री कायम राहते!
हे असे विचित्र प्रसंग खरोखरच, एखाद्याच्या आयुष्यात घडूनही त्याच्यावर शिक्के न मारले जाण्याचा तो काळ युरीला तारतो. युरीला कविता करण्याची, लिखाणाची गोडी लागते. अखेर मुंबईच युरीला लिखाणाचा विषय पुरवते आणि युरीला पहिली नोकरी मिळते! पण इथवरच्या प्रवासात मुंबईनं युरीला स्ट्रॅण्ड बुक स्टॉल, आर्टिस्ट्स सेंटर, मुंबईतल्या इंग्रजी हौशी-कवींचा गोतावळा, युरीला ‘टीचर’म्हणून पैसे मिळवायला कारणीभूत ठरलेला कामगारवस्तीतला ‘सहस्रबुद्धे टय़ूटर्स ब्यूरो’ आणि त्याच्या पहिल्या शिकवणीचं ‘गिऱ्हाईक’ जिथं राहतं ती माहीमची चाळ अशा अपरिचित ठिकाणी मुंबईच नेते. या मुंबईसोबतच आपण जगायचंय, असं युरीनं अखेरच्या प्रकरणात ठरवलेलं असणार, हे वाचकाला जाणवू लागेपर्यंत युरी अकाली प्रौढ झालेला असतो. आदिल जस्सावालांसारख्या प्रौढत्वी निज शैशवास जपणाऱ्या कवीशी त्याची गाठ पडते.. इथं कादंबरी संपते. पण तिओ ज्युलिओचं काय होतं? मुझम्मिल, भावना, त्याला ‘गीतू टॉकीज’कडे नेणारा आरिफ .. या सर्वाचं काय होतं?
हे समजण्यासाठी अख्खी कादंबरीच वाचावी, हे उत्तम. ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असल्याचा संशय काही अंशी योग्य असला तरी ती आत्मशोधाची गोष्ट आहे हे अधिक खरं. जेरी पिंटो यांच्याच आत्मशोधाचा हा अनुनाद आहे.. झंकार जसा नादानंतर पाझरत राहतो, तसा जेरी पिंटो यांचा युरी हा त्याच्या सोबतच्या माणसांमुळे झंकारू लागतो.. पण ‘तू विचार करतोस’ हे मुझम्मिलचं साधंसं निरीक्षण या आत्मशोधातला महत्त्वाचा टप्पा ठरतं. तेव्हा, वाचकापर्यंतही या कादंबरीचा झंकार पोहोचलेला असतो.