‘ब्रेन रॉट’ हा २०२४ या वर्षाचा ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ दि इयर’ म्हणून घोषित करण्यात आला. आजच्या या डिजिटल युगात, आपण सर्वच ऑनलाइन माहितीचा वापर करत आहोत. समाजमाध्यमे, वेबसाईट आणि इतर ऑनलाईन माध्यमांवरून आपण असंख्य प्रकारची माहिती पाहतो, वाचतो, कित्येक तास रील्स पाहत बसतो. आणि या सर्व आपण पाहत असलेल्या माहितीमध्ये खूप कमी अशी माहिती असते जी आपल्या उपयोगाची असते आणि इतर माहिती अतिशय कमी दर्जाची आणि चुकीची असते किंवा आपला वेळ वाया घालवणारी असते.
ब्रेन रॉट म्हणजे नक्की काय ?
ब्रेन रॉट हा एक अनौपचारिक शब्द आहे. कमी दर्जाची माहिती मोबाईलवर पाहणे, वाचणे किंवा तासंतास रील्स स्क्रोल करणे, टीव्ही वरील अर्थहीन बातम्या पाहणे यामुळे आपल्या मेंदूचे नुकसान होते. यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
हेही वाचा…लेख: सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा जीव…
ब्रेन रॉट शब्दाचा इतिहास
ब्रेन रॉट हा शब्द आजकाल समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक आणि बौद्धिक नुकसान सूचित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द नवीन नाही. या शब्दचा वापर पहिल्यांदा १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी आपल्या “वॉल्डन” या पुस्तकात केला होता. त्यांनी या शब्दाचा वापर बौद्धिक प्रयत्नांमध्ये घट होण्याच्या संदर्भात केला होता. त्यांच्या काळात, या शब्दाला अधिक व्यापक अर्थ होता आणि तो आजच्या अर्थापेक्षा थोडा वेगळा होता.
आधुनिक वापरामध्ये आजकाल हा शब्द विशेषतः समाजमाध्यमे आणि मोबाइलच्या अतिवापराशी संबधित आहे. जेव्हा आपण तासंतास निरर्थक व्हिडीओ पाहतो, स्क्रोल करत राहतो, एकसारख्या आणि कमी कालावधीचे व्हिडीओ पाहतो, तेव्हा आपला मेंदू विचार करण्याची क्षमता गमावू लागतो. आजच्या काळात समाजमाध्यमे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाली आहेत. परंतु त्यांचा अतिवापर आपल्या मानसिक आरोग्याला धोकादायक ठरत आहे. जी कामे करणे महत्त्वाचे असते, त्यांचा विसर पडल्यासारखे होते. समाजमाध्यमांवरील निरर्थक व्हिडीओ, फेक न्यूज, आणि सतत बदलणारी माहिती आपल्या मेंदूला गोंधळात टाकते आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, यालाच ब्रेन रॉट म्हणतात.
हेही वाचा…नवा विदा संरक्षण कायदा नागरिकांना सक्षम करेल…
ब्रेन रॉट का धोकादायक आहे ?
(१) निर्णय घेण्याची क्षमता कमी होते
निर्णय घेण्याची क्षमता कमी होण्याची काही करणे आहेत.
माहितीचा भडीमार – समाजमाध्यमे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर सतत नवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला कोणती माहिती महत्वाची आहे आणि कोणती महत्वाची नाही हे ओळखण्यात अडचणी येतात.
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते – युट्युब आणि इन्सटाग्रामवरील कमी कालावधीच्या व्हिडीओ आणि रील्स पाहून आपल्या मेंदूची एका विषयावर लक्ष केंद्रित करण्याची सवय कमी होते. त्यानुळे आपण एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.
विश्लेषण करण्याची क्षमता कमी होते – एकाच प्रकारच्या गोष्टीची माहिती आपल्याला अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रकारे मिळाल्यावर आपल्या मेंदूला त्या माहितीचे विश्लेषण करणे कठीण जाते. त्यामुळे आपण फक्त वरवरची माहिती पाहतो आणि त्यावरून निर्णय घेतो.
भावनिक निर्णय – आपण सत्य माहितीऐवजी भावनिक होऊन निर्णय घेतो. आपल्याला कोणता निर्णय योग्य आहे हे समजत नाही.
(२) सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे कठीण होते –
सत्य- असत्य ओळखण्यात अडथळा – मेंदूवर सतत नवनवीन माहितीचा भडीमार होत असतो. यामुळे आपल्या मेंदूला योग्य माहिती कोणती हे ओळखण्यात अडचण येते, यामुळे अनेकदा आपला मेंदू चुकीच्या माहितीला सत्य समजू लागतो.
स्रोताची विश्वासार्हता – अनेक वेळा समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवली जाते आणि आपण त्या माहितीची सत्यता न पडताळताच ती माहिती सत्य मानून पुढे पाठवतो. आपण अशी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो जी आपल्या पूर्वग्रहाला बळकटी देईल, यामुळे सत्य माहितीकडे दुर्लक्ष होते.
फेक न्युज – समाजमाध्यमांवर फेक न्युजचा प्रसार खूप वेगाने होतो. फेक बातम्याच खऱ्या वाटू शकतात आणि आपण त्या सत्य मानून घेतो.
हेही वाचा…सत्तेला प्रश्न विचारताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला…
ह
(३) मानसिक स्वास्थ्यावर परिणाम –
तणाव आणि चिंता – सततच्या अपडेट्स, लाईक्स, आणि कमेंट्सची अपेक्षा असणे तणाव आणि चिंता वाढवू शकते.
एकटेपणा – समाजमाध्यामांवर असंख्य मित्र असूनही, खरोखरच्या नातेसंबंधांची कमतरता जाणवू शकते.
नैराश्य – समाजमाध्यमांवर इतरांचे परिपूर्ण जीवन, सुंदर फोटो पाहून अनेकांना असुरक्षित वाटते आणि त्यतून नैराश्य येते.
निंदा, निद्रानाश, आत्महत्या – या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संबधित आहेत समाजमाध्यामांवरील ट्रोलिंग आणि निंदा ही सामान्य गोष्ट बनली आहे, जी मानसिक स्वास्थ्याला अतिशय हानिकारक आहे.
रात्री उशीरपर्यंत मोबाइल फोनचा वापर केला तर झोपेच्या चक्रात बदल होऊ शकतो. काही अभ्यासकांच्या मते समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगमुळे लोक आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात.
ब्रेन रॉट टाळण्यासाठी उपयोजना
ब्रेन रॉट टाळण्यासाठी आपण अनेक उपययोजना करू शकतो. समाजमाध्यमांचा अतिवापर आणि निरर्थक माहिती जाणून घेणे हे ब्रेन रॉटचे मुख्य कारण आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खालील उपायांची अंमलबजावणी करून आपण ब्रेन रॉटपासून सुरक्षित राहू शकतो.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे वेळोवेळी डिजिटल डिव्हाईस (स्मार्टफोन, हेडफोन, स्मार्टवॉच टॅब्लेट) पासून स्वतःला दूर ठेवावे.
नियमित व्यायाम केल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकते.
नियमित आणि पुरेशी झोप घेतल्यास मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.
पुस्तके वाचण्यामुळे सकारात्मकता वाढते.
नवीन कौशल्ये शिकून आपल्या मेंदूला सक्रीय ठेवता येते.
मित्र- कुटुंबियाबरोबर वेळ घालवून आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेता येऊ शकते.
समाजमाध्यमांचा वापर दिवसातून काही विशिष्ट वेळेपुरता मर्यादित ठेवावा.
नकारात्मक आणि हिंसक गोष्टी पाहणे टाळावे.
इतरांच्या जीवनाशी आपली तुलना करणे बंद करावे.
समाजमाध्यमांऐवजी वास्तविक जीवनातील नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करावे.
ब्रेन रॉट टाळण्यासाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत असे वाटल्यास मदत मागण्यास संकोच करू नये. आपले मानसिक आरोग्य बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातात असते.akshay111shelake@gmail.com