अ. पां. देशपांडे, अध्यापन, लेखन व भाषण
विज्ञान हा अनेकांना किचकट वाटणारा विषय. त्यात नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हे मोठेच आव्हान होते. हे आव्हान ज्या अनेकांनी पेलले त्यांच्यापैकी एक होते प्रा. रा. वि. सोवनी. स्वत:च्या जिज्ञासेचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उत्तरे मिळविली आणि इतरांपर्यंत पोहोचविली. लेखन, भाषण, अध्यापन आणि पुढे मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही विज्ञानाच्या प्रसाराची धुरा वाहिली. सोवनी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या योगदानाचा आढावा..
विज्ञान माणसाला कोणत्याही गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची, चिकित्सा करण्याची, अपयश पचवत आपल्या उद्दिष्टाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राहण्याची क्षमता मिळवून देते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांत भारतात विज्ञान समजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे नितांत गरजेचे होते. त्याकाळात ज्यांनी आपापल्या परीने ही जबाबदारी सांभाळली, त्यांच्यापैकी एक म्हणजे प्रा. रा. वि. सोवनी.
हेही वाचा >>>विदर्भ: अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच..
प्रा. सोवनी यांचा जन्म ३० एप्रिल, १९२४ चा. म्हणजे आज त्यांची जन्मशताब्दी आहे. सोवनी यांचे एम.एस्सी.पर्यंतचे (प्राणीशास्त्र) शिक्षण पुण्यात झाले. तिथेच त्यांनी सहा वर्षे नोकरीही केली. सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरापाशी त्यांचे वडिलोपार्जित घर होते. वडील डॉक्टर आणि थोरले बंधू प्रा. नी. वि. सोवनी अर्थतज्ज्ञ, गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ इकनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे संचालक आणि काही काळ संयुक्त राष्ट्रांतही होते.
पुण्यात सहा वर्षे नोकरी केल्यानंतर रा. वि. सोवनी मुंबईत आले आणि रुपारेल महाविद्यालयात अध्यापन करू लागले. मुंबईतील जागांचे भाव, संसारासाठीचा मासिक खर्च आणि असिस्टंट लेक्चररला मिळणारा पगार यांचा मेळ बसत नसल्याने ते एका खासगी क्लासमध्ये शिकवत. त्यांना लिखाण आणि भाषणे करण्याची आवड होती. रुपारेल महाविद्यालयात अध्यापन सुरू केल्यानंतर त्यांनी ही आवड जोपासण्यास सुरुवात केली. १९५०-५५ च्या काळात विज्ञानावर लेख आणि भाषणे देणाऱ्यांत प्रा. ना. वा. कोगेकर, प्रा. चिं. श्री. कर्वे, प्रा. प. म. बर्वे अशा मोजक्या लोकांत त्यांची गणना होऊ लागली. मग त्यांना आकाशवाणीकडूनही आमंत्रणे येऊ लागली. आचार्य अत्रे यांचे ‘नवयुग’ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुरू झालेले ‘मराठा’ वर्तमानपत्र इथूनही सोवनींना आमंत्रणे आली. आचार्य अत्रे यांची नजर चौफेर होती. सोवनी विज्ञानावर सोप्या भाषेत लिहितात हे पाहून अत्रेंनी त्यांच्यावर एक सदर चालविण्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी अत्रे सोवनींना म्हणाले होते, ‘मला विज्ञानवरचे एक मासिकच सुरू करायचे होते, पण ते राहून गेले.’
हेही वाचा >>>खासदार बिनविरोध कसे काय निवडले जातात? इतिहास काय सांगतो?
प्रा. सोवनी विज्ञानातील नवनवीन विषयांवर लेख लिहित. एखाद्या डॉक्टरने शस्त्रक्रियेत काही नवीन पद्धत शोधली तर ते त्या डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या शस्त्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहात आणि मग त्यावर लेख लिहित. त्यामुळे त्यांचे लेखन अधिक वाचनीय ठरत असे. मग हे नावीन्य वैद्यकीय क्षेत्रातील असो की अभियांत्रिकी अथवा अन्य एखाद्या क्षेत्रांतील असो, सोवनी तेथे पोहोचलेच असे समजायचे.
‘आकाशाशी जडले नाते’
मुंबईत दूरदर्शन सुरू झाले आणि ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात त्यांनी, ‘आकाशाशी जडले नाते’ या शीर्षकाखाली केलेल्या १३ भागांच्या मालिकेत डॉ. जयंत नारळीकर, प्रा. शशिकुमार चित्रे, प्रा. प्रभाकर कुंटे अशा नामवंत शास्त्रज्ञ मंडळींचा समावेश होता. सोवनी ज्या काळात अध्यापनाच्या क्षेत्रात होते, त्याकाळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत नवनवीन महाविद्यालये स्थापन होत होती. मी एकदा सोवनींना विचारलेही की तुम्ही अशा एखाद्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून का गेला नाहीत? कारण त्यावेळी अलिबागच्या महाविद्यालयात पुण्याचे आर. टी. कुलकर्णी प्राचार्य म्हणून गेले होते तर महाडच्या महाविद्यालयात मुंबईचे रा. भि. जोशी प्राचार्य होते. पण आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे-मासिके, जाहीर भाषणे यांची आवड असलेले सोवनी यांच्या मते, एखादी व्यक्ती ग्रामीण भागात जाते तेव्हा ती या विविध गोष्टींपासून दूर जाते. त्यामुळे त्यांना तिकडे जायचे नव्हते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. व. दि. कुलकर्णी- ते जोवर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते, तोवर ते दूरदर्शनवर अनेकवेळा दिसत, पण निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि दूरदर्शन त्यांच्यापासून दूर गेले.
रुपारेल महाविद्यालयात अध्यापन करत असतानाच तत्कालीन शिक्षणमंत्री अनंत नामजोशी यांनी शालेय पाठय़पुस्तकांत काही बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रा. सोवनी यांना गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पद देऊन त्यांच्या सरकारी बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये कार्यालय थाटून दिले.
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
दरम्यान त्यांनी रुपारेल महाविद्यालयातील अध्यापकाच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. नामजोशी यांचे काम दोन वर्षांत संपले, मग त्यांना नव्याने सुरू झालेल्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या होमी भाभा शिक्षण संस्थेत रुजू होण्याचे निमंत्रण आले. त्यांनी ते स्वीकारले. निवृत्त होईपर्यंत ते त्याच संस्थेत कार्यरत राहिले.
१९६६ साली मुंबईत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली आणि तिच्या कार्यात प्रा. सोवनी पहिल्या दिवसापासून सहभागी झाले. तेव्हापासून मृत्यूपर्यंत म्हणजे २००७ सालापर्यंत ते त्या संस्थेत रमले. ते अनेक वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादकपदही त्यांनी भूषविले. पत्रिकेत ते दरमहा लिहित असत. त्यांनी परिषदेतर्फे अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. १९७२ साली परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात त्यांचा ‘सन्मानकरी’ म्हणून
गौरव झाला. नंतर परिषदेने त्यांना सन्मान्य सभासदत्वही दिले. प्रा. सोवनी हे चटकन लिहिण्याबद्द्ल प्रसिद्ध होते. इंग्रजीतून मराठीत अनुवादही ते तितक्याचा जलद गतीने करीत असत, पण एकदा त्यांना मराठी लेखाचे इंग्रजीत भाषांतर करण्यास सांगण्यात आले असता, ते काम अवघड असल्याचे त्यांनी प्रामाणिकपणे म्हटले होते.
मराठी विज्ञान परिषदेच्या ग्रंथालयाचा प्रा. सोवनी यांच्या एवढा उपयोग क्वचितच कोणी करून घेतला असेल. ते लेख लिहित असताना त्यांचा भर अचूकतेवर असल्याने ते सतत अनेक ग्रंथ चाळून त्यातून अचूक संदर्भ गोळा करत. रुपारेल महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अनेक वेळा प्रा. सोवनींशिवाय चिटपाखरूही नसे असे तेथील ग्रंथपाल प्रदीप कर्णिक सांगत असत. एकदा सोवनींनी एक पुस्तक वाचायला घेतले व उर्वरित भाग उद्या वाचू म्हणून ते कर्णिकांना म्हणाले, ‘हे पुस्तक बाजूला ठेवा, म्हणजे उद्या परत शोधायला नको,’ तर कर्णिक म्हणाले, ‘त्याच कपाटावर ठेवा, येथे कोणीच येत नसल्याने उद्या तुम्हाला ते सहज मिळेल.’
प्रा. सोवनींची नोकरी एकाच ठिकाणी नव्हती. निवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन आर्थिक चणचणीचे होते, पण त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य लोपले, असे कधीच झाले नाही. त्यांनी आयुष्यात किती लेख लिहिले, किती पुस्तके लिहिली आणि किती भाषणे केली याची मोजदाद केली नाही, कारण ती संख्या अगणित होती. सोवनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोप्या आणि आकर्षक लेखन, भाषण शैलीतून विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करत राहिले.