इन्स्टाग्राम पोस्टवरच्या कमेंटमध्ये लाल गोळीचं इमोजी टाकलं म्हणून त्याने खून केला? तो कायम रूममध्येच असायचा. आपल्याला वाटलं, घरात आहे म्हणजे सुरक्षित आहे. आपल्या लक्षात कसं आलं नाही?… पण लक्षात आलं असतं तरी आपण काही करू शकणार होतो का? हतबल आई-बाबा विचार करत बसले आहेत, की आपण कुठे चुकलो? त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने त्याच्याच शाळेतल्या मुलीचा खून केला, त्याला आता वर्षं उलटलं आहे. खुनाचं कारण आहे, इन्स्टाग्रामवरचं ट्रोलिंग. इंग्लंडमध्ये घडलेल्या काही सत्यघटनांवर आधारित ‘अॅडोलेसन्स’ ही वेब सिरीज सध्या जगभर चर्चेत आहे. 

नेटफ्लिक्सवरची क्राईम सिरीज म्हणून जो एक साचा डोळ्यांसमोर उभा राहतो, तो पुरता मोडून टाकणाऱ्या या सिरीजचं सर्वाधिक चर्चेत असलेलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक एपिसोडचं सिंगल टेक चित्रिकरण. तांत्रिकदृष्ट्या तर ही सीरिज हा एक अत्यंत यशस्वी प्रयोग आहेच आणि त्याबद्दल तिचं प्रचंड कौतुकही होत आहे. पण अडोलेसन्स या पलीकडे जाऊन या काळातली अतिमहत्त्वाची सीरिज ठरते, ती तिने अतिशय निष्ठुरतेने विचारलेल्या एका प्रश्नामुळे– आपण खरंच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकतो का?

मेनोस्फीअर, रेड पिल, ब्ल्यू पिल, ८०-२० रूल, सेलिबेट, इनसेल… हे सारं काय आहे? आपल्या नुकत्याच किशोरवयात पाऊल टाकलेल्या पोरांना काय झालंय? ही बोलत काहीच नाहीत. फक्त पोस्ट, कमेंट, लाइक, फॉलो करतात. पण त्यातून खून कसा काय होऊ शकतो, हे न समजणारा मिलेनियल्सच्या पिढीतला पोलीस बाप आणि ‘बाबा, तू लोकांशी बोलायला आलायस पण तुला इथे काहीच मिळणार नाही. सारं काही इन्स्टाग्रामवर आहे,’ हे आपल्या पोलीस बापाला पटवून देण्याचा प्रयत्न करणारा मुलगा पाहताना या दोन पिढ्या एकमेकांसाठी किती एलियन आहेत, याची जाणीव होते.

अॅडोलेसन्स इंग्लंडमधल्या यॉर्कशायर प्रांतातल्या एका कुटुंबाची कहाणी मांडते. १३ वर्षांचा जेमी मिलर हुशार विद्यार्थी आहे. जेमीचे वडील एडी प्लंबिंगची कामं करतात. आई-वडील, जेमी आणि त्याची मोठी बहीण असं सरळमार्गी चौकोनी कुटुंब. अचानक एका पहाटे पोलीस येतात आणि जेमीला झोपेतून उठवून चौकशीसाठी घेऊन जातात. त्याच्यावर त्याच्याच शाळेतल्या केटीच्या खुनाचा आरोप आहे. आपल्या मुलावर गैरसमाजातून आरोप ठेवले गेले आहेत, हा या कुटुंबाचा गैरसमज लवकरच दूर होतो. आणि पुढे सुरू होतं तपासचक्र…

जेमीचं पात्र ऑनलाइन ट्रोलिंगमुळे आणि इंटरनेटवरच्या टॉक्सिक कन्टेन्टमुळे न कळत्या वयातल्या मुलांवर होणाऱ्या गंभीर परिणामांचं भयावह वास्तव मांडतं. मॅनोस्फीअर ही संकल्पना समोर येते. इंटरनेटवर या संकल्पनेवरील अनेक ब्लॉग्ज, व्लॉग्ज आणि समाजमाध्यमी कम्युनिटीज आहेत. त्यातील आशय पुरुषी वर्चस्वाचा पुरस्कार करणारा असतो. जगातल्या ८० टक्के स्त्रिया या केवळ २० टक्के पुरुषांकडे आकर्षित होतात. कारण हे पुरुष श्रीमंत असतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी असतं, शारीर आकर्षक असतं, असं ८०-२० रूल सांगतो. ही सारी वर्णनं अल्फा मेल या संकल्पनेशी मिळती जुळती भासतात. उर्वरित पुरुष हे अनाकर्षक आणि दुबळे असतात. त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होत नाहीत, असं हे गृहितक. मॅनोस्फीअरमध्ये इन्सेल म्हणजेच इनव्हॉलन्टरी सेलिबेट अर्थात अवांछित ब्रह्मचार्याचाही समावेश होतो. रेड पिल या इमोजीचा अर्थ संबंधित व्यक्ती अनाकर्षक, कमकुवत आहे आणि या पुरुषाकडे स्त्रिया कधीही आकृष्ट होणार नाहीत.

जेमीने केटीवर वार केले, ते अशा इमोजीयुक्त कमेंट्स आणि त्या कमेंट्सवर इतर अनेकांनी केलेल्या लाइक्स मुळे. आजच्या पिढीचं इन्स्टा अकाउंट हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. तिथे सर्वांदेखत तू अगदीच पोकळ आहेस, असं त्यांचेच समवयस्क सतत सामूहिकरित्या म्हणत राहिले, तर त्यांच्या स्वत्वाला किती हादरा बसू शकतो, याचं जेमी हे चित्र.

पोलीस अधिकारी बॅस्कॉमला जो प्रश्न पडतो तोच बहुसंख्य प्रौढ प्रेक्षकांना पडला असावा- अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला काय कळतंय, स्त्रिया-पौरुष्य, ब्रह्मचर्य वगैरे… ही सगळी ‘तिकडची’ थेरं. पण आता असं इकडचं तिकडचं काही राहिलेलं नाही. इंटरनेटने सर्वांना एकाच गावात आणून बसवलं आहे. दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडच्या शाळांतली मुलंही हा सिम्प आहे, तो बीटा आहे, आमचा सिग्मा ग्रुप आहे असं सहज सांगत. आता या संकल्पना काहीशा मागे पडलेल्या दिसतात. पण एकदा जे इंटरनेटवर आलं त्याच्या लाटा वारंवार येत राहतातच. 

जिमी आणि त्याची मनोविश्लेषक ब्रायोनी यांच्यातील संवाद, या पिढीच्या मनातील असह्य गदारोळ जबरदस्त ताकदीने मांडतो. मी दोन मुलींना स्पर्श केला आहे हे सांगणारा जेमी पुढच्या काही क्षणांत नाही, मी फक्त फोटो पाहिले आहेत, हे मान्य करतो. एकीकडे मी इन्सेल कॉन्टेन्ट पाहिला, पण मला तो आवडला नाही असं म्हणतो आणि दुसरीकडे मी मुलींना आवडत नाही, कारण मी कुरूप आहे, असं सांगत राहतो. मर्शमेलो घातलेलं आवडतं हॉट चॉकलट भिरकावून देणारा, पण नावडत्या सँडविचची चव घेऊन पाहणारा, वयाचं भान विसरून ब्रायोनीवर ओरडणारा आणि क्षणार्धात शांत होऊन माफी मागणारा, ती आपल्या चुकांसाठी आपल्या वडिलांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका घेणारा आणि तिच्या भाषेवरून तिच्या आर्थिक स्थितीचे आडाखे बांधणारा, ब्रायोनीविषयी मानत प्रचंड संशय बाळगूनही तिच्याशी चर्चेचं हे शेवटचं सेशन आहे म्हटल्यावर बिथरलेला जेमी असहाय भासतो. इतका की तो ब्रायोनीलाच तुला माझ्याविषयी काय वाटतं, तुला मी आवडतो का, असं काकुळतीला येऊन विचारू लागतो. आयुष्यात स्त्री असलीच पाहिजे, हे त्याच्या भोवतालाने त्याच्या मनात किती खोलवर बिंबवलं आहे, याची जाणीव या पिढीचं उद्ध्वस्त वास्तव दर्शवते. जेमी ब्रायोनीला सांगतो की ‘मला केटी कधी आकर्षक वाटलीच नाही, पण तिचं अर्धनग्न चित्र व्हायरल झालं होतं. मला वाटलं, आता मी तिला विचारलं तर ती हो म्हणेल. मी तिला विचारलं, की माझ्याबरोबर फिरायला येशील का तर ती कुत्सितपणे हसली आणि म्हणाली, की मी एवढी काही उतावीळ नाही…’ असहाय्य स्त्री सहज आपल्याला होकार देईल, असा विश्वास जेमीला आहे. तरीही ती नकार देते तेव्हा, त्याच्यावर बिंबवल्या गेलेल्या पुरुषी वर्चस्वाला जबरदस्त हादरा बसतो. लैंगिकतेचा एवढा विचार करणाऱ्या जेमीच्या खोलीचा वॉलपेपर मात्र लहान मुलांच्या रूममध्ये असतो तसा ग्रहताऱ्यांची चित्र असणाराच आहे.

इतरही पात्रांच्या मनातील असुरक्षितता, सारं काही आपल्या हाताबाहेरचं आहे, या विचारातून येणारी असहायता पदोपदी दिसत राहते. आपण आपल्या मुलाला कधी वेळच देऊ शकलो नाही, याची जाणीव झालेला आणि जेमीच्या प्रकरणाने स्वतःही आतून हादरलेला तपास अधिकारी बॅस्कॉम, शाळेत एवढी भयावह घटना घडूनही त्याची अजिबात मानसिक झळ न बसलेली मुलं, हाताबाहेर गेलेल्या मुलांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडणारे शिक्षक, जिमीच्या संपूर्ण कुटुंबावर लैंगिक गुन्हेगार म्हणून बसलेला शिक्का, १३ वर्षांच्या मुलातली आक्रमकता, त्याची उद्ध्वस्तता पाहून स्वतःही आतून हबकलेली मात्र वरवर शांत राहण्यासाठी झगडणारी मनोविश्लेषक ब्रायोनी, अंगणात उभी राहून गंमत पाहणारी शेजारीण या साऱ्यांच्या वर्तनाचे बारकावे उत्तम टिपले आहेत. 

सीरिज इंग्लंडमधली असली, तरी थोड्याफार फरकाने जगभर सारखीच स्थिती आहे. अॅडोलेसन्सची जग दखल घेतंय ते त्यामुळेच. आपण ज्यांना शब्द शिकवले, त्यांची भाषाच आपल्यासाठी अगम्य झाली आहे, याची जाणीव जशी तिथल्या पालकांना हादरवणारी, तशीच इथल्याही पालकांसाठी विदारक. आज आपल्याकडेही सातवी- आठवीपुढच्या विद्यार्थ्यांचे इन्स्टाग्राम ग्रुप्स असतात. त्यावर विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचं ट्रोलिंग सुरू असतं. पूर्वी मुलं शाळेच्या भिंतींवर शिक्षक–शिक्षिकांच्या, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जोड्या जुळवत. ते उद्योग पकडणं, कोरलेली नावं मिटवणं सोपं होतं. आज इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर काय काय बोललं जातं, शेअर केलं जातं, कोणाची कशा अवस्थेतली मीम्स तयार केली जातात, कोणाला कोणती लैंगिक ओळख चिकटवली जाते, याचा ठाव घेणं, इंटरनेटच्या जंजाळातून ती हटवणं कठीण आहे. झूम कॉल कसा लावाव, हे सुध्दा आपल्या विद्यार्थ्यांकडून शिकलेले शिक्षक कुठवर पुरे पडणार? आज शाळांच्या पालक सभांमध्ये दरवेळी ही सूचना द्यावी लागते की मुलांना कोणतंही समाजमाध्यम वापरण्याची परवानगी देऊ नये. मोबाइल फोन घरी असतात, पण समाजमाध्यमांवरची भांडणं शाळेच्या प्रांगणात हाणामाऱ्यांपर्यंत पोहोचतात. आपल्याकडे या प्रश्नाला अलीकडे एक नवीनच पैलू जोडला गेला आहे तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा. एखाद्याला त्याच्या धर्मावरून हिणववणं, शाळेत धार्मिक घोषणा देणं हा सारा समाजमाध्यमांतून बिंबवल्या गेलेल्या विचारांचाच परिपाक आहे. मुलांनी अशा घोषणा देऊ नयेत, असं सांगण्याची वेळ शाळांवर येत आहे. मिलेनियल्सच्या काळात अशी वेळ कधी आल्याचं आठवत नाही. थोड्याफार फरकाने जगभर सारखीच परिस्थिती आहे. अॅडोलेसन्स हे त्याचं अलार्म नव्हे, सायरन वाजवणारं प्रातिनिधीक चित्र.

ही शॉर्ट सिरीज आहे. प्रत्येकी साधारण एक तासाचे चार एपिसोड्स आहेत. एपिसोडदरम्यान एकही कट नाही. एडिटही नाही. घर, ते सिक्युअर्ड ट्रेनिंग सेंटर, ते शाळा, ते मॉल, वाहनांतला प्रवास सारं काही सलग चित्रित केलं आहे. हे साध्य करण्यासाठी किती तगडी पटकथा लिहिली असेल, प्रत्येक सेकंदाचं किती काटेकोर गणित मांडलं असेल, प्रत्येक अभिनेता, तंत्रज्ञ किती कसलेला आणि दिग्दर्शक किती धाडसी असेल, अशा अनेक ‘कितीं’चे आडाखे पाहणारा नकळत मांडू लागतो. तंत्राचा हा आविष्कार पाहणं चुकवू नये असंच आहे. स्टीफन ग्रॅहमने साकारलेला संयमी एडी मिलर आणि ओवन कुपरचा गोंधळलेला, उद्ध्वस्त, असहाय्य जेमी लाजवाब आहे. ओवनने या पहिल्याच सीरिजमधून प्रेक्षक आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

असं म्हणतात, की एक मुल वाढवायला अख्खं गाव लागतं. मग त्या गावाचे गुणदोष मुलात प्रतिबिंबित होणारंच. आज सारं जगच एक खेडं झालं असताना जगाच्या कानाकोपऱ्यातले सारे गुणदोष या खेड्यात वाढणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचणारंच आहेत. प्रश्न हा आहे, की त्या रोज अपडेट होणाऱ्या दोषांना दूर करण्याएवढा वेग आधीची पिढी घेऊ शकेल का?

vijaya.jangle@expressindia.com