पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅनडाच्या अ‍ॅलिस मन्रो या हयातभर फक्त कथा लिहिणाऱ्या लेखिकेला नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर जागतिक पटलावर या देशातील वाचकांचा कथासाहित्याबाबत असलेला दृष्टिकोन समोर आला होता. ढीगभर राष्ट्रीय आणि स्थानिक मासिकांतून खंडीभर कथांची निर्मिती होत असताना ‘सीबीसी न्यूज’ ही तेथील मोठी वृत्तसंस्था राष्ट्रीय पातळीवरची कथा स्पर्धा घेते. पण आपल्याकडील आंग्लकथा वाचकांपर्यंत ज्या कॅनेडियन लेखकांची नावे पोहोचतात ती, त्यांनी अमेरिकेतही यश मिळवल्यावर. उदा. ‘लाइफ ऑफ पाय’ लिहिणारे यान मार्टेल, ‘द इंग्लिश पेशंट’ लिहिणारे मायकेल ओंडाटिआ, ‘हॅण्टमेड्स टेल’ लिहिणाऱ्या मार्गारेट अ‍ॅटवुड. या प्रत्येकाचे लिखाण चित्रपट/ चित्रवाणीतून झळकल्यानंतर ते फक्त कॅनडाचे न राहता जागतिक वगैरे झाले. मुंबईत जन्मलेले- वाढलेले पण इथल्या मातीऐवजी कॅनडात कर्तुमकी गाजवलेले अनोश इराणी आपल्याकडच्या फार कमी वाचकांना माहिती असतात. ‘मटका किंग’, ‘बॉम्बे ब्लॅक’ ही त्यांची नाटके आणि ‘डहाणू रोड’, ‘द पार्सल’ या त्यांच्या कादंबऱ्या तिथल्या वर्तुळात गाजून मानांकनांमध्येही राहिल्या. इराणी यांच्याचप्रमाणे रोहिंग्टन मिस्त्री या मुंबईकराचे कथालेखन तिकडे ‘गिलर’ या सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मान्ति झाल्याचे आपल्या गावी नसते, पण याशिवाय आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून त्यांचे पुस्तक काढून घेतल्याची हास्यास्पद कारणेही आपल्यासमोर ठळक दिलेली नसतात. कॅनडातील कथालेखनाचा आणि लेखकांचा शोध घ्यायचा झाला, तर ‘बेस्ट कॅनडीयन शॉर्ट स्टोरीज’ हे वार्षिक खंड उपयुक्त ठरतात. अ‍ॅलिस मन्रो या कथालेखिकेच्या देशात कादंबरीइतकाच किंबहुना कादंबरीहून अधिक सन्मान या साहित्य प्रकाराचा कसा होतो, हे त्या खंडांची निर्मिती पाहिली तर लक्षात येते. सोवांखम थामावोंगसा, पाशा मल्ला, लिन कोडी, पॅट्रिक डिवीट ही अलीकडच्या काळामध्ये कॅनडातून निर्यात झालेली लेखकांची फौज. या फौजेतले एक लक्षणीय आणि वेगळा उल्लेख करावे असे नाव म्हणजे अ‍ॅलिक्स ओहलिन. 

कॅनडातील उपनगरांत राहणाऱ्या नागरिकांच्या (परदेशी स्थलांतरित होऊन परतलेल्यांच्याही) या गोष्टी त्यांच्या नावांसह पहिल्या परिच्छेदापासून पकड घेतात. ओघवत्या निवेदनातून लेखिकेने सांगायला घेतलेल्या गोष्टीचे दुसरे टोक शोधायला वाचक हतबल होतो. ती त्याला जखडून ठेवत आपल्या मनातील शेवट खेळाचा उद्योग करण्यास उद्युक्त करते आणि या खेळात वाचकाची दीर्घ विचार-रपेट घडलेली असते. ‘द किंग ऑफ कोलराबी’ या कथेत (संग्रह ‘ बॅबिलॉन अ‍ॅण्ड अदर स्टोरीज’) नवलकोलाच्या (कोलराबी) अतिदुर्लक्षित भाजीसाठी सुपरमार्केटमध्ये आलेल्या अनोळखी माणसाशी ओळख झालेल्या निवेदिकेची कहाणी रंजक वळणांची बनून जाते. त्या माणसाची कठोर बायको नवलकोल बनविण्यात सम्राज्ञी असल्याचा तपशील या कथेच्या शीर्षकाला आहे. पण कथा चमत्कारिक माणसांचा आणि प्रसंगांचा अद्भुत माहोल तयार करत राहते. ‘हू डू यू लव्ह’ या कथेत (संग्रह ‘साइन्स अ‍ॅण्ड वण्डर्स’) निवेदिकेचे कॉलेजकाळातील अ‍ॅडम लेव्हिट या संगीतकार गायकाशी न जुळू शकलेले नाते आणखी काही वर्षांनी अपघाताने आणि तिच्या कार्यालयीन कामांमुळे जमून येते. अ‍ॅडम लेव्हिट हे नाव ‘मरून फाइव्ह’ या अमेरिकी पॉप-रॉक बॅण्डचा प्रमुख गायक अ‍ॅडम लेव्हिनच्या अगदीच जवळ जाणारे. (संदर्भासाठी पाहा मीटू मोहिमेनंतर गाजलेले ‘गर्ल्स लाइक यू’ हे गाणे) ही कथा त्याच्या आणि निवेदिकेच्या पूर्वायुष्यावर बेतली असल्याचे पूर्ण वातावरण इतके तंतोतंत करते, की खऱ्याखुऱ्या अ‍ॅडम लेव्हिनच्या कारकीर्दीचा तपशील जाणून घेण्याची गरज भासते. तो जाणून घेतला, तर या कथालेखिकेने किती ताकदीने या व्यक्तीभोवती कथा गुंफली आहे, याचा पत्ता लागतो.

 गिलर पारितोषिकांसाठी अनेकदा नामांकनात राहिलेली असूही दरवेळी पुरस्काराने हुकलेल्या या लेखिकेच्या कथा करोनाकाळापूर्वी न्यू यॉर्करपासून अनेक अमेरिकी मासिकांमध्ये झळकू लागल्या आणि ही लेखिका फक्त मन्रोनगरीतील म्हणजेच कॅनडातील राहिली नाही. कथालेखनासह तिच्या तीन कादंबऱ्याही आल्या. तरीही मुख्य ओढा हा कथालेखनाचाच. एक कादंबरी तर अगदी छोटय़ा-छोटय़ा प्रकरणांची. शिवाय कथानकाला अधिकाधिक प्रयोगांनी विणणारी.

करोनानंतर आलेला ‘वी वॉण्ट वॉट वी वॉण्ट’ हा तिचा ताजा कथासंग्रह आयुष्यातून काहीतरी हरवलेल्या माणसांच्या गोष्टींना एकत्र करतो. बहुतांश निवेदिका-नायिका-व्यक्तिरेखा या स्त्रीच असल्या तरी पुरुष निवेदकांचे या लेखिकेला अजिबात वावडे नाही. या कथांमध्ये वेगवेगळय़ा वयोगटाची, आर्थिक स्तरातली माणसे आहेत. ती घराबाहेर किंवा घरात सुखाच्या शोधात दु:खांची बेगमी करीत विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेली दिसतात. या संग्रहातील पहिलीच कथा ‘पॉइंट ऑफ नो रिटर्न’ ही न्यू यॉर्कर साप्ताहितात २०१७ साली ‘क्वारंटिन’ नावाने छापली गेली होती. संग्रह प्रकाशित झाला, त्यावेळी ‘क्वारंटिन’ या शब्दाचा जगाने भोगलेला काळ पाहता कथाशीर्षक बदलल्याचे लेखिकेने नमूद केले आहे. यातल्या नायिकेला बार्सिलोनात नवी ओळख काढून वेगवेगळय़ा घरांत आश्रय घेण्याचा नाद लागलेला दिसतो. विविध देशीच्या स्त्री-पुरुषांच्या घरांतून हा फेरफटका तिच्या कॅनेडियन मैत्रिणीपर्यंत येऊन पोहोचतो. काही काळानंतर तिच्या घरातूनही बाहेर पडल्यानंतर ही कथा ‘बेघर’ होण्याचा प्रवास असल्याचा आभास निर्माण करते. प्रत्यक्षात अनेक वर्षे न भेटणाऱ्या या मैत्रिणीला अनाकलनीय आजार होतो, तेव्हा सारे सोडून ही नायिका अंमळकाळासाठी तिच्या सेवेसी अवतरते. ‘ब्रुक ब्रदर्स गुरू’ ही कथासंग्रहाचे शीर्षक ज्यातून आले ती कथा. इतर कथांपेक्षा थोडी मोठी. यातील कौटुंबिक दु:खांनी सैरभैर नायिका भरपूर वर्षे संपर्कही नसलेल्या दूरच्या नाते-भावाच्या ‘फेसबुक’ मैत्री निमंत्रणाने चकित होते. त्याच्याशी मैत्री करते. काही दिवसांनी तिला कळते, की कोणत्याशा ‘गुरू’ने चालविलेल्या एका पंथामध्ये हा नातेभाऊ सहभागी झाला आहे. ‘अघोरी’ असू शकणाऱ्या पंथातून त्याला बाहेर काढण्यासाठी ही निवेदिका ‘गुरू’च्या पत्त्यावर दाखल होते. तिकडे तिला कला, संस्कृती, वैचारिक व्यासपीठांवर अविरत-अमोघ चर्चा करणाऱ्या व्यक्तींचा समूह दिसतो. त्या ‘अनाकलनीया’च्या आकर्षणात ती देखील या पंथाकडे काही काळ आकर्षित होते. नंतर अतिविचारी माणसांच्या घोळक्यासमोर आपले अभ्यासशून्यतेचे प्रमाणपत्र वारंवार समोर करून गोंधळ उडवून देते. 

‘विमेन आय न्यू’ ही कथा पुस्तक आणि लेखकासंबंधीची आहे. हयातभर ज्या लेखकाच्या पुस्तकाच्या प्रेमात निवेदिका राहते, त्याची अपघाती भेट पुढल्या आयुष्यात झाल्यानंतर त्याच्या लेखनाचा जगण्याशी न जुळणारा ताळमेळ पाहत लेखिका बऱ्याच मोठय़ा धक्क्यात जाते. या लेखकाच्या मुलीसह कॉलेजमधील आणि तारुण्यातील बराच काळ राहूनसुद्धा तिला ती मैत्रीण आपल्या वडिलांच्या लेखन उद्योगापासून अपरिचित ठेवते. ही कथा वाचल्यानंतरही (‘हू डू यू लव्ह’ संदर्भात गायक अ‍ॅडम लेव्हिटच्या तपशिलासारखा) आपण ‘विमेन आय न्यू’ या पुस्तकाचा शोध घेण्यास उद्युक्त होऊ शकतो. एका कथेत एक पोलिश कवी आहे. ज्याची बायको मुलांबरोबर दुसऱ्या माणसाशी घरोबा करून राहते. हा फाटका आणि भणंग कवी आपल्या बायकोच्या नव्या नवऱ्याशी मैत्री करताना दिसतो आणि या ‘सवत्यां’ची कहाणी पुढे विचित्र वळणावर येऊन ठेपते. ‘टॅक्सॉनॉमी’ नावाच्या कथेतील नायक आपल्या पहिल्या बायकोच्या दुसऱ्या लग्नाच्या मुलाला पाहायला जातो, तोही त्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर. आडगावात घडणाऱ्या या कथेचा परिसर जागतिकीकरणाच्या रेटय़ात कोकणातल्या किंवा कुठल्याही देशातील पडझड झालेल्या खेडय़ाचे वातावरण उभे करतो. तिथलेच अडलेले हतबल आयुष्य जगणाऱ्या लोकांची व्यथा अत्यंत कमी शब्दांत समोर आणतो. ‘द युनिव्हर्सल पर्टिक्युलर’ या कथेत एकाच व्यक्तिरेखेची अनेकदा अनाथ होण्याची साखळी पाहायला मिळते.

बारमध्ये काम करणाऱ्या, मसाज करणाऱ्या, अभिनयात आयुष्य पोळलेल्या व्यक्ती, हॉटेलात रोजंदारी करणारी माणसे ही या कथांतील पात्रे. काही काळ परदेशी राहिलेली तर काही काळ विदेशात राहूनही कॅनेडियन असणे जपणारी. यातली कुठलीही कथा स्त्रीवादी नजरेतून वा पुरुषवादी नजरेतून लिहिली गेली नसून कथा लिहिण्याचा आणि वाचण्याचा आनंद मिळावा या ‘कथावादी’ विचारांतून उमटलेली आहे. कॅनडा या अनेक स्थलांतरितांना सामावून घेणाऱ्या देशात अ‍ॅलिस मन्रो इतकी वर्षे उत्तमोत्तम कथाच का लिहीत राहिली, त्याचे थोडे तरी उत्तर अ‍ॅलिक्स ओहलिनच्या या कथा वाचून मिळू शकेल. 