मनोहर सप्रे यांच्या निधनाच्या बातमीने विलक्षण खिन्नता आली. सप्रे म्हणजे एक बहुपेडी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांनी सरकारी नोकरीपासून प्राध्यापक, कामगार चळवळीचे नेते, व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार, लेखक अशा अनेक प्रांतांत मनसोक्त मुशाफिरी केली. त्यांनी वर्तमानपत्रांसाठी लिहिलेल्या स्फुटलेखांच्या संग्रहाचे ‘मन मौजी’ हे शिर्षक अगदी सार्थ होते. त्यांचं वाचन चौफेर आणि अफाट होतं. ‘वाचक हा साहित्य निर्मितीचा एक भागीदार असतो. कवि किंवा लेखक काही एक लिहून जातो पण त्या लेखनाला वाचकागणिक नवनवे अर्थ प्राप्त होत जातात. तो साहित्य-विस्तार असतो.’ हे त्यांचं आवडतं मत होतं.
शि.द. फडणीस, वसंत सरवटे, बाळ ठाकरे या मराठी वाचकांना व्यंगचित्रकलेची गोडी लावणाऱ्या आदल्या पिढीतील काही मोजक्या व्यंगचित्रकारांमध्ये मनोहर सप्रे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. जवळपास २० वर्षं त्यांची सामाजिक व्यंगचित्रे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाली. चंद्रपूरसारख्या तेव्हाच्या आडगावी राहणारे सप्रे चित्र काढून ओळखीच्या रेल्वेगार्डमार्फत मुंबईला पाठवायचे. दुसऱ्या दिवशी तो ते ‘लोकसत्ता’ कार्यालयात पोहोचवायचा आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी ते छापून यायचं. राजकीय विषय तात्कालिक असतात. त्या विषयावरचं व्यंगचित्र लगोलग प्रसिद्ध व्हावं लागतं, ते शक्य नसल्यामुळे सप्रे सामाजिक विषयांवरच चित्रे काढत. त्या काळात अनेक मासिके आणि दिवाळी अंकांतही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध व्हायची.
हेही वाचा : ‘लाडक्या बहिणी’ एकगठ्ठा मते देतात?
‘व्यंगार्थी’, ‘हसा की!’ हे त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचे संग्रह खूप लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या काष्ठ-शिल्पकलेतील योगदानासंबंधी ‘फ्रॉम बीइंग टू बिकमिंग’ हे कॉफी-टेबल पुस्तकही संग्राह्य आहे. त्यांच्या निवडक कलाकृतींचे एक कायमस्वरूपी प्रदर्शन पेंच राष्ट्रीय पार्क येथील एका रिसोर्टमध्ये उभारण्यात आले आहे. अनेक पुरस्कारांनी सप्रे सन्मानित झाले आहेत. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी वार लावून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे पुढे शिकण्याऐवजी सरकारी नोकरी पत्करली. त्यांनी चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नसलं, तरी अंगात कलागुण होतेच. ‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी तिथे व्यंगचित्रकार म्हणून काही दिवस काम केलं. कल मार्क्सिझमकडे होता, त्यामुळे कामगार चळवळीत काही दिवस पूर्ण-वेळ कार्यकर्ता म्हणून काम करून पाहिलं. (एकदा तर चक्क लोकसभेची निवडणूकही लढवली!) अशाच भटकंतीत केव्हातरी तत्त्वज्ञान विषयातील एम.ए.ची पदवी घेऊन पुढची बरीच वर्षं (त्यांच्याच शब्दांत, यातनामय नाइलाज म्हणून) प्राध्यापकी केली. त्यांचा विषय नसलेली मुलं त्यांच्या तासाला गर्दी करतात, वर्गात जागा नसली तर बाहेर उभं राहून त्यांचं लेक्चर ऐकतात म्हणून प्राचार्यांनी कानउघाडणी केली, तेव्हा पुढचा-मागचा कोणताही विचार न करता, त्या दिवशीच, राजीनामा देऊन ते बाहेर पडले!
पुढे त्यांनी आपल्या कलेच्या बळावर चरितार्थ चालवला. अव्वल दर्जाचे ‘डिझायनर’ आणि काष्ठ-शिल्पकार अशीही त्यांची व्यावसायिक ओळख आहे. त्यांच्याकडे अनेकजण ड्रिफ्टवुड, नदीतले गोटे, बांबू, टेराकोटा अशा वस्तूंपासून कलाकृती बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन गेलेत. चंद्रपूरच्या जंगलांतल्या कित्येक आदिवासी मुलांना कलाशिक्षण देऊन त्यांनी पोटापाण्याला लावलं आहे; एवढंच नव्हे, तर त्यांच्या कलाकृती थेट फ्रान्समधल्या प्रदर्शनात मांडल्या आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांत त्यांना वक्ता म्हणून, तर सरकारी समित्यांवर तज्ज्ञ म्हणून बोलावलं जात असे.
अभिव्यक्तीचं एक साधन म्हणून त्यांनी पत्रलेखनाचा पर्याय निवडला. अगदी भिन्न प्रवृत्तीच्या आणि प्रकृतीच्या व्यक्तींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांपैकी निवडक पत्रांचे ‘सांजी’ आणि ‘रुद्राक्षी’, ‘दहिवर’ हे संग्रह गाजले. आडिवरेकर, बी. विठ्ठल, धर्मापूरकर, पंडितजी आदींना लिहिलेल्या पत्रांतून त्यांनी कला आणि व्यवहार याविषयीची आपली मतं अतिशय प्रांजळपणे मांडली आहेत. एके ठिकाणी ते लिहितात, ‘सामान्य स्थितीतून वर येणाऱ्यांच्या मनांत खोलवर तळाशी एक सूक्ष्मसा न्यूनगंड असतो. धाडसी निर्णयाच्या क्षणी नेमका तो आपल्याला मागं खेचत असतो. एकेकाळी माझ्यातही तो होता, पण संघर्षाच्या रियाझात तो नाहीसा होऊन माझ्यात जादाच अहंगंड आला. वाचन, मनन, संवादी भाषा, वागण्याची रीती, मानसशास्त्रीय निरीक्षण आणि अंदाज, बहुश्रुतपणा या जमांच्या आधारे मी पुढे आक्रमकपणे वागू शकलो. मात्र या तथाकथित श्रेयातून माझी एकच शोकांतिका झाली, ती म्हणजे, जगण्याच्या या वेगात माझ्यातल्या कलाकाराचा मात्र बळी गेला. ऑपरेशन यशस्वी झालं, पण रोगी दगावला असं सारं विपरीत झालं.’
हेही वाचा : महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे
व्यंग-विनोदाची इमारत प्रामुख्याने विसंगतीवर आधारित असते. त्यावर सप्रे सविस्तर भाष्य करतात. ‘विनोदाला आधारभूत विसंगती राजकारणातच आढळतात, हा मोठा गैरसमज आहे. खरं तर, पृष्ठभागावरच्या दृश्य राजकारणाला तोलणारे अदृश्य आधार समाजजीवनाच्या तळाशीच आढळतात; म्हणून मी त्यांनाच लक्ष्य बनवून व्यंगचित्रं रेखाटत गेलो. समाजजीवनाच्या सगळ्या पातळ्यांवर ज्या विसंगती आढळतात, त्या व्यंगोपहासाने नाहीशा होणं शक्य नसलं, तरी निदान त्या उघड करून त्या जाणवून देण्याचं अमाप सामर्थ्य त्यात आहे असा माझा विश्वास आहे. पाश्चात्त्य जगतात व्यंगचित्रांसह एकूण विनोद हा समाजजीवनाचा आरसा म्हणून त्याला विलक्षण महत्त्व आलेलं आहे. आपल्याकडे असं काही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकलं नाही. कारण आम्हाला त्या विसंगती नाहीशा करण्याऐवजी त्या उदात्तीकरणातून जपाव्याशा वाटतात. म्हणून आम्ही अधिमान्यतेद्वारे त्यांना प्रतिष्ठित केलं आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय समाजजीवनाला एक अभूतपूर्व दांभिकपण येत गेलं. व्यवहारांप्रमाणंच धार्मिक श्रद्धाही त्याला अपवाद नाहीत. पूजेच्या म्हणून बाजारात मिळणाऱ्या या स्वस्त (किडक्या) खारका-सुपाऱ्या आणि लांडे देवीचे खण याचंच उदाहरण. समाजाकडून माझी ‘बोले तैसा चाले’ एवढीच अपेक्षा आहे. त्याच दृष्टीनं मी सभोवतालच्या परिसराकडे बघतो. बोलण्यातून चालणं वजा केलं, की व्यंग बाकी उरतं हेच एकमेव सूत्र मला यातून गवसलं आहे.’
कविता हा सर्प्यांना अतिशय जवळचा आणि भावणारा साहित्यप्रकार आहे हे त्यांच्या पत्रांतून पानोपानी जाणवतं. ‘तंत्रात्मकदृष्ट्या व्यंगचित्राचे ‘कविता’ या प्रकाराशी गहिरे आणि विलक्षण साम्य आहे. अन्य सगळे कलाप्रकार विस्तारातून आकार घेतात, तर व्यंगचित्र आणि कविता हे दोनच प्रकार तेवढे संकोचातून जन्मतात; किंबहुना या प्रकारे त्रोटक होण्यामुळेच त्यांच्यात प्रखरता येते.’ असं मत ते नोंदवितात.
हेही वाचा : भारतातील मानसिक आरोग्याचे धोरण आणि कायदे
आपली अनुभवविश्वं समान नसतात आणि आपल्यातल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी प्रश्न आणि समस्या भेडसावत असतात. आपल्या अनुभवांना आणि समस्यांना काही विशिष्ट प्रासंगिक संदर्भ असले आणि स्थल-कालानुरूप स्वतंत्र ‘विशेषनामं’ असली, तरी प्रयत्न केल्यास त्यामधून काहीएक समान सूत्र शोधता येण्यासारखं असतं. त्यातूनच आपले व्यक्तिगत तत्त्वज्ञान आपल्याला विकसित करता येऊ शकते आणि त्याच्या आधारे आपण आपलं समस्याग्रस्त आयुष्य सुसह्य करू शकतो, हाच माझ्या मते सर्प्यांच्या व्यंगचित्रांचा आणि लेखनाचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.
pkarandikar50 @gmail. com