अभिजीत ताम्हणे
जातिभेद आणि त्याचे दुष्परिणाम यांबद्दल एवढं लिहून झालंय की या इझाबेल विल्करसन काय निराळं सांगणार आहेत, अशा कुतूहलानंच कोणताही भारतीय – विशेषत: महाराष्ट्रीय – वाचक या पुस्तकाकडे पहिला कटाक्ष टाकेल. त्याउलट अमेरिकन वाचकांना कदाचित, अंगाच्या रंगावरून ठरणाऱ्या वर्णभेद किंवा ‘वंश’भेदाला कास्ट : जात का मानावं असा प्रश्नही पडला असेल. या दोन्ही प्रकारच्या वाचकांना नवी दृष्टी देणारं हे पुस्तक आहे. अमेरिका, भारत आणि नाझी जर्मनी यांमधील जन्मदत्त जात-जाणीव आणि तिच्यामुळे होणारे सामाजिक, राजकीय आणि मानसिक परिणाम हे (देश- काळानुरूप होणारा तपशिलाचा फरक वगळता) एकमेकांपेक्षा फार निराळे नाहीत, हे या पुस्तकाचं म्हणणं आहे. जन्मावर आधारलेल्या वर्चस्व / कनिष्ठत्व जाणिवा अमेरिकी गोऱ्यांच्या असोत, भारतातील कथित उच्च वर्णीयांच्या असोत किंवा गेल्या शतकाच्या पूर्वार्धात कुणा लोकप्रिय नेत्याच्या नादी लागून स्वत:ला खरे आर्यन समजू लागलेल्या जर्मनांच्या – त्या जातजाणिवा बुद्धी आणि तर्कापासून फारकत कशा घेतात, हे इझाबेल विल्करसन विविध प्रकारे दाखवून देतात.
विविध प्रकारे म्हणजे काय? याचं एका वाक्यातलं उत्तर आहे : बुद्धीप्रमाणेच भावनेला, सदसद्विवेकाला आणि व्यक्तिगत तसंच सामाजिक नीतिमत्तेला आवाहन करून ! ते कसं? याचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न पुढल्या परिच्छेदांतून करतो आहे. पण त्याआधी या पुस्तकाच्या रचनेबद्दल. सात भागांमधल्या ३१ प्रकरणांतून उलगडणारं हे पुस्तक विद्यापीठीय अभ्यासाच्या शिस्तीत, पण वाचकांशी संवाद साधणाऱ्या ओघवत्या शैलीत लिहिलं गेलं आहे. पुस्तकाचा भर अमेरिकेतल्या उदाहरणांवर अधिक आहे, या उदाहरणांना इतिहासाची आणि वर्तमानातल्या अनुभवांची जोड आहे. त्याखालोखाल भारतात लेखिका अनेकदा आली तेव्हाचे अनुभव किंवा भारतीय जातिव्यवस्थेचं वास्तव तसंच त्याविषयी झालेलं चिंतन याबद्दलचा माहितीवजा मजकूर आहे; तर नाझी जर्मनीबद्दलचा या पुस्तकातला भाग तुलनेनं कमी असला तरी विचारप्रवर्तनासाठी पुरेसा आहे.
किस्से सांगण्याच्या तंत्राचा वापर पुस्तकात अधूनमधून आढळतो; त्यात अलीकडल्या काही घटना आहेत तसंच अगदी जुन्या, इतिहासानंही लक्षात न ठेवता जुन्या पानांत गाडून टाकलेल्या घटनासुद्धा आहेत. काही उद्बोधक किस्से आहेत. उदाहरणार्थ, जेन एलियट या शिक्षिकेनं १९६८ नंतर – मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या हत्येमुळे विद्ध होऊन, तिसरीतल्या मुलामुलींना वंशभेद कसा वाईट हे शिकवायचं ठरवून काय केलं, याचा किस्सा. ‘आय ऑफ द स्टॉर्म’ या फिल्ममुळे तो अनेकांना माहीत असेल.. वर्गात सारी मुलं गोरीच असताना, जेन यांनी भरवर्गात जाहीर केलं – निळय़ा डोळय़ांची मुलंमुलीच हुशार नि शहाणी – या निळय़ा डोळय़ांच्या मुलामुलींनी पिंगट डोळे असलेल्या मुलामुलींसह खेळू नये, पाणी निळे डोळेवाल्यांनीच नळावरनं थेट आणि पर्यायानं पिंगट डोळेवाल्यांच्या आधी प्यावं ! शिक्षिकेचं ऐकणाऱ्या त्या मुलामुलींपैकी पिंगट डोळेवाल्यांना त्रास झाला.. निळे डोळे असलेल्या मुलानं शिरजोरपणा करत कुणा मुलाला , ‘ए पिंगटडोळय़ा..’ असं चिडवलंसुद्धा. पण मग यातला कथित श्रेष्ठ- कनिष्ठांचा क्रम बदलून, ज्यांना विनाकारण श्रेष्ठपणा बहाल केला गेला त्यांच्यामुळे इतरांना त्रास होतो, कथित श्रेष्ठांनी चिडवलं म्हणूनही तो होतो; हे संस्कारक्षम वयातच शिकवण्याचा प्रयोग होता तो. याखेरीज काही ‘किस्से’ अंगावर काटा आणणाऱ्या ‘लिंचिंग’च्या वर्णनांचे. ‘शरिया’सारखे कायदे नसणाऱ्या अमेरिकेत, युरोपातून आलेल्या गोऱ्यांनी काळय़ा गुलामांना दिलेल्या शिक्षांचं हे वर्णन आहे. पण ‘ते जुनं कधीचं तरी’ म्हणून सोडून देता येईल का, हा सवाल लेखिका अन्य पानांतून करते आहे- त्यासाठी ‘आज- आत्ता’च्या जातिभेदपूरक जाणिवांचे दाखलेही देते आहे. उदाहरणार्थ, ‘अहो मी काही लॉण्ड्रीवाला नाहीये.. मी तुमचा नवा शेजारी.. ते रस्त्यापलीकडलं घर हल्लीच घेतलंय आम्ही’ असं, ज्याला पाहिल्यावर शेजारीणबाईंनी कपडय़ांचा गठ्ठा हातात घेऊनच दार उघडलं, अशा माणसाचा किस्सा. हा माणूस कोणत्या वर्णाचा आणि शेजारीण कोणत्या वर्णाची, हे आलं ना लक्षात?
या शेजारणीसारख्या माणसांचा कांगावाही गेल्या काही काळात वाढू लागला, तो समजून घेण्यासाठी नाझीकालीन जर्मनांची मानसिकता निरखणं महत्त्वाचं ठरतं, तसंच ‘ते आपल्याहून वरचढ ठरू लागलेत’ असा कथित श्रेष्ठजातींचा ग्रह कसा होतो, याविषयीचं समाजशास्त्रीय प्रतिपादन समजून घेणंही अगत्याचं ठरतं. समाजशास्त्रीय सिद्धान्तांबद्दल सरळपणे लिहिणं, हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जात-विषयक चिंतन यात आहे. ‘प्रत्येक जात कोणत्या ना कोणत्या युक्तिवादानं स्वत:ला श्रेष्ठ समजत असते’ आणि त्यामुळे जात आणि जातिभेद दोन्ही घट्ट होत राहतात, हे डॉ. आंबेडकरांना दिसलेलं वास्तव आजही बदललं नाही, याची टोचणी लेखिकेला आहे आणि अमेरिकेत ट्रम्प यांचा उदयच मुळी अशा घट्ट जातिभेदामुळे झाला, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. अमेरिकी वर्णभेदाला तिथल्या अभ्यासकांनी ‘जात’ (कास्ट) म्हटलं ते १९३६ साली. त्याच वर्षी ‘अॅनिहिलेशन (/अॅनायलेशन) ऑफ कास्ट’ हे डॉ. आंबेडकरांचं न झालेलं भाषण निबंधरूपानं प्रकाशित झालं होतं, हा निव्वळ योगायोग म्हणू, पण डॉ. आंबेडकरांनी कोलम्बिया विद्यापीठात जातिव्यवस्थेचा अभ्यास मांडला होता तो १९१६ च्या आधीच.. आणि अमेरिकेत कागदोपत्री समता आली ती १९६८ मध्ये- त्याआधी केवळ गुलामगिरी संपुष्टात आली होती. पण गुलाम बनवण्याची मानसिकता मात्र कायम राहिली आणि ती ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ प्रकारच्या घोषणांतून आजही दिसते, हे या पुस्तकातून भारतीय वाचकांना जाणवेल तेव्हा आपल्याकडली उदाहरणंही आठवतील. त्या उदाहरणांना पूरक ठरणारा एक तपशील पुस्तकात आहे, तो म्हणजे २०१२ मध्ये ट्रेव्हॉर मार्टिनची झालेली हत्या ही थेट गोऱ्यानं नव्हे, एका ‘लॅटिनो’नं केली होती आणि तिच्याहीमागे काळय़ांबाबतचा जातिभेद होताच.
भारतातले आजचे तपशील- विशेषत: गोरक्षक, कांवडिये आदी कोणत्या ‘समाजा’तून येतात यासारखे अभ्यास पुस्तकात असते तर ते परिपूर्ण ठरलं असतं, पण अमुक एक पुस्तक परिपूर्ण नाही म्हणून काही बिघडत नाही.. इतरांनाही पुस्तकं लिहिता येतातच. इसाबेल विल्करसन यांनी सामाजिक प्रश्नाकडे तक्रारीच्या किंवा रडगाण्याच्या सुरात न पाहाता साकल्यानं पाहिलं आहे, तसं पाहिल्यावर तथाकथित ‘श्रेष्ठां’ची कीवच वाटावी असे निष्कर्ष निघताहेत, ही दृष्टी पुढल्या पुस्तकांसाठीही महत्त्वाची ठरेल.
या पुस्तकावर चित्रपट निघाला; तो का?
इसाबेल विल्करसन यांचं ‘कास्ट – द ओरिजिन्स ऑफ अवर डिसकन्टेन्ट्स’ हे पुस्तक स्वत:सकट जगाला तपासून पाहणारं आहे. ज्या वस्तुस्थितीचा सामना आपण सारेच जण करतो आहोत त्याबद्दल मी लिहिते आहे, हा विश्वास असल्यानं लेखिका या पुस्तकाच्या वण्र्यविषयापासून नामानिराळी राहात नाही. जात-जाणिवेची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत आणि प्रसंगी ही जाणीव किती पाशवी ठरू शकते, हे सांगताना तिनं स्वत:च्या आयुष्यातले काही प्रसंगही मांडले आहेत. पत्रकार म्हणून काम करताना, म्हणजे जगातल्या कार्यरत/ क्रयशक्तिवंत मानवांपैकी एक झाली असताना लेखिकेला केवळ तिच्या वर्णामुळे जे सहन करावं लागलं, त्यामुळे तिचा अभ्यासविषय अधिक सच्चा होत गेला, अभ्यासू प्रश्नांचं स्वरूप निव्वळ विद्यापीठीय न उरता हे प्रश्न म्हणजे आतून उमटलेले सवाल ठरले. काही वेळा तर या प्रश्नांवर थेट तोडगे शोधण्याचा प्रयत्नही लेखिकेकडून झाला.
उदाहरणार्थ, १९३० ते १९६० या दशकांत अमेरिकेतला अगदी कमी वेतन कमावणारा कामगारसुद्धा गोरा असल्यानं काळय़ांना ‘खालचे’ मानत असे, ही माहिती कुणाही अभ्यासकाला मिळू शकते तशी लेखिकेकडेही होती. पण अगदी अलीकडल्या ‘ट्रम्प-युगा’त तिच्याच घरी आलेला प्लम्बर ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची टोपी घालून आलेला गोरा मध्यमवयीन.. तो लेखिकेकडे संशयानंच पाहू लागला- ही इतकी पैसेवाली कशी? हे घर हिचंच की ही बनाव रचतेय, तिचा नवरा गोरा असल्याचा? अशा शंका त्याला असल्याचं लेखिकेनं ओळखलं आणि तेच केलं जे मानवी समानतेवर विश्वास असलेली कोणीही व्यक्ती करेल : तिनं या प्लम्बरच्या राजकीय मतांचा अवमान न करता विचारलं, घरी कोणकोण असतं तुमच्या.. कधीपासून करताय हे काम? जो प्लम्बर स्वत:च्या सामाजिक अंधविश्वासांमुळे आणि त्याहून मूर्खपणाच्या राजकीय मतांमुळे काम टाळत होता, त्यानं मनापासून काम केलं! – हा आणि असे इतरही अनेक प्रसंग आता ‘ओरिजिन’ नावाच्या चित्रपटात आहेत. पुस्तकाच्या लेखिका इसाबेल विल्करसन यांची जीवनकहाणी सांगणारा, पण या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट एव्हा डय़ुवेर्ने यांनी दिग्दर्शित केला. त्यात विल्करसन यांची भूमिका आंजेनू एलिस यांनी केली आहे. लेखिकेच्या कुटुंबीयांच्याही भूमिका अभिनेते-अभिनेत्रींनीच केल्या आहेत, तर सूरज एंगडे हे स्वत:च्याच भूमिकेत आहेत.
‘कास्ट’ हे पुस्तक सुरू होतं ते वरवर पाहाता असंबद्ध वाटणाऱ्या एका परिच्छेदानं. ‘मॅन इन द क्राऊड’ नावाचा हा दीर्घ परिच्छेद हिटलरकाळात (सन १९३६ मध्ये) तत्कालीन ‘महान नेत्या’ला अनेक कामगार जर्मन पद्धतीनं वंदन करताहेत, अशा छायाचित्रात एकच माणूस निराळा आहे.. त्यानं हाताची घडी घालून, वंदन करणं नाकारलंय! हा ‘गर्दीमधला एकटा’ माणूस म्हणजे ऑगस्टस लॅण्डमेसर. त्यानं केवळ वंदन करण्यासाठी हात उंचावला नाही एवढंच नव्हे, तर ज्यू समाजाशी कोणतेही व्यवहार न करण्याचं ‘ठरलं’ असताना यानं एका ज्यू तरुणीशी सूत जमवलं. दोघं चोरून भेटायची. अखेर, त्याच्या प्रेयसीचं तेच झालं जे अन्य हजारो ज्यू युवतींचं झालं असेल. पण त्या ऑगस्टस लॅण्डमेसरचं पात्रही ‘ओरिजिन’ या चित्रपटात एव्हा डय़ुवेर्ने यांनी आणलंय. तथाकथित ‘समाजमान्यते’ला नकार देत राहण्याची ही प्रेरणा आहे.अर्थात, इसाबेल विल्करसन यांनी पुस्तकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अनेकदा केलेला आहे, महात्मा फुले यांचा उल्लेख किमान तीनदा आणि ‘गुलामगिरी’ या त्यांनी मराठीत आणलेल्या पुस्तकाचाही उल्लेख आहे.. तरीही चित्रपट-कथेच्या ओघात या भारतीय महापुरुषांना स्थान मिळालेलं नाही.
पुस्तक वाचणारे सारे जण हा चित्रपट पाहातीलच, असं नाही (आणि उलट- चित्रपट पाहिलेल्या अनेकांनी हे पुस्तक वाचलं नसेलही); मात्र पुस्तक वाचता- वाचताच लेखिकेच्या आयुष्यातले काही प्रसंग चित्रपटासारखे उलगडतात. त्यापैकी नमुनेदार अशा दोन-तीन प्रसंगांचा उल्लेख इथं आवश्यकच आहे. पहिला प्रसंग शिकागोमधला. लेखिका पत्रकारितेत तुलनेनं नवी आहे. न्यू यॉर्कचे अनेक व्यापारी पार बाराशे किलोमीटरहूनही दूर असलेल्या शिकागोतल्या एकाच रस्त्यावर दुकानं थाटत आहेत, अशी साधीशीच बातमी करण्यासाठी तिला न्यू यॉर्क टाइम्सनं शिकागोला पाठवलं. आयत्या प्रसिद्धीसाठी बऱ्याच व्यापाऱ्यांनी तिला मुलाखती दिल्या, त्यातून बातमीखेरीजही भरपूर ऐवज जमला वगैरे.. पण एका व्यापाऱ्यानं त्याच्याकडे आलेली ही ‘काळी तरुण मुलगी’ पाहिली आणि तो म्हणाला- ‘तुझ्याशी बोलायला मोकळा नाहीये मी, माझी मुलाखत ठरलीय आता- न्यू यॉर्क टाइम्सच्या प्रतिनिधीला वेळ दिलीय मी.. काय समजलीस?’ यावर लेखिकेनं ‘अहो मीच ती..’ वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं फर्मावलं- ‘कंपनीचं आयकार्ड दे तुझं मला पाहायला’- हे ऐकून मात्र लेखिकाही उठली- नाही झाली मुलाखत तरी चालेल.. मी ओळखपत्र दाखवायला बांधील नाही.
पुढला एक प्रसंग लेखिकेनं नाव कमावल्यानंतरचा, साहजिकच तिचे विमानप्रवास ‘बिझनेस क्लास’ किंवा त्याहून वरच्या श्रेणीतून होऊ लागल्यानंतरचा. विमान उतरल्यानंतर वरच्या कप्प्यातून बॅगा काढण्यासाठी सर्वच उतारूंनी आसनं सोडली असताना शेजारच्याच जाडगेल्या अहंमन्य, उर्मट (याचा वर्ण सांगायलाच हवा का?) पुरुष प्रवाशानं, स्वत:च्या पाठमोऱ्या अंगाचा सारा भार लेखिकेवर टाकला. ती अक्षरश चेमटली. मदतीसाठी तिनं अन्य प्रवाशांकडे पाहिलं पण ते सारेच ‘त्याच्यासारखे’! असे अनेक प्रसंग.. लेखिकेला कळलेली ही भेदभावाची कटू चव. तरीही रुढार्थानं हे ‘दलित आत्मचरित्र’ म्हणता येणार नाही. उलट, दलितत्व त्यागून तुमच्यासारखीच मीही स्वत:ला सिद्ध करायचा प्रयत्न करतेय तरी तुम्ही माझ्यावर माझं दलितत्व लादताय, असं सांगू पाहणारं हे पुस्तक आहे (अलीकडल्या काळात भारतीय तरुणांनी मूळ इंग्रजीत लिहिलेली पुस्तकंही या सुरापर्यंत पोहोचणारी आहेत). लेखिका व्यवस्थेबद्दलच बोलते आहे, पण तिची कहाणी व्यवस्थेच्या बाहेरची कशी असेल? या कहाणीचे मासलेवाईक अंश या पुस्तकाचा ‘चित्रदर्शी’पणा वाढवतात.. आणि हे चित्र जाणवूनसुद्धा वाचक अस्वस्थ होणार आहे की नाही, अशी परीक्षाही घेतात!