डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तिला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या सभेच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदवाक्याची सुद्धा शंभरी होत आहे. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेली ही पहिली सार्वजनिक संघटना होय. या संघटनेचा प्रभाव आजही समाजमनावर दिसून येतो, त्यामुळे या संघटनेच्या शतकपूर्तीनिमित्ताने या संघटनेची व डॉ. आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारांवर चर्चा होणे गरजेचे आहे.

९ मार्च १९२४ ला दामोदर हॉल, परळ येथे डॉ. आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून सभा घेतली. त्यानुसार २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली. या सभेच्या सदस्यांमध्ये सर चिमणलाल सेटलवाड, मेयर निस्सीम, रुस्तुमजी जीनवाला, जी. के. नरिमन, डॉ. र. पु. परांजपे, बी. जी. खेर, नानाजी मारवाडी, झीनाभाई राठोड, केशव वाघेला यांच्यासह काही चांभार, मातंग व महार सदस्यांचा समावेश आहे. अस्पृश्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात अस्पृश्यांनी भूमिका घेणे जसे गरजेचे होते, तसेच स्पृश्य समाजानेसुद्धा या बाबतीत भूमिका घेणे गरजेचे आहे. हा विचार शंभर वर्षांपूर्वी जेवढा महत्त्वाचा होता, तेवढाच आजही महत्त्वाचा आहे. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार किती दूरदर्शी होता, याची जाणीव होते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हे ही वाचा… अग्रलेख: स्थलांतराची शिडी; वर्गवादाचा साप!

बहिष्कृत हितकारिणी सभेचे उद्देश व नियम विचारपूर्वक तयार केले गेले होते. त्याला कठोर अशी शिस्त होती, हे सभेच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून स्पष्ट होते. बहिष्कृत वर्गाच्या चालू परिस्थितीची माहिती गोळा करून व ती लोक निदर्शनास आणून त्यावर लोकमत तयार करणे, त्याचप्रमाणे सरकारकडून त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या उन्नतीस जरूर त्या सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे. बहिष्कृत वर्गात जागृती करणे व त्याप्रीत्यर्थ प्रचारक नेमणे, बहिष्कृत वर्गात त्यांच्या हक्कांची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे. शिक्षणप्रसार करणे, वाचनालये स्थापणे, विद्यार्थी वसतिगृहे काढणे, लायक विद्यार्थ्यांस शिष्यवृत्त्या देणे व देवविणे, समाजजागृतीसाठी कीर्तने किंवा मॅजिक लॅटर्नद्वारे व्याख्याने वगैरेंची व्यवस्था करणे, आर्थिक उन्नतीच्या जरूर त्या योजना व सूचना तयार करून योग्य अधिकाऱ्यास सादर करणे, इ. या सर्व उद्देशांना अनुसरून बहिष्कृत हितकारिणी सभेची वाटचाल नंतरच्या काळात झाली.

बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीद

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य आहे. हे फक्त तीन शब्द नाहीत, तर अस्पृश्यांच्या दु:ख निर्मूलनाचा मूलमंत्र या तीन शब्दांमध्ये सामावलेला आहे. भारतीय सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासात चिरायु असणारे हे शब्द आहेत. या शब्दांनी जशा बहिष्कृतांच्या अनेक पिढ्या घडवल्या, तसेच हे शब्द संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत आणि आता तर या शब्दांची चर्चा जागतिक पातळीवर होत आहे. जगभरातील नाकारलेल्या समूहांनाही प्रेरणा देण्याचे काम हे शब्द करत आहेत.

तत्कालीन बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे प्रत्येक जिल्ह्यातून लोकजागृतीसाठी सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम राबवला होता. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या ठिकाणी तिसरे मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषद अधिवेशन घेण्यात आले. या सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा एवढा परिणाम झाला की, बेळगावला १ जून १९२७ ला एक वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहाची जबाबदारी बळवंत हनुमंत वराळे यांनी स्वीकारली. नंतर ते वसतिगृह १९२९ ला धारवाडला स्थलांतरित झाले. काही दिवसांनी जळगाव, पनवेल (ठाणे येथे स्थलांतरित) व अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करण्यात आली.

हे ही वाचा… भूगोलाचा इतिहास: समृद्धीचा पर्जन्यमार्ग

अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळाव्यात यासाठी सभेने प्रयत्न केले. श्री. जाधव यांच्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत. कु. काशीबाई जाधव या ढोर समाजाच्या मुलीला जे. जे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश, दरमहा १५ रु. स्कॉलरशिप व नर्सेसच्या बोर्डिंगमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सभेच्या नेतृत्वाखाली श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळी, कामाठीपुरा पहिली गल्ली, औचितपाडा येथे रात्रीची इंग्रजी व मराठी शाळा सुरू केली.

हस्तलिखित व बहिष्कृत भारत

बहिष्कृत भारतच्या कार्यालयामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या रविवारी वादविवाद मंडळाच्या बैठका होत. या बैठकीत ‘रणशिंग’ नावाचे एक हस्तलिखित मासिक सुरू करण्याचे ठरले होते. ते सुरू झाले की नाही याची माहिती उपलब्ध नाही; परंतु ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र सुरू केले गेले. त्यात बहिष्कृत समाजाच्या अनेक प्रश्नांना समाजासमोर मांडण्यात आले व अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यात आली.

बहिष्कृत हितकारिणी सभेचे वाचनालय मुंबईतील क्लार्क रोडवर होते. या वाचनालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: देणगी दिली होती. कोल्हटकर आपला ‘संदेश’ आणि दे. वि. नाईक यांचे ‘ब्राह्मण ब्राह्मणेतर’ हे वृत्तपत्र मोफत पाठवत होते. स्टुडंट ब्रदरहूड मुंबईचे सेक्रेटरी यांनी क्लार्क रोडवरील लायब्ररीस दोन बाकांची लाकडे आणि पाच रुपये मजुरी देणगीपोटी दिली. वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेने केलेले हे प्राथमिक प्रयत्न होते. आज भारतात वाचन संस्कृती आणि आंबेडकरी समाज हे समीकरण बनत आहे.

जागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅजिक लॅटर्नच्या साहाय्याने व्याख्याने आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम इंदूर येथील बहिष्कृत हितकारिणी सभेनेदेखील राबवला. शंभर वर्षांपूर्वी जनजागृती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉ. आंबेडकरांनी केल्याचे दिसून येते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या स्थापनेनंतर अस्पृश्यांमधील इतर संघटनांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले. सभेच्या प्रत्येक कृतीला सर्वांचा पाठिंबा असे. बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाने इतर भागातही सभा स्थापन झाल्या. इंदूर येथे श्रीमंत सवाई यशवंतराव महाराज होळकर यांच्या २१ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी बहिष्कृतांची जाहीर सभा भरली. त्या सभेत बहिष्कृत हितकारिणी सभा इंदूर येथे स्थापन करण्याचा निर्णय झाला. मुंबईतील बहिष्कृत हितकारिणी सभेत महिलांचा सहभाग असे, तसाच राधाबाई पंडित आणि अंबुबाई इनामदार यांचा विशेष सहभाग इंदूर येथील सभेच्या कामात असे.

हे ही वाचा… गेल्या दोन-तीन दशकांत नोकरशाही बेबंद का झाली?

सभेला ब्रिटिशांचे सहकार्य

१९२४-१९२७ या कालखंडात बहिष्कृत हितकारिणी सभेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ब्रिटिश सरकारकडे अस्पृश्यांच्या नोकरीच्या निमित्ताने सतत पाठपुरावा केला. त्यामुळे इंग्रज सरकारला बहिष्कृत हितकारिणी सभेची दखल घेणे भाग पडले. मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी सभेला २५० रु. देणगी दिली. अस्पृश्यांनीही सतत देणग्या दिल्या. बेळगाव येथील अनाथ विद्यार्थी आश्रमास श्रीमंत धर्मवीर राजे लक्ष्मणराव भोसले यांनी ५१ रु. देणगी दिली. ज्यांनी-ज्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्यास आर्थिक मदत केली, त्यांच्या मदतीच्या रकमेसह सभेचे सचिव सीताराम शिवतरकर यांनी वेळोवेळी आभारासह प्रसिद्धी दिली आहे. महाडच्या सत्याग्रहासही लोकांनी विशेष देणग्या दिल्या. सभेला मदत म्हणून सोलापूर वतनदार महार परिषदेसाठी येणाऱ्या महार लोकांनी ४४५ रु. देणगी दिली. भारतातीलच नव्हे, तर ब्रिटनमधील काही व्यक्तींनाही अस्पृश्यांविषयी सहानुभूती होती. ब्रिटिश पार्लमेंटचे मजूर पक्षाचे मार्डी जोन्स हे जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी भारतातील अस्पृश्यांचा प्रश्न ब्रिटनमध्ये चर्चिला जावा यासाठी मार्डी जोन्स व सभेच्या सर्व सदस्यांसोबत एक भेट घडवून आणली.

सभेचा महाड येथील सत्याग्रह

बहिष्कृत हितकारिणी सभेने महाडचा चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन हे दोन उपक्रम राबवले, त्यांचे पडसाद आजही समाजावर दिसून येतात. माणूस म्हणून हक्क बजावण्यासाठी हे संग्राम झाले. डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांचीही सभा घेतली, त्या सभेत बाबासाहेबांनी स्त्रियांना उद्देशून केलेल्या भाषणाने महिलांमधील स्वाभिमानाला व त्यांच्या अस्मितेला कायमचे जागृत करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केले. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी भविष्यातील पिढी घडविण्याचे कामही स्त्रियांनी करावे, हा बाबासाहेबांचा विचार आजपर्यंत प्रत्येक दलित स्त्री जपत आणि जगत आली आहे. या सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकर पथका’ची निर्मिती सभेचे व्यवस्थापन करण्यासाठी केली होती. पुढे कालांतराने याचे विस्तृत पातळीवर ‘समता सैनिक दला’त रूपांतर झाले.

जून १९२८ पासून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. याचे जनरल सेक्रेटरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत हितकारिणी सभेने जे वसतिगृह काढले होते, त्याची सर्व जबाबदारी नंतर या मंडळातर्फे पार पाडली गेली. जून १९२८ नंतर बहिष्कृत हितकारिणी सभेचे संदर्भ मिळत नाहीत. काही तात्कालिक कारणे आणि काही प्रशासकीय कारणांमुळे या मंडळाची स्थापना झाली. बहिष्कृत हितकारिणी सभेने आखलेले कार्यक्रम, तिची ध्येय-धोरणे यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक चळवळीच्या वाटचालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. खऱ्या अर्थाने बहिष्कृत हितकारिणी सभेमध्ये सामाजिक, शैक्षणिक चळवळीच्या उत्थानाची बीजे आहेत. आज शंभर वर्षांनंतर त्याचा वटवृक्ष झाला आहे.

sunitsawarkar@gmail.com