संदेश पवार
दसऱ्याप्रमाणेच ‘अशोक विजयादशमी’ तथा ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि या देशात पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. भारतातून लुप्त झालेला बौद्ध धम्म पुनरुज्जीवित केला. खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचे एक आगळेवेगळे शुद्धरूप लोकांसमोर मांडून लोकांना आत्मसन्मान व स्वाभिमान मिळवून देणारा, सर्व प्रकारच्या विषमतेला मूठमाती देणारा, बौद्ध धम्म दिला. या धम्मक्रांतीमुळेच भारतातील दीनदुबळ्या, दलित, शोषित व तथाकथित अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या समाजाला नवे जीवन दिले. गलितगात्र झालेल्या या समाजामध्ये स्वाभिमानाचे व आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवले. म्हणूनच हा सबंध समाज आता स्वाभिमानाचे जीवन जगत आहे. या धर्मांतराने नवबौद्ध झालेल्या समाजामध्ये गेल्या साडेसहा दशकांत कोणता बदल झाला- की नाही झाला- याचा मागोवा घेणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबरला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर नवदीक्षित बौद्ध समाजासमोर एक ऐतिहासिक भाषण केले. “बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ओसाड जंगलासारखी आहे. आणि म्हणूनच तुम्ही या शून्यवत् पवित्र धम्माचे उत्तम रीतीने पालन करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. नाहीतर या धर्म परिवर्तनाची निंदा होईल, आज तुम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करा की, बौद्ध धम्म स्वीकारून तुम्ही फक्त स्वतःचे नव्हे, तर स्वतःबरोबर या देशाचे आणि याबरोबर साऱ्या जगाचा उद्धार करायचा आहे. … जगात जोपर्यंत न्यायाला योग्य स्थान मिळत नाही, तोपर्यंत शांतता नांदू शकत नाही,” असे मार्गदर्शन बाबासाहेबांनी केले. भारतातून जवळपास हद्दपार झालेला बौद्ध धम्म पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी ओळखून, ती पार पाडण्याचा प्रयत्न नवबौद्ध समाज करू लागला.
हे धर्म परिवर्तन करण्यामागची बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती. ते म्हणतात, ‘आम्हाला स्वतःचा सन्मान जास्त महत्त्वाचा वाटतो. आम्ही या सन्मानासाठीच लढतो. सन्मानाने राहणे हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या सन्मानापर्यंत जात असताना जेवढी जास्त आम्ही प्रगती करू, तितकं ते चांगलं आहे व यासाठी आम्ही जो त्याग करू तो थोडाच आहे.’ बौद्ध समाजाने जुना धर्म त्यागल्यानंतर आपली लढाई स्वाभिमान, आत्मसन्मान यासाठीच केलेली आहे. ज्या इतर अस्पृश्य जाती व इतर दलित, मागास समूह यांनी बाबासाहेबांचा धर्मांतराचा विचार स्वीकारला नाही, त्या आहे त्याच धर्मामध्ये राहिल्या. मात्र ज्या दलित /अस्पृश्य जातींनी बाबासाहेबांचा धर्मांतराचा विचार निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारून अमलात आणला, त्या जाती, तो समूह आज खूप वेगाने परिवर्तन करताना दिसून येत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचा महार समाज- समुदाय. या समुदायाने बाबासाहेबांसोबतच बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या पिढीला शिक्षित करण्याचा आग्रह धरला, जुन्या परंपरा त्यागल्या. त्यामुळे आणि पुढच्या काळातही धर्मांतर होत राहिले. हा समुदाय मोठ्या प्रमाणात बदललेला दिसतो. त्याने आपली सर्व प्रकारची प्रगती केलेली दिसून येते. मात्र त्याच वेळी इतर दलितेतर जाती विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या दिसतात.
सन १९५६ मध्ये भारतात बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतरामुळे जवळपास १० ते १५ लाख एवढी झाली होती. मात्र आता ५० वर्षांनंतर (२०११ ची जनगणना) ही लोकसंख्या साधारणपणे ८४ लाखांहून अधिक झालेली दिसून येते. त्यातही सुमारे ६५ लाख लोकसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे सहा ते सात टक्के लोक बौद्ध धर्मीय आहेत. जनगणनेतील आकडेवारीनुसार बौद्ध धर्मीयांमध्ये साक्षरतेचे प्रमाण हे इतरांपेक्षा जास्त आहे. देशभराचे साक्षरता प्रमाण त्या जनगणनेनुसार ७२.९८ टक्के होते, तर नवबौद्धांमध्ये ते ८१.२९ टक्के एवढे आढळले. विशेषतः महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ७४.०४ टक्के इतके आहे. मात्र साक्षरतेचे हेच प्रमाण देशभरातील हिंदूंमध्ये ७३.२७ टक्के हिंदूच राहिलेल्या अनुसूचित जातींमध्ये ६६.०७ टक्के असे दिसून येते.
बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र बौद्ध समाजाने अंगीकारल्यामुळे या समाजात शिक्षणाचा प्रसार व प्रचार वेगाने झाला. या समुदायात स्त्रीभ्रूणहत्यादेखील घडत नाहीत, असे दर हजारी पुरुषांमागे महिलांचे सरासरी प्रमाण (९६५) पाहिले असता लक्षात येते. एकूण बौद्ध लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के लोक हे शहराकडे स्थलांतरित झालेले, शहरात राहणारे दिसून येतात. ही आकडेवारी काय सांगते? तर ‘खेडी सोडा, शहरांकडे चला’ हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश बौद्ध समाजाने अमलात आणला. आणि म्हणूनच गावगाड्यातील विषमतेत, जातीयतेत पिचत न राहता शहराकडे जाऊन नोकरी, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या त्याने संधी शोधल्या. त्यामुळेच या समुदायात विकास होताना आपल्याला दिसून येतो. या विकासाची फळे पूर्णत: साऱ्या समाजात पोहोचलेली नाहीत हे खरे, परंतु अन्यायी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे, त्या विरोधात बंड करण्याचे सामर्थ्य या समुदायांमध्ये आलेले दिसते. अन्य दलित /अस्पृश्य जाती प्रस्थापित सामाजिक , धार्मिक, राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास, त्या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यास धजत नाहीत. मात्र संख्येने अल्प असूनही नवबौद्ध समाज अशा प्रकारच्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी उभा ठाकतो. हे आपल्याला निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आंदोलनाद्वारे दिसून येते. आपले न्याय्य हक्क, सांविधानिक हक्क मिळवण्यासाठी तो तत्पर असतो. ही एक धम्मक्रांतीचीच उपलब्धी आहे.
sandesh.pawar907@gmail.com