१२ फेब्रुवारी १८०९ हा चार्ल्स डार्विनचा जन्मदिवस. त्याच्या जन्माला आता दोनशेहून अधिक वर्षं उलटून गेली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी (१९५९ साली) त्याचा ‘ऑन द ओरिजिन ऑफ द श्पीसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ’ अशा लांबलचक नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. ‘आपण कुठून आलो’ या माणसाला पडलेल्या सनातन प्रश्नाच्या शोधात माणसाला मिळालेलं उत्तर ‘आपल्याला आणि या पृथ्वीवरच्या एकूणच सगळ्या पसाऱ्याला निर्माण करणारा सर्वशक्तीमान ईश्वर’ असं होतं. हा ईश्वर एक किंवा अनेक होते. त्याकरता कुठल्या पुराव्याची आवश्यकता नव्हती. जे परंपरेने आपल्याला सांगितलं आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलं आहे ते चुकीचं कसं असेल हा विचार प्रबळ होता. आजही आहे. डार्विनच्या ग्रंथाने या सनातन प्रश्नाला वेगळी दिशा दिली हे खरं असलं तरी आजही एका मोठ्या मानवसमूहाची ईश्वरावरची श्रद्धा, धर्मश्रद्धा अजिबात ढळलेली नाही. ‘क्रिएशनिस्ट (निर्मितीवादी) वि. इव्होल्यूशनिस्ट (उत्क्रांतीवादी)’ असा संघर्ष आजही सुरूच आहे. देव आहे-नाही, श्रद्धा असावी-नसावी, असल्यास तिची अंधश्रद्धा कशी होऊ नये, श्रद्धा-अंधश्रद्धा यातली सीमारेषा कशी ओळखायची, सगळे तर्क पटूनही जर आपल्या आवडीच्या देवाच्या मूर्तीपुढे लीन व्हावंसं वाटत असेल तर त्याचा खुलासा कसा करायचा या आणि संबंधित मुद्द्यांवर हिरीरीने नित्य चर्चा होत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन उदाहरणं द्यायचा मोह आवरत नाही. पहिलं उदाहरण ‘बिग बँग थिअरी’ या अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिकेतलं. विज्ञान आणि तर्क हे जगण्याचे आधार असलेला, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक, बुद्धिमान आणि तऱ्हेवाईक, आपल्या विक्षिप्त वर्तनामुळे इतरांसाठी डोकेदुखी ठरणारा शेल्डन कूपर आणि येशू ख्रिस्तावर अतूट श्रद्धा असलेली, धार्मिक वृत्तीची त्याची आई मेरी कूपर यांच्यात वेळोवेळी झडणारे वाद हे आस्तिक-नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध यांच्यात असलेल्या दृष्टीकोनातील, विचारातील फरकांचं एक चांगलं उदाहरण आहे. एका प्रसंगात आई म्हणते, “ठीक आहे. प्रत्येकाला त्याचं मत असण्याचा अधिकार आहे”. त्यावर शेल्डन उसळून म्हणतो, “मत? उत्क्रांती हे ‘मत’ नाही. ती वस्तुस्थिती आहे”. त्यावर आई उत्तरते, “आणि हे तुझं मत आहे!”

दुसरं उदाहरण शेल्डनच्या आईची भारतीय आवृत्ती असलेल्या माझ्याच एका मावशीचं. ‘डार्विनने उत्क्रांतीचा ‘शोध’ लावला हे ठीक; पण तो लावण्याची बुद्धी त्याला कुणी दिली?’ असं एकदा ती मला म्हणाली होती. तिच्या या प्रश्नानंतर मी चर्चा आवरती घेतली! (तिच्या दृष्टीने हाच मुद्दा न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या शोधाला आणि इतर कुठल्याही वैज्ञानिक शोधाला लागू होईल!)

वरील उदाहरणं प्रातिनिधिक म्हणावीत अशी आहेत. त्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर/आक्षेपांवर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने मुख्य मुद्दा ‘संपूर्ण, सुसूत्र खुलाशा’चा आहे. म्हणजे असं की हे जग, आपण सजीव ही ईश्वराची निर्मिती आहे हे सुलभ स्पष्टीकरण मान्य करण्यामागे ‘संशोधकीय आळस’ आहे हे मान्य केलं तरी दुसऱ्या बाजूने पाहता, सर्व सजीव उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून लक्षावधी वर्षांचा प्रवास करत विशिष्ट शारीरिक-मानसिक अवस्थेत पोचले याचंही समजेल असं स्पष्टीकरण सर्वसामान्य लोकांपुढे सातत्याने आणलं गेलेलं नाही. (यातले ‘समजेल असं’ आणि ‘सातत्य’ हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत). आपण जर धर्मसंस्थेचा विचार केला तर तिने गेली हजारो वर्षं आपल्या ‘सुलभ स्पष्टीकरणां’नी लोकांची मनं काबीज केली आहेत. (आजची परिस्थिती तर कमालीची गंभीर आहे. बहुसंख्य लोकांची सारासार विवेकबुद्धीदेखील धर्मश्रद्धेच्या अतिरेकी माऱ्याने पुरती पांगळी केली आहे. अशा स्थितीत ‘संशोधकीय’ बुद्धी’ तर फार दूरची गोष्ट आहे). अर्थात धर्मसंस्थेचा क्रमशः उदय आणि क्रमशः विकास यात केवळ विश्वाची उत्पत्ती हाच एक विषय हाताळला गेलेला नाही. मानवसमूहाला नैतिक आचरणाची चौकट देण्याचं कामही धर्मसंस्थेने केलं. महत्त्वाचं म्हणजे जैविक विकासक्रमात माणसाला पडू लागलेल्या अस्तित्वविषयक प्रश्नांना हाताळण्याचं काम तिने केलं. यातून धर्मसंस्था तिच्या हजारो वर्षांच्या प्रवासात, मानवी बुद्धीच्या मर्यादांच्या बळावर ज्या भक्कमपणे उभी राहिली त्या तुलनेत दोनशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला भक्कमपणे उभं राहायला वेळ लागणार हे सरळ आहे. शिवाय उत्क्रांती हा श्रद्धेचा विषय नसून अभ्यासाचा विषय असल्याने तो अधिक व्यापक, म्हणून अधिक अवघड आणि म्हणून कमी ‘रंजनमूल्य’ असलेला आहे. आणि याच मुद्द्यावर विस्ताराने काही म्हणावंसं वाटतं.

सामर्थ्य आहे ‘गोष्टी’चे…

‘रंजनमूल्य’ हा शब्द ज्ञानाच्या संदर्भात कदाचित थोडा विरोधाभासी वाटू शकेल; पण आपण ज्या विषयाबाबत बोलतो आहोत त्या संदर्भात आणि सर्वसामान्य लोकांना या विषयाबाबत आस्था निर्माण व्हावी या संदर्भात ‘रंजन’ हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. माणसाच्या प्रवासात ‘गोष्ट’ हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाला पडणारे अनेक प्रश्न धर्म, अध्यात्म, गूढवाद या कक्षेतून विज्ञानाच्या कक्षेत येण्याआधी हजारो वर्षं माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र आदि कलांमधून सतत सांगितल्या गेलेल्या ईश्वरी गोष्टींनी झाली आहे. याखेरीज माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या जैविक-सामाजिक प्रवासात उपयोग झालाच; पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे कशा उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या लोकप्रिय ‘सेपियन्स’मधलं विवेचन अनेकांनी वाचलेलं असेल.

ईश्वर ही संकल्पना निर्माण झाल्यापासून आजवर तिने माणसाचा पिच्छा सोडला नाही. या संकल्पनेबाबत कितीही तार्किक युक्तिवाद केले तरी बहुसंख्य माणसं ही संकल्पना टाकून देऊ शकलेली नाहीत. ‘व्हाय गॉड वोन्ट गो अवे – ब्रेन सायन्स अँड द बायॉलॉजी ऑफ बीलिफ’ या पुस्तकात यूजीन डाक्विली आणि अँड्र्यू न्यूबर्ग यांनी ईश्वर ही संकल्पना मानवी मेंदूत ‘हार्ड-वायर्ड’ झाली असल्याचं काही प्रयोगांद्वारे दाखवून दिलं आहे. मानवी मेंदूत ही संकल्पना घट्ट रुजली आणि प्रचंड तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरदेखील ती टिकून राहिली याचा मेंदूविज्ञान आणि सामाजिक-आर्थिक प्रभावांच्या अभ्यासाच्या साहाय्याने आज उलगडा होऊ शकतो. पण यातला एक महत्त्वाचा घटक ‘रंजन’ हादेखील आहे. येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, राम-कृष्ण-शंकर-विष्णू आदि सर्व देव-देवतांच्या, प्रेषितांच्या कथांमध्ये फार मोठं रंजन आहे. ईश्वर, प्रेषित ही संकल्पना माणसाच्या चिंतनापेक्षाही रंजनात जास्त प्रमाणात ठाण मांडून बसलेली आहे. कारण ती एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. थरारकता आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हेच आपलं भागधेय आहे हे मनुष्य मान्य करतो आणि हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं.

या पार्श्वभूमीवर निरीश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांनीच ‘सजीव उत्क्रांती’ हा विषय रंजकपणे, सांस्कृतिक अवकाशात प्रवेश करत कसा सांगता येईल यावर विचार करणं आवश्यक आहे. ‘मानवी उत्क्रांती हा एक अवघड विषय आहे, तो आपल्याला झेपणारा नाही’ अशी सर्वसामान्य लोकांची धारणा असल्याने आणि या विषयाचा अभ्यास करण्याइतपत वेळ हाताशी नसल्याने, तशी वृत्तीही घडलेली नसल्याने अशा मनोवस्थेतील लोकांना आपण कथा, नाटक, चित्रपट, संगीत, चित्र, डिजिटल माध्यमावरील काही कल्पक प्रयोग अशा काही मार्गांनी आकर्षित करून घेऊ शकू का यावर विचारमंथन होणं आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीवर आज मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मराठीतही पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण ते एका वर्गापुरतं मर्यादित आहे. आणि या विषयाबाबत लोकांच्या मनात अनास्था, भीती असं बरंच काही आहे. त्यामुळे इथे गरज आहे तो कल्पक ‘योजकां’ची. एका बाजूला उत्क्रांतीविषयक पुष्कळ ज्ञान उपलब्ध आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्याशी कधीच संबंध न आलेला एक मोठा मानवसमूह आहे. ज्यांना ज्ञान आहे ते स्वतः कदाचित या ज्ञानातून कल्पकपणे, सोप्या, सुटसुटीत पद्धतीने एकेक विषय लोकांपुढे काढून ठेवू शकणार नाहीत. हे काम ‘योजकां’ना करावं लागेल.

‘इंटेलिजंट डिझाइन’चं आव्हान

उत्क्रांतीचा सिद्धांत सहजपणे पचनी न पडण्याचं एक प्रमुख कारण सजीवांच्या शरीररचनेतील कमालीची गुंतागुंत हेही आहे. एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांत होत होत आजचं अद्भुत वाटावं असं मानवी शरीर निर्माण झालं – त्यात डोळ्याच्या जागी डोळा बसला, कानाच्या जागी कान बसला, हृदय-फुफ्फुस-यकृत-मूत्रपिंड-आतडी इ. अवयव उत्क्रांत झाले, रक्त-मांस-स्नायू निर्माण झाले, मेंदू नावाचा एक थक्क करणारा अवयव उत्क्रांत झाला या सगळ्याची नीट फोड करून, तुकड्या-तुकड्यात समोर मांडून, त्यातून एका संपूर्ण शरीराची निर्मिती कशी झाली हे समजावून सांगणं आणि तेही रंजकपणे सांगणं हे विलक्षण आव्हानात्मक काम असणार आहे. पण ते झाल्याखेरीज अधिकाधिक लोकांना उत्क्रांतीच्या अभ्यासाकडे, वैज्ञानिक विचारपद्धतीकडे वळवणं अवघड ठरेल.

‘ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेचच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हे मान्य करणाऱ्यांना ईश्वराने सजीव कसे निर्माण केले, सृष्टी कशी निर्माण केली याचं क्रमवार उत्तर देता येणार नाही; पण ज्याअर्थी हे सगळं दिसतं आहे त्याअर्थी हे कुणीतरी निर्माण केलं आहे हे तार्किकच आहे असा त्यांचा विश्वास असतो. ‘इंटेलिजंट डिझाइन’च्या पुरस्कर्त्यांकडून मांडला जाणारा घड्याळजीचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. – एका निर्जन बेटावर जर कुणाला एक घड्याळ सापडलं तर ते तयार करणारा घड्याळजी कुठे ना कुठेतरी असणार हे सरळच आहे. त्याच न्यायाने ज्याअर्थी सृष्टी आहे त्याअर्थी सृष्टीचा निर्माता कुठे ना कुठे असलाच पाहिजे! आता या सिद्धांतातली अडचण अशी की ते विशिष्ट घड्याळ कुणी तयार केलं आहे हे माहीत नसलं तरी घड्याळ ही वस्तू कुणा मनुष्यानेच तयार केलेली आहे हे आपल्याला माहीत असतं. एखाद्या घड्याळजीला आपण भेटलेलो असतो. त्याच्याशी बोललेलो असतो. पण सृष्टीच्या निर्मितीला ते लागू होत नाही. सृष्टीच्या निर्मात्याला कुणीच भेटलेलं नाही. तिच्याशी/त्याच्याशी कुणीच बोललेलं नाही. काही सिद्धपुरुषांना, योग्यांना साक्षात्कार झाले आहेत, त्यांना देवाचं दर्शन झालं आहे असं आपण ऐकतो. पण त्या दर्शनात देवाने सृष्टीनिर्मितीची प्रक्रिया सांगितली का? डोळ्याच्या जागी डोळा कसा बसला आणि मेंदूच्या जागी मेंदू कसा बसला हे सांगितलं का? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. (आणि देव जर बोललाच तर कुठल्या भाषेत बोलेल हा आणखी एक प्रश्न!)उत्क्रांतीच्या अभ्यासातून या प्रश्नांची सुसूत्र उत्तरं मिळावीत असा आग्रह धरला गेला तर त्यात काही वावगं नाही. (तशी उत्तरं मिळू शकतातच; पण मुख्य मुद्दा ‘कळण्या’चा आहे). ईश्वराबाबत ती/तो सर्वशक्तीमान असल्याने, तिच्या/त्याच्यापुढे आपण क्षुद्र असल्याने तिने/त्याने सृष्टीनिर्मितीचा खुलासा आपल्यापाशी करण्याचं कारणच नाही, ते आपल्या बुद्धीच्या कक्षेत येणार नाही अशी ईश्वरवाद्यांची भावना असू शकते. उत्क्रांतीच्या सिद्धांताची मात्र त्यातून सुटका नाही. आणि ईश्वरवाद्यांची अपेक्षा असली-नसली तरी एक ज्ञानशाखा म्हणून उत्क्रांतीने दिलेल्या अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं सुगम पद्धतीने लोकांसमोर मांडली जावीतच. मानवी उत्क्रांती हा प्रचंड गुंतागुंतीचा, डोक्याला शीण आणणारा प्रवास असला तरी यात अनेक चित्तथरारक (आणि अर्थातच प्रदीर्घ कालावधीचे) टप्पे आहेत. उदा. माणूस दोन पायांवर उभा राहिला किंवा कंठातून येणाऱ्या ध्वनीतून माणसाने शब्द विकसित केला हे अतिशय रोमांचकारक विषय ठरू शकतात. आपल्या शरीरातील विविध अवयवांची उत्क्रांती यात तर ठायी ठायी थरारकता असू शकते. आज हा अभ्यास पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. एका अर्थी तो ‘बंदिस्त’ आहे. त्याचं ‘माध्यमांतर’ करून तो लोकांपुढे आणला गेला तर लोक त्याकडे खेचले जाऊ शकतील. यूट्यूबसारख्या लोकप्रिय डिजिटल माध्यमातून आज ते काही प्रमाणात होतं आहे; पण तरी ईश्वरी कथा जशा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग झालेल्या आहेत तसं अद्याप या विषयाचं झालेलं नाही.

डार्विनची उलघाल

आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे, विश्वाच्या पसाऱ्याला प्रयोजन आहे, आपल्या कृतींचा हिशेब मांडणारी एक पारलौकिक शक्ती आहे हा धर्मश्रद्धेतून आलेला विचार माणसांना आधार देणारा ठरला आहे. उत्क्रांतीची दिशा जो मार्ग दाखवते त्या मार्गावर अशा आधाराला जागा नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अंगभूत असा अर्थ नाही, आपल्या असण्याला प्रयोजन नाही हे मान्य करून जीवनाचा हेतू आपला आपण शोधणं, या जीवनात आनंद निर्माण करणं, जीवनेच्छा जागी ठेवणं, निश्चित उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहणं शक्य आहे हे पटवून द्यावं लागेल. आणि यासाठी वर म्हटलं तसं कल्पक व्हावं लागेल.

‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ (संपादक – नंदा खरे, रवींद्र रु. पं.) या पुस्तकात विद्यागौरी खरे यांचा ‘संधिकाळातील घालमेल’ या शीर्षकाचा एक लेख आहे. या लेखात त्यांनी जीलियन बीअर लिखित ‘डार्विन्स प्लॉट्स’ या ग्रंथातील एक विधान उद्धृत केलं आहे – ‘क्रांती फक्त वैज्ञानिकांच्या मनात घडून चालत नाही. तिला संपूर्ण प्रामाण्य तेव्हाच लाभते जेव्हा त्याच संस्कृतीतील इतर माणसांच्या विश्वासातही क्रांतिकारक बदल घडतात’. खरे यांनी पुढे डार्विनने २२ मे १८६० रोजी ॲसा ग्रे यांना लिहिलेलं पत्र दिलं आहे. (हे पत्र ‘पँडिमोनियम’ या हंफ्री जेनिंग्ज लिखित ग्रंथात आढळतं). पत्र मुळातून अवश्य वाचावं. त्यात डार्विन लिहितो – सृष्टीची निर्मिती सुरचित नियमांमधून झाली असावी आणि बारीकसारीक तपशील – चांगला अथवा वाईट – भरण्याचे काम आपण ज्याला योगायोग (चान्स) म्हणतो त्यावर सोडण्यात आले असावे असे मानण्याकडे माझा कल आहे. या कल्पनेमुळे मला जराही समाधान मिळत नाही. विवेकवादी वृत्तीचा अंगीकार केल्यानंतर विज्ञानाच्या पलीकडच्या मानवी जाणिवांची धार बोथट झाल्याने कलांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता नष्ट झाल्याने डार्विनला वाटणारं दुःख त्याने नोंदवून ठेवलं आहे असं विद्यागौरी खरे लिहितात. त्यांनी ‘पँडिमोनियम’मधली डार्विनची नोंद उद्धृत केली आहे –माझे मन म्हणजे तथ्यांच्या प्रचंड साठ्यातून सामान्य नियम घडवणारे एक यंत्र झाले आहे. पण ह्याच्यामुळे मेंदूच्या ज्या भागात उच्च अभिरुचींचे केंद्र आहे त्याचा क्षय का व्हावा हे मला कळत नाही. ह्या अभिरुची नष्ट होणे म्हणजे आनंदाचा नाश होणे. ह्यामुळे बुद्धीला हानी पोचण्याची शक्यता आहेच; पण आपल्या स्वभावातील भावनिक वृत्ती दुर्बल बनून नैतिक व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होण्याचा धोकाही मोठा आहे.

माणूस उत्क्रांतीच्या वाटेने आज आहे तिथवर पोचला आहे हे मान्य केलं की त्याची भावनिक हतबलता, धर्मभोळेपणा, देवभोळेपणा, माणसाचा विवेक हरवणं या गोष्टीदेखील उत्क्रांतीच्याच आधारे समजून घेता येतील. आणि असं लक्षात येईल की ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडायच्या आधीपासून इंग्लंडमध्ये या विषयाबाबत लोकांमध्ये कुतूहल जागं होत असल्याची ‘पँडिमोनियम’ मधली उदाहरणं विद्यागौरी खरे यांनी वर उल्लेख केलेल्या त्यांच्या लेखात दिली आहेत. निरीश्वरवाद भारतीय परंपरेतही आढळतोच. यात चार्वाक तर आहेच; पण ‘अचेतन जडद्रव्यच मुळात आहे, चेतन जीव हा जडद्रव्याचाच विकार किंवा जडद्रव्याचीच कार्यरूप परिणती आहे, असे मत उपनिषदकाळापासून भारतात प्रचलित आहे’, ‘देहाहून निराळा, मृत्यूनंतर ज्याचे अस्तित्व राहते, असा आत्मा नाही असे जडवादी मत कठोपनिषदात सांगितले आहे’ असं ‘जडवाद’ या मराठी विश्वकोशातील नोंदीत म्हटलं आहे.

ईश्वरी अस्तित्वावर शंका घेणं ही काही अर्वाचीन घटना नाही. डार्विनने उत्क्रांतीच्या सिद्धांतामधून ही चौकट आणखी घट्ट केली आणि या अभ्यासाला आजवर न मिळालेली चालना दिली. मात्र ही वैचारिक दिशा सर्वसामान्य लोकांच्या मनाचा ठाव घेऊ शकलेली नाही. भारतासारख्या देशात आज धार्मिकतेचा रेटा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना उत्क्रांतीपुढील आव्हान मोठं आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रतिक्रियावादी न होता, धोरणी विचार करत सांस्कृतिक अवकाशात भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. धार्मिक राजकारणाने चिकित्सेचा अवकाश कमी कमी करत नेलेला असताना जडवादाचं, निरीश्वरवादाचं ‘व्यापक, लोकाभिमुख राजकारण’ कसं असावं यावर पुरेसा विचार व्हावा. ‘सांस्कृतिक अवकाशात प्रवेश’ ही या राजकारणाची पहिली पायरी ठरू शकेल.

utpalvb@gmail.com