गूगलनं आपलं माहितीविश्व व्यापलं, त्याला आता दोन दशकं उलटत असतानाच चॅट-जीपीटी हे नवतंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं हव्या त्या स्वरूपातलं उत्तर देण्याची अचाट क्षमता घेऊन ते आपल्या सेवेत दाखल झालं आहे..

डॉ. रवींद्र उटगीकर

US Navy HELIOS laser weapon
अमेरिकेच्या नव्या लेसर शस्त्राने वाढवली जगाची चिंता; काय आहे ‘हेलिओस लेसर वेपन’?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
three day b2b exhibition and conference vitafoods india 2025 held in jio world convention center
आयुर्वेदिक, पोषणपूरक उत्पादनांचे २०० अब्ज डॉलरच्या बाजारपेठेचे लक्ष्य
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
Thieves stole gold ornaments from a safe in a bungalow in Loni Kalbhor area Pune news
पुणे: पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला- लोणी काळभाेरमघील घटना
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
The helmet
२४५० वर्षे जुन्या अस्सल सोन्याच्या शिरस्त्राणाची चोरी; का आहे हे शिरस्त्राण महत्त्वाचे?

स्टीफन हॉकिंग म्हणत, ‘परिवर्तन अंगीकारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.’ जीवसृष्टीत मानवी जीव उठून दिसतो तो त्याच्या बुद्धीचा वापर करण्याच्या क्षमतेमुळे! आता हेच शस्त्र आपल्या शरीरापासून वेगळं करून, आपल्यासाठी वापरण्याचं तंत्र मानव विकसित करू लागला आहे. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स – एआय) असं नाव देण्यात आलं आहे. डिजिटल साधनं आणि संगणकनियंत्रित यंत्रमानवही आपल्यासारखीच बुद्धी वापरू शकतील, अशी अशक्यप्राय वाटणारी व्यवस्था या एआयने निर्माण केली आहे. चॅट-जीपीटी हा अशा एआयचा ताजा आविष्कार आहे. आपली बुद्धी विचारेल, अशा हरेक प्रश्नाची चुटकीसरशी, मुद्देसूद आणि सुसंगत उत्तरे देऊ शकणारी कृत्रिम बुद्धी म्हणून नुकताच हा आविष्कार आपल्या सेवेत दाखल झाला आहे.

डिजिटल तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा नवा टप्पा चॅटबॉट प्रणालीच्या स्वरूपातील आहे. लिखित अथवा वाचिक मानवी संवादाचं हुबेहूब अनुकरण हे चॅटबॉटचं प्राथमिक कार्य. चॅट-जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर- जीपीटी) हा सर्वात ताजा आणि नावीन्यपूर्ण बॉट आता या क्षेत्रात खळबळजनक क्रांती करू पाहत आहे. सॅन फ्रान्सिस्कोस्थित ओपन एआय या कंपनीने तो उपलब्ध करून दिला आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये प्रसृत केलं गेलेलं हे तंत्रज्ञान अवघं सायबरविश्व व्यापण्याच्या दिशेनं झपाटय़ानं पावलं टाकत आहे.

चॅटबॉटची पार्श्वभूमी

जीपीटीमुळे बॉट हा शब्द अचानक सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा ठरत असला, तरी ही प्रणाली काही अगदी नवी नाही. २०१६मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने या नावाचा बॉट तयार केला होता आणि अगदी अलीकडे, ऑगस्ट २०२२मध्ये मेटा कंपनीने ब्लेंडरबॉट नावाची प्रणाली प्रसृत केली होती. परंतु या प्रणाली सर्वमान्य ठरल्या नाहीत. चॅट-जीपीटी मात्र तशी मान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

ओपन एआय कंपनीची स्थापना सॅम आल्टमन, इलॉन मस्क आदींनी २०१५मध्ये केली. चॅट-जीपीटी प्रसृत होऊन पाच दिवस उलटले नाहीत, तोच या प्रणालीने दहा लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला. प्रश्नकर्त्यांचा हेतू जाणून त्यानुरूप उपयुक्त, सत्याधारित व निर्धोक उत्तर देणं हे चॅट-जीपीटीचं वैशिष्टय़. अनेक ज्ञानशाखांतील प्रश्नांवर तपशीलवार आणि मुद्देसूद उत्तरे देण्याची क्षमता या प्रणालीत आहे.

चॅट-जीपीटी ३.५ ही याची सर्वात ताजी आवृत्ती. आंतरजालावरील सर्व माहिती आणि संकेतनांचा (कोडिंग) साठा पुरवून ही प्रणाली सेवासज्ज करण्यात आली आहे. चॅट-जीपीटी ३.० आवृत्तीविषयी स्टॅनफोर्ड विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, १७५ अब्ज परिमिती आणि ५७० गिगाबाइट एवढी आशय स्वरूपातील माहिती यांच्या पुरवठय़ातून ही प्रणाली घडली. त्यामुळे कोणत्याही चौकशीचे समर्पक उत्तर देण्यास ती सिद्ध झाली.

चॅट-जीपीटीचा वापर

चॅट-जीपीटी सध्या वापरकर्त्यांसाठी मुक्त उपलब्ध आहे. या नव्या संशोधनाचा आढावा घेण्याच्या हेतूने ते नि:शुल्क ठेवण्यात आले आहे. संगणकीय संकेतन लिहिणे आणि त्यातील दोष शोधून दूर करणे असो की गाण्याला चाल देणे असो, हरेक अपेक्षेची पूर्तता चॅट-जीपीटी करू शकते. ग्राहकसेवेसाठीही ही प्रणाली तत्पर आणि अचूक प्रतिसाद देऊ शकते. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं व सेवा या ग्राहकांनुरूप घडवणे आणि सुधारणे सुकर होणार आहे. विक्रीपश्चात सेवा हे आता महत्त्वाचं क्षेत्र ठरत आहे. कमी साधनस्रोतांतून, परवडणारी आणि तरीही परिणामकारक ग्राहकसेवा पुरवणाऱ्या बॉटकडे कंपन्यांचा कल वाढत आहे. चॅट-जीपीटी हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चॅट-जीपीटी प्रोफेशनल नावानं ही प्रणाली उपलब्ध होईल. त्यातून ओपन एआय कंपनीला २०२३मध्ये २० कोटी डॉलरचे उत्पन्न अपेक्षित आहे.

चॅट-जीपीटीच्या मर्यादा

चॅट-जीपीटी प्रणालीवरील माहिती संचय आणि माहिती प्रसारण दोन्ही मानवी सहभागातूनच साकारत आहे. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला किंवा मानवी सहयोगाला चॅट-जीपीटी भविष्यात पर्याय ठरेल काय, या प्रश्नाचे उत्तर तूर्त तरी नाही, असेच द्यावे लागेल. ही प्रणाली अद्याप विकसनाच्या प्रगत टप्प्यावर आहे. काही वेळा वरकरणी स्वीकारार्ह वाटावीत अशी, परंतु सदोष किंवा असमंजस स्वरूपाची उत्तरेही या प्रणालीकडून मिळू शकतात. ज्या माहितीसाठय़ाचं प्रशिक्षण तिला दिलं गेलं आहे, त्याच आधारे ती प्रतिसाद देते.

कोणत्याही नवतंत्रज्ञानाच्या समाजावरील दुष्परिणामांची चर्चा होणे स्वाभाविक ठरते. परंतु क्रूर, बीभत्स किंवा अन्य कोणताही सामाजिकदृष्टय़ा हानिकारक आशय उपलब्ध होणार नाही, अशी व्यवस्था या प्रणालीच्या निर्मात्यांनी केली आहे. उदाहरण द्यायचे, तर स्फोटकांची निर्मिती कशी करावी, या प्रश्नावर चॅट-जीपीटीकडून माहितीपर प्रतिसाद मिळणार नाही, हे दिलासादायक म्हणावे लागेल. दुसरीकडे, २०२१नंतरच्या घडामोडींसंबंधी या प्रणालीला मर्यादित माहितीचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. त्यामुळे अद्ययावत किंवा ताजा प्रतिसाद अपेक्षित असल्यास, सध्याच्या आवृत्तीकडून तरी तशी अपेक्षा ठेवता येत नाही.

चॅट-जीपीटीमुळे ज्ञानक्षेत्रातील मनुष्यबळाच्या मागणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं मत अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी ही प्रणाली प्रसृत झाल्यानंतर लगेचच व्यक्त केलं आहे. उदाहरण द्यायचं, तर भविष्यात ही प्रणाली सर्च इंजिनांची जागा घेऊ शकली, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये कार्यरत मनुष्यबळाची मागणी कमी होऊ शकते.

चॅट-जीपीटीचं भवितव्य

चॅट-जीपीटी म्हणजे भविष्यातलं गूगल असं म्हटल जातं. आजवरची या बॉटची प्रगती पाहता, ते अशक्य आहे, असं म्हणणं या टप्प्यावर तरी धाडसाचं ठरेल. ते क्षितिज अजून दृष्टिपथात नसलं, तरी सर्च इंजिन आणि बॉट दोन्ही एका प्रणालीत उपलब्ध होऊ शकते.

चॅट-जीपीटी सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अझूर क्लाउडवरून कार्यरत आहे. बिंग हे मायक्रोसॉफ्टचं स्वत:चं सर्च इंजिन. जीपीटीचा वापर करून बिंगमध्ये सुधारणा करण्याचा मायक्रोसॉफ्टचा इरादा आहे. जीपीटी ४.० ही या प्रणालीची पुढची आवृत्ती येत्या मार्चपर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्याचा गूगलच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्टला आधार मिळू शकतो. चॅट-जीपीटीची क्षमता वाढवण्यासाठी या प्रणालीला प्रशिक्षण देणारा परमसंगणक ओपन एआय आणि मायक्रोसॉफ्ट यांनी विकसित केला आहे. ओपन एआयचं तंत्रज्ञान वर्ड, पॉवर पॉइंट, आउटलुक अशा आपल्या प्रणालींमध्ये समाविष्ट करण्याचाही मायक्रोसॉफ्टचा इरादा आहे.

ओपन एआयच्या तीरातून गूगलच्या वर्मी बाण मारण्याचा मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे. परंतु गेली सुमारे दोन दशकं आंतरजालावर मक्तेदारी गाजवणाऱ्या गूगलनंही या स्पर्धेला पुरून उरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनीनं आपले संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांना त्यासाठी साद घातली आहे. २०१९मध्येच कंपनीतील जबाबदाऱ्यांतून मुक्त झालेल्या या दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक धोरणात सहभाग घ्यायला सुरुवातही केली आहे.

चॅट-जीपीटीच्या निमित्तानं कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात सहज प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केली आहे. दावोसमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला याच चॅट-जीपीटीने व्यापलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गमतीचा भाग म्हणजे या तंत्रज्ञानात पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्या मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या दोन्ही कंपन्यांचे सध्याचे प्रमुख सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई हे भारतीय आहेत!

स्वजननक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय) हे भविष्यासाठीचं तंत्रज्ञान ठरणार आहे. आपला उद्याचा इंटरनेटचा वापर कसा असेल, हे त्यावर अवलंबून असेल. चॅट-जीपीटी आपल्याला त्या दिशेने नेणार आहे. मानवी बुद्धिमत्तेवर मात करू शकणारं ते दुधारी अस्त्र ठरण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. परंतु तंत्रज्ञानाबाबत अशी भीती व्यक्त केली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. तूर्त तरी, माहितीसाठय़ाच्या जंजाळातून नेमक्या मुक्कामी पोहोचवणारा जादूई दिवा म्हणून सकारात्मकतेनेच त्याकडे पाहता येईल. त्यामुळे, या तंत्रजालात ‘गूगल करून’ माहितीस्फोटात स्वत:ला हरवून घेण्याला कंटाळला असाल, तर थोडे ‘चॅट -जीपीटी’ करूनही पाहायला हरकत नाही. पर्यायांच्या जंजाळातून बाहेर काढून ही प्रणाली तुम्हाला नेमक्या मुक्कामी नक्की पोहोचवेल!

Story img Loader