– अमोल मिटकरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुष्पा २ (हिंदी)चा विक्रम तोडूत छावा चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत तब्बल १५० कोटी रुपयांची कमाई केली असली तरी, आणि दिग्दर्शकाने एक उत्तम कथानक, उत्तम कलावंत, उत्तम संगीत दिग्दर्शन यांचा मेळ घालून प्रेक्षकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराज पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी, अलीकडे गणोजी शिर्के यांच्या वंशजानी घेतलेल्या आक्षेपानंतर चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता पूर्वीसारखा भालजी पेंढारकरांच्या चित्रपटनिर्मितीचा काळ नसल्यामुळे, चित्रपट पाहून गूगल/ विकिपीडियावर लिहिणारी वाचणारी युवा पिढी सध्या ज्ञानपिपासू वृत्तीने संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या पलीकडे या इतिहास संशोधनाला आता नव्याने सुरुवात झाली आहे. ‘छावा’चे हेच फलित समजायला हरकत नाही.
यापूर्वी शिवाजी महाराजांपेक्षाही अधिक संभाजी महाराजांवर नाटक व चित्रपट निर्मिती झाली.कथानके, नाटके, बखरी, कथा- कादंबऱ्या, पोवाडे या माध्यमातून ’मदिरा -मदिराक्षीच्या नादात होरपलेला, विवेक सुटून क्रूर बनलेला, शिवरायांच्या पवित्र वारशास कलंकित करणारा, उग्रप्रकृती, दुराचारी, व्यसनी, धर्मरक्षक….’ अशा नाना प्रकारच्या प्रतिमा जनमानसात रुजविण्याचे काम अनेक कथाकारांनी केले. डॉ. कमल गोखले यांनी कैकयीसारखी साकारलेली सोयराबाई असो किंवा राम गणेश गडकऱ्यानी राजसंन्यास मधून साकारलेले व्यसनासक्त- पण नंतर उपरती होणारे- शंभूराजे असोत… सगळे सारखेच. राजसंन्यास, राजमस्तकाचा आदेश, बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते… यांनी अशा कपोलकल्पित प्रतिमा चांगल्याच रंगविल्या! शिवाय थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, यांनी शंभुराजेंची प्रतिमा ‘रोमॅण्टिक हीरो’ म्हणून, तर अप्रकाशित राहिलेल्या राकेश दुग्लजच्या ‘संभाजी १६८९’ ने धर्मरक्षक म्हणून शंभुराजेचा इतिहास चितारला. या पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांची ‘छावा’ ही कादंबरी जरा निराळी ठरली, इतकेच.उतेकरांच्या छाव्याने विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्यामार्फत शंभुराजे व येसुबाई या व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्या असल्या तरी शिवाजी सावंताच्या ‘छावा’चा (कादंबरीचा) आधार घेतल्याने शंभु चरित्राला त्यांना शंभर टक्के न्याय देता आला नाही, हेही खरे! अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब हा या चित्रपटाचा एकमेव खलनायक ठरत नाही. या चित्रपटाने औरंगजेबासोबत आणखी दोन खलनायक प्रेक्षकांसमोर ठेवले आहेत, त्यातील पहिल्या सावत्रआई सोयराबाई, व दुसरे गणोजी शिर्के!इतिहास हा तर्कावर नाही तर पुराव्यावर सिद्ध करावा लागतो. गणोजी शिर्केंच्या वंशजानी पत्रकार परिषद घेऊन उतेकरांना इशारा देताच उतेकर भानावर आले व त्यांनी शिर्केची माफीही मागितली, याचा अर्थ ते चुकले! म्हणजेच गणोजी शिर्के फितूर असल्याचा कुठलाच पुरावा उतेकरांकडे नव्हता. यानंतर एक दुसरा प्रश्न परत निर्माण होतो मग इतिहासातील फितुर कोण? खलनायकाच्या बाबतीत कथानक चुकले, हे दिग्दर्शक मान्य करतो मात्र खरा खलनायक कोण हे दिग्दर्शकाला माहीत नाही. चित्रपट सुपरहिट करण्याच्या नादात त्यांनी सत्य शोधायची तसदी ही घेतली नसल्याचे दिसते.
आता इतिहासाचे पुरावे याबाबत काय सांगतात ते पाहू. जेधे शकावली हे इतिहासातील महत्त्वाचे साधन समजले जाते. त्यामधील नोंद अशा प्रकारे आहे, ‘कार्तिकमासी (ऑक्टो.नोव्हें. १६८८) कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले… कलश पळोन खिलणियावरी (खेळणा किल्ला) गेला…’ (संदर्भ जेधे शकावली ) कलशाच्या पराभवाची वार्ता समजताच संभाजी महाराज रायगडावरून धावतच खेळण्याकडे आले व त्यांनी शिर्केंशी लढाई करून त्यांना पळवून लावले… याखेरीज आणखीही एक नोंद आहे ती अशी- ‘ मार्गसीर्ष मासी (नोव्हें. डिसें. १६८८) संभाजी राजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हादपंत व सरकारकून व कित्येक लोकास धरिले…’ दक्षिण कोकणात शिर्क्यांनी उठाव करून कवी कलशाशी जो झगडा केला, त्यामध्ये प्रल्हाद निराजी व इतर सरकारकुनांनी शिर्क्यांना सहाय्य केले असले पाहिजे. कारभारातील कवी कलशाचा उदय व महत्त्व न साहवून प्रल्हाद निराजी आदी सरकारकुनांनी त्याचा परस्पर काटा निघाला तर उत्तमच, अशा भावनेने शिरक्यांना मदत केली असावी. संभाजी महाराजांना याची दखल घेऊन त्यांना कैद करावे लागले. औरंगजेबाचे एवढे मोठे संकट सीमेवर उभे असताना ही शहाणी म्हणवली गेलेली मंडळी असा अंतस्थ कलह माजवत होती हे पाहून आश्चर्य वाटते. ( संदर्भ छ.संभाजी एक चिकित्सा पृ.क्र.११९ लेखक डॉ.जयसिंगराव पवार )
पुढे इतिहास संशोधक असेही म्हणतात या सुमारास पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या खेळण्याच्या (विशाळगड) परिसरात संभाजी महाराजांचा शिर्केंशी झगडा होऊन त्यात शिर्केंचा पराभव झाला. हे शिर्के तेथून पळून मुकर्रबखानाच्या छावणीत आश्रयास आले. औरंगजेबाची हेर यंत्रणा प्रचंड होती. बादशहा संभाजीराजांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होता.त्याला असे समजले की शिर्क्यांच्या परिपत्यासाठी संभाजी राजांनी रायगड सोडला आहे व तो खेळण्याकडे आला आहे तेव्हा त्याने तातडीने आपल्या वजीरास मुकर्रब खानासाठी आदेश पाठविला.इथे शिर्के इतिहासकारांच्या नजरेत संशयाच्या भोवऱ्यात असले तरी खाफीखान लिहितो की, खुद्द मुकर्रबखानाने आपले विजेसारखे चपळ व खरे बोलणारे हेर कोल्हापूर भागात सर्वत्र पसरून ठेवले होते, याचा अर्थ फितुरीची नोंद व पुरावा दिसत नाही हे स्पष्ट होते.शंभुराजांच्या सावत्रआई सोयराबाई हे छाव्यातील आणखी एक विलन ठरवलेले पात्र! मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरीने व त्याचाच आधार घेतलेल्या लेखिका डॉक्टर कमल गोखलेंनी सोयराबाई व शंभुराजे यांचे अतिरंजित वितुष्ट रंगविले. संभाजी राजांनी सोयराबाईंना भिंतीत चिणून मारले असा आरोप बखरकारांनी केला. परंतु शिवरायांच्या मृत्यूनंतर दीड वर्ष सोयराबाईसाहेब जिवंत होत्या हे इतिहास संशोधकानी सिद्ध केले. अणुपुराणात रायगडावर येताच संभाजीराजांनी सोयराबाई व आपल्या तीन माता यांचे सांत्वन केल्याचे नमूद आहे तर इंग्रज बातमीपत्रात His Younger brother he used with all kindness and countinues as yet so to do..(12 July 1680) अर्थात राजाराम महाराजांना संभाजीराजांनी फार प्रेमाने वागविले अशी बातमी इंग्रजी कागदपत्रात नमूद केली आहे.
छावा चित्रपटाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला असला तरी इतिहासातील काही प्रश्न अनुत्तरित राहातात : गणोजी शिर्के व शिर्के बंधू फितूर नव्हते, तसे इतिहासातील पुरावे ही नसतील तर मग शेवटच्या क्षणी दगा कुणी दिला? संगमेश्वराच्या कैदेपासून बहादूरगड व तुळापूरच्या माळरानापर्यंत अगदी शेवटी मरण यातना सहन करेपर्यंत ४० दिवसात राजांना सोडविण्याचा प्रयत्न का झाला नाही? रायगडावर मुकर्रब खान चालून आला तेव्हा महाराजांच्या सोबत कोण कोण होते? हत्येनंतरचा महाराष्ट्र कसा धुमसत राहिला?या व अशा अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून छावा ने दणकावून कमाई केली असली तरी शंभुराजे ३५० वर्षानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. वढु तुळापूर व बहादूर गडावर घडलेला प्रसंग प्रत्येकाचे डोळे पाणवत असला तरी तरी उतेकरांनी खरा खलनायक मात्र लपविला आहे. विकी कौशलच्या रूपाने हिरो परफेक्ट मिळाला असला तरी खलनायक चुकला हे नक्की! आता नवीन पिढीच त्या खलनायकाचा शोध घेईल अशी अपेक्षा.
(लेखक ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रवक्ता असले, तरी या लेखातील मते वैयक्तिक आहेत.)