युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटवणाऱ्यांमध्ये लोकराजे शाहू महाराज (जन्म २६ जून १८७४, मृत्यू ६ मे १९२२) यांचे नाव घ्यावे लागेल. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते. ‘एक वेळ गादी सोडून देईन, पण बहुजनोद्धाराचे कार्य सोडणार नाही,’ असे म्हणणारे ते दुर्मिळ राजे होते.

छत्रपती शाहू महाराज यांनी जे विचार आयुष्यभर जपले, त्या विचारांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी आपले राजेपण पणाला लावले. ते पुरोगामी आणि परिवर्तनवादी होते. मात्र आज त्यांच्या याच विचारांना तडे दिले जात आहेत. जात आणि धर्माचा आधार घेऊन समाज जीवन कलुषित करण्याचा प्रयत्न अत्यंत वेगाने होतो आहे. जात्यांधतेला व धर्मांधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही शाहू महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. या लोकराजाचे १५० वे जन्म वर्ष साजरे होत असताना त्यांच्या विचारांची प्रस्थापना करून त्या पद्धतीने समाज घडवणे महत्वाचे आहे.

loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
Telecom Act 2023,
आजपासून लागू होणाऱ्या ‘टेलिकॉम कायदा- २०२३’तील तरतुदी आणीबाणीचीच आठवण देणाऱ्या ठरतील…
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
representation of women in the lok sabha after general elections 2024
अग्रलेख: राणीचे राज्य…
loksatta editorial Akhilesh yadav samajwadi party grand victory in uttar Pradesh lok sabha election
अग्रलेख:  योगी आणि अखिलेश योग!

हेही वाचा – आजपासून लागू होणाऱ्या ‘टेलिकॉम कायदा- २०२३’तील तरतुदी आणीबाणीचीच आठवण देणाऱ्या ठरतील…

छत्रपती शाहू महाराजांना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे कुर्मी समाजाने २५ एप्रिल १९१९ रोजी ‘राजर्षी ‘ही पदवी दिली. तसेच शाहू महाराज प्रमुख पाहुणे असलेल्या ‘माणगाव’ परिषदेचेही हे शताब्दी वर्ष झाले. पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परिषदेचे अध्यक्ष होते. शाहूरायांच्या कोल्हापूर संस्थानातील ‘माणगाव’येथे २१ व २२ मार्च १९१९ रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली होती. फुले, शाहू व आंबेडकर ही विचारपरंपरा मानवतेच्या सूत्राने गुंफलेली आहे. माणगाव परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘पंडित’ आणि ‘विज्ञानाचे भूषण’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. तसेच अस्पृश्यांना ‘आपल्या जातीचा पुढारी करा’ असे आवाहनही केले होते. डॉ आंबेडकर यांना आपला पुढारी निवडल्याने ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत हा आशावाद व्यक्त केला होता. आपल्या या भाषणात त्यांनी करवीर संस्थानात अस्पृश्यांवर अन्याय करणारी हजेरीची पद्धत का नष्ट केली हे सांगून वेठबिगारी पद्धत नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला. अस्पृश्य वर्गाकरिता आपण केलेले प्रयत्न बाबुराव यादव यांनी छोट्याश्या पुस्तिकेद्वारे नोंदवून ठेवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली आपल्या संस्थानातील ५० टक्के जागा नोकरीसाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला होता. तसेच त्या भरल्याचा अहवाल दर तीन महिन्यांनी ते तपासत असत.

कुस्ती आणि शिकार यासाठी लागणारे शारीरिक सामर्थ्य, राजकारण आणि राज्यकारभार यासाठी आवश्यक मुत्सद्दीपणा, दूरदर्शित्व, योग्य माणसांची पारख, गुणग्राहकता, नाट्यकला यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती, धर्म व समाजसुधारणेसाठी लागणारी क्रियाशीलता, सत्ता व संपत्तीचा लोकोद्धारासाठी वापर करण्याची तळमळ, विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्यासाठी सर्व पावले उचलण्याची क्षमता अशा अनेक गुणांनी राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्व समृद्ध बनले होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने २००३ सालापासून शाहूराजांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे कारण महाराजांनी समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचे कृतिशील कार्य केले.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्व लोकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्रीय एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता राखण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन आहे. यासाठी राज्यघटनेत मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समाविष्ट केली आहेत. ज्याची सुरुवात राजर्षिनी आपल्या राज्यकारभारात केली होती. शाहू राजांना समता अभिप्रेत होती आणि त्यासाठी ते आग्रही होते. त्यांची भूमिका स्पष्ट होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू राजांचे विचार एकमेकांस पूरक होते. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाबाबत म्हटले होते की, ‘समतावादाचे ध्येय सर्वांना समतेने वागवणे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय असताना सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही व्यक्तींना समानतेने वागवल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय.’ समानांमध्ये समता नांदू शकते. असमानांना समान मानणे म्हणजे विषमता जोपासणे होय. हे लक्षात घेतले की राजर्षी राज्यकारभाराची सूत्रे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी किती गांभीर्याने राबवत होते हे लक्षात येते.

कागलकर जयसिंगराव घाटगे यांचे ते सुपुत्र. १८८४ साली शाहू राजेंना दत्तक घेतले गेले. १८९४ साली त्यांनी प्रत्यक्ष राजसूत्रे स्वीकारली. या घटनेचे लोकमान्य टिळकांनी ‘दुग्धशर्करा योग’ असे वर्णन केले होते. त्यापूर्वी गाजलेल्या बर्वे प्रकरणात कागलकर जयसिंगराव घाटगे म्हणजे शाहूराजांचे वडील, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी एकमेकांना मदत केली होती. नंतर शाहू महाराजांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारून संस्थेला मोठी मदत केली होती. वेदोक्त प्रकरणात लोकराजे आणि लोकमान्य यांचे संबंध दुरावले. यात अर्थातच छत्रपती शाहू महाराजांची भूमिका बरोबर होती. पुढे महाराजांनी सनातन्यांशी दोन हात करण्यासाठी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही भरीव स्वरूपाचे काम केले. अनेक वसतिगृहे उभारली. फी माफी, विद्यावेतन, सक्तीचे शिक्षण, राजाराम कॉलेजची स्थापना याद्वारे शैक्षणिक चळवळ गतिमान केली. आपले संस्थान सर्वार्थाने सुजलाम -सुफलाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसराची जी समृद्धी दिसते आहे त्यात शाहूंराजांच्या दूरदृष्टीचा फार मोठा वाटा आहे. तसेच त्यांनी संस्थानाबाहेरही विपुल काम केले. अनेकांना मदत केली. विधायक कामे उभी केली.

हेही वाचा – असलं’ राजकारण चालणार नाही, हाच संदेश!

लोकराजे शाहू महाराजांनी राधानगरी धरणापासून ते चहाच्या मळ्यापर्यंत आणि लहानमोठ्या उद्योगधंद्यापासून ते दलित माणसाच्या चहाच्या टपरीपर्यंत फार मोठे सर्वांगीण विकासाचे काम केले. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतही त्यांनी मोठी कामगिरी केली. ‘राजर्षी शाहू : वसा आणि वारसा’ ही कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेली पुस्तिका इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीने डिसेंबर १९९७ मध्ये प्रकाशित केली होती. त्याच्या समारोपात कॉ. पानसरे लिहितात ‘ज्या सामाजिक समतेसाठी शाहू महाराजांनी संघर्ष केला, ती सामाजिक समता अजून प्रस्थापित व्हायची आहे. सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आपणास नव्या जोमाने, नव्या विचाराने चालू ठेवला पाहिजे. जयजयकाराच्या गदारोळात विचारांची पीछेहाट होऊ नये, प्रतिमांचे पूजन करताना विचारांचे दफन होत नाही, याची दक्षता घ्यावी. प्रतिमा पुजावी पण तेवढेच करून थांबू नये. महाराजांचा विचार समजून घ्यावा, पण तेवढेच करून थांबू नये, तर त्या विचारांआधारे कार्य करावे. राजर्षी शाहू महाराज हा एक कार्यकर्ता राजा होता हे लक्षात ठेवावे.” अशा या बुलंद व्यक्तिमत्वाच्या आणि दिलदार पण पहाडी काळजाच्या राजाचा पुतळा भारताच्या संसदेच्या प्रांगणातही १७ फेब्रुवारी २००९ रोजी दिमाखात उभा करण्यात आला आहे. लोकशाहीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात या राजाचा पुतळा उभा होतो यातच त्यांचे लोकराजेपण स्पष्ट होते. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी ते कालवश झाले. इतिहासाच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी उक्ती आणि कृती केलेल्या या लोकराजाला १५० व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत. प्रबोधिनीच्या वतीने गेली ३५ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)

prasad.kulkarni65@gmail.com