– प्रणाली धम्मानंद
आपल्या वयाची काही वर्षे लोटून गेली की, जुन्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात. अगदीच काही वर्षाच्या आतील असेल तर, त्या अगदी स्पष्ट आठवतात. पण फार वर्षांपूर्वीच्या जुन्या किंवा बालपणाच्या असतील तर त्या पुसट स्वरुपात आठवतात. पण आपण नीट निरखून पाहिले तर सगळ्याच गोष्टी आपल्याला लक्षात राहिलेल्या नसतात. लक्षात असतात त्या फक्त घटना. आणि याच घटना म्हणजेच त्यावेळी माणसाने घेतलेला अनुभव. त्यावेळी काहीतरी ठोस असे झालेले असेल म्हणून तो क्षण आपल्या मेंदूत कायमचा टिपून राहिला असेल. यात अनुभवाची यादी ही व्यक्तीपरत्वे नक्कीच वेगवेगळी असू शकते. परंतु आपण सगळ्या घटनांची गोळाबेरीज केली की, तर आपल्याला असे लक्षात येईल की, ही सगळी यादी मजा, मस्तीची जास्त प्रमाणात आहे. जसे एकत्र खाल्लेला डब्बा, मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, सहलीत, शाळेत, कार्यक्रमात केलेला दंगा – खोड्या, सरांनी दिलेला मार, लागलेला चटका, आई-बाबांनी दिलेला मार, आजीने सांगितलेल्या गोष्टी, केलेले लाड, त्यावेळी मिळालेल्या भेटवस्तू, प्रवासातील प्रत्येक क्षण, जंगलातील मज्जा किंवा खेळलेलो खेळ, इत्यादी इत्यादी. सगळे कसे अगदी ताजे असल्यासारखे वाटते नाही का? पण हेच का बरे लक्षात राहिले असेल? अभ्यास का लक्षात राहिला नसेल? शिक्षकांनी तर शिकवला होता ना? मग तो कुठे हरवला?
पाठ्यपुस्तक हे मज्जा म्हणून न शिकवता परीक्षेत येणाऱ्या उत्तरांसाठीची तयारी म्हणून राहिले. पाठ करणे आणि घोकंपट्टी करणे त्यात इतकेच होते. त्यामुळे उत्तर आले तर शाबासकी, नाही आले तर छडी. वर्षाअखेर अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा या भीतीपोटी मुलांवर झालेल्या कळत-नकळत शिक्षेमुळे त्यांना अभ्यास मित्र न वाटता शत्रू वाटतो. आमचे आजी आजोबा तिसरी, चौथी इतकेच शिकलेले होते. पण ते आम्हाला त्यांच्या वर्गातील जुन्या कविता, गाणी म्हणून दाखवायचे अगदी वयाच्या ऐंशीव्या वर्षी. इतकी वर्षे त्यांच्या शिक्षणाला होऊनसुद्धा ते का बरे विसरले नाहीत?
हेही वाचा – परीक्षा पे चर्चा, मुख्यमंत्र्यांचे पत्र नको; शक्य असल्यास एक शिक्षक द्या!
मुलांनी शाळेत यावे, शिक्षक शिकवतील ते शिकावे… अगदी निमूटपणे. किमान लिहिता वाचता यावे. या व्यतिरिक्त मुलांमध्ये शिकण्याची ओढ आणि स्वत:हून वेगळे कौशल्य असेल तर त्यावर भर देऊन त्यालाच पुढे घेऊन जाता येईल अशा पद्धतीची प्रणाली इथे कार्य करत नसेल तर ते आपल्याला तपासून बघायला हवे. मग नेमके हल्लीच्या शिक्षणातून काय हरवले आहे? हरवला आहे तो शिकण्यातील आनंद.
कारण, शिकण्यात आनंद वाटायला लागतो तेव्हा तो माणसाच्या स्मरणात कायमच घर करून बसतो. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण, प्रत्येक गोष्ट कशी करून पहायची, त्यात काय विज्ञान दडलेय हे जाणून घेण्याचे शिक्षण, गटागटात कसे काम करायचे असते या मूल्यांचे शिक्षण, एकमेकांशी हितसंबध कसे जपायचे, कशा भावना जपायच्या या आदर भावाचे शिक्षण, स्त्री पुरुष भेदाभेद यावर उघड चर्चा करून समतेच्या पातळीवरील शिक्षण, जात, धर्म प्रांत, लिंग, रंग, व्यंग, भाषा, गरीब – श्रीमंत या भेदाच्या पलीकडील माणूस बनण्यासाठीचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे एखाद्या बालकाला लहान मूल न समजता त्याला आजचा वर्तमान आणि भविष्यात तयार होणारा नागरिक म्हणून या सगळ्या बाबींचा अनुभव देणारे शिक्षण. कुणीतरी म्हटले आहे की, फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.
हेही वाचा – देशाच्या ‘विकास इंजिना’ला गती..
मूल लहान आहे. त्याला अजून काय कळतेय, हे वाक्यप्रचार आपल्याला थांबवावे लागणार. कारण आपल्याला लक्षात घ्यायला हव की, मूल लहान असले तरीसुद्धा त्याच्या मर्यादेनुसार त्याला उमगते आणि समजतेसुद्धा. मुले सगळ्यांचे निरीक्षण करत असतात. त्यांना हेसुद्धा माहीत असते की, आपण लहान आहोत आणि आपल्या छोट्या हातांनी व उंचीने, शरीरातील बळाने आपल्याला काही गोष्टी करता येणार नाही. परंतु ती आपल्या आजूबाजूचे अनुभव घेऊनच मोठी होत जातात. त्याच काळात त्यांना वाईट संगत मिळाली असेल तर मोठ्या मंडळींनो आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. चीन या देशात प्रत्येक नागरिक एकमेकांना वाकून आदराने नमस्कार करतो. आपल्या मुलांनाही ते इतरांप्रती आदर कसा व्यक्त करायचा ते शिकवतात. त्यांची ही शिकवण कुटुंबांपुरतीच मर्यादित न ठेवता तो त्यांनी जगण्याचा भाग करून घेतलाय. आपल्यालाही प्रत्येक मुलाला सुजाण नगरिक घडवायचे असेल तर आपल्या जगण्यामध्ये मूल्यांची अत्यंत गरज आहे. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीतील कार्यकारणभाव समजावून सांगणे. त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देणे. आपल्याला माहीत नसेल तर शोधून सांगणे, चूक बरोबर या नाण्यांच्या दोन्ही बाजू लक्षात आणून देणे, चांगल्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी प्रदान करणे गरजेचे वाटते. या सुवर्ण स्वप्नाकारिता आपल्याला बालकेंद्री होणे गरजेचे आहे. सामाजिकीकरणातील प्रत्येक घटकामध्ये बालकेंद्री वातावरणाची निर्मिती करायला हवी. समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये, त्याच्या शिक्षणामध्ये आनंद आणि माणूसकीचे बीज रुजवले तर पुढील पिढी अधिक समृद्ध होईल.
लेखिका ओवी ट्रस्टच्या संचालक आहेत.