प्रदीप गोखले
गेली ३०-३५ वर्षं वसुधैव कुटुंबकम् चं बरं चाललं होतं. मालाच्या स्वस्त उत्पादनाचा आणि वाहतुकीच्या मुक्तपणाचा फायदा सगळ्यांनाच मिळत होता. पण ट्रम्प आबा कुटुंबप्रमुख झाल्यापासून सगळी घडीच विस्कटली आहे…
आपल्या वसुधैव कुटुंबकम् चा कारभार नवीन ‘थोरले आबा’ डोनाल्ड ट्रंप यांनी दोनच महिन्यांपूर्वी हातात घेतला. तसं त्यांच्या हातात सत्ता येण्यापूर्वीपासूनच ते म्हणत होते ‘की बुवा आपल्या पैकी सावत्र, चुलत, मामे, मावस, आत्ते भावंडांनी आपल्या सख्ख्यांचा लईच गैरफायदा घेतलाय’. सख्खे म्हणजे त्यांची ती अमेरिकन पोरं. सावत्र म्हणजे चीनी, मेक्सिकन, कॅनेडियन. बाकी मामे, मावस, आत्ते भावंडांचा एक गट आहे ती म्हणजे युरोपीय. थोडी जरा बरी आहेत ती चुलत भावंडं (त्यात म्हणे भारतीय येतात). आल्या आल्या आबांनी फर्मान काढलं की आता इथून पुढे हे चालणार नाही. जेवढं तुम्ही मिळवाल तेवढंच आमची सख्खी अमेरिकन मिळवतील. आमच्या बरोबर व्यापारउद्योग करताना आम्हाला कमी आणि तुम्हाला जास्त असं इथून पुढं चालणार नाही. आधी आमच्या सख्ख्यांचं भलं आम्ही बघणार. त्यांचा धंदापाणी आम्हाला महत्वाचा आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देणं हे माझं पहिलं काम. गेले दोनतीन महिने यासाठी काय करायचं यावर आबांचा विचार चालू होता.
एप्रिलफूल नको म्हणून
आमचे थोरले आबा गेले दोन महिने सांगत होते की आता असा काही जमालगोटा देतो बघा की बाकी सगळी सुतासारखी सरळ येतील. आबांनी आधी ठरवलं की १ एप्रिलला जालीम औषध द्यायचं. पण काय आहे, आमच्या थोरल्या आबांचा स्वभाव थोडा विक्षिप्त आहे. त्यामुळे काही लोक त्यांना लहरी समजतात. ते आज काय म्हणतील त्यावर उद्या ठाम राहतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे काही लोकांनी त्यांची चेष्टा सुरू केली. १ एप्रिलला आबांचा जमालगोटा म्हणजे एप्रिल फूल असणार. हे आबांच्या कानावर गेलं. मग आबा म्हणाले की बरं तुम्हाला खोटं वाटतंय तर मग २ एप्रिलला डोस देतो.
टॅरीफचे चूर्ण
शेवटी २ एप्रिलला आबानी त्यांच्या टॅरीफ नावाच्या चूर्णाचा डोस दिलाच. आता हा डोस जास्तच जालीम होता. परिवारातल्या बऱ्याच जणांना नको ते सुरू झालं. पण गमतीचा भाग असा की बाकीच्यांच्या बरोबर त्यांच्या सख्ख्या अमेरिकनांना सुद्धा लागण झाली. त्यांच्या सख्ख्या मंडळींनी सुद्धा अंथरूण धरले. काहींच्या मते हे औषधच चुकीचे आहे. आपल्या पोरांचं कल्याण करण्याच्या नादात आबांनी बाकीच्या परिवाराला दिलेल्या औषधानं पसरवलेला रोग संसर्गजन्य असेल हे आबांच्या लक्षातच आलं नाही. त्यामुळं सध्यातरी त्यांच्याच घरातली मंडळी त्रासली आहेत. त्यांच्या शेअरबाजाराचा इंडेक्स एका दिवसात रक्तबंबाळ झाला. तसं गेल्या दोन महिन्यांपासून वसुधैव कुटुंबकम् मधल्या बऱ्याच जणांची नुसतं औषध देणार म्हटल्यापासून पोटं बिघडलीच आहेत. पण आबांना हे मान्य नाही. आबा म्हणतात थोड्या दिवसांसाठी कळ सोसावी लागेल पण हे आमच्या पुढच्या पिढीसाठी आवश्यक आहे. आमचा अमेरिकन मोठा झाला पाहिजे. त्याला ते ‘मागा’ म्हणतात.
३५-४० वर्षं बरं चाललं होतं
बघा, साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी आमच्या वसुधैव कुटुंबकम् मधल्या भावंडांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला होती. थोरल्या आबांचं गाव अमेरिका आणि त्यांचा एक सावत्र भाऊ रशिया यांच्यामधून विस्तव जात नव्हता. चीन नावाचा त्यांचा आणखी एक सावत्र भाऊ फार आतल्या गाठीचा. काय करतोय काय पत्ता लागायचा नाही (अजूनही त्याचा स्वभाव थोडासा तसाच आहे). गेल्या ३०-३५ वर्षांत आमच्या लक्षात यायला लागलं की आपापसात भांडून, आपल्यातच स्पर्धा करून काय उपयोग नाही. सगळ्यांचच नुकसान. त्यापेक्षा ज्याला जे जमतंय ते करू द्यावं, जिथे जे स्वस्तात उत्पादन होईल त्याला ते करू द्यावं आणि एकमेकांना मदत करून सगळ्यांचाच फायदा करून घ्यावा. तर १ जानेवारी १९९५ ला आम्ही एक संघटना स्थापन केली. त्याला WTO म्हणतात. थोडी खळखळ करत २००१ साली चीनसुद्धा त्या संघटनेत आला आणि सगळ्यांशी जरा मिळून मिसळून वागायला लागला. एकमेकांनी एकमेकांत मुक्त व्यापार करावा. निर्बंध, टॅरीफ यांचा कमीतकमी वापर करून एकमेकांतला व्यापारउद्योग सहकार्यानं करावा म्हणून संघटना काम करू लागली. काही भावंडांनी एकमेकांत करारही केले. एकूण काय मालाच्या स्वस्त उत्पादनाचा आणि वाहतुकीच्या मुक्तपणाचा फायदा सगळ्यांनाच झाला. तसं एकमेकांत कधीकधी खटके उडायचे पण अगदी वितुष्ट येईपर्यंत ताणलं जात नव्हतं. एकूण काय सारं काही बरं चाललं होतं.
३-४ महिने झाले, सगळं बिनसलंय
आमच्या अमेरिकेन कुळातल्या लोकांना डोनाल्ड ट्रम्पनी गेल्या वर्षभरात बिथरवून टाकलंय. म्हणजे तिकडे त्यांच्या कुटुंबप्रमुखाची निवडणूक लागली आणि त्यानी लोकांच्या मनात कायकाय भरवायला सुरुवात केली. त्यांना काय सांगितलं तर म्हणे ‘तुमचं शोषण झालंय. इतर भावंडांनी तुमचा गैरफायदा घेतलाय. तुमचा उद्योगधंदा बसवून आपला उद्योग धंदा कसा वाढेल ते बघितलंय. तुमच्या नोकऱ्या घालवून आपल्या पोराबाळांना नोकरीला लावलंय.’ पुढं म्हणाले ‘द्या मला निवडून आपल्या अमेरिकेला एक नंबरची करतो. आपल्याला लागणारं आपल्याच देशात बनवायचं’. अमेरिकन कुळातल्या लोकांना ते पटलं आणि ते त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून निवडून आले आणि अशा तऱ्हेने जानेवारीत डोनाल्ड ट्रंप आपल्या वसुधैव कुटुंबकम् चे ‘थोरले आबा’ झाले. चीन, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावर तर ते खार खाऊनच होते. आल्याआल्या त्यांना लई बोलले. बाकीच्याना पण टोमणे मारतच होते. बरं आबांचं असं आहे त्यांनी एखादी गोष्ट डोक्यात घेतली की ती त्यांच्या डोक्यातून काढून टाकणं अवघड. कोणाचा सल्ला घ्यावा वगैरे काही नाही. आणि मग २ एप्रिलला कारभार केला. त्यांच्यातलेच काही लोक आबांना सल्ला देत होते की आबा हे आपल्याला थोडं महागात पडेल. कदाचित आपल्याच अंगावर उलटेल. पण ते स्वत:ला ट्रंप कार्ड म्हणजे हुकमाचा एक्का समजतात. त्यांनी चूर्णाचा डोस दिलाच. सगळ्या वसुधैव कुटुंबकम् वर भीतीचं सावट पसरलंय. आता सगळं कुटुंबच नैराश्याच्या म्हणजे डिप्रेशनच्या गर्तेत सापडेल अशी भीती वाटू लागलीय.
आबांना घरचा आहेर
आता तुम्हाला वाटलं असेल की तुमची मंडळी थोरल्या आबांचं एवढं कसं ऐकून घेतात. तर तसं अजिबात नाहीय. ती सावत्र भावंडं शड्डू ठोकून उभी आहेत. काय आहे, कुटुंबात सगळे सारखे नाहीयेत. काही गरीब आहेत. काही अमेरिकेच्या मदतीमुळे मिंधे आहेत. काही काही दडपणाखाली आहेत. काहींना वाटतय आपलं आणि अमेरिकेचं नातं मित्रत्वाचं आहे, त्यामुळे ते जरा सबुरीने घेतायत. ते युरोपीय आहेत ते एकट्याने काही करण्यापेक्षा आपला गट करून काय करता येईल ते चाचपडून पाहतायत. काही जणांना असं वाटतंय की हे सगळं थोरल्या आबांच्या अंगलट येईल आणि आबा स्वत:च माघार घेतील. त्यांच्या अमेरिकन कुळातसुद्धा गृहकलह आहे. त्यांच्यातलीच काही विरोधी विचाराची मंडळी राहून राहून सांगतायत की आपापसातल्या या टॅरीफ वॉरमुळे अमेरिकेतच महागाई वाढेल. लोक काही घेण्याच्या मन:स्थितीत असणार नाहीत. मग मागणी कमी होईल. त्यामुळे उत्पादन कमी करावे लागेल. त्याचा परिणाम म्हणून नोकऱ्या जातील. आपणच कंगाल होऊ. पण आबा काही हे ऐकायला तयार नाहीत. त्यांचं स्वत:चं इकॉनॉमिक्स वेगळं आहे. काही जण त्याला उपहासाने ‘ट्रम्पोनॉमिक्स’ म्हणतात.
चीनचे टॅरीफास्त्र
आमच्या वसुधैव कुटुंबकम् मध्ये थोरल्या आबांच्याकडे डोळे वटारून बघणारा एकजण आहे त्याचं नाव चीन. त्यांचा आबा क्षि जिनपिंग. तो ‘अरे’ला ‘कारे’ म्हणणारा आहे. एकाचं ट्रम्प कार्ड तर दुसऱ्याची झिंग. आबांनी २ एप्रिलला दिलेल्या चूर्णाला उत्तर म्हणून १० एप्रिलला आपलं ‘टॅरीफास्त्र’ डागायचं त्यानं जाहीर केलंय. त्यामुळे मंडळी आता आणखीनच पिसाळलीत. सगळ्या कुटुंबात घबराटीचं वातावरण झालंय. ३०-३५ वर्षांची घडी आबांनी एका दमात विस्कटून टाकलीय. आमच्यातले काही जाणकार (त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणतात) सुद्धा म्हणू लागलेत ‘काय होईल सांगता येत नाही’. तिकडे ४ तारखेला वॉलस्ट्रीटवर ‘रक्ता’चे पाट वाहायला लागलेत. त्यांच्या कुळातल्याच काहींनी एक गणित मांडलय की त्यांच्याच अमेरिकन पोरांचे दोन दिवसांत शेअर बाजारात दरडोई २० हजार डॉलर गेलेत म्हणे. आता चीनने एकदा ‘जशास तसे’ म्हणायला सुरू केल्यामुळे आणखीही काही जणांना जोर चढेल. थोरले ट्रम्पआबा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. ते म्हणतात पूर्वीच्या बायडन आबांनी घालून ठेवलेला घोळ निस्तरण्यात सुरुवातीला काही त्रास होईल पण आपल्या अमेरिकन पोरांच्या भल्यासाठी हे कधी ना कधी करणं आवश्यक आहे.
आमच्या उपनिषदात एक श्लोक आहे
‘अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम् |
हे माझं, ते दुसऱ्याचं असा विचार कोत्या मनोवृत्तीचे करतात. उदार मनाचे लोक सगळी धरती हाच परिवार मानतात. थोरल्या ट्रंप आबांना हे कोण समजावून सांगणार?
माणसं परत पाठवतायत
तिकडे आणखी एक घोळ झालाय. थोरले आबा म्हणतायत ‘काहीकाही भावंडांची पोरं आमच्या अमेरिकन घरात बरीच वर्षं येऊन राहिली आहेत. आता त्यांचा भार आम्ही सोसणार नाही तेव्हा त्यांनी आपापल्या गावाला निघून जावं’. काहीकाहींच्या पोरांना तर डांबून गाडीत भरून त्यांच्या त्यांच्या गावाला नेऊन सोडलंय. तेव्हापासून वसुधैव कुटुंबकम् मधे वातावरण सगळं भयभीत झालंय.
आता वातावरण फार चिघळलंय. विषय फक्त पैशाच्या गणिताचा राहिलेला नाही. कोणीतरी ‘तुम्हीच थोरले आबा कसे?’ असं म्हणू लागलय. आमच्या वसुधैव कुटुंबकम् च्या घराचे जणू वासेच फिरलेत. आता जगन्नियंताच यातून वाचवेल कारण आबांच्या अमेरिकन कुळाचेच ब्रीदवाक्य आहे ‘In God We Trust’
(लेखक चार्टर्ड अकाउंटट आहेत.)
pradip.prajakta@gmail.com